डॉ. प्रदीप आवटे

२००५ मध्ये थॉमस फ्रीडमनने ‘वल्र्ड इज फ्लॅट’ असे महत्त्वपूर्ण विधान केले. एकूण जागतिक पातळीवरील आर्थिक घडामोडींसंदर्भात ते विधान होते; पण मागील काही दशकांमध्ये हे विधान साथरोग शास्त्राच्या अनुषंगानेही खरे ठरले..

Golden Jubilee of Mumbai grahak Panchayat fighting for consumer rights
ग्राहकांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या जागल्याचा सुवर्णमहोत्सव…
Listed on Roots 2 Roots Social Stock Exchange in Arts Sector
कला क्षेत्रातील ‘रूट्स २ रूट्स’ सोशल स्टॉक एक्सचेंजवर सूचिबद्ध
Drug supply to Delhi
अमली पदार्थ प्रकरणातील शोएबकडून दोनदा दिल्लीस कोट्यवधींचा पुरवठा
Office of ED and National Investigation Agency in BKC mumbai
ईडी आणि राष्ट्रीय तपास यंत्रणेचे बीकेसीत कार्यालय; बीकेसीतील २००० चौ. मी. चा भूखंड ईडीला

जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक डॉ. ट्रेडोस यांनी २३ जुलै २०२२ रोजी ‘मंकी पॉक्स ही सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय आणीबाणी आहे हे जाहीर केले. २००९ ते २०२२ या कालावधीतील म्हणजे अवघ्या १३ वर्षांतील सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील ही सातवी आंतरराष्ट्रीय आणीबाणी! म्हणजे जवळपास दर दोन वर्षांनी एक आणीबाणी इतके हे प्रमाण काळजी वाटावे एवढे अधिक आहे.

२००९ पासून स्वाईन फ्लू, इबोला, पोलिओ, झिका आणि कोविड अशा अनेक आजारांची आणीबाणी आपण पाहिली आहे. इबोला संदर्भातील आणीबाणी दोन वेळा जाहीर झाली आहे आणि २०१३ मध्ये ‘मर्स’ या आजारासाठी आणीबाणी जाहीर होईल असे वाटले होते पण तेव्हा ती जाहीर झाली नाही. सूक्ष्मजीवांमध्ये प्रतिजैविकांना- अँटिबायोटिक्सना- वाढता प्रतिरोध म्हणजेच ‘अँटि मायक्रोबिअल रेझिस्टन्स’ हीसुद्धा अनेक तज्ज्ञांच्या मते आंतरराष्ट्रीय आणीबाणी आहे पण जागतिक आरोग्य संघटनेने ती अद्याप तरी जाहीर केलेली नाही. हे सारे लक्षात घेतले तर अगदी दरवर्षी आपल्या समोर एक आरोग्य आणीबाणी उभी ठाकते आहे, असे दिसते.

मुळात ‘सार्वजनिक आरोग्याची आंतरराष्ट्रीय आणीबाणी’ (Public Health Emergency of International Concern –  PHEIC – फिक) ही संकल्पना काय आहे, हे आपण समजावून घेतले पाहिजे. वैश्विक आरोग्य परिस्थिती हाताळण्यासाठी आंतरराष्ट्रीय आरोग्य नियमन असा एक कायदा जागतिक आरोग्य संघटनेने केला आहे. १९६७ च्या या कायद्यात कॉलरा, प्लेग आणि यलो फीव्हर हे तीनच आजार आंतरराष्ट्रीयदृष्टय़ा दखलपात्र (नोटिफायेबेल) होते. २००५ साली या कायद्यात महत्त्वपूर्ण सुधारणा झाल्या आणि त्यामध्ये कोणत्याही आजारापेक्षा ‘फिक’ ही संकल्पना मांडण्यात आली. केवळ जैविक आजार हीच आरोग्यविषयक आणीबाणी असू शकत नाही, ही नवीन महत्त्वपूर्ण धारणा यामधून पुढे आली. सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय आणीबाणी (फिक) यामध्ये चार बाबी महत्त्वाच्या आहेत :

१)     असामान्य आणि अनपेक्षित घटना घडणे.

२)     या घटनेचा सार्वजनिक आरोग्य क्षेत्रावर महत्त्वपूर्ण परिणाम होण्याची शक्यता असणे.

३)     यामध्ये आंतरराष्ट्रीय प्रसाराची शक्यता असणे.

