विजय तांबे
७ जुलै १८९३ रोजी २४ वर्षांच्या बॅरिस्टर मोहन करमचंद गांधीला दक्षिण आफ्रिकेत पीटरमेरिट्सबर्ग स्टेशनवर रात्रीच्या वेळी कुडकुडत्या थंडीत कुली म्हणून सामानासकट फेकून दिलं. हे सर्वांना माहीत आहे. त्या कुरकुरत्या थंडीत रात्रभर तरुण मोहनने काय विचार केला असेल? डोक्यात अनेक शक्यता तयार झाल्या असतील. त्यांच्या वावटळी उठल्या असतील. खूप विचार करत ,स्वतःला छळत रात्र काढल्यावर मोहन निर्णयाला आला ‘मी परत जाणार नाही माझा आत्मसन्मान जपेन.’ हा मोहनचा व्यक्तिगत निर्णय होता. पुढे दक्षिण आफ्रिकेत त्यांच्या गांधीजी बनण्याच्या प्रवासात गरीब, भुकेकंगाल, असहाय्य माणसांनी अन्यायाचा प्रतिकार कसा करावा यावर खूप विचार केला. त्यांना तिथेही हेच उत्तर मिळालं ‘शरीराला कितीही त्रास झाला तरीही आपण आत्मसन्मान जपणार.’ त्या काळात अशा प्रकारच्या वेगळ्याच तात्विक भूमिकेवर खूप विचारांती येणे ही सर्जनाची चिन्हे आहेत.

सर्वसाधारणपणे कलावंतासाठी सर्जनाच्या प्रक्रियेचा काळ हा अस्वस्थतेचा आणि मेंदूला थकवणारा असतो. कलाकृती निर्माण झाली की त्यातून कलावंताची सुटका होते. मात्र गांधीजींच्या बाबतीत तसे होत नाही. स्वातंत्र्य लढ्यातील महत्त्वाच्या निर्णयापासून आश्रमातील निर्णयापर्यंत त्यांची सर्जन प्रक्रिया ही प्रत्यक्ष मानवी मनाशी आणि देश बांधवांच्या जीवाशी संबंधित आहे. प्रत्येक छोट्या मोठ्या कृतीनंतर समाजाचे आणि मानवी मनाचे वेगवेगळे पैलू त्यांच्या समोर येत राहतात. त्याच्या अनुषंगाने त्यांचे पुढचे कार्यक्रम बदलत जातात किंवा असे म्हणू की ते विकसित होत जातात. त्यामुळेच गांधीजींच्या जीवनातील कुठलाही काळ त्यांची या अस्वस्थतेपासून कधीच सुटका झालेली नाही.

गांधीजींच्या जीवनातील सर्जकता लखलखितपणे दिसणारा प्रसंग म्हणजे असहकार आंदोलन मागे घेण्याचा निर्णय! चौरीचौरा येथे पोलीस चौकी जाळल्यावर आतील २० पोलिसांचे प्राण गेले. गांधीजींनी तात्काळ आंदोलन मागे घेण्याचा निर्णय जाहीर करताना, घटनेची जबाबदारी स्वीकारून, अहिंसक आंदोलनाला देशबांधव अजून तयार नाहीत हे कबूल केले. हातात तोंडाशी आलेले स्वातंत्र्य आपण दूर ढकलताय म्हणून अनेकांनी त्यांच्यावर टीका केली. १९१५ मध्ये भारतात आलेल्या गांधींनी फक्त सात वर्षांत हा निर्णय घेतला होता आणि त्यावर ते ठाम राहिले. अशा निर्णयात दोन मुद्दे महत्त्वाचे असतात. पहिला आहे नैतिकता आणि दुसरा आहे समाजाचे भान किंवा लोकांची नाडी समजणे. त्यात पुन्हा मेख अशी की दोन्ही मुद्दे रणनीती म्हणून वापरू गेले की हाताशी काहीच लागत नाही. नैतिक मुद्दा जीवनात मुरायला हवा म्हणजे तो माझाच मुद्दा होतो. समाजाची नस कळण्यासाठी परंपरा, संस्कृतीची जाण असण्याबरोबरच जनतेच्या सुखदुःखाशी मनापासून एकरूप असावं लागतं. जनतेची भाषा समजावी लागते. त्यांच्या मनाला नेमकी भिडेल अशी भाषा आपल्या मुखातून यावी लागते. थोडक्यात रणनिती म्हणून वापरता येत नाही.

