परभणीचा परिसर, मराठवाड्यातला कापूस पट्टा, ऊस आणि सोयाबीनसारखी एरवी नगदी ठरणारी पिकं यांसह केवळ मराठवाड्यावर नव्हे तर राज्यावरच दुष्काळाचं सावट उतरतंय. ते दिसू लागलंय आता जमिनीवर. त्या काळवंडलेल्या छटांमधली ही दुष्काळचित्रं…
परभणीपासून जवळच झरी या नावाचं गाव आहे. युवराज मुंजाजी मुधवर हा १४ वर्षे वयाचा शाळकरी मुलगा. त्याच्या शाळेची सहल जाणार होती. म्हणून तो वडिलांना म्हणाला, ‘मला नवा ड्रेस घेऊन द्या.’ वडील म्हणाले, ‘अजून सोयाबीनचे पैसे आलेले नाहीत. सोयाबीन विकल्यानंतर तुला ड्रेस घेऊ.’ … दुपारी दीड वाजता कोणाच्याही ध्यानीमनी नाही. घरचे शेतात कामासाठी गेलेले. युवराजनं घरातल्या पत्र्याच्या छताला असलेल्या एका लोखंडी पाइपला गळफास घेऊन आपलं आयुष्य संपवलं. साडीच्या सहाय्याने त्याने गळफास घेतला. युवराजचे वडील मुंजाजी मुधवर यांना एक मुलगा, एक मुलगी अशी दोन अपत्यं. तीन भावांमध्ये चार एकर जमीन. म्हणजे मुंजाजी मुधवर यांच्या वाट्याला जमीन येते फक्त सव्वा एकर. त्या जमिनीत सोयाबीन पेरलं पण ते पावसाअभावी आलंच नाही. ते आणि त्यांची बायको दोघंही दुसर्याच्या शेतात कामाला जातात, सध्या ग्रामीण भागात तुरळक ठिकाणी सोयाबीन काढणी, कापूस वेचणीची कामं आहेत.
***
रामराव प्रभाकर शुकारवार या नावाचे साठीतले एक शेतकरी. वसमत तालुक्यातील पारडी हे त्यांचं गाव. त्यांच्याकडे जमीन केवळ ५८ गुंठे. त्यांनीही शेतात सोयाबीन पेरलं होतं. सोयाबीनचा मोठा ढीग गोळा केला जातो, त्याला सुडी असं म्हणतात. रामराव सकाळी शेतात गेले, त्या ढिगासमोर उभे राहिले. सोयाबीनचा अपेक्षित उतारा येणार नाही आणि आपला झालेला खर्चही भरून निघणार नाही या विवंचनेनं त्यांना घेरलं. ढिगासमोर उभे असतानाच त्यांना हृदयविकाराचा झटका आला.
***
येणार्या काळाच्या भयाण संकटाचा चटका किती दाहक असेल हे दर्शवणार्या या दोन्ही घटना याच आठवड्यातल्या आहेत. पाऊस दगा देतो तेव्हा केवळ शिवारच करपतं असं नाही तर आशा, आकांक्षा, स्वप्नं सारं काही करपून जातं.
***
आता तर संपूर्ण राज्यातून मोसमी पावसानं माघार घेतली आहे. तापमानाचा पारा पस्तिशीपार जाऊन पोहोचला. पावसाची तूट इतकी मोठी की काही जिल्ह्यांत ती ४० टक्क्यांहून अधिक आहे. टँकर सुरू झाले आहेत. जे पाण्याचे साठे आहेत त्यांतल्या काही ठिकाणी तर खडा पहारा सुरू आहे. पाण्याची चोरी होऊ नये म्हणून धरणावरची गस्त वाढवण्यात आली आहे. शिवारांतलं पाणी आटत चाललं आहे. यंदा मुबलक पाऊस झालाच नाही. नेहमीसारखा पावसाळा सुरू झाला. पिकं वाढीला लागली. खतं, फवारणी, मशागत यांवरचा खर्च सुरूच होता. अचानक ऑगस्ट अखेरपासून पाऊस गायब झाला. तोवर पिकांवरचा बहुतेक खर्च करून झाला होता. जे जवळचं भांडवल आहे ते जमिनीत ओतलं गेलं. ओढे- नाले वाहात आहेत, नद्यांना पूर आलेला आहे असं चित्र दिसलंच नाही.
