संयोगिता ढमढेरे

जीवघेण्या आजारांपासून मुलांचे संरक्षण करण्यासाठी लसीकरण ही सर्वात सुरक्षित पद्धत मानली जाते. मात्र कोविड साथीच्या काळात लसीकरण विस्कळीत झाले. त्यामुळेच सरकारने आता त्यावर अधिक लक्ष केंद्रित केले आहे.

Planning of extra bus service by state transport due to holidays
नाशिक : सुट्यांमुळे राज्य परिवहनतर्फे जादा बससेवेचे नियोजन
arun gawli marathi news, arun gawli jail marathi news
विश्लेषण: अरुण गवळीची सुटका होणार का? न्यायालयाने काय म्हटले? राज्य सरकारची भूमिका काय?
ie think our cities
IE THINC Second Edition: “लवकरच असमानता आणि हवामान बदल ही आपल्या शहरांसमोरची सर्वात मोठी आव्हानं ठरतील!”
sangli lok sabha marathi news, mla vinay kore marathi news
सांगलीत पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या नेतृत्वाला मित्र पक्षाकडून आव्हान

नोव्हेंबर २०२२ मध्ये मुंबईपाठोपाठ छत्रपती संभाजीनगरमध्ये गोवरच्या साथीचा उद्रेक झाला. भवानीनगरमधील उद्रेक सर्वात मोठा होता. तेथील आरोग्य केंद्राच्या प्रमुख परिचारिका समिना शेख सांगतात, ‘‘पहिला रुग्ण आढळल्यापासून आजपर्यंत भवानीनगर भागात गोवरचे ५९ रुग्ण आढळले. नोव्हेंबर २२ ते एप्रिल २३ या काळात नऊ महिने ते पाच वर्षे वयोगटातील ८७४ मुलांना म्हणजे १०० टक्के मुलांना गोवर-रुबेलाची लस देण्याचे लक्ष्य आमच्या टीमने पूर्ण केले आहे. गेल्या महिन्याभरात एकही रुग्ण न आल्याने इथली साथ संपली आहे.’’

‘‘घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात आले. संजयनगरमध्ये सर्वाधिक मुले लसीकरणापासून वंचित होती,’’ असे डॉ. पवनकुमार जेरपुला यांनी सांगितले. ते ‘युनिसेफ’चे जिल्हा लसीकरण कक्षाचे समन्वयक आहेत. या कक्षाने सूक्ष्म नियोजन केले. आशा आणि युनिसेफ कक्षाच्या प्रतिनिधींनी जी मुले केंद्रावर येत नाहीत त्यांच्यापर्यंत पोहोचून लसीकरण पूर्ण केले.  

‘‘लसीकरण न झालेल्या मुलांसाठी विशेष लसीकरण सत्रे आयोजित केली गेली. नकार देणाऱ्या पालकांचे आरोग्य विभागाच्या टीमने समुपदेशन केले. काही ठिकाणी स्थानिक खासगी डॉक्टर आणि मौलवींचा प्रभाव आहे. तिथे युनिसेफ कक्ष प्रतिनिधींनी त्यांना लसीकरणाचे महत्त्व समजावून सांगितले,’’ अशी माहिती छ. संभाजीनगर महानगरपालिकेच्या लसीकरण अधिकारी डॉ. स्मिता नलगीरकर यांनी दिली. विलगीकरण, लसीकरणातून साथ आटोक्यात आणण्यात यश आले. ‘‘शहरात ३७९ सत्रांत ८००३ मुलांना अतिरिक्त मात्रा देण्यात आल्या आहेत. १५ पैकी आठ ठिकाणची साथ संपली असून उरलेल्या सात ठिकाणी तुरळक आढळणारे रुग्णांचे प्रमाणही लवकरच शून्यावर येईल,’’ असा डॉ. नलगीरकर यांना विश्वास आहे.

‘‘साथीवर नियंत्रण मिळवण्यासाठी टास्क फोर्सच्या बैठका घेण्यात आल्या. वैद्यकीय संस्था, बालरोगतज्ज्ञ, सामाजिक संस्था यांचे प्रतिनिधी आणि धार्मिक नेते बैठकांना उपस्थित राहात. शाळांच्या मुख्याध्यापकांनाही माहिती कळवण्यास सांगितले होते.  बालरोतज्ज्ञांचेही सहकार्य मिळाले,’’ असे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी पारस मंडलेचा यांनी सांगितले. या सर्व एकत्रित प्रयत्नांना पालकांची साथ लाभल्याने छत्रपती संभाजीनगरमधील साथ नियंत्रणात आली. 

