महात्मा गांधी हे केवळ भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे नेतृत्व करणारे नेते नव्हते, तर विसाव्या शतकातील जागतिक नैतिक राजकारणाचा केंद्रबिंदू होते. टॉलस्टॉय, रसेल, आइन्स्टाइन, मार्टिन ल्यूथर किंग, नेल्सन मंडेला यांच्यावर ज्यांचा प्रभाव पडला, असे गांधी मराठी समाजाला आणि मराठी साहित्यिकांना मात्र कायमच ‘अवघड’, ‘अस्वस्थ करणारे’ आणि अनेकदा ‘उपहासाचे’ वाटले. गेल्या शंभर वर्षांच्या मराठी साहित्याकडे पाहिले तर गांधीजींवर सखोल, सहानुभूतिपूर्ण, तत्त्वज्ञानात्मक किंवा सौंदर्यदृष्ट्या मोठे लेखन फारच कमी आढळते. जे आहे त्यातही विनोद, उपरोध, टिंगल, किंवा ‘भोळेपणा’ दाखवणारी छटा ठळकपणे दिसते. हा विरोधाभास केवळ योगायोग नाही; त्यामागे वैचारिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि वर्गीय कारणांची गुंतागुंत आहे.
मराठी साहित्याची आधुनिक परंपरा मुख्यतः ब्राह्मण मध्यमवर्गीय शहरी मानसिकतेतून घडलेली आहे. लोकमान्य टिळक, आगरकर, सावरकर, आंबेडकर, गोखले अशा परंपरांमध्ये मराठी बुद्धिजीवी वाढले. गांधी मात्र या चौकटीत बसणारे नव्हते. ते टिळकांसारखे आक्रमक राष्ट्रवादी नव्हते, सावरकरांसारखे क्रांतिकारक नव्हते, आणि आगरकरांसारखे विवेकवादीही नव्हते. गांधींचा राष्ट्रवाद नैतिकतेवर आधारित होता, त्यांच्या राजकारणात आत्मसंयम, तपश्चर्या, सत्याग्रह, उपवास, आत्मशुद्धी यांसारख्या गोष्टी केंद्रस्थानी होत्या. आधुनिक, विवेकवादी, प्रगतिशील म्हणवणाऱ्या मराठी साहित्यिकांना हे सगळे अतीताचे, अवैज्ञानिक आणि कधीकधी हास्यास्पद वाटणे स्वाभाविक होते. त्यामुळे गांधी ही ‘गंभीर साहित्याची’ व्यक्ती नसून ‘उपरोधाचा विषय’ म्हणूनच हाताळली गेली.
प्र के अत्रे यांचा गांधींकडे पाहण्याचा दृष्टिकोन याचे ठळक उदाहरण आहे. अत्रे हे तडफदार, उपरोधिक, नाट्यमय आणि थेट भाषेत लिहिणारे साहित्यिक होते. गांधींच्या आत्मसंयम, साधेपणा आणि नैतिक आग्रहांशी त्यांचा स्वभाव आणि लेखणी कधीच जुळली नाही. अत्र्यांच्या लेखनात गांधीजी हे अनेकदा भाबडे, वास्तवापासून दूर असलेले, किंवा ‘भक्तांच्या जाळ्यात अडकलेले’ नेते म्हणून येतात. हा उपहास केवळ व्यक्तीविरोधी नव्हता, तर एका विशिष्ट नैतिक राजकारणाविरुद्धचा बंडखोर प्रतिसाद होता. अत्रे यांना गांधींचा नैतिक आग्रह हा मध्यमवर्गीय ढोंग वाटत होता, जो प्रत्यक्ष जीवनातील संघर्षांना भिडत नाही, अशी त्यांची धारणा होती.
पु ल देशपांडे यांचे गांधीविषयक लेखनही याच छायेत येते, जरी त्यात अत्र्यांसारखी आक्रमकता नसली तरी. पु ल यांचा विनोद हा सौम्य, आत्मीय आणि मानवी विसंगती दाखवणारा असतो. गांधीजींच्या साधेपणावर, त्यांच्या उपवासांवर, त्यांच्या अनुयायांच्या अतिरेकी भक्तीवर पु ल यांनी विनोद केला, पण तो विनोद अनेकदा गांधींच्या तत्त्वज्ञानावर न जाता त्यांच्या ‘प्रतिमेवर’ केंद्रित झाला. पु ल ना गांधींचे नैतिक मोठेपण नाकारायचे नव्हते, पण ते मोठेपण त्यांच्या विनोदी संवेदनशीलतेला सुसंगत वाटत नव्हते. त्यामुळे गांधी हे पु ल साठी ‘आदरयुक्त अंतरावर ठेवायचे’ व्यक्तिमत्त्व होते, सखोल चिंतनाचा विषय कधीही झाले नाहीत.
