scorecardresearch

सत्यशोधक समाज: १५० वर्षांची शोधयात्रा

सत्यशोधक समाजाची स्थापना ही इथल्या तळागाळातल्या जनतेला ‘सदुपदेश व विद्याद्वारे त्यांस त्यांचे वास्तविक अधिकार समजून देण्याकरिता’ झालेली होती.

सत्यशोधक समाज: १५० वर्षांची शोधयात्रा
(संग्रहित छायाचित्र)

श्रद्धा कुंभोजकर

महात्मा जोतिराव फुले आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी एकत्र येऊन स्थापन केलेला सत्यशोधक समाज दीडशेव्या वर्षांत पदार्पण करत आहे. जात, धर्म, लिंगभाव यासंदर्भात तत्कालीन समाजात बुद्धिनिष्ठेची मशागत करणाऱ्या, विद्येचा आग्रह धरणाऱ्या सत्यशोधकांसमोर आज कोणती आव्हाने आहेत?

विठ्ठल नामदेव गुठाळ हे पुण्यामध्ये आडतदार होते. त्यांनी ‘सर्वसाक्षी जगत्पती। त्याला नकोच मध्यस्ती।’ या सत्यशोधक समाजाच्या तत्त्वाचा उपदेश केला. त्यामुळे १८७४ मध्ये महादेव सूर्यवंशी यांनी आपल्या घराची वास्तुशांती सत्यशोधक पद्धतीनं पारंपरिक पुरोहितांशिवाय केली. पुरोहितांच्या संतापाचा परिणाम असा झाला, की गुठाळ यांच्या व्यावसायिक भागीदारांनी त्यांची भागिदारी काढून टाकली. आर्थिक नाकेबंदीमुळे गुठाळ यांना मुलाबाळांची शाळादेखील सुरू ठेवणं अशक्य झालं. सुदैवानं गंगाराम भाऊ म्हस्के यांनी दरमहा तीन रुपये स्कॉलरशिप देऊन गुठाळ यांची परिस्थिती सुधारेपर्यंत मुलाच्या शिक्षणात खंड पडू दिला नाही. सनातन धर्माच्या विरुद्ध जाऊन सामाजिक समतेचा विचार मांडणाऱ्या माणसांचं आर्थिक आणि राजकीय नुकसान करण्याचे प्रयत्न सत्यशोधक समाजामुळे निष्फळ झाले.

२४ सप्टेंबर १८७३ रोजी महात्मा जोतिराव फुले आणि त्यांच्या अनेक जाती-धर्मातल्या सहकाऱ्यांनी एकत्र येऊन सत्यशोधक समाजाची स्थापना केली. भारत या राष्ट्राचं बीजारोपण करणं आणि ते जगवणं यात सत्यशोधक समाजाचं मोठं योगदान आहे. आज सत्यशोधक समाज १५०व्या वर्षांत पदार्पण करत आहे. त्याच्या वाटचालीची कृतज्ञ आठवण ठेवणं अगत्याचं आहे. सत्यशोधक समाजाची स्थापना ही इथल्या तळागाळातल्या जनतेला ‘सदुपदेश व विद्याद्वारे त्यांस त्यांचे वास्तविक अधिकार समजून देण्याकरिता’ झालेली होती. हे अधिकार आणि कर्तव्यांची जाणीव भारतीय जनतेला झाल्यामुळेच महात्मा फुले म्हणाले होते तसं ‘एकमय लोक’ या स्वरूपात भेदाभेदांच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न करता करता भारत हे राष्ट्र अनेक दिशांनी बहरत अमृत महोत्सवापर्यंत पोचलं आहे.