दलालवाडी वसाहतीत वैशाली अभ्यंकर-विटेकर गेली २२ वर्षे औरंगपुरा इथे आशासेविका आहेत. ‘‘दलालवाडीतील एक घर सोडल्यास १०० टक्के लसीकरण पूर्ण झाले होते. मुलांना लस दिली तर बायकोला घटस्फोट देईन अशी एक माणूस धमकी देत होता. त्याच्यापुढे सर्वानी हात टेकले,’’ असे त्या सांगतात. आशासेविकांना असेही अनुभव येतात. पण  आशासेविका, महिला आरोग्य समित्या सक्रिय असतील तर साथी, कुपोषण आटोक्यात राहते. माता आणि बालकांच्या आरोग्याला धोका उरत नाही.

लसीकरण तुमच्या दारी..

नवजात बालकांसाठी गंभीर ठरू शकतील अशा अनेक आजारांवरच्या लशी सरकार मोफत देते. वयाच्या पाच वर्षांपर्यंत या सात लशी दिल्यास क्षयरोग, पोलिओ, कावीळ, धनुर्वात, हगवण, न्यूमोनिया, मेंदुज्वर, गोवर आदींपासून संरक्षण मिळते. पालकांना पुरेशी माहिती नसणे, स्थलांतर, वेळेचा अभाव, भीती, गैरसमज अशा अनेक कारणांमुळे बहुसंख्य मुले लसीकरणापासून वंचित राहतात. अशा मुलांना आणि त्यांच्यामुळे इतर मुलांनाही सहज टाळता येतील असे संसर्ग होतात. त्यामुळे जास्तीत जास्त मुलांचे लसीकरण पूर्ण होणे आवश्यक आहे. त्यासाठी वंचित राहिलेल्या, लसीकरण अर्धवट सोडलेल्या किंवा नकार देणाऱ्या पालकांपर्यंत पोहोचणे गरजेचे ठरते. वारंवार सांगूनही पालक मुलांचे लसीकरण करत नसतील तर परिचारिका युनिसेफच्या क्षेत्र प्रतिनिधींची मदत घेतात.

संजयनगर वसाहतीतील आफरीन शेख यांनी त्यांच्या दोन आणि पाच वर्षांच्या मुलांना कोणतीही लस दिली नव्हती. तेथील आशाताईने त्यांच्या शंकांचे निरसन केल्यानंतर आफरीनने दोन्ही मुलांचे लसीकरण पूर्ण केले. नसरीन चार महिन्यांपूर्वी मध्य प्रदेशमधून संभाजीनगरला आली. ‘‘इथे लस कुठे देतात हेच मला माहीत नव्हते. पण मी शोधण्यापूर्वीच या परिसरातील आशाताई माझ्याकडे आल्या.’’ आता त्यांच्या मुलांचे योग्य लसीकरण झाले आहे. ‘‘खूप अंधश्रद्धा आहेत. आम्ही कधी लस घेतली नाही आणि मुलांना देणारही नाही, असे ते म्हणतात. त्यांना वाटते आम्ही त्यांना करोनाचे किंवा गर्भनिरोधाचे इंजेक्शन देत आहोत.’’ मनीषा खराटे या परिचारिका सांगत होत्या.  ‘‘मुलांना लसीकरणानंतर ताप येतो म्हणून अनेक पालक लसीकरणासाठी आणत नाहीत,’’ असाही अनेक आशासेविकांचा अनुभव आहे.  

भटक्या जाती-जमाती, बांधकाम मजूर हे एका ठिकाणी राहात नाहीत. ते जितके दिवस शहरात असतात तोवर त्यांच्यापर्यंत लस पोहोचवण्याचा प्रयत्न केला जातो. लशींच्या बाटल्यांची, त्यांच्या तापमानाची काळजी घ्यावी लागते. परिचारिकेला एकटीने लसीकरण करणे सोपे जावे यासाठी युनिसेफ टीमने एक खास बॅग तयार केली. त्यात प्रत्येत साहित्यासाठी एक विशिष्ट जागा आहे. दोन्ही बाजूंनी ती पूर्ण उघडत असल्याने तिचा टेबलासारखा उपयोग करता येतो. प्रत्येक लशीची बाटली ठेवण्यासाठी विशिष्ट जागा आणि तिथे नाव लिहिलेले असल्याने चूक वा गोंधळ होत नाही. लसीकरण वेगाने होईल अशी ही रचना केली आहे. अशा सोयी असलेली ही बॅग एकटीला सहज खांद्यावर नेता येते हे विशेष. कोविडपाठोपाठ आलेल्या गोवरच्या साथीवर विविध संबंधित घटकांच्या एकत्रित प्रयत्नांतून मात करणे शक्य झाले आहे.