४)     त्यामुळे आंतरराष्ट्रीय दळणवळण आणि व्यापार यांवर निर्बंध घालण्याची गरज लागू शकणे.

या चारपैकी कोणत्याही दोन किंवा अधिक बाबी एखाद्या घटनेला लागू होत असतील तर अशा घटनेला जागतिक आरोग्य संघटना आंतरराष्ट्रीय आणीबाणी (फिक) म्हणून घोषित करते.

आरोग्य क्षेत्रात अशी आणीबाणी वारंवार येण्याची कारणे काय आहेत, याचा शोध घेतला असता डेंग्यू विषयातील आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ असणाऱ्या डय़ुआन गुबलरचे एक वाक्य समोर येते. तो लिहितो, ‘जागतिकीकरण, शहरीकरण आणि डेंग्यू हे एकविसाव्या शतकातील अपवित्र त्रिकूट आहे.’ पण हे विधान केवळ डेंग्यूबद्दलच खरे नाही. आज आढळणाऱ्या बहुसंख्य साथरोग आजारांबाबत ते खरे आहे. जागतिकीकरण आणि शहरीकरणामुळे प्रबळ झालेल्या अनेक घटकांमुळे साथरोगशास्त्रीय गृहीतके आमूलाग्र बदलली आहेत.

प्रचंड वेगात वाढते आंतरराष्ट्रीय दळणवळण, वाढते शहरीकरण, मोठया प्रमाणावर होणारे स्थलांतर, हवामान बदल, नवनवीन ठिकाणच्या भूभागावर मनुष्यवस्ती विस्तारत जात असताना प्राणी आणि मानवी जगताशी येणारा निकट संपर्क अशा अनेक कारणांमुळे साथीचे आजार नवनवीन आणीबाणी निर्माण करत आहेत. १९६० च्या दशकातच सुधारलेले जीवनमान आणि हातात आलेली नवनवीन अँटिबायोटिक्स यामुळे साथरोगाचा अध्याय आता संपला आहे, असे भल्याभल्यांचे अनुमान होते. त्यामुळे साथरोगासाठीचे हेल्थ बजेट कमी करून ते जीवनशैलीशी निगडित आजारांकडे वळवावे अशी सूचनाही काही जणांनी केली होती पण सूक्ष्मजीवांनी हा अंदाज पूर्णपणे चुकीचा ठरवला. जगण्याच्या या शर्यतीत टिकून कसे राहावे, यामध्ये सूक्ष्मजीव मानवापेक्षा कैक लाख वर्षे वरिष्ठ आहेत. उकळत्या पाण्यात आणि उणे तापमान असणाऱ्या ध्रुवीय प्रदेशातही टिकून राहण्याची, तगून राहण्याची कला त्यांना अवगत आहे आणि म्हणूनच जागतिकीकरणाच्या या नवीन काळात साथरोगाचा अध्याय संपण्याऐवजी दिवसेंदिवस अधिकाधिक विस्तारत चाललेला आहे, असे आपणांस दिसते.

२००५ मध्ये थॉमस फ्रीडमनने ‘वल्र्ड इज फ्लॅट’ असे एक महत्त्वपूर्ण विधान केले. त्याचे हे विधान एकूण जागतिक पातळीवरील आर्थिक घडामोडींच्या अनुषंगाने होते पण मागील काही दशकांमध्ये हे विधान साथरोग शास्त्राच्या अनुषंगानेही खरे होताना आपण पाहतो आहोत. वेगवेगळय़ा प्रदेशात तेथील भौगोलिक परिस्थितीनुसार आणि लोकसंख्येच्या वैशिष्टय़ानुसार वेगवेगळे आजार आढळतात पण जागतिकीकरणाच्या प्रबळ धक्क्याने ही साथरोगशास्त्रीय विविधता हळूहळू संपुष्टात येत असून आपण स्थानिक पातळीवरदेखील ‘ग्लोबल एपिडेमिओलॉजी’ काम करताना पाहतो आहोत. म्हणूनच अवघ्या दीड महिन्यांत मेक्सिकोमधील स्वाइन फ्लू भारतात पोहोचतो आणि आफ्रिकेमध्ये प्रामुख्याने आढळणारा ‘मंकीपॉक्स’ युरोप पादाक्रांत करतो.

