ॲड. शुभम पगार
आमची पिढी १९८८ ते २००० या कालखंडात जन्माला आलेली. ही मिलेनियल पिढी आज केवळ दोन पिढ्यांच्या मधोमध अडकून पडलेली नाही, तर स्वतःच्या आकांक्षांचा बळी देऊन, स्वतःच्या निर्णयांवर सतत प्रश्नचिन्ह लावत एका भीषण वळणावर उभी आहे. एका बाजूला १९६८ ते १९८८ दरम्यान जन्मलेल्या आमच्या पालकांची अतिसंरक्षक आणि एकाधिकारशाही वृत्ती, त्यांच्या अनुभवांचे अवाजवी ओझे आणि त्यांच्या निर्णयांना अंतिम सत्य मानण्याची आमच्यात रुजलेली अगतिकता; तर दुसऱ्या बाजूला आजच्या नव्या पिढीचा (‘जेन झी’) बेधडक, स्पष्टवक्ता बाणा.

आज अन्यायाविरुद्ध थेट रस्त्यावर उतरून व्यवस्थेला जाब विचारणारी आणि घरातही स्वतःच्या निर्णयांवर ठाम उभी राहणारी नवी पिढी पाहिली की एका जळजळीत वास्तवाची जाणीव होते—आपण इतके लाचार, मान तुकवणारे आणि तडजोडीलाच आयुष्य मानणारे कसे झालो? हातात उत्तम शिक्षण, तंत्रज्ञान आणि जगाची माहिती असूनही आपल्याच अस्तित्वासाठी उभे राहण्याची हिंमत नेमकी कुठे गहाण पडली?

आमच्या आधीच्या पिढीने दारिद्र्य, टंचाई आणि जगण्याचा तीव्र संघर्ष पाहिला, यात शंका नाही; पण स्वतःच्या अगतिकतेतून आणि असुरक्षिततेतून जन्मलेली भीती त्यांनी पुढच्या पिढीवर लादली, हे सत्य नाकारता येणार नाही. ‘आम्ही सांगतो तेच कर, आम्ही जग पाहिलंय, तुझ्या भल्यासाठीच बोलतोय’ —या भावनिक बुरख्याखाली पालकांनी मुलांच्या स्वतंत्र विचारांची, आवडीनिवडींची आणि स्वप्नांची अनेकदा गळचेपी केली. करिअर, नोकरी, लग्न आणि सामाजिक जगण्याचे निर्णय त्यांनी स्वतःच्या अटींवर ठरवून दिले. आम्हीही त्याला ‘संस्कार’ समजण्याची घोडचूक केली; मान तुकवण्याला ‘आज्ञाधारकपणा’ म्हटले, अगतिकतेला ‘समजूतदारपणा’ ठरवले आणि स्वतःच्या इच्छा मारून जगण्याला ‘कर्तव्य’ मानले.

आज परखडपणे जाब विचारावासा वाटतो की, आई-वडिलांचा आदर करणे म्हणजे स्वतःच्या बुद्धीचा आणि अस्तित्वाचा संकोच करणे आहे का? पालकांनी कष्ट केले म्हणून त्यांच्या प्रत्येक कालबाह्य आणि स्वतःच्या अपूर्ण इच्छांच्या ओझ्याखाली मुलांचे आयुष्य वेठीस धरणे हा संस्कार असू शकत नाही; ती निव्वळ मानसिक कोंडी आहे.

घरातील या अगतिकतेचा थेट परिणाम देशाच्या सामाजिक आणि राजकीय पटलावर झाला. एका विशिष्ट कालखंडात जेव्हा देशात परिवर्तनाच्या घोषणांचा गाजावाजा झाला, तेव्हा या संपूर्ण पिढीने सारासार विचार बाजूला ठेवून एका विशिष्ट विचारसरणीला आणि सत्ताधाऱ्यांच्या चेहऱ्याला डोक्यावर घेतले. लोकशाहीत कोणालाही पाठिंबा देणे हा अधिकार असला, तरी त्या पाठिंब्याचे रूपांतर जेव्हा अंधानुकरणात झाले, तेव्हा या पिढीचा स्वतंत्र नागरिक म्हणून असलेला विवेकच बोथट झाला. सत्तेवर कुणीही बसले तरी वाढती बेरोजगारी, ढासळलेली अर्थव्यवस्था, शिक्षण व्यवस्थेचा उडालेला बोजवारा आणि आक्रसत चाललेल्या रोजगाराच्या संधी यावर सत्तेला जाब विचारणे हा आपला हक्क होता. सत्तेच्या चुकीवर बोट ठेवले तर ‘देशद्रोही’ ठरवले जाऊ या भीतीने गप्प बसणे आणि समाजमाध्यमांवरून पेरल्या जाणाऱ्या अजेंड्याला सत्य मानणे ही केवळ राजकीय अपरिपक्वता नव्हती, तर ते आमच्या बौद्धिक दिवाळखोरीचे लक्षण होते.

