शूद्र, अतिशूद्र आणि स्त्रियांच्या सर्व प्रकारच्या गुलामगिरीविरुद्ध चळवळ उभा करणारा पहिला तत्त्वचिंतक नेता म्हणजे महात्मा जोतिबा फुले. हा संघर्ष उभा करताना त्यांच्या कथनी आणि करणीमध्ये कधीच विसंगती निर्माण झाली नाही. वैज्ञानिक दृष्टिकोन, धर्मनिरपेक्षता आणि मानवता या मूल्यांच्या आधारे त्यांना भारतीय समाजाची पुनर्रचना करायची होती.

डॉ. आंबेडकरांनी जोतिबांना बुद्ध आणि कबीर यांच्या पंक्तीत आपले गुरू मानले. ते दोघे एकमेकांना भेटणे शक्यच नव्हते-  १८९० साली फुले निर्वाण पावले आणि १८९१ झाली डॉ. आंबेडकर जन्माला आले. एकमेकांना कधीच न भेटलेल्या या गुरू-शिष्यांत पराकोटीची वैचारिक समानता होती. डॉ. आंबेडकरांनी सार्वजनिक पाणवठ्यावर आपले नागरी अधिकार प्रस्थापित करण्यासाठी १९२०च्या दशकात जो महाडचा रणसंग्राम सुरू केला त्याची पूर्वपीठिका जोतिबा फुले यांनीच तयार केली. ब्रिटिशकाळात १८५८ मध्ये नागरी वस्त्यांसाठी नगरपालिका स्थापन झाल्यावर सार्वजनिक पाणवठ्यांची व्यवस्था निर्माण करण्यात आली. या सार्वजनिक पाणवठ्यावर पाणी भरण्यावरून तत्कालीन अहमदनगर शहरात तंटा उपस्थित झाला. एका अस्पृश्य स्त्रीने हौदाचे पाणी  बाटवले अशी तक्रार झाली. सार्वजनिक पाणवठ्यांची हीच अवस्था पुण्यात होती. पुण्यात जागोजागी पेशव्याने हौद बांधले होते परंतु तिथे महार मांगांना पाणी मिळण्याची सोय नव्हती. पुणे नगरपालिकाही त्यांच्याकडे लक्ष देत नव्हती. एप्रिल, मे महिन्यात पाण्याचे दुर्भिक्ष पडे तेव्हा अनेक किलोमीटर अंतरावरून येणार्‍या दलितांना करुणा भाकूनही हौदावरील पाणी भरू दिले जात नसे. जोतिरावांनी १८६८ साली सनातन्यांच्या शिव्याशापाला न भिता आपल्या घराजवळील पाण्याचा हौद महार मांगासाठी खुला केला. त्यामुळे सनातनी  लोकांची माथी भडकली. शहरात पुन्हा एकदा जोतिबा विरोधाची लाट उसळली, पण त्यांनी त्याला धैर्याने तोंड दिले.

परावलंबन असहायता आणि आश्रित भावना यांनी ग्रासलेल्या दलितांच्या मनामध्ये प्रथमच फुलेंनी आत्मोन्नतीचा उजेड निर्माण केला होता. डॉ. आंबेडकरपूर्व काळात दलितांची चळवळ उभे करणारे दापोलीचे गोपाळ बाबा वलंकर यांनाही फुलेंनीच मार्गदर्शन केले होते. याचा डॉ. आंबेडकरांना अभिमान होता. परंतु जोतिबा फुले आणि त्यांच्या सत्यशोधक समाजाचा प्रत्यक्ष वारसा सांगणारे काही सत्यशोधक नेतेच जोतिबा फुले यांच्या प्रेरणेच्या विपरीत तत्त्वज्ञान सांगून वर्तन करू लागले होते. जोतिबा फुले यांनी मनुस्मृती ही शूद्रांच्या बोकांडी गुलामगिरी बसवते म्हणून तिचा धिक्कार केला; तीच मनुस्मृती डॉ. आंबेडकरांनी महाडच्या सत्याग्रहात जाळली. तेव्हा मनुस्मृतीचे समर्थन सत्यशोधक समाजाचे नेते भास्करराव जाधव करू लागले. याचा संताप व्यक्त करत डॉ. आंबेडकर म्हणाले ‘‘जोतिबांचा अनुयायी म्हणून घेण्यात मला यापूर्वी कधीच लाज वाटली नाही, आत्मविश्वासाने मी आज असे म्हणू शकतो की, मीच तेवढा खरा आज जोतिबांना एकनिष्ठ राहिलो आहे. आणि मला अशी खात्री आहे की या देशात जनतेचे सर्वांगीण हित करणारा असा कोणताही पक्ष पुढे आला तरी ,त्यांनी कोणतेही नाव धारण केले तरी, त्यांना जोतिबांचे धोरण त्यांचे तत्त्वज्ञान आणि त्यांचे कार्यक्रम घेऊनच पुढे जावे लागेल. तोच एक खराखुरा लोकशाहीचा मार्ग आहे’’.

