सरकारी नोकरभरतीमुळे राज्याच्या महसुली खर्चात वाढ होते, वेतन आणि निवृत्तिवेतनाची जबाबदारी वाढते, हा युक्तिवाद चुकीचा नसला तरी संबंधित कर्मचारी आपापली कामे करून राज्ययंत्रणा नीट सुरू ठेवतात, या गोष्टीचे महत्त्व कसे नाकारता येईल? देशाला रोजगार हमीसारखी योजना देणार्‍या महाराष्ट्राला सरकारी पदे रिक्त ठेवण्याची आर्थिक आणि सामाजिक किंमत समजू नये, हे राज्याचे दुर्दैव आहे. सरकारी नोकरी म्हणजे केवळ पगारावरचा खर्च नव्हे; ती अर्थव्यवस्थेला गती देणारी आणि नागरिकांपर्यंत राज्यव्यवस्था पोहोचवणारी यंत्रणा आहे.

एमपीएससीसंदर्भातील पुण्यातील आंदोलन आता थांबले असले तरी ते करणार्‍या मुलांकडे पाहताना एक प्रश्न सतत पडत होता. तो म्हणजे ज्या राज्याने रोजगार हा विकासाच्या धोरणाचा भाग मानला, त्याच राज्यात आज रोजगारासाठी परीक्षा देणार्‍या तरुणांना आपले भविष्य सुरक्षित आहे, याची खात्री का वाटू नये? ही परिस्थिती केवळ महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) कारभारातील त्रुटी दाखवणारी नाही. ती राज्याच्या प्रशासकीय क्षमतेविषयी आणि रोजगाराकडे पाहण्याच्या त्याच्या दृष्टिकोनाविषयी मूलभूत प्रश्न उपस्थित करणारी आहे.

औषध निरीक्षक पदाच्या भरती परीक्षेतील पेपरफुटीपासून सुरू झालेला हा प्रश्न आता बराच पुढे गेला आहे. मार्चमध्ये झालेल्या परीक्षेतील गैरप्रकारानंतर ऑगस्टमध्ये भरती प्रक्रिया रद्द करण्यात आली. तोपर्यंत उमेदवार मुलाखतीच्या टप्प्यापर्यंत पोहोचले होते. राज्यसेवा मुख्य परीक्षेसह अन्य परीक्षांच्या वेळापत्रकाबाबतही अनिश्चितता निर्माण झाली. परीक्षांमधील गैरप्रकार, मूल्यमापनाविषयीचे आक्षेप आणि वारंवार होणारे बदल यांमुळे विद्यार्थ्यांचा या व्यवस्थेवरचा विश्वासच उडाला आहे. पण एमपीएससीचा प्रश्न केवळ किती परीक्षा झाल्या, किती रद्द झाल्या किंवा किती पदे भरली गेली, एवढ्यापुरता मर्यादित नाही. या आंदोलनाच्या मुळाशी आहे ती रोजगाराची असुरक्षितता, सामाजिक प्रतिष्ठेची आकांक्षा आणि राज्याच्या व्यवस्थेवरील विश्वासाचा प्रश्न.

ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांसाठी मुलाच्या किंवा मुलीच्या सरकारी नोकरीतून मिळणारे स्थैर्य म्हणजे अनेक वर्षांच्या कष्टांचे फलित असते. शेतीतील अनिश्चित उत्पन्न, वाढता शैक्षणिक खर्च आणि मर्यादित रोजगारसंधी यांच्या पार्श्वभूमीवर ही नोकरी संपूर्ण कुटुंबाच्या भविष्याचे गणित बदलू शकते. त्यामुळे परीक्षेतील अनिश्चितता ही केवळ उमेदवाराची निराशा नसते; ती त्याच्या कुटुंबाच्या आशा-अपेक्षांनाही धक्का देत असते. मात्र या प्रश्नाची आणखी एक बाजू आहे, जिची चर्चा सध्या फारशी होताना दिसत नाही. ती म्हणजे, सरकारी पदे रिक्त राहिल्यामुळे नागरिकांना मिळणार्‍या सेवांवर त्याचा कसा परिणाम होतो?

गावात कोतवालासारखे स्थानिक कर्मचारी, महसूल विभागातील अधिकारी, आरोग्य कर्मचारी किंवा पशुवैद्यकीय सेवा पुरवणारे कर्मचारी पुरेशा संख्येने नसतील, तर त्याचा थेट परिणाम त्या शेतकर्‍याला मिळणार्‍या सेवेवर होतो. पिकांचे नुकसान झाल्यानंतर पंचनाम्यासाठी कोण येणार? सरकारी योजनांची माहिती गावातील शेवटच्या माणसापर्यंत कोण पोहोचवणार? एखादा बैल आजारी पडल्यावर शेतकर्‍याला वेळेत मदत कोण देणार? आरोग्य केंद्रात कर्मचारी नसतील, तर उपचारांसाठी नागरिकांनी किती दूर जायचे? एक साधं उदाहरण घेऊया. गावातील पशुवैद्यकीय अधिकारी जागेवर नसेल, डॉक्टर नसेल, दवाखान्यात योग्य औषधं नसतील तर त्याचा थेट परिणाम तो बैल दगावण्यात होऊ शकतो. गावखेड्यातून, पैसा आणि वेळ खर्च करून आलेल्या  शेतकर्‍याचे मोठे आर्थिक नुकसान होते. आणि हे नुकसान केवळ त्याचे नसून महाराष्ट्राच्या शेतीचे असते!