आज या पिढीतील तरुण तिशी-पस्तिशीच्या उंबरठ्यावर उभा आहे. पदव्यांच्या रद्दीवर हक्काचा रोजगार नाही, व्यवसाय सुरू केला तर धोरणांअभावी तोटा आहे, नोकरीत मानसिक शांतता नाही आणि हातात पैसा असला तरी स्वतःचे आयुष्य जगण्यासाठी उसंत नाही. ईएमआयचे हप्ते भरण्यात, घराचे कर्ज फेडण्यात आणि कुटुंबाच्या अपेक्षांच्या चक्रात अडकून कित्येकांनी लग्नाचा निर्णय पुढे ढकलला, तर काहींनी संसाराच्या चक्रव्यूहात स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व गमावून बसले. आधी शिक्षण, मग नोकरी, मग लग्न, मग मुले आणि उर्वरित आयुष्य त्यांच्यासाठी खर्ची घाला—या न संपणाऱ्या शर्यतीत स्वतःसाठी जगण्याचा क्षण नेमका कधी आला? सुरक्षित भविष्याचा भ्रम बाळगताना आम्ही आमचे संपूर्ण तारुण्य आणि जिवंत वर्तमान गमावून बसलो. आजची नवी पिढी आपल्याला स्पष्ट आरसा दाखवत आहे. ती घरातल्या जुनाट अपेक्षांना प्रश्न विचारते, समाजाच्या कुजलेल्या रूढींना आव्हान देते आणि चुकीच्या धोरणांविरुद्ध छातीठोकपणे उभी राहते. आपण ज्याला ‘सहनशीलता’ म्हणत राहिलो, ती मुळात अन्याय स्वीकारण्याची सवय होती. आपल्या पिढीचे पंख छाटले गेले असतील, तरी तोच लाचारीचा वारसा पुढच्या पिढीवर लादण्याचा आपल्याला कोणताही नैतिक अधिकार नाही.

आता आत्मदोष देत बसण्याची किंवा पालकांच्या नावाने खंत व्यक्त करण्याची वेळ निघून गेली आहे; आता बंडखोरीची खरी गरज आहे. ही बंडखोरी नाती तोडण्यासाठी नाही, तर नात्यांमधील कालबाह्य वर्चस्ववादाला नकार देण्यासाठी आहे. घरात आई-वडिलांचा आदर नक्कीच ठेवावा, परंतु त्यांच्या अवाजवी अपेक्षा आणि ‘सेटलमेंट’च्या संकुचित व्याख्या नाकारण्याची हिंमत दाखवलीच पाहिजे. सत्तेत बसलेल्या कोणत्याही नेतृत्वाचे अंध समर्थक बनणे बंद करून, रोजगारावरून आणि भवितव्यावरून त्यांना घाम फुटेल असे जाब विचारले पाहिजेत. ‘लोक काय म्हणतील’ या भीतीने मारून टाकलेली स्वप्ने पुन्हा उभी करून, स्वतःच्या अटींवर जगण्याचा मार्ग निवडला पाहिजे. १९८८ ते २००० दरम्यान जन्मलेल्या पिढीने गमावलेली वर्षे परत येणार नाहीत. पण उरलेले आयुष्यही त्याच तडजोडीत जगायचे की ताठ मानेने स्वतःचे अस्तित्व सिद्ध करायचे, हा निर्णय आजच घ्यावा लागेल. बंडखोरीशिवाय परिवर्तनाची नवी पहाट शक्य नाही. ही लढाई कोणाला हरवण्यासाठी नाही, तर स्वतःच्या मनात ठाण मांडून बसलेल्या भीतीला कायमचे संपवण्यासाठी आहे!

लेखक मुंबई उच्च न्यायालय आणि नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयात वकिली करतात.