 जोतिबांच्या धर्मचिकित्सा, शूद्र अतिशूद्र आणि ्त्रिरयांची उन्नती आणि त्यांचे नागरी अधिकार व लोकशाहीच्या व्यापक विस्तारासाठी डॉ. आंबेडकर संघर्षरत राहिले. या संघर्षात कोणत्याही चिकित्सेची सुरुवात ही धर्म चिकित्सेपासून होते. ही धर्माची चिकित्सा करण्याची आंतरदृष्टी त्यांना फुले यांच्याकडून मिळाली असावी. भारतीय इतिहासाचा व गुलामगिरीचा उलगडा करण्यासाठी फुले यांनी गुलामगिरी, अस्पृश्यांची कैफियत यासारखे ग्रंथ लिहिले. फुले यांची हीच अंतर्दृष्टी डॉ. आंबेडकर यांच्या ‘शूद्र पूर्वी कोण होते?’ या पुस्तकात दिसते. शूद्र मूळचे क्षत्रिय होते, या जोतिबांच्या आंतरदृष्टीचा सैद्धांतिक विकास करणारे हे पुस्तक आंबेडकरांनी फुले यांना अर्पण केले. या अर्पणपत्रिकेत, ‘आधुनिक भारतातील महान शूद्र’ असा फुले यांचा उल्लेख करून आंबेडकर म्हणतात की ‘‘(फुले) यांनी हिंदूंमधील पद दलितांना उच्च वर्गाकडून होणार्‍या गुलामगिरीची जाणीव करून दिली आणि उपदेेश केला की, भारतातील सामाजिक लोकशाही परकीयापासून मिळणार्‍या (राजकीय) स्वतंत्र्यापेक्षा अधिक महत्त्वाची आहे.’’ सामाजिक सुधारणा  की राजकीय सुधारणा आधी या वैचारिक द्वंद्वात न अडकता हे या पूर्वीच जोतिबा यांनी तयार केलेल्या वैचारिक भूमिकेसह राहिले. परंतु ही सामाजिक भूमिका घेताना महार, मांग, शेतकरी, स्त्रिया आणि कामगार लोक यांच्याकडे इंग्रज दुर्लक्ष करतात हे वास्तव जोतिबांप्रमाणे तेही विसरले नाहीत. राष्ट्रीय सभा (तत्कालीन काँग्रेस) ही कनिष्ठ वर्गाच्या हिताकडे दुर्लक्ष करत आहे अशी जोतिबांची तक्रार होती हीच भूमिका पुढील काळात डॉ. आंबेडकरांच्या आंबेडकरांच्या संघर्षात आली.

पुनर्रचनेचा आग्रह आणि व्यापक कृती

प्रत्यक्ष सामाजिक संघर्ष टाळून आणि निव्वळ भूतदयेच्या दृष्टीने शूद्र अतिशूद्र ्त्रिरयांचे प्रश्न सोडवण्यास दोघांचाही विरोध होता. म्हणूनच ‘हिंदू समाजाच्या पुनर्रचनेसाठी जातीचे उच्चाटन केले पाहिजे’, हा आग्रह आंबेडकरांच्या आधी फुले यांनी मांडला. डॉ. आंबेडकरांनी त्या आग्रहाला अभ्यासाचा आणि व्यापक कृतीचा पाया दिला. कोकणातील शेतकर्‍यांच्या शोषणाविरुद्ध पुकारलेले खोती आंदोलन, हिंदू धर्माची कठोर चिकित्सा, अस्पृश्यांसाठी सुरू केलेली शैक्षणिक चळवळ,स्त्रियांचे प्रश्न यांवर त्यांनी लक्ष केंद्रित केले. जोतिबा फुले यांची जयंती व स्मृतिदिन नंतरच्या काळात आंबेडकरांच्या चळवळीत मोठ्या प्रमाणात साजरे होऊ लागले.

‘‘शिंपी, कुंभार, न्हावी, कोळी, महार, मांग, चांभार यांना माणुसकीचे धडे फुल्यांनीच दिले आणि शिकवले .पूर्वीच्या राजकारणात आम्ही जोतिबाच्या मार्गाने जात होतो पुढे मराठे हे आमच्यातून फुटले. त्यांच्याच पैकी आमचे रा. बोले (रावबहादुर एस. के. बोले, १९३८ मध्ये) हिंदू महासभेत गेले. कोणी कुठेही जावे पण आम्ही मात्र जोतिबांच्या मार्गाने जाऊ. जोडीला कार्ल मार्क्स घेऊ किंवा इतर कोणी घेऊ. पण जोतिबाचा मार्ग सोडणार नाही.’’ – अशा आशयाची नोंद पंढरीनाथ पाटील यांनी लिहिलेल्या फुले चरित्राच्या अभिप्रायात आढळते.