अहिंसेसाठी देशाची तयारी नाही हे सांगताना गांधीजींनी अप्पा पटवर्धनांना जगातील वेगवेगळ्या देशांमधील मिठाच्या कायद्यांचा अभ्यास करायला सांगितला. अप्पांनी अभ्यास करून गांधीजींना टिपण सादर केलं. त्या माहितीच्या आधारावर गांधीजींनी कोर्टात केस दाखल केली नाही किंवा ब्रिटिश पार्लमेंटमध्ये विषय मांडायला कोणाला सांगितले नाही किंवा एक साधा आर्थिक प्रश्न म्हणून आंदोलन उभे केले नाही. धर्मजातीच्या पलीकडले एक राष्ट्र असल्याची भावना निर्माण करणारे, माझ्या देशातील साधनसंपत्तीवर माझा अधिकार आहे हे सांगणारे, प्रत्येक माणसाच्या दैनंदिन प्रश्नांना जोडणारे आणि आपल्या मागण्यांसाठी अहिंसेच्या लढाईतून निर्भयतेची अनुभूती देणारे मिठाच्या सत्याग्रहाचे डिझाईन त्यांनी तयार केले. हा सत्याग्रह यशस्वी होणार नाही याची अनेकांना खात्री होती. तसे गांधींना निरोपही पाठवले गेले होते. मात्र झाले उलटेच. भारतात सर्वदूर सर्व जाती-धर्माच्या, गरीबश्रीमंतांच्या, स्त्री-पुरुषांच्या मनात ‘मी मार खाईन पण घाबरणार नाही’ ही चेतना निर्माण होऊन कृतीत उतरली. इतक्या व्यापक प्रमाणात प्रथमच ब्रिटिश शासनाविरुद्ध नि:शस्त्र भारतीय भयमुक्त होऊन उभे राहिले. अशावेळी शासन संस्था भयग्रस्त होते आणि पाशवी हिंसा करते. अगदी त्या प्रकारेच ब्रिटिश शासनाने हिंसा केली. मात्र त्यातून राज्यकर्त्यांचे भय लपले नाही.

खरंतर प्रश्न गांधींचा नाही. प्रश्न आपला आहे. आज आपण संवेदनाक्षम असू, आपल्यातील करुणा आणि अनुकंपा धर्मजातीच्या पल्याडची असेल, स्त्रीपुरुष समतेवर आपला विश्वास असेल आणि सर्वांना सामावून घेण्याची आपली वृत्ती असेल तर लक्षात ठेवा आपण फलाटावर फेकलेले गांधी आहोत. अंधारात थंडीत कुडकुडत मेंदूला ताण देऊन परिस्थितीतून बाहेर पडायच्या प्रयत्नात आपण आहोत. गांधीजींसारखा आपल्यालाही पुढे प्रश्न उभा राहणार आहे ‘माझे कर्तव्य काय?’ मात्र आपण कोणत्या परिस्थितीत या प्रश्नाचे उत्तर शोधायचे हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. जागतिकीकरणानंतर आपल्या देशातील मध्यमवर्गीय नवश्रीमंत होऊ लागले. आता सर्वत्र एआयचा प्रवेश झाल्यानंतर लवकरच यांचा प्रवास कनिष्ठ मध्यम वर्गाकडे सुरू झालेला आपल्याला दिसणार आहे. आज बाजार विविध प्रकारच्या वस्तू फुलून गेलेला आहे. हव्यास आणि वस्तू संचय वाढलाय. बाजाराने आपल्या प्रतिष्ठेच्या कल्पना बदलल्या आहेत. मात्र सर्वसामान्य माणसाच्या खिशात पैसा नाही आणि भविष्याची शाश्वती नाही. थ्रीजी, फोरजी आणि आता फाईव्ह-जी आल्यानंतर आपल्या हातात एक कॉम्प्युटर आलेला आहे. त्याच्यासोबत रिल्स बनवायला छानसा कॅमेराही आहे. मुख्य म्हणजे समाज माध्यमावर माहितीची धरणे फुटली असून खऱ्यासोबत खोटी माहिती दुथडी भरून वाहत आहे. समाजात चांगला बदल घडवून आणणाऱ्या संस्था संघटनांमध्ये काम करणाऱ्यांची चणचण आहे. जातींच्या आणि आदरणीय ऐतिहासिक पुरुषांच्या नावे उघडलेल्या आधुनिक संघटनांकडे भरमसाठ भरती आहे. आता फक्त जाती-धर्माच्या अस्मिता प्रखर झालेल्या नाहीत तर ऐतिहासिक पुरुष आणि आदरणीय नेत्यांबद्दल जाज्वल्य अस्मिता पराकोटीला पोहोचली आहे. दैनंदिन जीवनातील प्रश्नांपेक्षा या अस्मितांच्या लढाया खेळण्यात मंडळी गुरफटलेली आहेत.

