विशुद्ध वैदिक ज्ञानाच्या माध्यमाने समाजात क्रांतिकारी परिवर्तन घडवून आणणारे थोर समाजसुधारक महर्षी दयानंद सरस्वती यांनी पुणे शहरात जवळपास अडीच महिने वास्तव्य करून पुणेकर बहुजनांचे प्रबोधन केले. दलित, स्त्रिया व सामान्य लोकांना वैदिक ज्ञानाचा अधिकार प्रदान करून समग्र विश्वाचा एकमात्र मानव धर्म कथिला. या ऐतिहासिक क्रांतिकारी घटनेला नुकतीच १५१ वर्ष पूर्ण झाली.
विद्वद्नगरी म्हणून ओळख असलेल्या पुणे या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक राजधानीला ज्ञानवंत सुधारकांच्या प्रबोधनाने नेहमीच संजीवनी मिळत राहिली आहे. एकोणिसाव्या शतकाच्या प्रबोधनयुगात या शहरात बाहेरून येऊन येथील सामान्य बहुजनांना सत्य वैदिक ज्ञानाचा बोधामृत पाजणारे महर्षी दयानंद सरस्वती हे एक थोर समाज सुधारक ठरतात. निसर्ग रचनेतील नियमबद्धता व तर्कसंगत वैज्ञानिक दृष्टी यांच्या माध्यमातून स्वामी दयानंदानी आधुनिक युगात जो वेदार्थ कथिला, तो सर्वार्थाने मानव समूहाच्या सर्वांगीण कल्याणासाठी अतिशय मौलिक स्वरूपाचा आहे. सर्व प्रकारचे मनुष्यकृत (धर्म)पंथ, मत- संप्रदाय, जाती- उपजाती, उच्च नीच, स्पृशास्पृश्य इत्यादी संकीर्ण भेदभाव दूर सारून सारा मानव एक आहे आणि हे सर्व वेदसंमत होय. म्हणून ‘वेदांकडे चला’ असा उद्घोष ठिकठिकाणी करीत २० जून २०२६ रोजी स्वामीजी पुण्यात आले.
प्रसिद्ध समाज सुधारक न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, मराठी भाषेचे अभ्यासक महादेव मोरेश्वर कुंटे या दोन वर्गमित्रांनी स्वामीजींना पुण्यात येण्याचे निमंत्रण दिले होते. संस्कृत पंडितांची व प्रबुद्ध विद्वानांची नगरी म्हणून ओळख असलेल्या पुणे शहरात स्वामीजींनाही यावेसे वाटत होते. म्हणूनच मुंबई येथे १० एप्रिल १८७५ रोजी आर्य समाजाची स्थापना केल्यानंतर स्वामीजींचे पुण्यात पदार्पण झाले. गुरुवार पेठेतील पंचहौदाजवळील नाना जगन्नाथ शंकरशेठ यांच्या वाड्यात स्वामीजींची राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती.
प्रबोधनपर व्याख्यानमाला
आपल्या अडीच महिन्यांच्या वास्तव्यात स्वामीजींनी विविध ठिकाणी सर्वस्पर्शी ५३ व्याख्याने दिली. धार्मिक, आध्यात्मिक, सामाजिक क्षेत्रात निर्माण झालेली अंधाधुंद व्यवस्था, त्याची कारणे, परिणाम आणि उपाय यावर त्यांनी केलेले विश्लेषण अतिशय ठोस स्वरूपाचे होते. यांपैकी ३५ व्याख्याने ही महात्मा फुले व न्यायमूर्ती रानडे यांचे परमस्नेही व प्रसिद्ध विधीज्ञ असलेले श्री गंगाराम भाऊ म्हस्के यांनी लष्कर भागात (पुणे कॅम्प) सुरू केलेल्या मराठी शाळेत झाली होती. याचे सारे नियोजन म्हस्के यांनी मोठ्या प्रयत्नांनी केले होते. विशेष म्हणजे हे व्याख्यान ऐकण्यासाठी सर्व स्तरांतील लोक येत. या सर्वच व्याख्यानांतून स्वामीजींनी समाज व राष्ट्राच्या दुर्गतीची कारणमीमांसा करून ‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’ असा सर्वमान्य वेदोपदेश कथन केला. मध्यंतरीच्या कालखंडात तथाकथित अर्धवट ज्ञानी अभ्यासकांनी वैदिक मंत्रांचे अर्थ चुकीच्या पद्धतीने लावल्याने सारे अनर्थ घडले व समाजव्यवस्थाच कोलमडून गेली. त्यातच धर्म व अधर्माच्या बाबतीत विवेक न राहिल्याने सर्वच समाजघटक कर्तव्यहीन झाले. वेदांचे विशुद्ध ज्ञान विसरल्यामुळे समाज अधोगतीला पोहोचला. गुण, कर्मावर आधारलेली वर्णव्यवस्था जन्मानुसार झाली. यावर एकमेव उपाय म्हणजे विशुद्ध वेद ज्ञानाचा अंगीकार होय, असा या व्याख्यानांचा मतितार्थ होता. शेवटच्या व्याख्यानानंतर म्हस्के यांच्या घरी निरोप समारंभ झाला. त्या प्रसंगी स्वामीजींनी ‘यथेमां वाचं कल्याणीमावदानि जनेभ्य:!’ या यजुर्वेदीय मंत्राचा पुरावा देत त्याची सारगर्भित अशी व्याख्या केली. त्याचा भावार्थ असा की ज्ञानाच्या मंदिराचे दरवाजे सर्वांसाठी खुले आहेत. निसर्गातील हवा, पाणी, प्रकाश हे सर्वांसाठी आहे, तर मग वेदज्ञान कोण्या एकाच वर्गासाठी असू शकत नाही. म्हणून सर्वच वर्ण आणि स्त्रिया यांनादेखील वेदज्ञानाचा अधिकार आहे, असे स्वामीजींनी निक्षून सांगितले.
भिडे वाड्यातील १५ व्याख्याने
स्वामीजींनी ४ जुलै ते ४ ऑगस्ट १८७५ यादरम्यान तांबडी जोगेश्वरी मंदिराच्या जवळील श्री बाळकृष्ण भिडे यांच्या वाड्यात १५ व्याख्याने दिली. ती इतिहासात नोंदवली गेली. कारण या व्याख्यानांना लिपीबद्ध करून ते दररोज प्रकाशित करण्याचे कार्य मराठी सारस्वत महादेव मोरेश्वर कुंटे व संस्कृततज्ज्ञ मुख्याध्यापक गणेश जनार्दन आगाशे यांनी मोठ्या प्रयत्नांनी केले. त्याकाळी कृष्णाजी त्र्यंबक रानडे यांनी सुरू केल्या ‘ज्ञानप्रकाश’ या साप्ताहिकात ही व्याख्याने प्रसिद्ध होत असत. स्वामीजींची ही व्याख्याने ‘प्रबोधन काळातील पुणे प्रवचन’ या ग्रंथात असल्याने त्यांना सर्वाधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. त्या काळात रेकॉर्डिंगची पद्धत नव्हती, पण कुंटे व आगाशे यांच्यासारख्या भाषातज्ज्ञांनी फार मोठे लेखनकौशल्य पणाला लावून मराठी साहित्यात हा दस्तावेज उपलब्ध करून ठेवला आहे.
परिव्राजकाची निर्भय सत्यवाणी
स्वामीजींच्या व्याख्यानाचा आवाका जबरदस्त होता. सत्य प्रतिपादन हे त्यांनी आपले कर्तव्य समजले. कारण ते खरे परिव्राजक होते. कोणालाही न घाबरता त्यांनी निरपेक्ष भावनेने आध्यात्मिक व धार्मिक कर्मकांडात निर्माण झालेल्या थोतांडावर सडकून टीका केली. मूर्तिपूजा व देवी – देवतांच्या नावावर चाललेला गोंधळ त्यांना मान्य नव्हता. कारण वेदात अशा काल्पनिक बाबींना मुळीच थारा नाही, असे त्यांनी पुराव्यानिशी स्पष्ट केले होते. एकमेव निराकार ईश्वर व त्याचे सर्वव्यापक स्वरूप, मानवतेचा एकच सत्यधर्म, वैदिक संस्कृतीची ज्येष्ठता व श्रेष्ठता, यज्ञात पशुबळी निषेध, ज्ञान- कर्म- उपासनेचे महत्त्व, मूर्तिपूजेचे खंडन, पर्यावरणासाठी यज्ञ, पशुहिंसा ही अवैदिकच, गोरक्षणाचे फायदे, जगाच्या उत्पत्ती, स्थिती व प्रलयाची वैज्ञानिक प्रक्रिया, बुद्धीसंगत वर्ण व आश्रम व्यवस्था, आदी काळापासून महाभारतापर्यंतचा इतिहास, भारताच्या दुर्दशेची कारणे, अन्य मत संप्रदायांच्या उदयाची कारणमीमांसा इत्यादी विषय स्वामीजींनी आपल्या या पुणे प्रवचनात प्रतिपादित केले. शेवटच्या पंधराव्या व्याख्यानात त्यांनी आपले संक्षिप्त चरित्रदेखील सांगितले आहे. काही व्याख्यानात त्यांनी प्रश्नोत्तर शैलीदेखील वापरली, जेणेकरून श्रोत्यांच्या शंकांचे निरसन करता यावे.
