समाजात एकीकडे बुवा-बाबांचे प्रस्थ माजल्याच्या घटना पुढे येत असतानाच दुसरीकडे मराठी विज्ञान परिषदेसारख्या विज्ञान शिक्षण आणि प्रसाराला वाहून घेतलेल्या संस्थेला २४ एप्रिल रोजी ६० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त संस्थेच्या वाटचालीचा आढावा.
मराठी विज्ञान परिषदेच्या स्थापनेला २४ एप्रिल २०२६ रोजी ६० वर्षे पूर्ण होत आहेत. महाराष्ट्रामध्ये मराठीतून विज्ञान प्रसार करणार्या, वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणार्या आणि अंधश्रद्धा निर्मूलन करणार्या ज्या संस्था आहेत, त्यात मराठी विज्ञान परिषद, लोकविज्ञान संस्था, कणाद विज्ञान परिषद, अंधश्रद्धा निर्मूलन संस्था अशा हाताच्या बोटावर मोजता येणार्या काही संस्था आहेत. त्यातील मराठी विज्ञान परिषद ही संस्था गेली ६० वर्षे सातत्याने विज्ञान शिक्षण आणि विज्ञान प्रसाराचे काम अनेक अंगांने करीत आली आहे. एखादी संस्था ६० वर्षे टिकून राहते हे आश्चर्य आहे आणि त्याची कारणे समजावून घेणे अगत्याचे आहे. संस्था जे कार्यक्रम करते ते समाजोपयोगी असतील तर तिला लोकाश्रय मिळतो. संस्था चालवण्यासाठी सातत्याने दमदार कार्यकर्ते मिळवले आणि त्यांनी नि:स्वार्थपणे काम केले तर ती संस्था टिकून राहते, संस्थेचा कारभार प्रामाणिक असेल व ती सभासद आणि देणगीदारांना करीत असलेल्या कार्याबद्दल दरवर्षी अहवाल देत असेल तर तिला जनतेकडून प्रतिसाद मिळतो आणि मराठी विज्ञान परिषदेसारख्या स्वयंसेवी संस्थांना बाजारभावाप्रमाणे पगार देणे परवडत नसताना १०-१२ कर्मचारी २५ ते ३० वर्षे टिकून राहतात त्यासाठी योग्य वातावरण ठेवणे या सर्व गोष्टींची परिपूर्ती मराठी विज्ञान परिषद करीत आली असल्याने तिने इथवर मजल मारली आहे.
परिषदेचा व्याप
मराठी विज्ञान परिषदेची स्थापना करणारे स्थापत्य अभियंता म. ना. गोगटे यांना संस्था बांधणीची एक दूरदृष्टी होती. त्यांनी घटना तयार करून संस्थेची नोंदणी धर्मादाय आयुक्तांकडे पहिल्या तीन महिन्यांत केली. थोडक्याच काळात संस्थेला संपूर्ण महाराष्ट्रातून सभासदांचा प्रतिसाद मिळाल्याने त्यांच्यात संवाद सुरू राहण्यासाठी पहिले वर्ष संपता संपत वार्तापत्र सुरू केले, जे पुढे एका विज्ञान मासिकात रूपांतरित झाले. आज हे मासिक ५९ वर्षे पुरी करीत आहे. साताठ महिने होताच पहिले संमेलन घेतले. अशी आजवर ६० संमेलने झाली. संस्थेला वास्तू हवी म्हणून शासनदरबारी खेटे घालून जमीन मिळवली व त्यावर दुमजली इमारत उभी राहिली. या गोष्टी एखादी संस्था चालवताना किती महत्त्वाच्या असतात, हे त्याच सुमारास सुरू झालेल्या इतर संस्थांकडे पाहिले तर लक्षात येईल.
मराठी विज्ञान परिषदेची मुंबईत स्थापना झाल्यावर अशा कार्यात रस असलेल्या व्यक्तींकडून आपापल्या गावी परिषदेची शाखा स्थापन करण्यासाठी विचारणा सुरू झाली आणि पुणे, ठाणे, नाशिक, सांगली, गोवा अशा ठिकाणी शाखा सुरू झाल्या. सध्या महाराष्ट्रात ६३ आणि महाराष्ट्राबाहेर चार असे मिळून ६७ ठिकाणांहून परिषदेचे काम चालते. त्यामुळे महाराष्ट्र शासन अथवा केंद्र सरकारला एखादा कार्यक्रम राज्यभर घ्यायचा असेल तर त्यांच्याकडून तशी विनंती मराठी विज्ञान परिषदेकडे येते. गेल्या ६० वर्षांच्या अवधीत परिषदेने ८०-८५ प्रकारचे कार्यक्रम राबवले. त्यातील काही कार्यक्रम कालबाह्य झाल्याने बंद करून नवे निर्माण झाले. यातील काही कार्यक्रम दूरदृश्य प्रणालीने होतात, तर बरेचसे कार्यक्रम परिषदेच्या शीव-चुनाभट्टी कार्यालयात होतात आणि काही कार्यक्रम शाळा-महाविद्यालयात जाऊनही होतात.
