ओंकार आदिनाथ काशिद
पुण्यातील एमपीएससी परीक्षार्थ्यांचे आंदोलन हा केवळ एका परीक्षेतील गैरप्रकाराचा संताप नाही; तो प्रतिनिधित्व, उत्तरदायित्व आणि तरुणांच्या राजकीय आवाजाचा प्रश्न आहे. विद्यापीठांतील थेट विद्यार्थी निवडणुका बंद केल्यावर विद्यार्थ्यांचे प्रश्न संपले नाहीत – ते कॅम्पसच्या बाहेर, अभ्यासिकांमध्ये आणि रस्त्यावर अधिक तीव्रतेने व्यक्त झाले. सध्या स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी पुण्यात एमपीएससीच्या कथित गैरप्रकारांविरोधात एकत्र आले आहेत. त्यांनी आयोगाच्या अध्यक्ष व सचिवांच्या राजीनाम्याची, प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची, पारदर्शकता वाढवण्याची आणि आरोपी अधिकार्‍यांच्या कार्यकाळातील परीक्षांचे फोरेन्सिक ऑडिट करण्याची मागणी केली आहे. ही मागणी व्यक्तीविरोधी रोष म्हणून नव्हे, तर परीक्षेच्या विश्वासार्हतेसाठी संस्थात्मक उत्तरदायित्वाची मागणी म्हणून पाहिली पाहिजे.

स्पर्धा परीक्षेची तयारी करणारा विद्यार्थी अनेकदा लहान शहरांतून किंवा ग्रामीण भागांतून पुण्यात येतो. त्याच्या मागे कुटुंबाची आर्थिक गुंतवणूक, अनेक वर्षांची मेहनत आणि सरकारी नोकरीद्वारे सामाजिक उन्नतीचे स्वप्न असते. अशा वेळी पेपरफुटीचा संशयही केवळ प्रशासकीय त्रुटी राहात नाही; तो समान संधीच्या तत्त्वावर घाला ठरतो. त्यामुळेच ४ ऑक्टोबर रोजी पुण्यात, तर ५ ऑक्टोबरला मुंबईत हे विद्यार्थी मोठ्या संख्येने जमले.

त्याआधी, सप्टेंबरमध्ये काढलेल्या ‘विद्यार्थी आक्रोश मोर्चा’त विद्यार्थ्यांनी पेपरफुटी, उत्तरपत्रिका तपासणीतील त्रुटी आणि परीक्षांतील इतर संशयास्पद बाबींच्या चौकशीची मागणी केली. त्यांनी मुंबई गुन्हे शाखेचा प्राथमिक अहवाल सार्वजनिक करण्यासह संशयितांच्या कार्यकाळातील परीक्षांचे फॉरेन्सिक ऑडिट करण्याचीही मागणी केली आहे. म्हणूनच त्यांच्या आंदोलनाला ‘तरुणांची अस्वस्थता’ म्हणून दुर्लक्ष करणे योग्य ठरणार नाही; तो प्रक्रियात्मक न्यायाचा आग्रह आहे. पण याच आंदोलनात एक दुसरा प्रश्नही उभा राहतो. विद्यार्थी आपला प्रश्न मांडण्यासाठी रस्त्यावर येतात, समन्वय समित्या उभ्या करतात, निवेदने लिहितात, मोर्चांचे नियोजन करतात, सरकारशी संवाद साधतात आणि भूमिकेवर ठाम राहतात. हीच तर लोकशाहीची प्राथमिक शाळा आहे. मग ही शाळा विद्यापीठाच्या अधिकृत चौकटीत का चालत नाही?

विद्यापीठ निवडणूक का हवी?

महाराष्ट्रात अखेरच्या थेट विद्यार्थी निवडणुका १९९३ मध्ये झाल्या. त्यानंतर महाराष्ट्र विद्यापीठ कायदा, १९९४ द्वारे थेट आणि स्पर्धात्मक विद्यार्थी निवडणुकांवर बंदी घालण्यात आली. या निर्णयामागे केवळ काल्पनिक भीती नव्हती; १९८० च्या दशकाच्या अखेरीस आणि १९९० च्या सुरुवातीला विद्यार्थी-राजकारणात हिंसा, पैशाचा प्रभाव, दादागिरी आणि बाह्य राजकीय हस्तक्षेप वाढल्याची गंभीर पार्श्वभूमी होती. मुंबईत १९८९ मध्ये एका महाविद्यालयाबाहेर प्रचारादरम्यान ‘एनएसयूआय’चे विद्यार्थी नेते ओवेन डी’सूझा यांची हत्या झाली होती. त्या घटनेने विद्यार्थी निवडणुकांतील हिंसेचा प्रश्न असह्य स्तरावर पोहोचल्याचे स्पष्ट केले. कायदा-सुव्यवस्था, पैशाचे आणि बाहुबलाचे राजकारण, तसेच बाहेरच्या राजकीय संघटनांचा कॅम्पसमधील प्रभाव – या कारणांनी बंदीचा निर्णय घेण्यात आला. म्हणजेच, त्या काळातील बंदीला काहीच कारण नव्हते असे म्हणणे इतिहासाशी बेईमानी ठरेल. राज्याने विद्यार्थ्यांना हिंसेपासून वाचविण्याची जबाबदारी घेतली; प्रश्न इतकाच की, हिंसा रोखण्याचा उपाय म्हणून मताधिकारच काढून घेणे हा किती दीर्घकालीन आणि लोकशाहीवादी उपाय होता?