राष्ट्राच्या जडणघडणीची प्रक्रिया राजकीय स्वरूपाची आणि सत्यशोधक समाजाचं कार्य हे सामाजिक स्वरूपाचं असल्यामुळे या दोन्हींमध्ये फारसा सहसंबंध नाही असा गैरसमज आहे. प्रत्यक्षात मात्र माणसांच्या समाजाशिवाय राष्ट्र घडत नाही. आणि सत्याचा शोध घेताना संसाधनांच्या असमान वाटपाचा, म्हणजेच अधिकार आणि सत्तेचा मुद्दा अग्रस्थानी असतो. त्यामुळे राजकीय आणि सामाजिक क्षेत्रांचा अविभाज्य संबंध मान्य करावा लागतो.

जात, धर्म आणि लिंग यांवर आधारलेल्या भेदभावांचा मुकाबला करण्यासाठी सत्यशोधक समाजानं माणसाला काय दिलं? नीतिमूल्यांचं पालन करणारी संस्था म्हणून या समाजानं कोणत्या दिशा दाखवल्या? तळागाळातल्या माणसांनी आर्थिक प्रगती करून घ्यावी यासाठी कोणता कार्यक्रम दिला? आणि बहुसांस्कृतिक जगण्याचे पेच सोडवण्यासाठी कोणते पर्याय उभे केले? या प्रश्नांची उत्तरं मांडता आली तर सत्यशोधक समाजाचं गेल्या दीडशे वर्षांतलं योगदान समजू शकेल.

जात ही माणसांचं शोषण करणारी व्यवस्था नष्ट करण्यासाठी सत्यशोधक समाजानं अनेक अंगांनी प्रयत्न केले. ‘सत्यशोधक चाबूक’सारख्या रचनांमधून मो. तु. वानखडे यांच्यासारख्या विचारवंतांनी ‘ब्राह्मण्य नव्हे जातीवरती’ हा विचार मांडून जन्मावर आधारित श्रेष्ठकनिष्ठत्वाच्या कल्पनांना मोडीत काढलं. धोंडिराम नामदेव कुंभार यांच्यासारख्या कार्यकर्त्यांनी शंकराचार्याकडून धर्मविधी करण्याबद्दल मान्यता मिळवली. तर ओतूरच्या डुंबरे पाटलांनी न्यायालयाकडून निकाल मिळवला, की लग्न आदी धार्मिक संस्कार करण्याबाबत कोणत्याही विशिष्ट जातीची मक्तेदारी मानण्याची गरज नाही.

धार्मिक विषमतेचा मुकाबला करण्याकामी तर सत्यशोधकांच्या कामाचं इंग्रज सरकानंही कौतुक केलं होतं. नारायण मेघाजी लोखंडे यांनी मुंबईत गिरणी कामगार संघटना उभारली हे आपल्याला माहीत असतं. १८९३ मध्ये मुंबईत हिंदू-मुस्लीम दंगली झाल्या त्यानंतर लगेचच लोखंडे यांनी आपल्या मुस्लीम मित्रांसह राणीच्या बागेत एक जत्रा भरवली. ‘जत्रेमध्ये मजा करताना आपापल्या धर्माचा अडथळा तुम्हाला येत नाही, तसंच समाजामध्ये एकोप्यानं राहिलात तर धर्मावर आधारलेले वाद टळतील,’ अशा आशयाचा लोखंडे यांचा उपदेश अतिशय प्रभावी ठरला. धार्मिक विषमता आणि वाद टाळण्यासाठी सत्यशोधकांनी अशा अभिनव मार्गाचा यशस्वी वापर केला हे आपल्यापैकी अनेकांना माहीत नसतं.

लिंगभावावर आधारलेले पेच सोडवतानाही सत्यशोधकांनी नवनवे मार्ग अनुसरले. सावित्रीबाई फुले आणि फातिमाबी शेख या पुण्यातल्या मुलींच्या शाळांचं काम पाहात होत्या हे तर सर्वश्रुतच आहे. सावित्रीबाई रोडे यांनी अस्पृश्य मानल्या गेलेल्या रामोशी जातीमध्ये सत्यशोधक विचार आणि स्त्रीशिक्षण रुजवण्याच्या  कामी इतकी कर्तबगारी गाजवली की त्या ‘विद्यादेवी’ म्हणून ओळखल्या जात.  तानूबाई बिर्जे यांनी दीनबंधु या वृत्तपत्राचं संपादन करून त्या क्षेत्रात आघाडी घेतली. सत्यशोधक पद्धतीच्या विवाहामध्ये वधू वराला म्हणते,