सरकारी नोकरभरतीच्या चर्चेत पगारावर होणारा खर्च नेहमी पुढे केला जातो. प्रत्येक नियुक्तीमुळे राज्याच्या महसुली खर्चात वाढ होते, वेतन आणि निवृत्तिवेतनाची जबाबदारी वाढते, हा मुद्दा नाकारता येणार नाही. पण महसूल विभागातील कर्मचारी जमिनीच्या नोंदी अद्ययावत ठेवतात, अर्जांवर प्रक्रिया करतात आणि विविध शासकीय योजनांच्या अंमलबजावणीला हातभार लावतात. आरोग्य कर्मचारी आजारांचे निदान आणि उपचार वेळेत होण्यासाठी मदत करतात.

कृषी आणि पशुसंवर्धन विभागातील कर्मचारी शेतकर्‍यांचे पीक आणि पशुधन वाचवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात. अशा सेवांमुळे होणारे नुकसान टळते, कुटुंबांचे उत्पन्न सुरक्षित राहते आणि नागरिकांना सरकारी कामांसाठी वारंवार हेलपाटे मारण्याची वेळ कमी येते. या सगळ्याचे आर्थिक मूल्य असते; ते प्रत्येक वेळी राज्याच्या तिजोरीत जमा होणार्‍या रुपयांत मोजता येत नसले, तरी ते नगण्य ठरत नाही. सरकारी कर्मचार्‍यांच्या वेतनाचा अर्थव्यवस्थेवर होणारा परिणामही लक्षात घ्यायला हवा. पगारातून मिळणारे उत्पन्न अन्न, घर, शिक्षण, वाहतूक आणि इतर वस्तू व सेवांवर खर्च होते. त्यामुळे स्थानिक बाजारपेठांमध्ये मागणी निर्माण होते. त्यातून आर्थिक व्यवहारांना चालना मिळते आणि अप्रत्यक्ष करांच्या माध्यमातून सरकारलाही महसूल मिळत असतो. 

सार्वजनिक खर्चाचा रोजगार आणि आर्थिक उत्पादनावर होणारा परिणाम अभ्यासणार्‍या संशोधनातूनही हा व्यापक मुद्दा अधोरेखित होतो. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (आयएमएफ) सार्वजनिक खर्चावरील संशोधनानुसार, सेवांवरील खर्चाचा रोजगारनिर्मितीशी असलेला संबंध महत्त्वाचा आहे. सेवांचे स्वरूप श्रमप्रधान असल्यामुळे त्यांच्यावरील खर्चातून रोजगाराला चालना मिळू शकते. याचा अर्थ कोणतीही सरकारी नियुक्ती आपोआप फायदेशीर ठरते असा नाही. मात्र आवश्यक सार्वजनिक सेवा देण्यासाठी लागणारे मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याचे आर्थिक औचित्य तपासताना वेतनाच्या खर्चाबरोबरच त्या सेवेचा समाजाला होणारा फायदा आणि रिक्त पदामुळे होणारे नुकसानही मोजले पाहिजे असे हे संशोधन सांगते.

याच ठिकाणी महाराष्ट्राच्या रोजगारविषयक विचाराची आठवण होते. रोजगार हमी योजनेने कामाची गरज आणि रोजगाराचा अधिकार यांना ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या चर्चेच्या केंद्रस्थानी आणले. दुष्काळ, शेतीतील अनिश्चितता आणि ग्रामीण बेरोजगारी यांच्या पार्श्वभूमीवर रोजगार हा केवळ व्यक्तीच्या उत्पन्नाचा प्रश्न नसून अर्थव्यवस्थेला आधार देणारा घटक आहे, हे महाराष्ट्राने देशाला दाखवून दिले. मग सरकारी पदे भरण्याच्या प्रश्नाकडे पाहताना हा आर्थिक दृष्टिकोन कुठे हरवतो? ज्या राज्याने रोजगार हमी योजनेचा विचार दिला, त्या राज्याला सरकारी पदे रिक्त ठेवण्याची आर्थिक किंमत समजू नये, हे राज्याचे दुर्दैव आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या अलीकडील अर्थसंकल्पामध्ये ७५ हजार रिक्त पदे भरण्याचे आश्वासन दिले आहे. ही सरकारने आधीच मंजूर केलेली पदे आहेत, मग त्यांची अंमलबजावणी का केली जाऊ नये हे कळत नाही. कोणत्या विभागात किती मनुष्यबळ आवश्यक आहे, कोणती पदे अत्यावश्यक आहेत, कुठे कामाचे स्वरूप बदलले आहे आणि कुठे नव्या कौशल्यांची गरज आहे, याचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन झाले पाहिजे. पण एखादे पद सार्वजनिक सेवा देण्यासाठी आवश्यक आहे, असे सरकारनेच मान्य केले असेल, तर ते अनिश्चित काळ रिक्त ठेवणे ही केवळ प्रशासकीय दिरंगाई राहत नाही. त्याचा खर्च सरकारच्या ताळेबंदात दिसत नसेल, पण तो नागरिकांच्या वेळेत, पैशांत आणि संधींमध्ये मोजला जातो.