***
साधारणपणे या दिवसांत शिवारात वेगळी लगबग पाहायला मिळते. कापसाच्या वेचण्यांना प्रारंभ झालेला असतो. सोयाबीन काढणी सुरू असते. एरवी शेतमाल घरात येण्याचे हे दिवस असतात. शिवारात वेगळंच चैतन्य जाणवू लागतं. काही दिवसांनी साखर कारखान्यांचा हंगाम सुरू झालेला असतो. ऊस तोडणीसाठी मजुरांच्या टोळ्या शेतात दाखल झालेल्या असतात. सध्या अशी काही लगबग दिसण्यापेक्षा शिवारभर एकच सन्नाटा पसरलेला दिसून येत आहे. वातावरणात एक उदासी आहे. निराशेचं मळभ दाटून आलं आहे. ज्या दिवसांत शेतमजुरांच्या हाती चार पैसे यायला लागतात, कामांची धांदल उडालेली असते तिथे शिवारात क्वचित कुठेतरी कापूस वेचणी आणि सोयाबीन काढणीचं एखादं काम दिसू लागलं आहे. सध्या अवर्षणाचा दाह सोसणार्या डोंगराळ भागातल्या खेड्यांमध्ये कामच नाही म्हणून माणसं शहराच्या दिशेनं निघालेली आहेत.
***
गावात काही ठिकाणी घराला कुलपं लागलेली दिसतात. अशी कुलपं लागलेल्या घरांची संख्या नजीकच्या काळात वाढताना दिसेल. सध्या सगळेच व्यवहार ठप्प आहेत. एका आजोबांना विचारलं, ‘गावात कामं नाहीत का?’ त्यांचं उत्तर असं, ‘सगळं शिवार करपून गेलंय. आता कशाची सुगी आली? बंदा रुपया गाडीच्या चाकाएवढा दिसायला लागलाय.’ पैसा पाहायलाच मिळणार नाही असं त्यांचं मत. ग्रामीण भागातले मिळकतीचे स्रोत आटल्यानंतरची हताश जाणीव सध्या सर्वत्र दिसू लागली आहे.
***
कापूस वेचणीचा दर गेल्या वर्षी सुरुवातीपासूनच दहा रुपये किलो होता. यंदा तो सहा, सात रुपये राहील. सोयाबीन काढणीचा दर एकरी चार हजार रुपये असतो, तोही आता तेवढाच असला तरी उत्पादन प्रचंड घटलं आहे. सोयाबीन काढणीला परवडत नाही म्हणून त्यात ट्रॅक्टर घालून रोटावेटरनं ते नष्ट करण्याची पाळी यंदा शेतकर्यांवर आली. ज्या पिकावर खर्च केला, मशागत केली त्या पिकाचा असा डोळ्यांदेखत कडेलोट करताना शेतकर्यांची भावना काय असेल? मळणी यंत्रवाल्यांचाही धंदा बसला. पावसाने ताण दिल्याने उसाची अपेक्षित वाढ झालीच नाही त्यामुळे उत्पादन घटणार. साखरेचा उताराही कमी असणार. साखर कारखान्यांच्या गळित हंगामाचा कालावधी कमी होणार. मजुरांचे कामाचे दिवस बुडणार. कापूस हे मराठवाड्यातलं महत्त्वाचं नगदी पीक. ज्या भागात कापसाचं उत्पादन अधिक होतं त्या प्रत्येक तालुक्यात किमान दहा ते बारा जिनिंग प्रेसिंग कारखाने आहेत. यंदा कापसाचं उत्पादन कमालीचं घटलं आहे. दरवर्षी सहा महिने या मजुरांना काम असतं. काही ठिकाणी स्थानिक मजुरांसोबत परप्रांतातील मजूरही कामाला असतात. जिनिंगवर काम करणार्या मजुरांना कामच उरलेलं नाही. साखर कारखाने, जिनिंग प्रेसिंग अशा सर्वच ठिकाणचा रोजगार निम्म्याहून कमी झाला. हाती पैसा येण्याचे एक एक स्रोत असे आटत चालले आहेत.