गंगाधर गाडगीळ, पु. भा. भावे, श्री. पु. भागवत यांसारखे साहित्यिक तुलनेने अधिक विचारशील आणि वैचारिक होते. तरीही त्यांच्या गांधीविषयक लेखनातही एक प्रकारची संकोचाची, कधी कधी दुराव्याची भावना दिसते. गाडगीळ यांना गांधींच्या अर्थविषयक विचारांतील ग्रामस्वराज्य, उद्योगविरोध, यांत्रिकीकरणावरील टीका अव्यवहार्य वाटत होती. पु. भा. भावे यांना गांधींच्या अाध्यात्मिक भूमिकांमध्ये पुरेसा विवेक जाणवत नव्हता. तर श्री. पु. भागवत यांच्यासारख्या विज्ञाननिष्ठ संपादकाला गांधींचे सत्य, अहिंसा आणि आत्मशुद्धीचे राजकारण भावनिक वाटत होते, तर्कसंगत नव्हे. त्यामुळे या सर्वांनी गांधींवर लिहिले; पण ते लेखन बहुधा टीकात्मक, मर्यादित किंवा संदिग्ध राहिले.
या सगळ्याच्या पलीकडे अजूनपर्यंत सरळपणे न उल्लेखले गेलेला एक महत्त्वाचा मुद्दा उरतो, तो म्हणजे गांधी हे मराठी सांस्कृतिक मानसाचे ‘आपले’ नव्हते. महाराष्ट्राने छत्रपती शिवाजी, टिळक, आंबेडकर, फुले यांसारखी प्रतीके घडवली. गांधी गुजरातमधील, बनिया समाजातील, हिंदी-गुजराती भाषिक, आणि अखिल भारतीय राजकारण करणारे नेते होते. त्यांची भाषा, त्यांची प्रतीके, त्यांची जीवनशैली मराठी मध्यमवर्गीय संस्कृतीशी पूर्णपणे जुळणारी नव्हती. त्यामुळे गांधी हे आदराने पाहिले जाणारे ‘राष्ट्रीय नेते’ असले तरी भावनिक जवळीक निर्माण करणारे ‘सांस्कृतिक नायक’ ठरले नाहीत. हा परप्रांतीयपणाचा मुद्दा उघडपणे मांडला गेला नाही, पण तो नेणिवेच्या पातळीवर कार्यरत होताच. तसेच जातीयतेचा प्रश्नही पूर्णपणे फेटाळून लावता येत नाही. गांधी हे बनिया समाजातून आलेले, व्यापारी पार्श्वभूमी असलेले- तर मराठी साहित्यिकांपैकी अनेकजण ब्राह्मण समाजातून आलेले होते. सार्वजनिकरीत्या गांधींच्या जातीकडे बोट दाखवले गेले नाही, पण ‘गांधी हे चालाख, व्यवहारकुशल, राजकारणी’ अशी एक छुपी प्रतिमा तयार झाली. ही प्रतिमा त्यांच्या नैतिकतेवर संशय निर्माण करणारी होती. गांधींच्या साधेपणामागे ‘राजकीय डावपेच’ पाहण्याची प्रवृत्ती काही मराठी विचारवंतांमध्ये दिसते. हा संशय केवळ वैचारिक नव्हता, तर तत्कालीन वर्गीय आणि जातीय अविश्वासातूनही येत होता.