तंत्रज्ञानाने रोजगाराची संख्या किमान पातळीवर नेली आहे. भावी काळात येणाऱ्या रोबोंच्या प्रोग्रामिंगसाठी आजच्या श्रमिकांना डोक्याला कॅमेरा लावून काम करावे लागत आहे. प्रत्येक क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रवेश पूर्ण होत आल्याने परीघाबाहेर फेकले जाणाऱ्यांची संख्या वाढत जाणार आहे. सरसकट युनिव्हर्सल बेसिक इन्कम द्यावे लागेल अशा चर्चा सुरू आहेत. वेगवेगळ्या नावांच्या योजनांतून लोकांच्या खात्यात पैसे जमा करण्यातून आज नागरिकांचे रूपांतर राजाच्या लाचार प्रजेमध्ये होत असल्याचे आपण अनुभवत आहोत.

दुसऱ्या बाजूला एआयमुळे आपली संस्कृती, भाषा, सर्वांगीण विविधता आपण हरवून बसणार आहोत. भाषा कमी होत जाणे म्हणजे विचार कमी होत जाणे. अभिव्यक्तीला मर्यादा येणे. आपण नैसर्गिक वागतोय असं आज वाटत असलं तरी आज सुद्धा आपण नियंत्रित आहोत. आपला जगण्याचा सगळा तपशील, आवडीनिवडी, स्वभाव, प्रेरणा, विकार यांची नोंद ठेवण्याचा कार्यक्रम सुरू आहे. मोबाइलवर फुकट असलेल्या ॲप्सचे सुद्धा आपण ग्राहक असतो हे आपण विसरतो. आपल्याला जे आवडतं तेच आपल्याला मोबाइलच्या पडद्यावर दिसत राहतं. मात्र अख्खं जग वेगळं असतं. थोडक्यात आपलं जीवन आपल्या आवडत्या रील्स सारखं झालंय पण वास्तवात तसं नाही.

अशा अस्वस्थ करण्याच्या काळात आपला निर्णय काय असेल? धार्मिक जातीय अस्मितेमध्ये गुंग होऊन रोबो म्हणून जगायचंय की मरेपर्यंत शहाणपण टिकवून अर्थपूर्ण जगायचा प्रयत्न करायचाय? हिंसा आणि क्रौर्यात समाधान मानायचंय की सर्वसमावेशी सहिष्णू म्हणून आनंदी व्हायचय? अंधारात फलाटावर फेकल्यावर अशा प्रश्नांनी कुडकुडताना आपल्यातील सर्जनक्षमतेला साद घालण्याची हीच वेळ आहे. समजा आपल्याला प्रश्नच पडत नसतील तर आपण रेल्वेच्या बोगीत आहात आणि लवकरच फलाटावर फेकले जाणार आहात. आणि हो, आपण सर्वांशी सर्वत्र गोड वागत असू तर याचा अर्थ भूमिका घ्यायच्यावेळी गप्प राहिलेल्यांपैकी आपण एक असू. आपल्या प्रत्येकामध्ये सर्जन क्षमता असते. सर्जनाची प्रक्रिया परिवर्तनाला चालना देते. अस्तित्वात असलेल्या संकल्पनांचा पुनर्विचार करायला लावते. यासाठी आपल्याच संकल्पना आपण वारंवार तपासणं गरजेचं असतं.