सुरुवातीला मराठी विज्ञान परिषदेने शालेय विद्यार्थ्यांसाठी शंका समाधानाचे कार्यक्रम, अनुवाद शिबिरे, विज्ञानात घडणार्या नवनवीन विषयांवर भाषणे, परिसंवाद, ‘लाइफ ऑन अर्थ’सारखे विज्ञान चित्रपट यांची आयोजने केली. त्यातील एक ठळक कार्यक्रम म्हणजे १९८३ साली सुरू झालेला ‘मुलगी वयात येताना’ व नंतर १९९८ साली सुरू झालेला ‘मुलगा वयात येताना’ हे स्लाइड शो. त्यावेळची सामाजिक मन:स्थिती हे कार्यक्रम जाहीररीत्या करण्याची नव्हती. या कार्यक्रमांना फार मोठा विरोध होत असे. या कार्यक्रमाची शिफारस करणार्या एका शिक्षिकेला राजीनामाही द्यावा लागण्यापर्यंत याची मजल गेली होती. पण काळ पुढे सरकत गेला तसा या विषयावर काढलेल्या सीडी / डीव्हीडी पालक परिषदेत येऊन विकत घेऊन व आपल्या मुलांना समजावून दयायला लागले. आता संगणक आणि गूगलच्या जमान्यात विद्यार्थी ही माहिती मिळवू लागल्याने या कार्यक्रमांना तुरळक मागणी येत असते.
शाळांत प्रयोगशाळा नसल्याने मुलांना प्रयोग करून देण्याची संधी परिषदेने उपलब्ध करून दिली व त्याची परिणती आता, ‘शनिवारी विज्ञानवारी’ कार्यक्रमात होऊन गेली तीन वर्षे राज्यातील २०० ते २२५ शाळांत हा कार्यक्रम राबवला गेला आहे. मुलांनी विज्ञान संशोधनात लक्ष घालावे म्हणून ‘विज्ञान संशोधनाकडे वळा’ ही भाषणे २५०-३०० च्या संख्येने होतात. मराठी माणसाला नाटकांची आवड असल्याने विज्ञान एकांकिका स्पर्धा सुरू केल्या. त्यात ५० ते ६० संघ भाग घेतात. परिषदेतून मुले पीएचडीचा अभ्यासक्रम पुरा करतात. शाळेतील प्रयोगशाळा साहाय्यकांसाठी कार्यशाळा घेतल्या जात आहेत. प्राध्यापकांनी संशोधन करावे म्हणून महाविद्यालय व विद्यापीठातील शिक्षकांना एकेक लाख रुपयांचे पुरस्कार सुरू केले. अडीच लाख रुपयांचे जीवनगौरव पुरस्कार प्रसिद्ध शास्त्रज्ञांना दिले जातात. गेली ५५ वर्षे विज्ञान कथा स्पर्धा घेतल्या, त्यातून प्रा. जयंत नारळीकर, डॉ. बाळ फोंडके, सुबोध जावडेकर, निरंजन घाटे, डॉ. मेघश्री दळवी, रेखा बैजल यांच्यासारखे लेखक निर्माण झाले. किंबहुना मराठी साहित्यात विज्ञान कथांचे दालन मराठी विज्ञान परिषदेने सुरू केले. परिषदेची पत्रिका दिमाखात सुरू आहे. परिषद छापील व ई-पुस्तके प्रकाशित करत असून गेली २१ वर्षे परिषद ‘लोकसत्ता’मध्ये, ‘कुतूहल’ हे सादर चालवीत आहे तर दूरदर्शनवर एक वर्षाहून अधिक काळ ‘विज्ञानं जनहिताय’ ही मालिका परिषद चालवत आहे.
मराठी विज्ञान परिषदेचे वैभव जसे तिच्या कार्यक्रमात आहे, मासिक पत्रिकेत आहे, इमारतीत आहे, त्यापेक्षा कांकणभर तिच्या अध्यक्षांबाबत आहे. डॉ. रा. वि. साठे, म. ना. गोगटे, प्रा. भा. मा. उदगावकर, प्रा. जयंत नारळीकर, डॉ. वसंत गोवारीकर, प्रभाकर देवधर आणि सध्याचे अध्यक्ष प्रा. जे. बी. जोशी यांच्यात आहे. लोक विचारतात की तुम्हाला एकापेक्षाएक वरचढ शास्त्रज्ञ अध्यक्ष म्हणून कसे मिळाले तर कार्यवाहांनी ठरवले की येथे पदोन्नती नसून अध्यक्ष हे नामवंत शास्त्रज्ञच असतील. परिषदेला भविष्यात ४५ वर्षे जुन्या इमारतीचे नूतनीकरण, विद्यार्थ्यांना स्वयंप्रज्ञा वापरून प्रयोग करण्यासाठी प्रयोगशाळा असे उपक्रम करायचे आहेत.
कार्यवाह, मराठी विज्ञान परिषद