***
हाताला काम नाही म्हणून मराठवाड्यातून गावंच्या गावं रिकामी झालेली पाहायला मिळतील अशी स्थिती आहे. शहरात वीटभट्टीपासून ते बांधकामापर्यंत सर्वच ठिकाणी ग्रामीण भागातले मजूर एरवी आढळून येतात. यावेळी पाण्याअभावी बांधकामंसुद्धा ठप्प आहेत. अशा वेळी रोजगार हमी योजना हाच ग्रामीण मजुरांसाठी एकमेव आधार राहणार आहे. या योजनेत अनेक दोष आहेत. सुरुवातीचा ‘मागेल त्याला काम’ या भूमिकेतून जन्माला आलेला रोजगार हमीचा कायदाही महाराष्ट्राने देशाला दिलेली देणगी आहे असं म्हटलं गेलं. पुढे ‘मनरेगा’ आणि आता ‘व्हीबी-जीरामजी’ अशा नव्या रूपांत हा कायदा बदलत गेला. रोजगाराचे दिवस १०० वरून १२५ करण्यात आले.
मजुरीचा दर मात्र दररोज ३१७ रुपये एवढा आहे. आजच्या महागाईच्या काळात हा दर परवडण्यासारखा नाही. ग्रामीण मजुरांना बाराही महिने काम नसतं. शेतातली मशागतीची, पीक काढण्याची कामं सोडली तर सदैव पैसा हाती राहण्याची सोयच नसते. सुगीच्या दिवसात अधिकाधिक कामं करून कुटुंबाच्या आर्थिक घडीचं नियोजन केलं जातं. ठरावीक मुदतीत काम न मिळाल्यास बेरोजगार भत्ता देण्याची तरतूद या कायद्यात आहे. अर्थात आधीची ‘रोहयो’ असो अथवा आताची ‘व्हीबी-जीरामजी’; कामं यंत्राद्वारे करायची, ती मजुरांनी केली असं दाखवायचं, असे प्रकार सर्रास घडतात. बनावट नोंदी, प्रशासकीय अडचणी, मजुरीतला विलंब या गोष्टी टाळून ही योजना निर्दोषपणे राबवण्याची गरज कधी नव्हे ती निर्माण झाली आहे.
***
दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांसंदर्भात वृत्तपत्रांतून येणार्या बातम्या आणि वस्तुस्थिती यात कमालीचं अंतर पडतं. सध्या पीककर्ज वसुलीला जरी स्थगिती देण्यात आली असली आणि नव्या पीककर्जांसाठी शेतकर्यांना कोणतीही अडचण येणार नाही असं सांगितलं जात असलं तरी जे कर्जदार पीककर्जाचं पुनर्गठन करतील त्यांनाच नव्याने पीककर्ज दिले जाणार आहे. नव्या पीककर्जासाठी शेतकर्यांना ३० एप्रिल २०२७ पूर्वी पुनर्गठन करावं लागणार आहे. एरवी पीककर्जाच्या परतफेड करण्याची मुदत ३१ मार्चपर्यंत असते. यंदा खरिपातून फारसं काहीच हाती येणार नाही आणि रब्बीची तर कोणतीच शाश्वती नाही. अशा वेळी पीककर्ज थकणार ही बाब स्पष्ट आहे. यंदाचं गणित हुकलं आहे, पुढचं सगळंच आर्थिक गणित बिघडणार. घोषणांपेक्षा वास्तव कितीतरी वेगळं असतं.
