डॉ. सविता पाटील ( कोठावळे)
मानवी संस्कृतीच्या विकासात विज्ञानाचे महत्त्व अबाधित आहे. राष्ट्र उभारणीमध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानातील प्रगती जितकी महत्त्वाची आहे, विवेकी समाज घडवण्यामध्ये तितकीच महत्त्वाची भूमिका विज्ञान साहित्य पार पाडत असते. विज्ञान म्हणजे क्लिष्ट, अवघड आणि सर्वसामान्य माणसांच्या आकलनापलीकडील क्षेत्र असा अर्थ काढला जातो. विज्ञान साहित्य म्हणजे विज्ञान, तंत्रज्ञान, वैज्ञानिक दृष्टिकोनावर आधारित लेखकाचा सर्जनशीलतेचा आविष्कार. हा आविष्कार विज्ञान कथा, कादंबरी किंवा विज्ञान ललितसाहित्य या माध्यमांतून व्यक्त होतो. अनेक सैद्धांतिक आधार विज्ञानामध्ये असतात. त्यामुळे विज्ञान लेखकाची भूमिका ही महत्त्वाची रहाते. सर्वसामान्य नागरिकांपर्यंत वैज्ञानिक सिद्धांत, त्यामागची सैद्धांतिक बाजू पोहोचवणे महत्त्वाचे ठरते. या अनुषंगाने बऱ्याच लेखकांनी विज्ञान साहित्यात त्यांचे योगदान दिले आहे.
जेष्ठ समीक्षक निरंजन घाटे म्हणतात, ‘विज्ञानाचं भविष्यकाळात केलेलं प्रक्षेपण आणि त्या प्रक्षेपित वैज्ञानिक व तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रगतीचा होणारा परिणाम, विज्ञान साहित्यातून व्यक्त होतो. या अनुषंगाने विज्ञान साहित्याचे अनेक प्रकार पडतात, जसे की विज्ञान कथा, ज्यामध्ये वैज्ञानिक संकल्पनांवर आधारित काल्पनिक रंजक कथा असतात. तसेच विज्ञान कादंबरी ही दीर्घ स्वरूपात वैज्ञानिक विश्वाची मांडणी करते. त्याचप्रमाणे विज्ञान कविता, नाटक, चरित्र व विज्ञान लेख इत्यादीही मराठी साहित्यात आले आहेत. यामध्ये जयंत नारळीकर, भा.रा.भागवत, द.पा. खांबेटे, द.चि. सोमण, नारायण धारप, गजानन क्षीरसागर, ग.रा. टिकेकर यांची नावे प्रामुख्याने घ्यावी. तसेच अलीकडील काळात डॉ. संजय ढोले, अरुण साधू, स्मिता पोतनीस यांसारख्या अनेक लेखकांनी विज्ञान साहित्यात उल्लेखनीय योगदान दिले आहे.
अलीकडेच लेखक डॉ. व्ही. एन. शिंदे यांचे ‘बांधावरची झाडे’ हे पुस्तक वाचले. या पुस्तकामध्ये त्यांनी अत्यंत समर्पक शब्दात निसर्गातील कालबाह्य होत असलेल्या झाडांची माहिती व त्या अनुषंगाने साहित्य, संस्कृती व विज्ञान यांनी व्यापून राहिलेली झाडे, आपल्या मनाचा वेध घेतात. या पुस्तकातून ते लेखनाचा वेगळा प्रयोग करतात. झाडांबद्दल लिहिताना सर्वप्रथम झाडांची विविध प्रकारची नावे, त्यांची उत्क्रांती, वैज्ञानिक माहिती , झाड बहरण्याची प्रक्रिया, त्याचे जीवशास्त्रीय महत्व, झाडांचे व्यावसायिक उपयोग, झाडाचे साहित्यातील स्थान, झाडांपासून बनणाऱ्या विविध पाककृती, तसेच पौराणिक /दंतकथा, झाडाचे धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व आणि लेखकाचे झाडाशी असलेले विशेष ममत्व, असे पैलू उलगडत जातात. त्यामुळे सदरचे पुस्तक हे पूर्णपणे विज्ञान साहित्य नाही किंवा पूर्णपणे ललित लेखनही नाही. सदरचे पुस्तक हे ‘विज्ञान ललितबंध’ प्रकारात मोडते. या दोन्ही साहित्य प्रकारचा सुंदर मिलाफ या पुस्तकाप्रमाणे डॉ. व्ही.एन. शिंदे यांच्या इतर लेखनातसुद्धा सापडतो. ‘ललित’ आणि ‘विज्ञान’ साहित्य या स्वरुपांचा मागोवा व विकासाचा टप्पा पहिला की लेखकाच्या शब्दातून साकारलेला ‘विज्ञान ललितबंध’ याविषयी बोलणे गरजेचे आहे.
मराठी साहित्यात विज्ञान साहित्याचा प्रवाह अलीकडचा मानला जातो. विज्ञान म्हणजे ‘सुसंघटित विशेष ज्ञान’ अशी व्याख्या सर्वमान्य आहे. मराठी भाषेत ‘विज्ञान’ आणि ‘शास्त्र’ असे दोन भिन्न शब्द आहेत. समाजातून अनिष्ट प्रथा दूर व्हाव्यात यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन साहित्यातून मांडल गेला. कालांतराने विज्ञान आणि तंत्रज्ञान यांची प्रगती होऊ लागली. त्याचे प्रतिबिंब साहित्यातही दिसू लागले. मराठी विश्वकोषानुसार ‘विज्ञान हे ज्याच्या आशयाचे अविभाज्य अधिष्ठान आहे, अशा साहित्यकृती या विज्ञान साहित्यात येतात. या विज्ञान साहित्यात विज्ञान संशोधनाचे लोकांनां आकलन होईल, अशा भाषेमध्ये लेखन, ज्यामध्ये माहितीपर लेखन, वैज्ञानिक तथ्याच्या कथा किंवा कादंबरीच्या रूपात सादर करणे आणि विज्ञान काव्यरुपात मांडणे असे प्रमुख प्रकार निर्माण झाले.