बंदीने विद्यार्थी परिषदांचे अस्तित्व संपवले नाही; पण त्यांची लोकशाही वैधता कमकुवत केली. विद्यार्थी आपले प्रतिनिधी थेट निवडत नसल्याने अनेक ठिकाणी प्रतिनिधी निवड किंवा नामनिर्देशनाच्या पद्धतीने येत राहिले. अशा व्यवस्थेत प्रतिनिधींची प्राथमिक जबाबदारी विद्यार्थ्यांकडे राहते की संस्थेच्या प्रशासनाकडे, हा प्रश्न अपरिहार्यपणे निर्माण होतो. निवडणूक म्हणजे केवळ पोस्टर, भाषणे आणि मतदान नव्हे. ती प्रश्न विचारण्याची संस्कृती आहे. वसतिगृह, फी, सुरक्षितता, लैंगिक छळविरोधी यंत्रणा, ग्रंथालयाची वेळ, परीक्षा, गुणवत्ता, आरक्षण, मानसिक आरोग्य, दिव्यांग विद्यार्थ्यांचे हक्क – या प्रश्नांवर संघटितपणे बोलण्याचा मंच आहे. त्यातून प्रतिनिधित्वाची सवय तयार होते; मतभेद असूनही संवाद साधण्याची क्षमता विकसित होते. याउलट, नामनिर्देशित संरचनेत विद्यार्थी ‘लाभार्थी’ राहण्याचा धोका वाढतो. विद्यार्थी परिषदेचा सदस्य प्रशासनाशी सौहार्दाने वागेल, पण तो प्रशासनाला अस्वस्थ करणारे प्रश्न विचारेलच याची खात्री राहात नाही. लोकशाहीमध्ये शांतता महत्त्वाची असते; पण प्रश्नच न विचारण्याची शांतता ही लोकशाहीची खूण नाही.

आज काय स्थिती आहे?

राज्याने नंतर स्वत:च या पोकळीची दखल घेतली. ‘महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा, २०१६’ ने निवडून आलेल्या विद्यार्थी परिषदांची तरतूद करून १९९४ मधील बंदी उठवण्याचा प्रयत्न केला. नियम २०१८ मध्ये तयार झाले; निवडणुकांचे नियोजन २०१९ मध्ये झाले. परंतु मतदानाच्या काही आठवडे आधी २०१९ मध्ये निवडणुका पुन्हा स्थगित करण्यात आल्या. त्यासाठी कायदा-सुव्यवस्थेची चिंता आणि विधानसभा निवडणूक तोंडावर असणे ही कारणे देण्यात आली. त्यानंतर निवडणुका प्रत्यक्षात झाल्याच नाहीत. याचा अर्थ राज्याकडे निवडणुकीसाठी नियम, प्रक्रिया आणि नियोजन होते; परंतु ती प्रक्रिया पूर्ण करण्याची राजकीय इच्छाशक्ती कमी पडली. आज सरकारने माजी कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली १२ सदस्यीय समिती नेमून विद्यार्थी निवडणुका पुन्हा सुरू करण्याच्या चौकटीचा अभ्यास सुरू केला आहे. या समितीसमोर बाह्य राजकीय हस्तक्षेप, पैशाचा वापर, निधीचे लेखापरीक्षण, डिजिटल प्रक्रिया, तक्रार निवारण आणि महिला व आरक्षित घटकांचे प्रतिनिधित्व यांसारखे मुद्दे आहेत. हा उपक्रम स्वागतार्ह आहे; मात्र ‘समिती’ हा उपायाचा आरंभ असतो, शेवट नव्हे. महाराष्ट्रातील अनेक राजकीय नेत्यांची जडणघडण विद्यार्थी संघटना, विद्यार्थी चळवळी किंवा विद्यापीठीय राजकारणातून झाली. सध्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हेही तरुणपणी विद्यार्थी राजकारणात सक्रिय होते, अशी नोंद आहे. विद्यार्थी राजकारणातूनच नेतृत्व घडते असे सरसकट म्हणणे चुकीचे असेल; पण नेतृत्वासाठी तो एक महत्त्वाचा लोकशाही प्रशिक्षणाचा मार्ग आहे, हे नाकारता येणार नाही.

