डॉ. प्रकाश आमटे
नानाच्या जाण्याची बातमी कानावर आली आणि काही क्षण माझं मन सुन्न झालं. बातमी खरी आहे, हे स्वीकारायला मन तयारच होत नव्हतं. माणसं एक दिवस आपल्याला सोडून जातात, हे आयुष्याचं सत्य आहे. पण काही माणसं अशी असतात की त्यांच्या जाण्याने केवळ एक व्यक्ती जात नाही, तर आपल्या आयुष्यातला एक मोठा कोपरा रिकामा होतो. नाना माझ्यासाठी असाच होता.
नाना पाटेकर आणि माझी पहिली भेट १९८० साली मुंबईत झाली. त्या वेळी मी आणि मंदा हेमलकसा येथे रुग्णालय सुरू केल्यानंतर काही आवश्यक साहित्य घेण्यासाठी मुंबईला गेलो होतो. प्रसिद्ध नाट्यअभिनेते वसंत पोतदार आणि त्यांचे भाऊ आम्हाला भेटायला आले होते. काम आटोपल्यानंतर त्यांनी आम्हाला दादरमधील एका हॉटेलमध्ये जेवायला नेलं. तिथं नाना मित्रांसोबत गप्पा मारत बसला होता. पोतदारांनी त्याला आवाज दिला आणि आमची ओळख करून दिली.
माझ्या कामाबद्दल नानाला आधीपासूनच माहिती होती. भेटताच त्याने मला कडकडून मिठी मारली आणि म्हणाला, ‘हे सगळं सोडून मी हेमलकसाला येतो. मला तुझ्याबरोबर घेऊन चल…’ पहिल्याच भेटीत त्याने असा आपलेपणा दाखवला की आम्ही नुकतेच भेटलो आहोत, असं वाटलेच नाही.
त्यानंतर नाना आनंदवनात आला. आनंदवनातील काम त्याने जवळून पाहिले आणि तेथील वातावरणाशी तो इतका जोडला गेला की त्याने बाबांकडेच इच्छा व्यक्त केली, की मला इथेच राहून काम करायचं आहे. समाजासाठी काहीतरी करावं, माणसांमध्ये राहावं, अशी त्याची मनापासून इच्छा होती. बाबांना नानातील हा भाव जाणवला. पण बाबांनी त्याला त्याच्या कलेची ताकद ओळखून वेगळी वाट दाखवली. समाजातील प्रश्न त्याच्या अभिनयातूनही लोकांपर्यंत पोहोचू शकतात, असा त्यांचा विश्वास होता. नंतरच्या काळात नानाने आपल्या अभिनयातून अनेक सामाजिक प्रश्न लोकांसमोर आणले. पुढे अभिनय क्षेत्रातील स्थिर झाल्यावर त्याने सामाजिक क्षेत्रातही पाऊल ठेवलं.
बाबा आणि नानाचं नातंही पुढं विलक्षण घट्ट झालं. बाबांना भेटल्यावर नाना त्यांच्या खाटेवर बसायचा आणि चित्रपटातील संवाद म्हणून दाखवायचा. बाबाही त्याच्याशी अगदी तो त्यांचा मुलगाच असल्यासारखं बोलायचे. नानानेही बाबांमध्ये केवळ समाजसेवक पाहिला नाही. त्याला त्यांच्यात वडिलांसारखा माणूस दिसला.
नंतर नानाची पत्नी नीलकांती आजारी पडली. उपचारासाठी नाना पत्नी आणि आईला सुमारे चार महिने आनंदवनात घेऊन आला होता. त्या काळात आमचा संबंध आणखी जवळचा झाला. नाना अधूनमधून आनंदवनात येत राहिला. तो तेथील लोकांमध्ये मिसळायचा, गप्पा मारायचा, आनंदवनातील वस्तू विकत घ्यायचा. प्रसिद्धीपासून दूर सामान्य माणसांमध्ये तो ज्या सहजपणे वावरायचा, ते पाहून मला नेहमीच त्याचं कौतुक वाटायचं.
१९८२ साली नाना पहिल्यांदा हेमलकसाला आला. त्या वेळी हेमलकसा आजच्यासारखं नव्हतं. रस्ते नव्हते, सुविधा नव्हत्या. जंगल आणि छोटंसं रुग्णालय एवढंच आमचं जग. पण नानाने ते जग मनापासून स्वीकारलं.