स्वामीजींचे प्रतिपादन शैली खूपच प्रभावशाली होती. दररोज व्याख्याने ऐकण्यासाठी उपस्थित असणाऱ्या रमाबाई रानडे ‘आमच्या आयुष्यातील काही आठवणी’ या आत्मचरित्रात म्हणतात – ‘स्वामी दयानंदजी हे उत्तम रसाळ वक्ते होते. त्यांची वाणी गंभीर असे. तशीच भाषणपद्धती मोठी मार्मिक व केव्हा केव्हा आलंकारिक असे. त्यामुळे त्यांचे भाषण ऐकण्यास जमलेली मंडळी तल्लीन होऊन जात.
दलितांच्या वस्तीत वैदिक व्याख्यान
पुण्यातील मुक्कामात स्वामी दयानंद सरस्वती यांनी दलित बांधवांच्या आग्रहावरून त्यांच्याकरिता एक खास व्याख्यान दिले. स्वामी दयानंद हे जातिभेद न बाळगता सर्वांसाठी वेदज्ञानाचा उपदेश करतात, अशी वार्ता जेव्हा पुणे पेठ जुनागंजमधील दलित बांधवांना समजली, तेव्हा त्यांनी स्वामीजींना पत्र लिहून उपदेशास येण्याची विनंती केली. १३ जुलै १८७५ रोजीच्या पत्रात हे बांधव स्पष्ट म्हणतात- ‘स्वामीजी, आपण आम्हां गरीब दीन- दुबळ्या देश बांधवांना अज्ञान, अंध:काराच्या पाशातून काढण्यास पाऊल टाकले आहे. कोणत्याही प्रकारचा जातीभेद न बाळगता जागोजागी वेद ज्ञानाचा उपदेश करीत आला आहात. कित्येक लोक आपल्या उपदेशामुळे जातिभेद व अज्ञानाच्या अंध:कारातून बाहेर पडले आहेत. तेव्हा आमची विनंती आहे की आपण आम्हां दलितांच्या पाठशाळेत येऊन उपदेश द्यावा.’ स्वामीजींनी ही भावना ओळखून महात्मा फुले यांनी स्थापन केलेल्या मोमीनपुऱ्यातील शूदतिशूद्रांच्या पाठशाळेत एक वैदिक प्रवचन दिले. या व्याख्यानाचा सारांश उपलब्ध नाही. पण यावरून अस्पृश्य बांधवांना स्वामीजींविषयी किती मोठी आस्था, आदर व आत्मीयता वाटत होती, याची कल्पना येते. पुण्याहून प्रकाशित होणाऱ्या ‘सत्यदीपिका’ मासिकाच्या ऑक्टोबर १८७५ अंकात या सभेचा वृत्तांत प्रसिद्ध झाला आहे.
असेच एक व्याख्यान दीनबंधू सार्वजनिक सभेचे संस्थापक व सत्यशोधक समाजाचे कार्यकर्ते दलितोद्धारक कृष्णराव पांडुरंग भालेकर यांच्या आग्रहावरून पुण्यातील भांबुर्डा गावात झाल्याचे वर्णन आढळते.
