अमोल नंदकिशोर आढळकर
मराठी भाषेचा गौरव करण्यासाठी दरवर्षी २७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरव दिन राज्यभर मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी राज्यभर मराठीचा अभिमान जागवला जातो. आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला आपल्याच भाषेचा विसर पडतो. मराठी ही केवळ भाषा नाही, ती आपली ओळख आहे, आपली अस्मिता आहे. आपले संचित आहे.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळणं ही प्रत्येक मराठी माणसासाठी अभिमानाची बाब आहे. हजारो वर्षांची परंपरा, संत-साहित्य, काव्य, नाट्य, लोककला तसेच लोकसंस्कृतीमधून आपली भाषा जिवंत ठेवली गेली. समृद्ध विचारांची देणगी लाभल्यामुळे मराठीला हा मान मिळाला. मात्र या आनंदाच्या क्षणी एक अस्वस्थ करणारा प्रश्न नेहमी डोळ्यासमोर उभा राहतो.
मराठी भाषा अभिजात झाली, पण ती जपणाऱ्या मराठी शाळांची अवस्था आज घडीला काय आहे? आज वास्तव असे आहे की अनेक मराठी शाळा विद्यार्थीसंख्येअभावी बंद पडत आहेत. हे विदारक चित्र आपल्याला राज्यभर दिसून येते. दुर्गम भागातील शाळा तर शेवटची घटका मोजताना दिसतात.
इंग्रजी माध्यम म्हणजेच गुणवत्ता, प्रगती आणि भविष्य अशी चुकीची समजूत समाज मनात खोलवर रुजली गेली आहे. परिणामी पालकांचा ओढा इंग्रजी शाळांकडे वाढतो आहे आणि मराठी शाळा दुर्लक्षित होत आहेत. हा केवळ शाळांचा प्रश्न नाही, तर सामाजिक आत्मविश्वासाचा आणि मराठी भाषेच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे.
मराठी शाळा म्हणजे फक्त शिक्षण देणाऱ्या संस्था नाहीत. त्या संस्कार घडवतात, विचार करायला शिकवतात आणि सामान्य कुटुंबातील मुलांना आत्मसन्मानाने उभे राहण्याची ताकद देतात. आजचे शहरी भागातील शिक्षण गोरगरिबांच्या आवाक्याबाहेर गेले आहे. खर्चिक खासगी शिक्षणाचा फास सामान्यांचा गळा आवळून टाकत आहे. मराठी शाळांना वेळीच अभय दिले नाही तर गरिबांचा शिक्षणाचा हक्क हिरावला जाईल. हे सांगण्यासाठी कोणत्याही ज्योतिषाकडे जायची गरज नाही. मातृभाषेतून शिक्षण घेतलेल्या मुलांचे विचार अधिक स्पष्ट असतात आणि सामाजिकदृष्ट्या जागरूक असतात, हे अनेक संशोधनांमधून सिद्ध झाले आहे. देशाला अनेक रत्ने याच सिद्धांताने दिली आहेत हे सत्यही आपल्याला नाकारता येणार नाही.
मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर केवळ भाषेचा उत्सव साजरा करून थांबणे पुरेसे नाही तर मराठी शाळांचे आधुनिकीकरण, दर्जेदार शैक्षणिक सुविधा, डिजिटल साधने, प्रशिक्षित शिक्षक आणि पालकांमध्ये विश्वास निर्माण करणे ही काळाची गरज आहे. मराठी शाळा म्हणजे मागासलेपणाचे प्रतीक नसून त्या गुणवत्तेचे केंद्र आहेत ही जाणीव समाजात रुजवावी लागेल. ही जबाबदारी आपल्या सर्वांची आहे.
शेवटी एक गोष्ट स्पष्ट आहे, भाषा वाचते ती शाळांमुळे आणि शाळा टिकतात त्या समाजाच्या पाठबळामुळे. त्यामुळे मराठी भाषा जिवंत ठेवायची असेल तर मराठी शाळा जिवंत राहिल्या पाहिजेत. भाषा टिकली तर संस्कृती टिकते, संस्कृती टिकली तर ओळख टिकते.
सद्यस्थितीत शहरी भागाचा विचार केला तर मोठ्या शहरांत मराठी भाषेवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेले दिसेल. पंचतारांकित हॉटेल्स, मॉल आणि इतर महत्वाच्या कार्यालयांमध्ये संवाद साधण्यासाठी इंग्रजी भाषेला गरजेपेक्षा जास्त मिळणारी प्रतिष्ठा आणि मराठीला मिळणारे दुय्यम स्थान हे मराठी मनाला प्रचंड वेदना देणारे आहे. अनेकदा मराठी माणसेच मराठी बोलण्याची लाज बाळगतात हे ही वास्तव आहे. शासनाकडून मराठी भाषा जतन करण्यासाठी वेळोवेळी प्रयत्न होतात. पण ते तुटपुंजे ठरत असल्याने त्यांचा अपेक्षित परिणाम होत नाही.
दरवर्षी पार पडणारे साहित्य संमेलनही आता साहित्याचे नव्हे,तर राजकीय घडामोडीचा आखाडा बनत चालले आहे. कधी अध्यक्षपदासाठी राजकीय समीकरणे, कधी व्यासपीठावर पक्षीय भाषणे, कधी सत्ताधाऱ्यांच्या स्तुतीसाठी शब्दांची उधळण… या सगळ्या गोंधळात साहित्य, भाषा, वाचक हरवून जातो. ज्या संमेलनांतून मराठीच्या भवितव्याचा आराखडा यायला हवा, तिथे निवडणुकीची चाचपणी होते. म्हणून सामान्य मराठी माणूस यापासून दूर जाताना दिसतो. याचा सर्वात मोठा फटका मराठी भाषेला बसतो. साहित्य संमेलनातून समाजभान जपले गेल पाहिजे तरच त्याला अर्थ उरेल अन्यथा त्याकडे केवळ एक सरकारी कार्यक्रम म्हणून बघितले जाईल.
ऑनलाइन युगात वाचन आणि लेखन संस्कृती लोप पावत आहे. अनेकांच्या आयुष्यातून शाळा दूर झाली की वाचन आणि लेखन यांच्याशी त्यांचा फारसा संबंध येत नाही, ही फार गंभीर बाब आहे. भाषा ही केवळ शब्दांनी बनत नाही. ती आपल्या संस्कृतीचे, अस्मितेचे आणि आत्मसन्मानाचे प्रतीक आहे. म्हणून मराठी भाषेचे जतन करण्यासाठी राज्यभरात लोकचळवळ उभी राहिली पाहिजे आणि त्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन पुढाकार घ्यायला हवा. कारण भाषा ही आपली ओळख आहे. ती पुसता कामा नये.
म्हणूनच चला ,एकत्र येऊन मराठी शाळा आणि मराठी भाषा यांचे रक्षण करूया आणि आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी आपली ओळख जपूया. नाहीतर अभिजात भाषेचा दर्जा केवळ कागदावर राहील आणि भाषा हळूहळू दैनंदिन आयुष्यातून दूर जाईल. फक्त अभिमान बाळगायचा की जबाबदारीही स्वीकारायची? निर्णय आपल्या हातात आहे.
लेखक प्राथमिक शिक्षक आहेत.
Email- amoladhalkar@gmail.com