त्यामुळे महाराष्ट्रात किती पदे रिक्त आहेत, याची विभागनिहाय आणि पदनिहाय माहिती नियमितपणे सार्वजनिक केली पाहिजे. पदे किती काळापासून रिक्त आहेत, भरती रखडण्याची कारणे काय आहेत आणि त्यामुळे कोणत्या सेवा प्रभावित होत आहेत, हेही स्पष्ट झाले पाहिजे. मोठ्या प्रकल्पांसाठी, पायाभूत सुविधांसाठी आणि विविध योजनांसाठी निधीची तरतूद करताना सरकारने आवश्यक प्रशासकीय मनुष्यबळासाठी केलेल्या नियोजनाचाही हिशेब द्यायला हवा. वेगवेगळ्या खर्चांची थेट तुलना करता येत नसली, तरी राज्याच्या मूलभूत जबाबदार्‍या पार पाडण्यासाठी पुरेशी क्षमता निर्माण करणे ही सरकारची प्राथमिक जबाबदारी आहे.

याबरोबरच एमपीएससीसारख्या संस्थांची विश्वासार्हता पुनस्र्थापित करणेही आवश्यक आहे. परीक्षांचे वेळापत्रक, मूल्यमापनाची पद्धत, भरतीतील अनियमिततेच्या चौकशीची प्रक्रिया आणि जबाबदारी निश्चित करण्याची यंत्रणा यांत पारदर्शकता असली पाहिजे. आयोगाचे स्वातंत्र्य जपले पाहिजे; पण स्वायत्तता म्हणजे उत्तरदायित्वाचा अभाव नव्हे. राज्य लोकसेवा आयोगाच्या सदस्यांना पदावरून दूर करण्याची घटनात्मक प्रक्रिया अनुच्छेद ३१७ मध्ये स्पष्ट केली आहे. या प्रक्रियेचे पालन करताना आयोगाचे संस्थात्मक स्वातंत्र्य आणि त्याच्या कामकाजाबाबतची सार्वजनिक जबाबदारी या दोन्हींचा समतोल राखणे आवश्यक आहे. राज्याच्या लोकसेवा आयोगाच्या प्रमुखाला काढण्यासाठी राष्ट्रपतींची गरज का लागते, याचा विचारही व्हायला हवा.

महाराष्ट्राने रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून रोजगाराचा आर्थिक आणि सामाजिक अर्थ ओळखला होता. आज त्याच राज्याला रोजगार, सार्वजनिक खर्च आणि प्रशासनाची क्षमता यांच्यातील संबंध पुन्हा समजून घ्यावा लागतो आहे. सरकारी कर्मचार्‍यांचे वेतन हा खर्च आहे; पण आवश्यक कर्मचारी नसल्यामुळे होणारे नुकसानही खर्चच आहे. फरक एवढाच की पहिला खर्च अर्थसंकल्पात दिसतो, तर दुसर्‍याची किंमत नागरिकांना रोज मोजावी लागते!

पुण्यातील आंदोलनात तीन-चार तास विद्यार्थ्यांसमोर उभा राहणारा माणूस असो किंवा गावात आपल्या कामासाठी सरकारी कार्यालयाचे उंबरठे झिजवणारा शेतकरी असो, दोघांचाही प्रश्न अखेरीस एकच आहे : राज्य आपली जबाबदारी पार पाडणार आहे का?

पुण्यात सुरू झालेले आंदोलन अखेर आयोगाच्या अध्यक्षांना दीर्घ रजेवर पाठवून थांबले असले तरी  भरतीच्या अंमलबजावणीतील दिरंगाई सरकारला परवडणारी आहे काय?

सल्लागार, ग्रीनअर्थ सोशल डेव्हलपमेंट कन्सल्टिंग प्रा. लि.

pradnya.shidore@gmail.com