मुंबईतील परिस्थिती..

मुंबईतील मानखुर्द, गोवंडी आणि कुर्ला येथील अतिशय गजबजलेल्या झोपडपट्टय़ांमध्ये गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये, गोवरच्या साथीचा उद्रेक झाला होता. ही साथ आता पूर्णपणे नियंत्रणात आली आहे. ‘‘स्थानिक स्वयंसेवक, नेते, सामाजिक कार्यकर्ते, यांच्याबरोबर काम करण्याचे धोरण हे लसीबाबतची साशंकता आणि नकार या प्रश्नांना भिडताना अतिशय उपयुक्त ठरले,’’ असे  ‘सिटिझन्स असोसिएशन फॉर चाइल्ड राइट्स’चे (सीएसीआर) संस्थापक, संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन वाधवानी सांगतात. मुंबई, ठाणे, भिवंडीतील विविध भागांमध्ये लसीकरणचा संदेश पोहोचवण्यासाठी सीएसीआरने भक्कम जाळे विणले आहे. मानखुर्दमधील देवनार कचराभूमीच्या अगदी समोर असलेल्या झोपडपट्टीत एक मदरसा आहे. सीएसीआरमध्ये प्रकल्प व्यवस्थापक असलेल्या सुवर्णा घाटगे या मदरशाचे अध्यक्ष मिसबहुर रेहमान यांना भेटल्या. रेहमान यांनी एका उद्घोषकाला बोलावले आणि लसीकरणाचा संदेश ध्वनिक्षेपकावरून संपूर्ण वस्तीमध्ये वाचून दाखवला.

‘‘कोविड-१९ मुळे बरीच मुले लसीकरणाला मुकली. आता मात्र एकही मूल लसीकरणापासून वंचित रहायला नको,’’ असे सुवर्णा घाटगे म्हणतात. पालिकेचे साहाय्यक वैद्यकीय अधिकारी डॉ. रमेश गाढवे गोवरची साथ कशी आटोक्यात आणली हे सांगतात- ‘‘मानखुर्दच्या शिवाजी नगर परिसरातील ८२ हजारपैकी ३२-३५ टक्के लोकसंख्या ही स्थलांतरित कामगारांची आहे. तिथे एकूण ३२ लसीकरण शिबिरे घेतली. सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे एप्रिलमध्ये गोवरच्या एकाही रुग्णाची नोंद झाली नाही आणि आमचे लसीकरण जवळजवळ १०० टक्क्यांच्या आसपास पोहोचले,’’ डॉ. गाढवे म्हणाले. लसीकरणाला नकार मिळत असेल किंवा लसीकरणाची टक्केवारी कमी असेल, अशा भागांना ते स्वत: भेट देतात आणि पालकांना त्यांच्या मुलांना आरोग्य केंद्रांवर आणण्याचे महत्त्व पटवून देतात. सीएसीआरच्या ज्योती साठे आणि सागर खेताडे हे कार्यकर्त्यांच्या या जाळय़ाचा कणा आहेत. लसीकरणाचा संदेश सर्वत्र पसरवण्यासाठी सीएसीआरने विविध पद्धतीही अवलंबल्या आहेत. औषधासाठी दुकानात येणाऱ्या पालकांशी लसीकरणाबाबत संवाद साधण्यासाठी म्हणून त्यांनी त्या भागातील औषध विक्रेत्यांनाही सहभागी करून घेतले आहे. पालकांपर्यंत पोहोचण्यासाठी आंगणवाडीचा वापर केला जातो. पालकांशी चर्चा करून त्यांना लसीकरणाचे महत्त्व समजावून सांगितले जाते. त्यांना कधी आणि कोणती लस द्यायची याचे वेळापत्रक दिले जाते. हे प्रयत्न जागरूकता निर्माण करण्याच्या कामी मदत करतात,’’ असे ज्योती साठे सांगतात.