२०१२ मध्ये माझ्या आयुष्यावर ‘प्रकाश बाबा आमटे : द रिअल हिरो’ हा चित्रपट करण्याचं ठरल. माझी भूमिका नाना करणार होता. त्या चित्रीकरणासाठी तो जवळपास महिनाभर हेमलकसात राहिला. पण तो पाहुण्यासारखा कधीच वावरला नाही. तो आमच्या घरातल्या कामांमध्ये सहज सहभागी व्हायचा. स्वयंपाकघराचा ताबा घेऊन त्याने आम्हाला अनेक पदार्थ बनवून खाऊ घातले. सगळे एकत्र बसलो की त्याच्या विनोदांनी आणि किस्स्यांनी वातावरणात हशा पिकायचा. त्या साध्या क्षणांमध्ये प्रसिद्ध अभिनेता नाना कुठेच नसायचा; आमच्याबरोबर घरातलाच एक माणूस बसलेला असायचा.
त्याने माझं काम आधीपासून पाहिलेलं असल्यामुळे त्याला या भूमिकेसाठी वेगळं काही बघण्याची, शिकण्याची गरजच नव्हती. माझं आयुष्य, जंगल, आदिवासींचे प्रश्न आणि प्राण्यांशी आमचं नातं हे सगळं त्याने जवळून अनुभवलं होतं. चित्रीकरण संपल्यानंतर तो निघाला तेव्हा त्याने ज्या खोलीत मुक्काम केला होता, तिच्याकडे पाहून मला म्हणाला, ही खोली माझ्यासाठी कायम ठेव. मी पुन्हा येणार आहे. पुढच्या वेळी आलो की मला याच खोलीत राहायचं आहे. ही खोली कुणाला देऊ नकोस.
त्या वेळी त्याचं बोलणं ऐकून मीही सहज हसलो. नाना पुन्हा येईल, गप्पा होतील, जेवण होईल, हेमलकसाच्या रात्री पुन्हा त्याच्या आवाजाने भरून जातील, असंच वाटलं होतं. आता ती खोली पाहताना मन भरून येतं आहे.
मला ब्लड कॅन्सर झाल्याचं कळल्यानंतर नाना तळमळीने मला भेटण्यासाठी पुण्यातील रुग्णालयात आला. आमची ती शेवटची प्रत्यक्ष भेट ठरली. त्यानंतर वाढदिवशी फोनवर बोलत, एकमेकांना शुभेच्छा देत आम्ही कायम संपर्कात होतो. वरचेवर भेटी व्हायच्या नाहीत, पण आमच्यातील जिव्हाळा कधी कमी झाला नाही.
आज नानाची आठवण काढताना मला अभिनेता नाना आठवत नाही. मला आठवतो तो पहिल्या भेटीत मला मिठी मारून ‘मला हेमलकसाला घेऊन चल’ म्हणणारा नाना. आनंदवनात राहून काम करण्याची इच्छा व्यक्त करणारा नाना. आमच्या घरी आल्यावर स्वयंपाकघरात येऊन गप्पा मारणारा, सगळ्यांसोबत जेवणारा नाना. बाबांच्या खाटेवर बसून संवाद म्हणणारा नाना. आणि हेमलकसातून जाताना ‘ही खोली माझ्यासाठी ठेव’ असं सांगणारा नाना. माणूस शरीराने निघून जातो, पण त्याच्यासोबत जगलेला काळ कुठे जात नाही. नानासोबतच्या माझ्या आठवणी आनंदवनात आहेत, हेमलकसात आहेत, त्या खोलीत आहेत आणि माझ्या मनात आहेत. त्यामुळे नानाला निरोप हा शब्दच माझ्या मनाला मान्य होत नाही. आपल्या माणसांना आपण निरोप देत नाही. ती फक्त दिसेनाशी होतात. एखाद्या आठवणीच्या वळणावर ती पुन्हा भेटतात.
नाना, तू माझ्या आयुष्यातला केवळ एक परिचित किंवा मित्र नव्हतास. तू आमच्या कुटुंबातलाच होतास. आणि म्हणूनच तू गेला असलास तरी माझ्या आयुष्यातून कधीच जाणार नाहीस.
डॉ. प्रकाश आमटे, ज्येष्ठ समाजसेवक