 पुणे महानगरपालिकेने १९२४ साली टिळकांचा व विष्णुशास्त्री चिपळूणकर यांचा पुतळा पुणे शहरात बसवला. परंतु फुले यांचा पुतळा बसवण्याला पुण्यातील ब्राह्मणाचा विरोध होता. शिवाय ‘सत्यशोधक की ख्रिस्त सेवक?’ या शीर्षकाची पुस्तिका लिहून जोतिबांवर बेछूट आरोप करून त्यांची बदनामी करण्याचा निंद्य प्रयत्न काही पुणेकरांनी राजरोस चालवला होता. याला प्रत्युत्तर म्हणून दिनकर जवळकर यांनी ‘देशाचे दुश्मन’ हे पुस्तक लिहिले. या पुस्तकाच्या विरोधात चिपळूणकर यांच्या नातवाने जेधे, जवळकर यांच्या विरोधात न्यायालयात खटला दाखल केला. तेव्हा जेधे, जवळकर यांची बाज मांडण्यासाठी कोणताच वकील तयार नसताना, आंबेडकर यांनी जेधे व जवळकर यांचे वकील पत्र घेऊन या खटल्यातून जेधे, जवळकर यांची निर्दोष मुक्तता केली. फुले यांचा पुणे शहरात पुतळा बसवण्यावरून जे पुणे नगरपालिकेत रणकंदन झाले होते त्यात जेधे, जवळकर या सत्यशोधक पुढारी यांच्या बरोबरीने आंबेडकरांचे अनुयायी पा. ना. राजभोज हेही लढत होते. त्यांनी आंबेडकरांच्या सांगण्यावरून फुले यांचा पुतळा बसवण्याबद्दलचा दुसरा ठराव नगरपालिकेत आणला होता.

जोतिबांचे जीवन चरित्र इंग्रजीत लिहिण्याची डॉ. आंबेडकरांची तीव्र इच्छा होती. जोतिबांच्या क्रांतिकारक व ऐतिहासिक कार्याचे मूल्यमापन करून समग्र चरित्र ग्रंथ त्यांना लिहायचा होता. त्यासाठी त्यांनी फुले यांचे सगळे ग्रंथ संग्रहित केले होते. काही ग्रंथाच्या प्रती उपलब्ध झाल्या नाहीत तेव्हा प्रबोधनकार ठाकरे यांच्यामार्फत ते ग्रंथ देण्याची जाहिरात त्यांनी वर्तमानपत्रात दिली. त्या काळी फोटोकॉपीसारख्या सुविधा उपलब्ध नसल्याने त्यांनी मुंबईतील एशियाटिक लायब्ररी, पुण्याचे इतिहास संशोधन मंडळ येथील संदर्भ ग्रंथाचे हस्तलिखित करून घेतले होते.

 व्यक्तिपूजा व्यक्तीला, समाजाला अधोगतीकडे आणि हुकूमशाहीकडे घेऊन जाते असे डॉ. आंबेडकरांचे दृढ मत होते. शिष्य केवळ आपल्या गुरूंकडून मार्गदर्शन घेतो. तो आपल्या गुरूंचे निष्कर्ष स्वीकारण्यास बांधील नसतो. शिष्याने आपल्या गुरूंची तत्त्वे किंवा निष्कर्ष स्वीकारले नाहीत, यात कृतघ्नता नसते. कारण, जरी तो त्या गोष्टी नाकारत असला तरी, ‘तुम्ही मला माझे स्वत:चे अस्तित्व ओळखायला जागृत केले; त्यासाठी मी तुमचा आभारी आहे.’ अशी भावनाच त्यात असते.

बुद्धाचे जीवन, कबिराची शिकवण आणि फुले यांचे कार्य यांचा प्रभाव मार्गदर्शक म्हणून मान्यच असला तरी डॉ. आंबेडकर म्हणतात, ‘‘शिष्याने स्वत:ला आपल्या गुरूंच्या तत्त्व आणि निष्कर्षांशी बांधून घेणे, हे गुरूंच्या तसेच स्वत:च्याही दृष्टीने चुकीचे आहे. शिष्याचे कर्तव्य आहे की त्याने ती तत्त्वे जाणून घ्यावीत आणि जर त्याला त्यांच्या मूल्याची व योग्यतेची खात्री पटली, तर त्यांचा प्रसार करावा. हीच प्रत्येक गुरूची इच्छा असते.’’ – या अर्थाने, फुले यांचे शिष्यत्व डॉ. आंबेडकर यांनी सार्थ केले.