आफ्रिकेमधील मागचा इबोला उद्रेक हा सर्वाधिक कालावधीसाठी चाललेला उद्रेक होता. यापूर्वी आफ्रिकेमधील कोणताही इबोला उद्रेक इतक्या काळ सुरू नव्हता. त्यामुळे अनेकांना इबोलाच्या विषाणूमध्ये काही बदल झाले आहेत का असा संशय आला आणि त्या अनुषंगाने इबोला विषाणूचे जनुकीय विश्लेषणदेखील करण्यात आले. पण लक्षात आले ते हे की इबोलाचा विषाणू बदलला नव्हता, बदलले होते ते आफ्रिका. पूर्वी आफ्रिका मुख्यत्वे खेडय़ांनी बनलेला भाग होता त्यामुळे एखाद्या खेडय़ात इबोला उद्रेक सुरू झाला की त्या गावापुरता ‘कंटेनमेंट झोन’ निर्माण करून उद्रेक आटोक्यात आणणे सोपे होते आणि त्यामुळे उद्रेक खूप कमी काळामध्ये नियंत्रणात येत असे. परंतु सत्तरच्या दशकातील आफ्रिका आता बदलली आहे. तेथेदेखील मोठय़ा प्रमाणावर शहरीकरण सुरू झाले आहे. त्यामुळे शहरी भागामध्ये जेव्हा या विषाणूचा शिरकाव झाला तेव्हा त्याचे नियंत्रण विखुरलेल्या खेडय़ातील लोकसंख्येइतके सोपे नव्हते. त्यामुळे हा उद्रेक दीर्घकाळ सुरू राहिला.

एकूणच साथरोगशास्त्रामध्ये तीन घटक नेहमीच महत्त्वाचे मानले जातात. रोगकारक सूक्ष्मजीव, पर्यावरण आणि माणूस हे ते साथरोगशास्त्रीय त्रिकूट आहे. या तीन घटकांपैकी कोणत्याही घटकांमध्ये बदल होत गेला की त्याचा परिणाम साथरोगाच्या एकूण व्यापकतेवर होतो.

सध्या इंग्लंडसह युरोपमधील खूप देशांमध्ये उष्णतेची लाट सुरू झाली आहे. इंग्लंडमध्ये तर राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करावी लागावी, इतका धुमाकूळ उष्णतेच्या लाटेने घातला आहे. स्वाभाविकपणे ग्लोबल वॉर्मिग आणि क्लायमेट चेंज या प्रकारामुळे पूर्वी न आढळणारे सूक्ष्मजीव नवनवीन भूभागामध्ये जाताना दिसत आहेत आणि या सगळय़ाचा परिपाक म्हणून आपण दरवर्षी सार्वजनिक आरोग्याची एक नवीन आणीबाणी अनुभवतो आहोत.

या पार्श्वभूमीवर आपण माणूस म्हणून काही शिकणार की नाही हा प्रश्नदेखील महत्त्वाचा आहे. देशांच्या सीमारेषा ओलांडताना हे सूक्ष्मजीव कोणताही भेदभाव करत नाहीत. ते कोणत्याही देशात मुक्तपणे प्रवेश करतात. असे असेल तर आपण आपली आरोग्यविषयक धोरणे आखतानासुद्धा देशांच्या सीमांचा विचार न करता आरोग्याचे एक वैश्विक धोरण का ठरवू नये ? आपल्याला खरोखरच जागतिक पातळीवरील आरोग्यविषयक धोरणाची आवश्यकता आहे. कोविड प्रतिबंधक लशीच्या बाबतीत आपण अनेक देशांमध्ये ‘वॅक्सिन नॅशनॅलिझम’ अनुभवला आहे. आपल्याला अवघ्या मानवी समूहाचे आरोग्य देश आणि प्रांतांच्या संकुचित सीमारेषांमध्ये बांधून चालणार नाही. एकूणच बदलती आरोग्य परिस्थिती आणि रोज वाटय़ाला येणारी आंतरराष्ट्रीय आणीबाणी पाहता आपल्याला आरोग्याच्या अनुषंगाने एक ग्लोबल धोरण निर्माण करण्याची गरज आहे आणि त्याच धर्तीवर आपल्या देशामध्ये आणि राज्यांमध्ये आरोग्य व्यवस्था अधिक बळकट करण्याची आवश्यकता आहे.

सूक्ष्मजीवांनी दिलेला हा कूट संदेश आपल्याला वाचता येईल हीच अपेक्षा.

लेखक राज्याच्या ‘एकात्मिक रोग सर्वेक्षण कार्यक्रमा’चे  राज्य सर्वेक्षण अधिकारी आहेत.

 dr.pradip.awate@gmail.com