अमलेश कणेकर
मतदारयाद्यांच्या विशेष सखोल फेरतपासणी मोहिमेत अनेकांना आयोगाकडून वेगवेगळ्या नोटिसा जात आहेत. मात्र या प्रश्नाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करणार्या एका जागरुक नागरिकाला यासंदर्भात जे सापडले, त्याची संभावना सरकारी यंत्रणेचे शुद्ध विनोद या पलीकडे होऊ शकत नाही. हे विनोद तितकेच क्रूर आहेत, हेही महत्त्वाचे…
महाराष्ट्रात निवडणूक आयोगामार्फत मतदारयाद्यांची विशेष सखोल फेरतपासणी (स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन, एसआयआर) सुरू आहे, याची आपल्या सर्वांना जाणीव आहे. या एसआयआरसंबंधित लेखातील उदाहरणे महाराष्ट्र विधानसभा १८१ (माहीम), बूथ क्रमांक ७३ मधील आहेत. गोपनीयतेचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने मतदारांची खरी नावे वापरण्यात आलेली नाहीत. तथापि, हे उदाहरण प्रत्यक्ष मतदारांच्या माहितीवर आधारित आहे. त्याबद्दलचे पुरावे उपलब्ध आहेत. यासाठीची माहिती चार स्रोतांतून मिळवली आहे:
(१) निवडणूक आयोगाच्या https:// voters. eci. gov. in/ download- eroll’’ या वेबसाईट वरील Maharashtra/2026/ SIR Draft Roll – 2026/ Mumbai City/181 Mahim X हा विभाग.
(२) आयोगाच्या https:// electoralsearch. eci. gov. in/ uesfmempmlkypo ¹ या वेबसाईट वरील Search Your Name In Voter List हा विभाग.
(३) २००२ची यादी आयोगाच्या website वर सापडत नसल्याने ती https:// voterlist. co. in/ mahim- sir-2002/ या खासगी वेबसाईटवरून मिळवली.
(४) संबंधित मतदान केंद्रावरील विसंगत नावांची यादी. (डि्क्रिरपन्सी लिस्ट) (अधिकृतरीत्या मिळविलेली).
पालकाचे नाव जुळत नाही…
पहिला किस्सा दोघा मतदार भावंडांचा आहे. या कुटुंबात आई, वडील, मुलगा, मुलगी आहेत. चौघांचीही नावे २०२४ या मतदार यादीत होती. आणि किमान ६० वर्षे हे कुटुंब त्याच घरात राहाते आहे.
२०२६च्या एसआयआर प्रक्रियेत भाऊ (वय २५ वर्षे) आणि बहीण (वय २७ वर्षे) दोघांनाही विसंगत नावांच्या यादीत टाकण्यात आले आहे. म्हणजे आता त्यांना निवडणूक आयोगाची नोटीस येणार. त्यानंतर त्यांनी कागदपत्रे सादर करायची आणि आपला आधीच असलेला मतदानाचा हक्क पुन: सिद्ध करायचा.
ज्या कारणावरून त्यांना विसंगत नावांच्या यादीमध्ये टाकण्यात आले आहे, तो खरा क्रूर विनोद आहे. दोघांनाही कारण ‘पेरेंट नेम मिसमॅच’ असे देण्यात आले आहे. म्हणजे ‘पालकांचे नाव जुळत नाही’. पालक म्हणजे आई की वडील? याचे उत्तर ‘वडील’ हे उघड आहे, कारण दोघांच्या मतदार नोंदीत ‘नातेवाईकाचे नाव’ (रिलेटिव्हज् नेम) यासोबत ‘फादर्स नेम’ असा उल्लेख आहे. म्हणजे, दिलेले कारण याचे विस्तृत स्पष्टीकरण असे मानायला हरकत नाही : ‘तुमच्या मतदार नोंदीसमोर असलेले वडिलांचे नाव आणि मतदार यादीतील वडिलांचे नाव यात तफावत आहे’.
