ॲड. राजा देसाई
सरसंघचालक मोहन भागवत यांनी जंतर -मंतरवरील आंदोलक तरुणांच्या तक्रारी खर्‍या असल्याचे सांगत त्यांना ‘देशविरोधी’  न मानता त्यांच्याशी संवाद साधण्याचे आवाहन केले. पण आंदोलनाच्या सुरुवातीपासून त्यांना देशद्रोही ठरवण्याची भाषा कोणी केली, आणि आता संवादाची भाषा का केली जात आहे?

‘‘आंदोलक तरुणांच्या तक्रारी खर्‍या आहेत, ते प्रश्नांची उत्तरे मागत आहेत. त्यांना ‘देशविरोधी’ न मानता संवाद साधायला हवा’’ एका संघ-संस्थेच्या कार्यक्रमात सरसंघचालक भागवत यांचे हे आवाहन. त्याला संदर्भ अर्थातच ‘जंतर-मंतर’वरील ‘कॉक्रोच’ आंदोलनाचा आहे.

सत्ताकारणी साठमारीपासून दूर असलेल्या आम्हा सामान्यांच्या मनात आलेला एक साधा प्रश्न : ‘त्यांना देशद्रोही मानू नका’ असं सांगायची वेळ स्वातंत्र्योत्तर काळात प्रथमच का आली? कोणी आणली? त्या तरुणांना आंदोलनाच्या पहिल्या क्षणापासून ‘देशद्रोही’ कोणी म्हटलं? आंदोलनाला ‘फॉरिन फंडिंग’ आहे असा आरोप करून त्याच्या चौकशीची मागणी कोणी केली? केंद्रीय मंत्र्यांचा राजीनामा मागणार्‍या आंदोलकांना देशद्रोही कोण म्हणेल? संघसत्तेचे विरोधक की समर्थक? थोडक्यात, वरील आवाहन हे ‘सबका साथ’सारखंच ठरतं!

समाजात कोणतीही ओळख नसलेले व कोणतीही संघटना नसलेले चार तरुण एकत्र येतात व त्यांना लाखोंचा उस्फूर्त पाठिंबा मिळतोय हे नक्कीच आश्चर्य वाटण्याजोगे,  समाजमन खदखदत असल्याचा यापेक्षा मोठा पुरावा नाही. संसद मोर्चानंतर हे लक्षात आल्यावर सदैव ‘व्होट-कॉन्शस’ असलेल्या दिल्लीतील सत्ताधीशांना जाग आली. तोपर्यंत आपल्या ‘सत्ता-बंधूं’साठी कवच म्हणून का होईना पण ‘त्यांना समजून घ्या, संवाद साधा, राष्ट्रविरोधी म्हणू नका’ ही भाषा तेव्हा कोणा संघ-वरिष्ठांनी केली होती का? मग आताच हे आवाहन का? समाजमानसात व तरुणाईत आपली/ सत्ताधार्‍यांची प्रतिमा सुधारण्याच्या गरजेपोटी तर नव्हे?