माझ्या सर्जनाचा आधार सद्भावना, सदविचार असेल की हिंसा? मतभेद म्हणजे शत्रुत्व असतं का? मग सवयीने माझे विचार मतभेदवाल्या विचारांच्या प्रतिक्रियेत बनत जातात. त्यामुळे समोर शत्रू असल्याशिवाय मला बोलता येत नाही. त्याचा मला त्रास होतो. सतत नवीन शत्रू शोधावा लागतो. मला कोणालाही शत्रू न ठेवता माझे विचार नेमकेपणाने मांडता यायला हवेत. माझ्या प्रतिष्ठेच्या कल्पना कशाच्या आधारावर आहेत? त्यामध्ये बाजार, समाज माध्यमे, जाहिराती, चालीरीती यांचा किती वाटा आहे? याची झाडाझडती घ्यावी लागेल. या सगळ्या संस्कारात मी आज जे जगतोय, तसेच जगण्याची माझी खरंच गरज आहे का? माझी जगण्याची प्राधान्ये काय आहेत? याची उत्तरे मी मोकळेपणाने शोधायला हवी.

आपली संस्कृती शुद्ध असावी असा माझा आग्रह असतो का? काळानुरूप संस्कृती बदलत जाते असा मी विचार करतोय का? त्यात विज्ञान-तंत्रज्ञान, पूर, दुष्काळ, स्थलांतर त्यातून एकमेकात मिसळलेली लोक संस्कृती यांचा वाटा किती आहे? खरं तर शुद्ध संस्कृती म्हणजे डबकं, साचलेलं पाणी. जिवंत संस्कृती म्हणजे वेगवेगळ्या प्रवाहांचा होणारा संगम. अशा प्रकारच्या विविध संकल्पना तपासण्याची प्रक्रिया निश्चितच डोक्याला त्रास देणारी आणि अस्वस्थतेची असते. त्यातून आनंदही मिळतो. आपली जीवनशैली बदलण्याची प्रेरणा आपल्याला मिळते.

१९३०च्या मिठाच्या सत्याग्रहातील धारासना मिठागराचा प्रसंग थरकाप उडविणारा आहे. सत्याग्रही पोलिसांच्या दिशेने चालत जात आहेत. त्यांना माहीत आहे तिथे पोहोचल्यावर आपल्याला बेदम मार पडणार आहे. तरीही ते चालतात. पोलिसांची पहिली काठी अंगावर पडेपर्यंत सत्याग्रहींच्या मनात वादळ असणार. पोलिसांनी अमानुषपणे बडवायला सुरुवात केल्यानंतर सत्याग्रही फक्त आपल्या मागण्यांच्या घोषणा देत राहील. बेशुद्धीतून बाहेर आल्यावर ते रक्तबंबाळ होते, अंग प्रचंड ठणकत होतं तरीही त्यांना खूप मोकळ वाटत होतं. भय दूर झाले होते. निर्भयतेचा आनंद त्यांच्या सर्जनाची प्रेरणा झाला. अशाप्रकारे आपल्या तत्त्वाप्रमाणे जगताना मोकळेपणाची कवाडे उघडतात. अनेक मार्ग सोपे होतात. जगण्याला भिडण्याची ताकद मिळते. एका वाक्यात सांगायचं तर आपल्या आतील गांधी जागा होतो.
vtambe@gmail.com