स्वातंत्र्यानुभवाचि ओळख अम्हां झाली नसे मानसी। यासाठी अधिकार देशिल स्त्रियां, घे आण त्याची अशी।।

लिंगभाव समानतेची मुळं सत्यशोधकांनी खोलवर रुजवल्याचा परिणाम असा झाला, की मुंबईत १८९४ मध्ये सुपारीबाग या ठिकाणी शेकडो स्त्रियांनी गिरणी कामगार म्हणून त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध सभा भरवली. त्यात भाषणं केली आणि पुढे कामगारांच्या हक्कासाठीच्या लढाईतही योगदान दिलं. स्वातंत्र्याच्या चळवळीत उतरणाऱ्या स्त्रियांच्या निर्भयपणाची मुळं या कामगार स्त्रियांच्या लढय़ामध्ये होती.

जोतिराव आणि सावित्रीबाईंच्या मृत्यूनंतरही सत्यशोधक समाजाची वाटचाल थांबली नाही. विदर्भ, मराठवाडा, कोकण, दक्षिण महाराष्ट्र, बडोदा, धारवाड अशा अनेक ठिकाणी सत्यशोधक समाजाच्या शाखा विस्तारलेल्या होत्या. वेगवेगळे कार्यकर्ते नवनवीन माध्यमांचा वापर करून विषमतेवर प्रहार करत होते. सत्यशोधक जलसे, सत्यशोधक विचारांची वृत्तपत्रं, पुस्तकं आणि सभांमधून प्रत्यक्ष उपदेश अशी अनेक माध्यमं वापरण्यात सत्यशोधक कार्यकर्ते तरबेज होते. यामुळे अनेक ब्राह्मणेतर जातींनी शिक्षण परिषदांची स्थापना केली. त्यांनी काढलेल्या शाळा आणि इतर शैक्षणिक संस्था, त्यांतल्या विद्यार्थ्यांना देशपरदेशात जाऊन उच्चशिक्षण घेण्यासाठी दिलेलं उत्तेजन, यांतून शिक्षणाची आणि पर्यायानं समृद्धीची दारं अनेक जातींसाठी खुली झाली.

शिक्षण आणि समृद्धी यांच्या सोबतीनं संसाधनांच्या वाटपामध्ये न्याय्य अधिकारांची जाणीवही सत्यशोधक समाजामुळे विविध जातीधर्माच्या लोकांपर्यंत पोचली. विसाव्या शतकात भारतीय राष्ट्रीय सभा अर्थात काँग्रेसच्या वाटचालीमध्ये या नवशिक्षित ब्राह्मणेतर वर्गानं हातभार लावायला सुरुवात केली. तोवर उच्च जातवर्गाचा तोंडवळा असणाऱ्या राष्ट्रीय चळवळीत ब्राह्मणेतर आणि अस्पृश्य मानल्या गेलेल्या जातींमधल्या माणसांनी सहभाग नोंदवल्यामुळे या चळवळीला राष्ट्रीय स्वरूप येत गेलं. याकामी सत्यशोधक समाजानं केलेल्या जागृतीचं योगदान नाकारता येणार नाही.