वरील स्पष्टीकरण हा मी लावलेला अर्थ आहे. परंतु हा अर्थ तर्कशुद्ध तर वाटतोच; शिवाय निवडणूक आयोगाने विसंगत नावांच्या यादीसंदर्भातील कारणांचे स्वत:हून कुठेही जाहीर व विस्तृत स्पष्टीकरण दिल्याचे मला आढळलेले नाही. हे ‘नेम मॅचिंग’ सॉफ्टवेअर करते ऐकल्यावर मी सतर्क झालो. कारण यात मी हल्लीच बरेच काम केले आहे.
आता या भाऊ-बहिणीच्या ‘वडिलांच्या नावाच्या जुळवणी’त गडबड कुठे झाली असेल ते पाहूया. प्रत्येक मतदाराचे संपूर्ण नाव मतदार यादीत येते उदाहरणार्थ, ‘फर्स्ट नेम- मिडल नेम- लास्ट नेम’. वडिलांचे नाव त्याप्रमाणे मतदार यादीत आहे. परंतु नातेवाईकांच्या नावाची नोंद ही बहुतांशी मतदार यादीत ‘फर्स्ट नेम- लास्ट नेम’ अशी येते. या भाऊ-बहिणीच्या नोंदीतही वडिलांचे नाव ‘फर्स्ट नेम- लास्ट नेम’ असे आहे.
म्हणजे वडिलांचे संपूर्ण नाव ‘वामन सदाशिव जोशी’ असेल, तर त्यांच्या मुलाच्या मतदार नोंदीत वडिलांचे नाव हे ‘वामन जोशी’. तर एक शक्यता अशी आहे की निवडणूक आयोगाचे सॉफ्टवेअर ‘वामन सदाशिव जोशी’ ची तुलना ‘वामन जोशी’शी करते आणि ‘मिसमॅच’ अशा निष्कर्षांस पोहोचते.
परंतु मामला यापेक्षाही जटिल असावा. कारण वारंवार आपल्याला सांगण्यात येते की तुलनात्मक ‘मॅपिंग’ हे २००२च्या एसआयआर यादीशी केले जाते. ठीक आहे, मग या भाऊ-बहिणीच्या वडिलांचे नाव २००२च्या एसआयआर यादीत कसे आले होते? ते तपासल्यावर दोन गोष्टींचा उलगडा झाला:
(१) https:// voterlist. co. in/ mahim- sir-2002/ वरील २००२च्या एसआयआरच्या यादीत नावे देवनागरी लिपीमध्ये आहेत.
(२) आणि त्यात नावे २०२६च्या ‘फर्स्ट नेम- मिडल नेम- लास्ट नेम’ या फॉरमॅटमध्ये नसून ती ‘लास्ट नेम – फर्स्ट नेम -मिडल नेम’ या फॉरमॅटमध्ये आहेत.
देवनागरी आणि इंग्रजी नावांच्या सॉफ्टवेअर तुलनेचे काम जटिल होऊ शकते. त्यात आधी अनुवादाचा भाग असतो आणि मग तुलनेचा. त्यात इथे उलट-सुलट क्रमाचाही मुद्दा आहे. आपल्या प्रातिनिधिक उदाहरणातील वडिलांचे नाव हे २००२च्या यादीत ‘जोशी वामन सदाशिव’ असल्यास सॉफ्टवेअर त्याचे इंग्रजी रूपांतर करताना Joshi Waaman Sadashiv, Joshi Waman Sadashiv, Joshi Waaman Sadaashiv इत्यादी करू शकते.
देवनागरी आणि इंग्रजी तुलनेसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता सॉफ्टवेअर (उदाहरणार्थ ओपन एआय) वापरता येते. परंतु खुद्द चॅटजीपीटी आपल्याला ‘चॅटजीपीटी कॅन मेक मिस्टेक्स’ अशी ताकीद नेहमी देत असते.
माझे असे अजिबात म्हणणे नाही की माझी कारणमीमांसा अचूक आहे. परंतु मला ती तर्कशुद्ध वाटते. आणि आयोग आणि त्यांच्या आयटी यंत्रणेने संपूर्ण पारदर्शकता दिली असती तर असल्या अटकळी लावण्याचे कारण नव्हते.