असो, मात्र एवढंही नशीब ना ‘मणिपूर’चं होतं, ना राष्ट्रीय/ आंतरराष्ट्रीय पदकं मिळवणार्‍या व लैंगिक शोषणाविरुद्ध दिल्लीच्या रस्त्यावर दोनतीन महिने धरणं धरणार्‍या महिला खेळाडूंचं. का? कारण त्यांचा सत्तेला धोका दिसत नव्हता हे तर नव्हे? नाही तर आपल्या सत्ताधारी बंधूंची राजकीय गणितं व अहंकार सोडा पण ‘यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता:’ हे सांगणारी भारतीय संस्कृती कोणा संघ-वरिष्ठांनाही त्या वेळी आठवल्याचं स्मरत नाही! उलट न्यायालयात बलात्कार-गुन्हेगार ठरलेल्या तुरुंगातील ‘गुरू’लाही राजकीय गणितांपोटी कायम जणू जामिनासारखे एकापाठोपाठ एक असे कितीही पॅरोल मिळत आहेत? अयोध्येत मंदिरपूर्तीपूर्वीच प्राणप्रतिष्ठेला ठाम विरोध करणार्‍या शंकराचार्यांवर ‘पॉक्सो’खाली योगींच्या राज्यात केस दाखल झाली आहे (खरंखोटं न्यायालय ठरवेल) पण हेच विरोधी राज्यात घडतं तर ‘सनातन धर्माचा अवमान’ म्हणून आगडोंब उसळवला गेला असता की नाही? काही काळापूर्वी काँग्रेसशासित कर्नाटकात मठाधिपतींविरोधात काही एफआयआर दाखल करून सरकारनं सनातन धर्माचा अवमान केला अशी टीका करून भाजपने आंदोलनाचा इशारा दिला होता! आम्हा सामान्य धार्मिकांसाठी प्रश्न आहे तो धर्माला सत्ताकारणासाठी जुंपलं की धर्माचं काय होतं हा! इतर धर्मांचे इतिहास याला साक्षी आहेत. भारताला मात्र हा अनुभव नवा आहे, पण ‘व्होट-सेक्युलॅरिझम’च्या प्रभावातून मुक्त होतानाच उन्मादी ‘व्होट-धर्मा’चेही गंभीर परिणाम भोगून झाल्याशिवाय आपल्याला हे कळणार नाही. त्यासाठी काही काळ जावा लागणार!

राज्य कोणाचंही असो. कोणाकडेही ज्यांची उत्तरं नाहीत, असे अनेक प्रश्न आहेत; अगदी जगभर. पण ओठांवर सतत संविधानाची भाषा करताना सत्तेचा उपयोग साम दाम दंड भेद वापरून विरोधी विचार दडपणारा उलटा व्यवहार सार्वजनिक जीवनातली नैतिकता संपवतो. नैतिकतेविना धर्म जगेल? भाषा ती नसते पण ‘कॉक्रोच’सारखे उत्स्फूर्त उद्रेक हा त्या नैतिकतेचा आक्रोश असतो. आणि लोकशाही युगात तर सत्ताकारण ही अनैतिकतेची गंगोत्रीच झाली आहे. लोकशाहीतील ‘राजा’ही, ‘कालस्य कारणं’ ठरतोच! 

उच्चतम नेतृत्वाच्या सांस्कृतिक उंचीवर बरंच काही अवलंबून असतं. विरोधकांची कल्याणकारी योजना ती ‘रेवडी’ म्हणणार्‍यांना त्यांच्याच ‘लाडक्या बहिणी’ गप्प बसवतात! पेपरफुटी असो की बलात्काराची घटना… मेणबत्ती मोर्चे काढायचे की नाही हे, कोणाच्या राज्यात ते घडलं यावर ठरणं… वा पूल कोणाच्या राज्यात कोसळला यावर ती घटना ‘ॲक्ट ऑफ गॉड’ की ‘ॲक्ट ऑफ फ्रॉड’ ठरवणारी देशाच्या उच्च नेतृत्वाची भाषा. कोणत्या ‘सनातन धर्म-संस्कृती-संवर्धना’चा संदेश देशाला यातून जातो? उलट अशा व्यापारी वातावरणात मुख्यत: निष्ठा ही बाजार-वस्तू बनते व नैतिकतेला अब्रू झाकायला वस्त्र मिळणं कठीण होतं. त्यावरही ‘व्होट’-मुद्रा उमटली की समाजाची घुसमट अधिकच होते. अशा वेळी समाजालाही आत्मपरीक्षण करायला सांगणारं कोणी उरत नाही ही स्थिती अधिक दुर्दैवी आहे. अशा अनैतिकतेचा संबंध राजकारणापेक्षा संस्कृतीशीच अधिक असतानाही ‘आम्ही केवळ सांस्कृतिक’ म्हणणार्‍यांच्या खुद्द सत्ताधारी स्वयंसेवकांचं तरी राजकारण संस्कृती संवर्धन करणारं आहे का? ‘कॉक्रोच’सारख्या निमित्तानं सर्वच पक्षांसहित एकंदरीतच राजकीय व्यवस्थेविषयीची अविश्वसनीयता सिद्ध होते.