नेत्याची निर्मिती फक्त निवडणूक जिंकण्यातून होत नाही. पराभव स्वीकारणे, प्रतिस्पध्र्याचा मुद्दा ऐकणे, खर्चाचा हिशेब देणे, प्रचारात संयम राखणे, अल्पसंख्याक मताचा आदर करणे आणि सार्वजनिक व्यासपीठावर तर्काने बोलणे – ही सगळी कौशल्ये विद्यार्थी निवडणुका शिकवू शकतात. त्याविना राजकीय नेतृत्वाचा मार्ग बहुधा पक्षनिष्ठा, कौटुंबिक वारसा, आर्थिक ताकद किंवा वरून मिळालेल्या संधीवर अधिक अवलंबून राहण्याचा धोका असतो. म्हणून ‘‘विद्यापीठातील निवडणुका बंद करून महाराष्ट्राने चांगले नेते घडवण्याची फॅक्टरी बंद केली का?’’ हा प्रश्न भावनिक नाही, तर संस्थात्मक आहे.

उत्तर असे : ती फॅक्टरी पूर्णपणे बंद झाली नाही; पण तिची सार्वजनिक, समावेशक आणि लोकशाही यंत्रणा नक्कीच क्षीण झाली. पुण्यातील स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासिका, वाचनालये, भाड्याच्या खोल्या, चहाचे कट्टे आणि ऑनलाइन गट यांना आज अनौपचारिक कॅम्पसचे स्वरूप आले आहे. एमपीएससी आंदोलनात विद्यार्थी विविध जिल्ह्यांतून एकत्र आले, मागण्यांची यादी तयार केली, मोर्चा आखला आणि प्रशासनाला उत्तरदायी धरण्याचा प्रयत्न केला. ही राजकीय परिपक्वतेची चिन्हे आहेत. परंतु सदाशिव पेठ किंवा इतर अभ्यासकेंद्रे विद्यापीठाची जागा पूर्णपणे घेऊ शकत नाहीत. तेथे विद्यार्थी असतात; पण नियमित, सर्वसमावेशक आणि निवडून आलेली प्रतिनिधी संरचना नसते. संघटनात्मक ऊर्जा असते; पण तिचा दीर्घकालीन संस्थात्मक आधार नसतो. आंदोलने तातडीची दखल मिळवून देतात; विद्यार्थी निवडणुका मात्र रोजच्या प्रश्नांवर उत्तरदायित्वाची यंत्रणा उभी करतात. म्हणून प्रश्न असा नाही की आंदोलक विद्यार्थी नेते होतील का. ते नेतृत्वाची क्षमता आधीच दाखवत आहेत. प्रश्न असा आहे की राज्य त्यांना केवळ संकटाच्या वेळी रस्त्यावर उतरू देणार, की शांततेच्या काळातही लोकशाही मार्गाने बोलण्याची जागा देणार?

विद्यार्थी निवडणुकांवरील बंदीचा नोंदवलेला आधार हिंसा, कायदा-सुव्यवस्था, पैसा आणि बाह्य हस्तक्षेप हाच होता. पण दीर्घकाळ निवडणुका न होण्याचा अनपेक्षित – किंवा राजकीयदृष्ट्या सोयीचा- परिणाम असा होऊ शकतो की नव्या, तळागाळातून उभ्या राहणार्‍या नेतृत्वासाठीचा मार्ग अरुंद होतो. घराणेशाहीला आव्हान देण्यासाठी युवकांना फक्त पक्षांच्या विद्यार्थी आघाड्यांमध्ये सामील होण्याचा पर्याय पुरेसा नाही. त्यांना स्वायत्त निवडणूक, स्पष्ट नियम, समान संधी आणि विद्यार्थ्यांपुढे थेट उत्तर देण्याची प्रक्रिया हवी. विद्यार्थी निवडणुका ही घराणेशाहीविरोधी हमी नाही; पण ती नेतृत्वाच्या प्रवेशद्वारांची संख्या वाढवणारी व्यवस्था आहे. पूर्वीच्या हिंसक अनुभवांकडे पाठ फिरवून विद्यार्थी निवडणुका सुरू करणे अविवेकी ठरेल. मात्र त्या अनुभवामुळे बंदीच कायम ठेवणेही तितकेच अपुरे ठरेल.

यावर उपाय म्हणजे नियंत्रित, पारदर्शक आणि विद्यार्थीकेंद्रित निवडणूक व्यवस्था. आजच्या एमपीएससी आंदोलनाने राज्याला एक स्पष्ट संदेश दिला आहे: विद्यार्थी निष्क्रिय नाहीत; त्यांना केवळ संस्थात्मक व्यासपीठ नाही. कॅम्पसची मतपेटी बंद असली, तरी प्रश्नांची दारे बंद होत नाहीत. महाराष्ट्राने आता या ऊर्जेला रस्त्यावरच्या संतापात अडकवायचे की विद्यापीठांतील जबाबदार लोकशाहीत रूपांतरित करायचे, हा निर्णय घ्यायचा आहे.
ओंकार आदिनाथ काशिद
दिल्लीतील ‘जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठा’त संशोधक
omkashid1999@gmail.com