सत्यशोधक समाजाच्या स्थापनेपासूनच भारतीयांना पुढे राजकीय अधिकार मिळतील तेव्हा आपले विचार मांडता यावेत या स्पष्ट उद्देशानं निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा घेऊन ब्राह्मणेतर वर्गाला आपले विचार सुसूत्रपणे मांडण्याचं प्रशिक्षण सत्यशोधकांनी अनेक वर्ष चालवलं होतं. समाजाच्या नियमित सभा भरवणे, अध्यक्ष, उपाध्यक्ष, खजिनदार, सेक्रेटरी अशी पदं विविध जातीधर्माच्या माणसांनी भूषवणे, समाजाच्या कामाचे वृत्तांत नियमितपणे प्रकाशित करणे या सगळय़ा गोष्टींतून सर्वसामान्य कार्यकर्त्यांना संस्था कशी चालवायची याचं शिक्षणच सत्यशोधक समाजामुळे मिळालं. रयत शिक्षण संस्था आणि विविध जातींच्या शिक्षण प्रसारक मंडळांना याचा निश्चित उपयोग झाला. छत्रपती शाहू महाराज आणि महाराज सयाजीराव गायकवाड या दोनही राज्यकर्त्यांनी सत्यशोधक विचारांना पाठबळ दिलं. सत्यशोधक समाजाच्या सर्वच कार्यकर्त्यांचे आणि चळवळींचे कार्यक्रम या राज्यकर्त्यांना पटत होते असं नाही. पण वैचारिक मतभेदांचा सन्मान राखून त्यांनी सत्यशोधक विचारांचा प्रसार करण्यासाठी सतत मदत केली. दीनबंधु, दीनमित्र, विजयी मराठा, हंटर, जागृती, राष्ट्रवीर अशा अनेक वृत्तपत्रांना या राज्यकर्त्यांनी ऊर्जा दिली.

स्वातंत्र्योत्तर काळात सत्यशोधक समाजापुढची आव्हानं बदलली. त्यानुरूप सत्यशोधकांनी समानता आणि बंधुतेकडे लक्ष केंद्रित केलं.  डॉ. बाबा आढावांसारख्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रामध्ये नव्याने निर्माण होणाऱ्या संपत्तीचं समान वाटप व्हावं, कामगारांना हक्क मिळावेत यासाठी कायदेशीर लढाया लढल्या. जिंकल्यादेखील. धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाचा कायदा असेल, हमाल माथाडी कामगारांसाठीचे कायदे असतील- सत्यशोधक विचाराच्या कार्यकर्त्यांनी अनेक प्रश्नांवर उत्तरं शोधणं चालू ठेवलं.

जागतिकीकरणानंतर मात्र सत्यशोधक समाजाच्या भवितव्याबाबत प्रश्न उभे राहिले आहेत. तगून राहण्याच्या कामी गुंतलेल्या माणसांना भवतालाचा, सत्याचा आणि शोध घेण्याचा विचार करायला सवड राहात नाही असं वाटतं. तसंही सत्योत्तर जगात कोणत्याही घटनेची प्रतिक्रिया द्यायची तर पाच पर्यायांपैकी एक निवडण्याइतकंच अंगठय़ाएवढं स्वातंत्र्य उरलं असताना सत्यशोधक हा शब्ददेखील कालबाह्य ठरेल अशी परिस्थिती आहे. बहुसांस्कृतिक जगण्यामधल्या प्रश्नांचा कल्लोळ पुढे ठाकतो, तेव्हा जोतिरावांनी पाहिलेलं बहुधर्मी कुटुंबाचं स्वप्न दिलासा देतं. पत्नी बौद्ध, पती ख्रिश्चन, मुलगी मुस्लीम आणि मुलगा सार्वजनिक सत्यधर्मी अशा कुटुंबाचं स्वप्न मांडून ते म्हणतात,

‘‘प्रत्येकाने कोणी कोणाच्या धर्माचा हेवा करून द्वेष करू नये, कारण त्या सर्वानी आपण सर्व निर्माणकर्त्यांने निर्माण केलेले असून त्याच्याच (निर्मीकाच्या) कुटुंबातील आहोंत, असें समजून प्रेमाने व गोडीगुलाबीनें एकमेकांशी वर्तन करावें, म्हणजे ते आपल्या सर्वाच्या निर्माणकर्त्यांच्या राज्यांत धन्य होतील.’’

shraddhakumbhojkar@gmail.com

मराठीतील सर्व विशेष लेख ( Features ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mahatma jyotiba phule150 year of satyashodhak samaj zws