आणखी एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. वर वर्णिलेला प्रकार बहुतांशी मतदारांच्या बाबतीत होऊ शकतो. परंतु तो मोजक्यांच्या बाबतीत घडतो आहे. त्यामुळे ‘सॉफ्टवेअर ग्लिच’ किंवा ‘सॉफ्टवेअर बग’चा संशय बळावतो. तसे असल्यास असा प्रश्न उपस्थित होतो की याची शिक्षा मतदाराने का भोगावी?
शेवटचा मुद्दा असा आहे की चला आपण असे गृहीत धरू की एखाद्या मतदाराच्या वडिलांच्या नावातील नोंदीत बारीकसारीक फरक खरोखर अस्तित्वात आहे. पण म्हणून मतदाराला थेट विसंगत नावांच्या यादीमध्ये घालायचे, त्याच्या मतदानाच्या अधिकारावर प्रश्नचिन्ह उभे करायचे आणि त्यास मेहनत आणि मानसिक त्रास भोगावयास लावायचे हे अनाकलनीय वाटते.
मतदाराचे नाव स्वत:च्या नावाशी जुळत नाही.
काही मतदारांना ‘सेल्फ नेम मिसमॅच’ या कारणावरून विसंगत नावांच्या यादीमध्ये टाकण्यात आले आहे. म्हणजे ‘मतदाराचे नाव स्वत:च्या नावाशी जुळत नाही’. याचा विस्तृत अर्थ मी असा लावतो की ‘तुमचे आजच्या मतदार यादीतील नाव २००२च्या एसआयआरच्या यादीतील नावाशी जुळत नाही’.
इथे पाहिला प्रश्न उपस्थित होतो की याचा अर्थ सॉफ्टवेअरला मतदार २००२च्या यादीत सापडला आहे! परंतु आजचे व तेव्हाचे नाव यात काहीतरी फरक आढळला आहे. मग असे असताना, मतदारास विसंगत नावांच्या यादीमध्ये टाकून, नोटीस बजावून सुनावणीला बोलावून अनेक कागदपत्रे सादर करण्यास सांगण्यात काय हशील? बूथ लेव्हल ऑफिसर (बीएलओ)ने मतदाराच्या घरी जाऊन चौकशी करून यथायोग्य स्पष्टीकरण मिळाल्यास विषय संपवावा. गैरप्रकाराचे पुरावे सापडले तरच कायदेशीर प्रक्रिया राबवावी.
‘आयोगाने विषय संपवावा’ याचा अर्थ काहीजण असाही काढतील की तुम्ही इतका गंभीर विषय फारच हलक्यात घेत आहात. परंतु हा आक्षेप योग्य ठरणार नाही. कारण पुढे दिलेल्या प्रत्येक उदाहरणाचा १०० टक्के सोक्षमोक्ष मी घरबसल्या करू शकलो. मग बीएलओला का जमू नये?
माझी प्रक्रिया खालीलप्रमाणे होती:
(१) २०२६ ची एसआयआरची यादी व विसंगत नावांची यादी आयोगाच्या अधिकृत पोर्टलवरून घेतली. २००२ ची एसआयआरची यादी खासगी पोर्टलवर मिळाली.
(२) थोडीफार सॉफ्टवेअरची मेहेनत करून (कृत्रिम बुद्धिमत्ता इत्यादी) हा डेटा मायक्रोसॉफ्ट एक्सेल फॉरमॅटमध्ये आणला.
(३) मग ‘सेल्फ नेम मिसमॅच’ हा निकष घेऊन विसंगत नावांच्या यादीत आलेल्या आमच्या परिसरातील एका इमारतीतील तीन व्यक्ती निवडल्या आणि २०२६-२००२च्या याद्यांचा ताळमेळ लावला.
(४) त्या इमारतीत गेली ५० वर्षे राहाणार्या एका इसमास हाताशी घेतले आणि संबंधित मतदारांच्या कुटुंबाचा इतिहास समजून मग तपशीलवार कारणमीमांसा केली.
ती पुढीलप्रमाणेे:
‘सेल्फ नेम मिसमॅच’ मतदार क्रमांक १
या मतदाराच्या नावात ‘फ’ हे अक्षर आहे. उदाहरण म्हणून आपण ‘फाल्गुनी’ हे नाव घेऊ. २०२६च्या यादीत हे नाव इंग्रजीत ढँं’ॠ४ल्ल्र असे आहे. २००२ एसआयआरच्या यादीत त्यांचे नाव देवनागरीत ‘फाल्गुनी’ असे आहे.