कोणत्याही सेवेचीही स्पर्धात्मक करिअर झाली की ही अनैतिकता अटळ. सत्तेचं समाजजीवनात स्थान, विशेषत: आधुनिक काळात, नक्कीच अत्यंत महत्त्वाचं आहे, पण सत्तेद्वारे मौलिक समाजपरिवर्तनाचं काय होतं हे विसाव्या शतकानं उत्तम शिकवलं आहे. तसेच उच्च नेतृत्वच अनुदार असेल तर घटना/कायदा यांचा दुरुपयोग करून लोकशाहीचं काय होतं हेही भारत/अमेरिकेसहित जगभर आपण पाहिलं आहे, पाहत आहोत.

असो, मागे जाऊ. राष्ट्रद्रोह हा शब्दप्रयोग या देशात मुख्यत: ‘संघसत्ता मजबूत झाल्यावर अधिकाधिक होऊ लागला. अगदी राष्ट्रीय संरक्षण विषयाचाही द्वेष पसरवण्यासाठी उपयोग. प्रत्यक्ष सैनिकी सूत्र काहीही बोलत नाहीत तरीही! ‘बालाकोट हल्ल्यात शेकडो दहशतवादी ठार असं आम्ही म्हणू’ पण आधार काय विचाराल तर विरोधक राष्ट्रद्रोही! हे आता रोजचं झालंय.

आता तर जोडीला ‘सनातन धर्माचा अपमान’ हे शब्द राष्ट्रद्रोहाचे समानार्थी व परवलीचे झाले आहेत. हा अपमान त्यांना आजकाल उठताबसता जळीस्थळी काष्ठीपाषाणी दिसत असतो. राजकीय/सामाजिक टीकेच्या विचारांसाठीही रोज फौजदारी/बदनामी खटले, मग लागोलाग देशभरात ठिकठिकाणी पोलिसांनी निमूटपणे एफआयआर दाखल करून पकडणं वा न्यायालयांनी निमूटपणे आरोपींना समन्स काढणं हे आलंच!  हे अगदी सत्ताविरोधी व्हॉट्सॲप मेसेज फक्त पुढे पाठवण्याबाबतही! केसेसचं शेवटी काहीही होवो, पण वर्षानुवर्षं न्याय-प्रक्रियेत सोलून निघण्याची भयंकर शिक्षा तर मिळतेच; शिवाय सामान्यांसहित असंख्यांना जरब! संपूर्ण राजकीय/सामाजिक वातावरणच (रामराज्यात) राम-प्रेमाऐवजी द्वेष-धर्मानं ओतू जात आहे. हे कोणतं संस्कृती-संवर्धन? हा प्रश्न सत्ताकारणाचा नव्हे; समाजस्वास्थ्याचा, राष्ट्रीय ऐक्याचा व हिंदू संस्कृतीचा आहे.

असो. वरील काळजीला आधारभूत म्हणून ताजी पूर्वपीठिका त्यात जीव नसतानाही नाइलाजाने द्यावी लागली. उदाहरणांत गेलं की त्यावर पक्षपातीपणाचे ठप्पे बसतात व म्हणून ते टाळावं तर उरणार्‍या गोडगोड गोष्टींनी सारेच माना डोलावतात; मात्र मग मानवी सृजनशीलता कुजणारं एक चैतन्यहीन डबकं बनतं (हेच झालं अख्ख्या निधर्मी-विश्वाचं!). शुद्ध द्वेषरहित भावानं पुढे जावं हा मार्ग उरतो.

