गेल्या काही वर्षांमध्ये मुंबईर्त गणेशोत्सवाच्या आडून आपल्या मंडळाचे वर्चस्व कसे वाढेल याची चुरस लागली आहे. त्याला सुरुवात होते ती उंच आणि हव्या त्या रूपात गणेशमूर्ती घडवून घेण्यापासून. गणेशमूर्ती पाहून भाविकाचे मन प्रसन्न व्हावे असे बहुधा मंडळांना वाटत नसावे. कारण काही मंडळांनी रौद्र रूपातील, विविध देवदेवतांच्या रूपातील गणेशमूर्ती साकारून मूळ रूपाला बगल दिल्यासारखेच वाटू लागले आहे. मुख्य म्हणजे अशा गणेशमूर्ती साकारून मंडळाच्या पापात मूर्तिकारही भागीदार होत आहेत. गणेश कार्यशाळेत घडवलेली गणेशमूर्ती मंडपस्थळी आणण्याची पदाधिकारी, कार्यकर्त्यांना फारच घाई असते. काही मंडळांचे पदाधिकारी तर आपल्या सवडीनुसार देखावा साकारण्याच्या नावाखाली दोन महिने आधीच वाजतगाजत गणेश आगमन मिरवणुका काढतात आणि वाहतुकीचा पूर्ण विचका करून टाकतात. बरं, या आगमन मिरवणुकीच्या वाटेवर रुग्णालये आहेत का याचा विचार करीत नाहीत. फक्त फटाक्यांची आतषबाजी, ढोल ताशाच्या तालावर थिरकत, वाद्य वाजविणार्‍यांवर हजारो रुपयांची उधळण करीत ही मंडळी मंडपस्थळी पोहोचतात.

लालबाग, परळ भागात अनेक रुग्णालये आहेत. त्यामुळे या सर्वांचा रुग्णांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे या भागातील गणेश कार्यशाळा अन्यत्र हलविण्याची मागणी जोर धरू लागली आहे. गेले दोन महिने आठवडाअखेरीस शनिवार-रविवारी काढण्यात येणार्‍या गणेश आगमन मिरवणुकांमुळे होणारी गर्दी, चेंगराचेंगरी, छेडछाडीच्या प्रकारांमुळे लालबाग, परळ भागात महत्त्वाचे काम असले तरी जाण्याचे अनेकजण टाळू लागले आहेत. इतकेच नव्हे तर गेल्या काही वर्षांमध्ये गणेशोत्सवाच्या निमित्ताने पाट पूजन, पाऊल पूजन, मंडप पूजन असेही प्रकार सुरू झाले असून मोठा गाजावाजा करीत कर्णकर्कश्श आवाजात ध्वनिक्षेपकांचा वापर करून ढोल-ताशावर थरकत हे सर्व साजरे होऊ लागले आहे. वृद्ध, रुग्ण यांना होणारा त्रास मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या गावीही नाही.

गणेश चतुर्थीला गणेशाची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर आपल्या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी मोठमोठे कलावंत, उद्योगपती, बडे राजकारणी आदी कसे येतील याकडे पदाधिकार्‍यांचा कल असतो. सर्वासामान्य भाविक अनेक तास रांगेत तिष्ठत राहिला तरी चालेल, पण बड्या मंडळींना तात्काळ दर्शन घडविण्यात, गणेशमूर्तीसमोर सत्कार करण्यात पदाधिकारी, कार्यकर्ते धन्यता मानत आहेत. सर्वसामान्य भाविक दर्शनासाठी आलेच नाहीत, रांगा लागल्याच नाहीत तर कदाचित मोठमोठे कलावंत, उद्योगपती, बडे राजकारणी तेथे फिरकणारही नाहीत, हे त्यांच्या लक्षातही येत नाही.

तासन्तास चालणार्‍या विसर्जन मिरवणुका या मार्गातील रहिवाशांना मेटाकुटीस आणत आहेत. कच्छीबाजा, बेन्जो पार्टी, ढोल-ताशाचा दणदणाट करीत एकामोगामाग रांगेतून विसर्जनस्थळी जाणार्‍या मंडळांच्या गणेश विसर्जन मिरवणुकांमुळे आवाज प्रदूषणामुळे आसपासच्या रहिवाशांना बहिरे झाल्यासारखे वाटू लागले आहे. त्यामुळे विसर्जनस्थळांच्या दिशेने जाणार्‍या मार्गांवर वास्तव्यास असलेले अनेक रहिवासी मुंबईबाहेर पळ काढू लागले आहेत. मंडळांच्या या उच्छादामुळे अनेकांना आर्थिक भुर्दंड सोसून कुठे तरी एक-दोन दिवसांसाठी आसरा घ्यावा लागत आहे.