मिरवणूकीत महात्मा फुले यांचा सहभाग
व्याख्याने संपन्न झाल्यानंतर शेवटच्या दिवशी ५ सप्टेंबर १८७५ रोजी स्वामीजींच्या सन्मानार्थ मोठ्या थाटामाटाने त्यांची हत्तीवरून मिरवणूक काढण्यात आली. तेव्हा न्यायमूर्ती म. गो. रानडे, महात्मा ज्योतिराव फुले हे सर्व आपल्या अनुयायांसह यात सहभागी झाले होते. चरित्रकार धनंजय कीर यांच्या मतानुसार जेव्हा पुण्याच्या समाजसुधारकांनी दयानंद यांची मिरवणूक काढण्याचा निश्चय केला. तेव्हा शहरातील सनातनी प्रतिगामी मंडळींनी त्यात विघ्ने आणण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. उपद्रवाची शक्यता दिसताच सुधारणावादी मंडळी मिरवणुकीच्या एक दिवस आधी महात्मा फुले यांच्या घरी गेली व त्यांना मिरवणुकीत सहभागी होण्याची विनंती केली. म. दयानंद यांचे समतातत्व आणि अस्पृश्यता निवारण चळवळ ही महात्मा फुले यांच्या जीवन उद्देशांशी संबंधित होती. म्हणून महात्मा फुले स्वतः आपल्या सहकाऱ्यांसह या मिरवणुकीत सहभागी झाले. आचार्य अत्रे यांच्या ‘महात्मा फुले’ या चित्रपटात फुले व रानडे हे इतर समाजसुधारकांच्या बरोबरच या मिरवणुकीत चालत असल्याचे दृश्य चित्रीत झाले आहे.
सनातनी मंडळींचा प्रखर विरोध
स्वामी दयानंद यांचे विशुद्ध पुरोगामी विचार पुण्यातील सनातनी मंडळींना मुळीच आवडले नाहीत. कारण स्वामीजींनी परंपरागत अंधश्रद्धा आणि रूढी परंपरांवर प्रहार केले होते. देव-देवतांच्या नावावर चाललेल्या अंधश्रद्धा व मूर्तिपूजेवर त्यांनी टीका केली होती. अवतारवाद, बुवाबाजी, कर्मकांड, स्पृश्य – अस्पृश्य भेदभाव इत्यादी गोष्टी स्वामीजींनी नाकारल्या होत्या. चारही वेदांच्या मंत्रांची त्यांनी यथायोग्य जनसुलभ व्याख्या केली होती. वेद, संस्कृत विद्या आणि वैदिक ज्ञान हे बहुजनांसाठी त्यांनी पुराव्यानिशी खुले केले. दयानंदांचे हे सुधारणावादी विचार कदाचित त्यांना मान्य नसावेत. म्हणूनच त्यांनी स्वामीजींना कडाडून विरोध केला.
शेवटच्या दिवशी काढलेल्या मिरवणुकीत सुद्धा हा विरोध विकृत स्वरूपात दिसून आला. याच सनातनी मंडळींनी दयानंद सरस्वतींच्या विरोधात नकली दयानंद म्हणून एका गाढवाला सजवले. त्यावर ‘गर्दभानंद’ असे लिहून एक दुसरीच मिरवणूक काढली. आरडाओरडा व चिखलफेक करीत वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न केला. काहींना काठ्या व दगडांचा ही मारा सहन करावा लागला. यात काहीजण जखमीदेखील झाले. न्यायमूर्ती रानडे त्यांच्या कपड्यांवर चिखलाचे डाग पडले होते, असे रमाबाई रानडे लिहितात. इतकेच काय तर मराठी भाषाकोविद विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी देखील दयानंदांना प्रखर विरोध केल्याचे त्यांच्या ‘निबंध माला’ या मासिक पुस्तकातील ‘वक्तृत्व’या लेखातून दिसून येते.
काही झाले तरी वेदज्ञानाची पुनर्बांधणी व विवेकपूर्ण मांडणी करणारे प्रखर निर्भिक संन्यासी स्वामी दयानंद कधीही डगमगले नाहीत. समाज सुधारणेच्या पवित्र कार्यात ते तितक्याच उत्साहाने सतत मार्गक्रमण करीत राहिले. प्रबोधन काळात पुण्यनगरीत घडलेला या थोर परिव्राजकाचा अडीच महिन्यांचा सोनेरी वास्तव्यकाल आज १५१ वर्षानंतरदेखील मौलिक सर्वंकष सुधारणा घडवून आणण्यासाठी चिरंतर प्रेरणा देत राहील.
(लेखक महर्षी दयानंद चरित्राचे अभ्यासक आहेत)
nayanacharya1971@gmail.com