माहितीपर लेखनाचा वाचकवर्ग, जिज्ञासू आणि ज्ञानपिपासू असतो. एखाद्या विषयातील माहिती मिळावी, ज्ञान मिळावे, यासाठी त्याचे वाचन असते. हा वर्ग प्रामुख्याने विज्ञान विषय प्राथमिक, माध्यमिक किंवा उच्च शिक्षणामध्ये अध्यापन करणारा किंवा शिकणाऱ्यांचा असतो. तसेच केवळ माहिती मिळावी, म्हणून अशा प्रकारचे वाचन करणारा एक गट असतो. परंतु या प्रकारातील लेखन हे लालित्य पूर्ण असतेच असे नाही. मराठी साहित्यात विज्ञान साहित्य हे कथा, कादंबऱ्यांपुरतेच सीमित राहिले. विज्ञान साहित्य हे २० व्या शतकाच्या सुरुवातीला भरभराटीला आले. एस. बी. रानडे, व्ही. एन. कोगेकर यांनी विज्ञान कथा लिहिण्यास सुरुवात केली. तसेच बी. आर. भागवत, जयंत नारळीकर यांनी बऱ्याच विज्ञान कथा लिहिल्या. तसेच व्ही. एम. जोशी यांच्या ‘अदृश्य किरणांचा दिव्यप्रकाश’, एस. बी. रानडे यांचे ‘ताऱ्यांचे हास्य’ तसेच व्ही. जी. आपटे यांचे ‘एक दिवसाच्या सुट्टीत’ अशा अनेक विज्ञान कथा लिहिल्या गेल्या. विज्ञान साहित्य हे अंतराळ आणि वेळेचे गणित, तंत्रज्ञान आणि समाज, अद्भुतरम्य कथा अशा अनेक वैशिष्ट्यानी पूरक असते.
मराठीत प्रकाश गोळे, शरदिनी डहाणूकर, शिरीष पै आणि मारुती चितमपल्ली यांचे निसर्गविषयक ललित लेखन उल्ल्लेखनीय आहे. मारुती चितमपल्ली यांनी मराठी ललित गद्यात निसर्गनुभवाचा साक्षात्कार घडविला आहे.
खरे तर, संपूर्ण विज्ञान साहित्यच बऱ्याच वेळेला दुर्लक्षित झाल्यासारखे वाटते. हे साहित्य मूठभर लोकांच्या रुचीतून वाचले जाते. विज्ञानाची फक्त अद्भुत बाजू सांगून मनोरंजनाचाच भाग जास्त प्रचलित झाला. पण हे इतकेच विज्ञान साहित्य नव्हे. यामध्ये विज्ञान ललितबंध हा प्रकारही तितकाच महत्त्वाचा आहे. पण हा साहित्य प्रवाह बराच दुर्लक्षित आहे, असे वाटते. विज्ञान ललितबंध हा खरे तर मराठी साहित्यातील नवप्रवाह आहे. कारण या साहित्य प्रकारात वैज्ञानिक सिद्धांत हे ललित लेखनाच्या सोबत येतात आणि त्यामुळे अवघड समजले जाणारे विज्ञान साहित्य हे सर्वसामान्य माणसाला जवळचे वाटू लागते. तथापि या साहित्य प्रकाराकडे अद्याप पुरेसे लक्ष दिले जात नाही.
विज्ञान साहित्य लेखन प्रकाराचे परीक्षण करण्याबाबतही बरीच उदासीनता जाणवते. परिणामी, हा साहित्य प्रकार सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचत नाही. विज्ञान साहित्यातील कथा, कादंबऱ्यावर लिहिले जाते, पण त्या तुलनेने ‘विज्ञान ललितबंध’ फारसा लिहिले जात नाही. तसेच जे लिहिले जाते, त्या पुस्तकांच्या परीक्षणाबाबतही उदासीनता जाणवते. वास्तविक विज्ञान ललितबंध हा फक्त मनोरंजन करीत नाही, तर विज्ञान आणि ललित या दोहोंचा मिलाफ घडवून आणते. वस्तुतः हा साहित्य प्रवाह सर्व प्रकारच्या वाचकांना खेचून आणू शकतो, कारण ‘विज्ञान ललितबंधामध्ये ज्ञान+मनोरंजन+कल्पना सिंद्धांत+वैज्ञानिक सिद्धांत या सगळ्याचा मेळ आहे. त्यादृष्टीने विज्ञान ललितबंध हे विज्ञान साहित्य विद्यार्थ्यांच्या मनात विज्ञानाची गोडी निर्माण करण्यासाठी महत्त्वाचे आहे. राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्ताने यावर विचार व्हावा, हीच अपेक्षा.
सहाय्यक प्राध्यापक (इंग्लिश) रयत शिक्षण संस्थेचे, डॉ बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, औंध, पुणे.
savipatil75@gmail.com