मतदार या पत्त्यावर निदान ४० वर्षे व्यवसाय करत असल्यामुळे मी या निष्कर्षांस पोचलो की kRYl, k´WXl, k Fl, k Phl अशा भाषिक वैविध्यामुळे सॉफ्टवेअर फसत आहे. या समस्येला सॉफ्टवेअर कारणीभूत असेल तर असा प्रश्न पडतो की देशात निदान १०-१२ लिपी (देवनागरी, बंगाली, गुजराती, गुरुमुखी इत्यादी) कार्यरत असल्यामुळे सॉफ्टवेअर आणि त्याला सांभाळणारे प्रोगॅम्स किती मोठा हाहाकार निर्माण करणार आहेत? सॉफ्टवेअरचे टेस्टिंग कितपत केले आहे याचे उत्तर मिळविणे, त्या टेस्टिंगचे पुरावे तपासणे अतिशय गरजेचे आहे. ते काहीही असले तरी मतदाराला प्रतिवादीच्या भूमिकेत उभे करणे हा निव्वळ अन्याय आहे.
‘सेल्फ नेम मिसमॅच’ मतदार क्रमांक २
या मतदाराचे नाव (फर्स्ट नेम) दोन शब्दांचे आहे. उदाहरणार्थ ‘शिव शंकर’. २०२६च्या यादीत त्याचे नाव त्र्फर्स्ट नेम ( हः१ि 1) सेकंड नेम ( हः१ि 2) लास्ट नेमत्न् या फॉरमॅटमध्ये आहे. उदा. शिव शंकर शर्मा’. परंतु २००२च्या यादीत वडिलांच्या नावाचा समावेश आहे. जसे ‘शर्मा शिवशंकर ब्रीजनाथ’ – आणि ते देवनागरीत आहे.
फॉरमॅट कसाही असो, २०२६ आणि २००२ ची नावे एकाच माणसाची आहेत हे याद्या पाहून आणि जागेवर चौकशी करून बीएलओ सहज ठरवू शकतो. असे असताना सॉफ्टवेअर घोळ घालत असेल तर ‘रोगापेक्षा औषध भयानक’ अशी परिस्थिती उद्भवते. आणि मुळात रोग आहे कुठला? विसंगत नावांची यादीतील जवळपास ५० मतदारांची २०२६-२००२ जुळवणी केल्यावर मला अद्याप एकही असे प्रकरण आढळलेले नाही ज्यात कुठल्याही प्रकारचे जाणीवपूर्वक केलेले बेकायदेशीर कृत्य संभवू शकते.
एक लॅपटॉप, एक फोन कॉल आणि अध्र्या तासाची मेहनत या जोरावर मी हे संशोधन करू शकतो तर आयोगाचे प्रामाणिक आणि कार्यक्षम बीएलओ दहा मिनिटात सॉफ्टवेअरच्या संशयाचे निरसन करतील. मग ‘नोटीस-सुनावणी-अनेक कागदपत्रे-डॉक्युमेंट अपलोड’ हा द्राविडी प्राणायाम करायची गरजच काय? आणि हे सगळे केल्यानंतर मतदार ‘क्लिअर’ होण्याची हमी नाही कारण तो अधिकार स्थानिक अधिकार्यांकडे तर नाहीच, तो कोणाकडे आहे याचा पत्ता नाही. मतदारास नोटीस पाठविण्याऐवजी बीएलओला ‘इनव्हेस्टिगेट द मॅटर. कलेक्ट एव्हिडन्स ॲण्ड क्लोज द केस इफ नो प्रॉब्लेम इज फाऊंड’ असा निर्देश देणे अधिक सोपे व संयुक्तिक नाही का?
हे असे प्रकार पाहिले की मनात विचार येतो की आयोगाची जमिनीवरील यंत्रणा उत्तम आहे, परंतु वर बसलेले आयएएस अधिकारी, महासंचालक (माहिती तंत्रज्ञान) यांना दुर्बुद्धी किंवा बुद्धिहीनता यांनी ग्रासले आहे की काय? amleshkanekar@gmail.com