गेल्या काही वर्षांपासून केंद्रातून प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवर बंदी घालण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. यंदा तर दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही शाडूच्या मातीच्या गणेशमूर्तींची प्राणप्रतिष्ठा करण्याचे आवाहन जनतेला केले. एरवी पंतप्रधानांचा शब्द पडू न देणार्‍यांचाही प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीकडेच कल असल्याचे प्रकर्षाने निदर्शनास आले. दरवर्षी मुंबईत साधारण १२ हजार ५०० सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आणि दोन लाखांहून अधिक घरगुती गणपतींची प्राणप्रतिष्ठा करण्यात येते. त्यापैकी साधारण ७० ते ८० टक्के गणपती प्लास्टर ऑफ पॅरिसने घडविण्यात येतात. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी तर २५-३० फुटांच्या उंच मूर्ती साकारण्यावरच भर दिला आहे. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींचे प्रकरण दरवर्षी न्यायालयात जाते. न्यायालय बंदी घालून कडक भूमिका घेईल असे वाटते, परंतु सरकार कच खाते आणि पुन्हा पहिले पाढे पंचावन्न. मूर्तिकार प्लास्टर ऑफ पॅरिसच्या उंच मूर्ती घडवतात आणि मंडळे त्यांची प्राणप्रतिष्ठा करतात. केवळ राजकीय छत्रछायेमुळे हे सुरू आहे.

काही वर्षांपूर्वी मुंबईतही कानठळ्या बसविणारा डीजेचा धडाका सुरू होता. मात्र न्यायालयाने फटकारताच पोलीस दल सक्रिय झाले. आगमन, विसर्जन वा गणेशोत्सव काळात डीजेचा वापर आढळताच संबंधित मंडळावर कारवाईचा बडगा उगारला जाऊ लागला. डीजेचे साहित्य जप्त करण्यात येऊ लागले. त्यामुळे आजघडीला मुंबईत डीजेचा तुरळक वापर होताना दिसतो, पण पोलीस तात्काळ कारवाईचा बडगा उगारतात. त्यामुळे मुंबईत पुण्यासारखी स्थिती नाही.

एकेकाळी गणेशोत्सवातील सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये कलावंत येत होते. अनेक मुले किशोरवयातच समाजसेवेचे धडे गिरवत होते. कालौघात ही मंडळी समाजकारण, राजकारणात आली आणि चांगले नेते समाजाला मिळाले. परंतु आता स्वयंघोषित नेते मंडळींनी आपापल्या विभागातील गणेशोत्सव मंडळांवर ताबा मिळविला आहे. उत्सवाआडून ही मंडळी शक्तिप्रदर्शन करीत आहेत. परिणामी, उत्सव समाजाचा न राहता ठरावीक मंडळींचा झाल्याचे चित्र आहे. आता केवळ स्वयंघोषित नेतेच नाही, तर प्रसिद्धीलोलुप बड्या कंपन्याही गणेशोत्सवात संधी शोधू लागल्या आहेत. बडे उद्योगसमूह गर्दी होणार्‍या गणेशोत्सवासाठी बक्कळ गंगाजळी देऊ लागले आहेत. यामुळे आता या उत्सवांना सर्वसामान्यांच्या देणगीची अथवा छोट्या-छोट्या जाहिरातींची आवश्यकताच राहिलेली नाही. परंतु एकेकाळी या सर्वसामान्य देणगीदार तसेच छोट्या जाहिरातदारांच्या जिवावर हा उत्सव साजरा केला होता याची मंडळींनी जाणीव ठेवायला हवी. परंतु तसे होताना दिसत नाही. असेच सुरू राहिले तर हा उत्सव सर्वसामान्यांचा न राहता कुणा बड्या उद्योगपतींच्या हाती जाईल आणि मंडळाच्या पदाधिकार्‍यांनाच ‘श्री’चे दर्शन घेण्यासाठी रांगेत उभे राहावे लागेल. एका विशिष्ट हेतूने सार्वजनिक गणेशोत्सव सुरू करणार्‍या लोकमान्यांच्या विचारांची प्रतारणा करणार्‍यांमुळे हा दिवस दूर नसेल.

prasad.ravkar@expressindia.com