याशिवाय गांधींचे व्यक्तिमत्त्व हे साहित्यिकांसाठी अवघड विषय होता. कारण गांधी म्हणजे नायक, संत, राजकारणी, तत्त्वज्ञ, प्रयोगशील विचारवंत, असे सगळे एकाच वेळी होते. मराठी साहित्याला व्यक्तिरेखांची, संघर्षांची, अंतर्विरोधांची आवड आहे. गांधी मात्र स्वतःच आपल्या विरोधाभासांवर सार्वजनिकपणे चर्चा करणारे होते. त्यांनी स्वतःला कधीच देवत्व दिले नाही, उलट आपल्या चुका मान्य केल्या. त्यामुळे ‘नाट्यमय’ साहित्यनिर्मितीसाठी लागणारी नायक-खलनायकाची सरळ चौकट गांधी देत नव्हते. त्यांच्यावर लिहायचे तर खोल वैचारिक प्रामाणिकपणा लागतो, जो उपहास किंवा विनोदाच्या सुरक्षित चौकटीपेक्षा अधिक धाडसी असतो. दुसरा मुद्दा असा की मराठी साहित्यिकांचा एक मोठा वर्ग स्वतःला ‘प्रगतिशील’ आणि ‘विवेकवादी’ मानत होता. गांधी मात्र आधुनिकतेवर प्रश्न विचारणारे होते. यंत्रसंस्कृती, औद्योगिकीकरण, शहरीकरण, उपभोगवाद यावर गांधींनी केलेली टीका मराठी मध्यमवर्गीय प्रगतीच्या स्वप्नांना धक्का देणारी होती. त्यामुळे गांधी हे मागास, प्रतिक्रियावादी किंवा अवास्तव वाटले. त्यांचे मोठेपण मान्य केले, पण त्यांचे विचार ‘आजच्या काळात चालणार नाहीत’ म्हणून बाजूला ठेवले गेले. या अस्वस्थतेतूनच टिंगल, उपरोध आणि दुर्लक्ष जन्माला आले.
असे असले तरीही हा त्यांच्या रेखाटलेल्या चित्राचा फक्त एक भाग झाला. गांधींमध्ये अनेक चांगले गुण होते, हे मराठी साहित्यिकांना कळले नाही, असे म्हणणेही अन्यायकारक ठरेल. सत्यनिष्ठा, आत्मसंयम, नैतिक धैर्य, अहिंसा, शोषितांविषयी कळवळा, स्त्री-पुरुष समानतेचा आग्रह, अस्पृश्यतेविरुद्धचा संघर्ष, हे सारे गुण अनेक मराठी लेखकांनी मान्य केले. पण हे गुण त्यांच्या साहित्यिक प्रेरणेत रूपांतरित होऊ शकले नाहीत. कारण गांधी हे केवळ ‘गुणांचे संकलन’ नव्हते, तर एक अस्वस्थ करणारे नैतिक आव्हान होते. त्यांच्या जीवनाने आणि विचारांनी प्रश्न विचारले… आपण ज्या सुखसोयींना प्रगती म्हणतो, त्या खरंच मानवमुक्तीच्या दिशेने नेणाऱ्या आहेत का? साहित्यिकांनी या प्रश्नांना सामोरे जाण्याऐवजी अनेकदा त्यांना विनोदात विरघळवले.
अखेरीस असे म्हणता येईल की मराठी साहित्यात गांधींचे कमी लेखन हे गांधींच्या मोठेपणाचा अपमान नसून मराठी साहित्यिकांच्या संकुचित मानसिकतेचे प्रतिबिंब आहे. गांधींचा कठोर प्रामाणिकपणा हा साहित्यिकांना न पैलवणारा होता. त्यांच्या साधेपणाने, त्यांच्या नैतिक आग्रहाने, त्यांच्या आत्मपरीक्षणाने प्रत्येक माणसाची कसोटी पाहिली. म्हणूनच त्यांना गांभीर्याने भिडण्याऐवजी मराठी साहित्यिकांनी टिंगल, उपरोध किंवा मौन हे सोपे मार्ग निवडले. आज, एकविसाव्या शतकात, जेव्हा राजकारण पूर्णतः निर्लज्ज, हिंसक आणि बाजारू झाले आहे, तेव्हा गांधींचे विचार पुन्हा अस्वस्थ करायला लागले आहेत. तेव्हा आताच्या काळी मराठी साहित्य गांधींकडे नव्या नजरेने, कमी अहंकाराने आणि अधिक प्रामाणिकपणे पाहील, अशी अपेक्षा करणेसुद्धा धाडसाचे ठरेल. पण आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की मराठी साहित्यिकांनी गांधींना अनुल्लेखाने मारायचे ठरवले तरी गांधीजींचे विचार हे कालातीत होते आणि आहेत. म्हणूनच भारतात जरी त्यांच्याकडे विशिष्ट विचारसरणीच्या लोकांकडून द्वेष बुद्धीने पाहिले जात असले तरी जगभर मात्र त्यांना मानसन्मान मिळत आहेच. कारण भारतात अजूनही गुणांची कदर जातीवरून केली जाते, तर परदेशात बुद्धिमत्तेवरून.
jetjagdish@gmail.com

