प्रा. अंबादास नरसिंगराव पाचंगे
हजारो वर्षांच्या राजेशाहीच्या शृंखला व जवळ-जवळ १५० वर्षाच्या ब्रिटिशांच्या जुलमी गुलामगिरीतून भारतास स्वातंत्र्य व सार्वभौम सत्ताप्राप्त झाली. अशा वेळी देशाची सर्व सूत्रे पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हातात आलेली होती. त्यावेळी पंडित जवाहरलाल नेहरूंना भारतीय संस्कृतीच्या, परंपरेच्या व महापुरुषांच्या विचारांना पायदळी तुडवत, ठराविक काही लोकांना व संस्थांना हाताशी धरून, देशाचा सर्वशक्तिमान नेता होऊन, हुकूमशहा सहज होता आले असते. परुंतु त्यांच्यात असलेले महापुरुषांचे विचार व देशाबद्दलची आंतरिक आत्मीयता व प्रेम यामुळे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आदर्शवादाचा व नैतिक मूल्यांचा स्वीकार करून देशहिताला अधिकाधिक प्राधान्य दिले.
दुसऱ्या महायुद्धानंतर जागतिक पटलावर अनेक बदल होऊन, जगाची एकीकडे भांडवलशाहिवादी अमेरिका व साम्यवादी रशिया अशा दोन गटांत विभागणी झाली होती, तर दुसरीकडे नवस्वातंत्र्य प्राप्त अनेक राष्ट्रांची संख्या वाढत होती. अशाच काळात म्हणजेच १५ ऑगस्ट १९४७ राजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. देशासमोर दारिद्र्य, उपासमार, धार्मिक दंगली, औद्योगिकरण, शेतकऱ्यांचे प्रश्न, रोजगार, शिक्षण हे व असे अनेक प्रश्न आ वासून उभे होते. अशा या परिस्थितीत नेहरूंकडे भारताची सत्ता आली होती. अशा वेळी भारतीय संस्कृती व परंपरेप्रमाणेच महापुरुषांच्या विचारांचा आदर्श घेत एका नव्या भारताच्या उभारणीसाठी आयुष्याच्या शेवटपर्यंत प्रयत्नशील राहिले.
पंडित जवाहरलाल नेहरू हे जागतिक स्तरावर आणि तत्कालीन सामान्य भारतीय जनमानसात मान्यता पावलेले प्रतिभासंपन्न नेते होते. स्वातंत्र्याच्या आधीपासूनच देश-विदेशातील राजकारणामध्ये ते अतिशय सक्रिय होते. त्यांनी स्वातंत्र्योत्तर काळात भारतीय परराष्ट्र धोरणाचा एक नवा जागतिक मान्यता प्राप्त असा आकृतिबंध तयार केला. तो करताना भारतीय संस्कृती, परंपरा व महात्मा गौतम बुद्ध ते महात्मा गांधी अशा सर्वच विचारांचा स्वीकार करून, एक आदर्शवादी व नैतिक मूल्यांना महत्वाचे स्थान देणारा विचार पुढे आणला. त्यामुळेच पंडित जवाहरलाल नेहरू हे भारताच्या परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार म्हणून ओळखले जातात.
कोणतेही राष्ट्र पूर्णपणे स्वयंपूर्ण नसते. प्रत्येक राष्ट्राला आपल्या विकासासाठी व जनतेच्या हितासाठी इतर राष्ट्रांची मदत ही घ्यावीच लागत असते. त्यामुळे प्रत्येक स्वातंत्र्य व सार्वभौम राष्ट्र आपले परराष्ट्र धोरण निर्धारित करत असते. ते करत असताना राष्ट्राच्या सर्वांगीण हिताचे निर्णय घेण्याची जबादारी ही त्या-त्या देशातील शासनाची म्हणजेच शासन प्रमुखाची असते. त्यामुळे भारताचे परराष्ट्र धोरण निर्धारित करताना नेहरूंनी विश्वशांतीला प्राधान्य देऊन, साम्राज्यवाद व वंशवादाला कडाडून विरोध केला.
“परराष्ट्र धोरण म्हणजे केवळ राष्ट्रीय हितसंबंध साधण्याचे साधन नाही, तर देशातील विकास घडवून आणण्याबरोबरच जागतिक शांतता आणि सुरक्षिततेसाठी परराष्ट्र धोरणाचा वापर केला गेला पाहिजे.” असे पंडित जवाहरलाल नेहरू यांचे ठाम मत होते. त्यांच्या या विचारांवरून त्यांची वैचारिक प्रगल्भता लक्षात येते. केवळ देशालाच नव्हे तर संपूर्ण जगाला विकासाबरोबरच सुरक्षितता आणि शांततेकडे घेऊन जाण्याचा त्यांचा दृष्टिकोन स्पष्ट होतो. त्यामुळेच त्यांच्या काळात भारताकडे तिसऱ्या जगातील राष्ट्रांचे नेतृत्व आपसूकच आले होते.
पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या परराष्ट्र धोरणाची मूलतत्त्वे खालीलप्रमाणे सांगता येतील
१) विश्वशांतीला प्राधान्य: पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या विचारांवर महात्मा गौतम बुद्ध ते महात्मा गांधी यांच्या शांती व अहिंसा या तत्वांचा तसेच भारतीय संस्कृतीतील विचारांचा प्रभाव होता. त्यामुळे भारताचे परराष्ट्र धोरण निर्धारित करतांना त्यांनी विश्वशांतीला प्राधान्य दिले.
२) साम्राज्यवाद व वंशवादाला विरोध: पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या विचारांवर मानवतावादी विचारांचा पगडा होता. त्यांनी देश विदेशातील साम्राज्यवादी व्यवस्थेखाली जीवन जगणाऱ्या नागरिकांचे जगणे जवळून पाहिले होते, त्यामुळे त्यांनी भारताचे परराष्ट्र धोरण ठरविताना साम्राज्यवाद व वंशवादाला विरोध केला. साम्राज्यवादी व वंशवादी विचारसरणी मानणाऱ्या देशापासून दूर राहण्याला प्राधान्य दिले आहे.
३) अलिप्ततावादाचा स्वीकार: दुसऱ्या महायुद्धानंतर जगामध्ये भांडवलवादी अमेरिका तर साम्राज्यवादी रशिया असे दोन गट तयार झाले होते. तर दुसरीकडे अनेक नवस्वातंत्र्य राष्ट्रांचा उदय होत होता. अमेरिका व रशियाला स्वतःच्या गटामध्ये जास्तीत-जास्त राष्ट्रांना सामील करून घ्यावयाचे होते. परंतु अनेक नवस्वातंत्र्य प्राप्त राष्ट्रांना दोन्हीही राष्ट्रांच्या गटात जायचे नव्हते. तर काहींना दोन्हीही महासत्ता राष्ट्रांच्या मदतीची गरज होती. अशा वेळी जागतिक राजकारणाची जाण असलेल्या पंडित जवाहरलाल नेहरू यांनी कोणत्याही गटामध्ये सामील न होता, अलिप्त राहण्याचे ठरवले. या धोरणाचा स्वीकार करताना, ते म्हणाले होते की, ‘आम्ही कुणाच्याही जवळ न जाण्याचा निर्णय घेत आहोत, कारण, कोणत्याही एका गटाकडे जाण्याच्या निर्णयाचा परिणाम इतिहासात विश्वयुद्धाच्या रूपाने पाहायला मिळाला आहे. त्यामुळे भारत कदाचित विश्वयुद्ध टाळण्यासाठी मोठी भूमिका निभावू शकतो.’ सुरुवातीला त्यांच्या या विचारांवर टीका झाली असली तरीही हा एक यशस्वी विचार मानला जातो. त्यांच्या परराष्ट्र धोरणाचे हे महत्त्वाचे मूलतत्त्व आहे.
४) पंचशील या तत्त्वांचा स्वीकार: पंडित जवाहरलाल नेहरू यांची भारतीय तत्त्वज्ञानावरचा अभ्यास होता. जैन धर्म परंपरेमध्ये पंचतत्त्वांना महत्त्वाचे स्थान आहे. त्याच प्रमाणे बौद्ध धर्मामध्येही पंचशील या तत्त्वाला खूप महत्त्व आहे. भारताचे परराष्ट्र धोरण निर्धारित करत असताना पंचशील या तत्त्वाचा स्वीकार पंडित जवाहरलाल नेहरू यांनी केला आहे. या तत्त्वानुसार प्रत्येक राष्ट्राने एकमेकांच्या भौगोलिक एकात्मता आणि सर्वभौमत्वाचा आदर करणे, युद्ध आणि आक्रमणास विरोध, समानता आणि परस्पर हिताला प्राधान्य देणे, शांततापूर्ण सहजीवन यांचा समावेश आहे. या तत्त्वामुळे भारताची जगामध्ये शांतताप्रिय व अहिंसक राष्ट्र म्हणून ख्याती आहे.
५) सहकार्य व शांततामय सहजीवनास प्राधान्य: पंडित जवाहरलाल नेहरू यांनी अलिप्ततेच्या तत्त्वांचा स्वीकार केलेला असला तरीही जागतिक शांतता, अहिंसा व याचबरोबर सर्व देशांनी एकमेकांच्या सार्वभौमत्वाचा आदर करून तेथील जनतेच्या व त्या – त्या राष्ट्रांच्या विकासाला प्राधान्य देणाऱ्या धोरणाचा स्वीकार केला आहे. त्यामुळे जगामध्ये राष्ट्रा-राष्ट्रामध्ये शांतता व मित्रत्वाची भावना वाढीस लागून मानवतावादास चालना मिळाली, याचे सर्व श्रेय पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या परराष्ट्र धोरणाला द्यावे लागते. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या परराष्ट्र धोरणविषयक या विचारांमुळेच आजही जगामध्ये त्यांची ओळख आदर्शवादी व मानवतावादी अशी आहे.
या सगळ्यामुळे पंडित जवाहरलाल नेहरू यांना भारताच्या परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते.
–प्रा. अंबादास नरसिंगराव पाचंगे, राज्यशास्त्र विभाग प्रमुख व राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी,
श्री स्वामी समर्थ विद्याप्रसारक मंडळाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय रावळगाव, ता. मालेगाव, जि. नाशिक,
pachangeambadas@gmail.com