पीककर्ज वसुलीला स्थगिती दिली असं म्हटलं जातं पण प्रत्यक्षात पीककर्जाचे आकडे किती आहेत? परभणी जिल्ह्यात गेल्या वर्षी पीककर्जाचं वाटप उद्दिष्टाच्या अवघं ४४ टक्के होते तर यंदा हेच प्रमाण ३३ टक्के आहे. एकूण उद्दिष्टाच्या तुलनेत एकतृतीयांश पीककर्ज वितरित होत असेल तर त्यात किती कमतरता आहे हे लक्षात येतं. यात जिल्हा मध्यवर्ती बँका जे वाटप दाखवतात त्यातलं बरंचसं शेतकर्यांच्या हाती पडतच नाही. आधीच्या कर्जाला थोडंफार वाढवून कागदावरच ‘नवंजुनं’ केलं जातं. मराठवाड्यातल्या बहुतेक जिल्हा बँकांची स्थिती अशी आहे. अशा वेळी ‘पीककर्ज वसुलीला स्थगिती’, ‘पीक कर्जाचे उद्दिष्ट’, ‘कर्जाचे पुनर्गठन व वाटप’ यांसारखे शब्द केवळ बातम्यांमध्येच दिसतात. वास्तव त्यापेक्षा गंभीर आणि भेदक आहे. पीक कर्जाचं उद्दिष्ट आणि वाटप यांतली तफावत प्रत्येक जिल्ह्यात आढळून येते.
***
माणूस दुष्काळी परिस्थितीमध्ये हातपाय हलवतो, जगण्याची साधनं निर्माण करतो, रोजगाराच्या शोधात जगाच्या पाठीवर सर्वत्र फिरतो, पण प्राण्यांचं काय? टँकरद्वारे माणसांची तहान भागवण्याचे प्रयत्न होतील. जनावरांचे प्रश्न आणखीच उग्र रूप धारण करणार आहेत. राज्यात अडीच कोटीहून अधिक पशुधन आहे. चारा छावण्यांच्या माध्यमातून राजकीय कार्यकर्ते कंत्राटं मिळवतात. प्रत्यक्षात छावणीत असलेल्या गुरांपेक्षा अधिक गुरं दाखवून मलिदा लाटला जातो. त्यामुळे ‘राजकीय पुढार्यांना, कार्यकर्त्यांना अशा चारा छावण्या देण्यापेक्षा गुरांना जगवण्याची रक्कम थेट पशुपालकांच्या, शेतकर्यांच्या खात्यात जमा करण्यात यावी’ अशी मागणी गेल्या काही वर्षात जोर धरू लागली आहे. जेव्हा जेव्हा चार्याचा प्रश्न निर्माण होतो तेव्हा तेव्हा थेट शेतातला उभा ऊसही शेतकर्यांना गुरांपुढे चारा म्हणून टाकावा लागतो. भविष्यात चार्याचे दर प्रचंड महागतील. शेतकर्यांना गुरं सांभाळणं कठीण जाईल. चारा- पाण्याच्या अभावाचा परिणाम दूध उत्पादनावर होतो. अनेक कुटुंबांना पशुपालन, दूध उत्पादन हा उत्पन्नाचा एक स्रोत आहे. तो भविष्यात आटण्याची भीती आहे. तसं झालं तर शेतकरी कुटुंबाचं अर्थकारणही कोलमडून जाईल.
***
शहरात शिकायला पाठवलेल्या मुलांना गावाकडून मिळणारी तुटपुंजी रसद आता हळूहळू बंद होऊ लागली आहे. गावाजवळची शहरं, तिथल्या बाजारपेठा सध्या ओस पडत चालल्या आहेत. कारण लोकांच्या हाती पैसाच नाही. सर्वत्र शुकशुकाट आहे. शेतीतल्या उत्पादनात कमालीची घट, रोजगाराचा अभाव, छोट्या-मोठ्या धंद्यांना बसणारी याची झळ दिवसेंदिवस वाढत जाईल. हे सावट दसरा- दिवाळीला आणखी गडद होत जाईल. asaram.lomte@expressindia.com