राष्ट्रीय ऐक्याचा एक मंत्र आपल्या हृदयात आपण सदैव जागृत ठेवला पाहिजे. असामान्य विविधता असूनही एक असलेल्या भारतीय ऐक्याचा आधार हा रूढार्थानं धर्म नव्हे. तो आहे मनुष्य जीवनाबरोबरच हे विश्व काय आहे, या प्रश्नाच्या ‘सनातन’ या उत्तरात. प्रश्न पडतो : काही हजार वर्षांच्या संस्कारांवर मात करून राजकीय हिंदुत्व हिंदूंचा डीएनए बदलू शकेल का? कोणता?

‘सर्वं खल्विदं ब्रह्म’! केवळ सारे धर्म आणि मानवच नव्हे तर जडासहित सारी सृष्टीच एका चैतन्यमय अविनाशी (म्हणून सनातन) तत्त्वानं व्यापलेली आहे व म्हणून तिचा कणन् कण जणू नैसर्गिकरीत्या (ऑर्गनिकली) एक आहे, हा तो हिंदू डीएनए. विश्वात अशी वस्तू नाही की जी सनातनच्या पोटात नाही; केवळ सद्गुणच नव्हे तर दुर्गुणही! इथे सैतानही वेगळा नाही! सार्‍या अस्तित्वाला व्यापून असलेल्या सनातनाबाहेर राहूच काय शकणार? मग द्वेष कुणाचा? अन्यायाविरुद्ध परिस्थितीनुरूप स्वभावजनित युद्धकर्मही कर्तव्य असेल पण युद्धातही ‘मा मनुस्मर युध्य च’ हा मार्गदर्शक ध्रुव तारा : ईश्वर-स्मरणातील कर्म द्वेषरहित होतं!

भारताचा हा उद्घोष हा केवळ बुद्धीजनित विचार नव्हे तर ती आमच्या पूर्वजांची अनुभूती आहे असं म्हटलं जातं; म्हणजे? आम्हा पामरांस ठाऊक नाही. उद्या विज्ञान यावर अंतिम निर्णय देईल. असो, वरील भारतीय विचारात निरीश्वरवादीही आपापल्या मार्गानं मुक्तीला पोहोचू शकतो. हा अत्यंत उदार हिंदू विचार आहे. या ‘सनातना’ला राष्ट्र, रूढ (अस्मिता) धर्म  इत्यादी लेबलांत कोंडल्यानं आमचं स्वत्व परिणामत: राष्ट्रैक्यही कमकुवत होईल. काळानुरूप भौतिक विकास  संरक्षण-सिद्धता इ. गोष्टी हव्यातच, पण त्या समाजाचं शरीर! आत्म्याशिवाय शरीर ते काय? प्रत्यक्षात उतरण्यासाठी, त्याच त्याच न म्हणता, जीवन-मार्गदर्शक चांगल्या गोष्टींचा रामनामासारखाच पुन्हा पुन्हा जप करावा लागतो : ‘भारत या ऐक्यधर्माला पकडून राहील तर त्याच्या नखालाही धक्का लागणार नाही, तो या ऐक्यधर्माला सोडेल तर त्याला कोणीही (ईश्वरही) त्याला वाचवू शकणार नाही!’ -स्वामी विवेकानंद. या भूमीचं भाग्य थोर की आकाशाएवढी विशाल जीवनदृष्टी आपल्याला लाभली आहे. तीही कशी? ‘धर्म विज्ञानाला सामोरा जायला तयार नसेल तर त्याच्या लवकरात लवकर मरणातच मानवाचं कल्याण आहे’ (विवेकानंद) असंही म्हणण्याचं धाडस असलेली.

हे सारं पेलण्याचा प्रश्न जरूर उरतो; पण हा प्रश्न सर्वच धर्मी/निधर्मींच्या ध्येयांबाबत सदैव राहिला आहे. उत्तर साधं आहे. ‘योग्य ध्येय असलेला माणूस जीवनात शंभर चुका करील तर तेच चुकीचं असलेला दहा हजार!’ -स्वामी विवेकानंद… हाच नियम राष्ट्रालाही लागू!

rajadesai13@yahoo.com