नीना कुळकर्णी
‘हमीदाबाईची कोठी’ या पहिल्या व्यावसायिक नाटकापासून माझी आणि नानाची मैत्री जुळली. विजयाबाई मेहता यांच्या या नाटकात आम्ही बहीण-भावाच्या भूमिकेत होतो. या नाटकानंतर आम्ही ‘महासागर’ नाटक केले, ज्यात आम्ही पती-पत्नीच्या भूमिकेत होतो. विजयाबाईंच्या सगळ्याच विद्यार्थ्यांच्या बाबतीत असे होते. एकाच कुटुंबाचे सदस्य असल्यासारखे सगळे मिळून मिसळून राहात. या गणेशोत्सवादरम्यान मी नेमकी त्याचवेळी अमेरिकेतून आले होते आणि लंडनला जाण्याच्या गडबडीत असल्याने त्याच्याकडे जाता आले नाही… आणि आज त्याच्या जाण्याची वार्ता कानावर पडली… हे असे घडू शकत नाही, पण त्याची मैत्रीण म्हणून असे वाटते की त्याला त्याचा मृत्यू कसा असेल, हे निवडण्याची संधी मिळाली असती तर तो असाच चटकन निघून गेला असता.
शेवटचे आम्ही भेटलो ते विजयाबाई गेल्यानंतर… त्यावेळी तो म्हणाला होता की काहीही झाले तरी आपल्यातले हे सौहार्द, मैत्रीचे नाते कायम जपले गेले पाहिजे. त्यावेळच्या नाटकांमध्ये कलाकारांचे संबंध हे घनिष्टच असायचे, आजन्म मैत्री व्हायची. मी, भारती आचरेकर आणि नाना पाटेकर हे आमचे मैत्रीचे त्रिकूट होते. एकाशिवाय दुसर्याचा विचारच आम्हाला कधी जमला नाही. नानाचे फार्महाऊस पाहिले आणि खरेच आनंदाने मन भरून आले. त्याने जे जे कमावले ते मुक्तहस्ताने इतरांना दिले. ‘नाम’च्या माध्यमातून शेतकर्यांसाठी काय काय गोष्टी करायच्या आहेत, कितीतरी लोकांसाठी काय काय करायचे आहे, ही त्याची कायम धडपड होती. नानाच्या मनात सेवाभावना होती, त्याच्या मनात ते विचार यायचे, पहाडाएवढा मोठा माणूस होता तो…
पन्नास वर्षांची आमची मैत्री. भांडणाचे प्रसंगही आलेच… कारण, नाना काही तसा सोपा माणूस नव्हता. आपल्या मुद्द्यांच्या, विचारांच्या बाबतीत आग्रही होता. नाना मला पन्नास वर्षांपूर्वी पहिल्या दिवशी जसा भेटला तसाच तो शेवटपर्यंत कायम होता. त्याचा अहंकार वाढत गेला, वगैरे असे त्याच्याविषयी बोलले जाऊ लागले, पण ते खरे नाही. तर्हेवाईकपणा हा पहिल्यापासून त्याच्या स्वभावाचा भाग होता, त्याला मिळालेल्या यशामुळे तो बदलला असे काही झाले नाही. पण, त्याच्या मनातला हळवेपणा आम्हाला दिसला आणि त्यामुळे आमची मैत्री अधिक घट्ट झाली. विजयाबाईंचाही तो अत्यंत लाडका शिष्य होता. तो, मी आणि भारती आम्ही तिघांनी मिळून ‘हमीदाबाईची कोठी’, ‘महासागर’ या नाटकांच्या निमित्ताने एकत्र होतो. जवळपास हजाराहून अधिक प्रयोग झाले त्या नाटकाचे… खूप दौरे असायचे. दिवसच्या दिवस एकत्र असायचो. बाहेर काही सोयी नसायच्या, त्यामुळे मला, भारती आणि विजयाबाईंना तो खूप जपायचा. कोणी आगाऊपणा करून आम्हाला त्रास देऊ नये, यासाठी तो सतत काळजी घ्यायचा.
अभिनेता म्हणून त्याची एक शैली होती, त्या पद्धतीने तो करत गेला आणि त्याला यश मिळत गेले. ‘नाम फाऊंडेशन’च्या माध्यमातून त्याने शेतकर्यांसाठी जे काम केले, दुष्काळग्रस्तांसाठी लाखो रुपयांची मदत केली हे खूप मोठे काम आहे. आज त्याचा मुलगा मल्हार ते काम सांभाळतो आहे. माटुंग्याला त्याच्या छोट्याशा घरात तो गणपती आणायचा. त्या घरी गणपतीच्या दर्शनासाठी रांगच लागायची. त्याची आई आल्या गेल्याला पोटभर खाऊ घालायची. सतत त्याच्याकडे माणसांचा राबताच असायचा. नानाकडे गणपतीला आम्ही गेलो नाही, असे कधीही व्हायचे नाही. यावर्षी त्याने आवर्जून मला बोलावले आणि जाता आले नाही… तो असा निघून जाईल, असे वाटलेच नव्हते. कधी तो आजारी नव्हता, त्याच्या फार्महाऊसमध्ये त्याने जिमही केली होती, फिटनेससाठीही तो मेहनत घ्यायचा. त्याच्या कलाकार म्हणून करायच्या खूप सार्या गोष्टी राहून गेल्या. आम्ही सगळी सुखदु:खे एकत्र अनुभवली. माझ्या वैयक्तिक कठीण क्षणातही तो माझ्याबरोबर होता. दिलीपबरोबर त्याने काम केले होते, त्यामुळे तो गेला तेव्हा मी तुला भेटायला येणार नाही, तुझा रडका चेहरा मला पाहायचा नाही, असे नाना म्हणाला तेव्हा दु:ख झाले होते. पण, आज तो असे का म्हणाला होता हे लक्षात येते. नाना नारळासारखा होता… वरून टणक वाटणारा पण, आतून अतीव माया त्याच्या मनात असायची. कोणी गेले तर त्याच्या डोळ्यात पाणी यायचे. तो कधीही खोटे बोलला नाही, त्याला कधीही कोणाचा हेवा वाटायचा नाही. त्यामुळे कधी हे तुला नीट जमलेले नाही किंवा हे नको असे त्याने म्हटले तर तो म्हणतो आहे म्हणजे नक्कीच त्यात काहीतरी अर्थ आहे, हा विश्वास मनात असायचा. तो कधीही रात्री फोन करून कविता ऐकव, गझलचा गाऊन दाखव, असं करत राहायचा. संयमाने त्याचे ऐकून घेणारे कोणीतरी त्याला हवे असायचे. नटाला सतत नवीन काहीतरी करायची उत्सुकता असते, ती त्याच्याकडेही भरभरून होती.
विजयाबाईंना अखेरच्या प्रवासासाठी नेताना आम्ही तिघेही बाईंबरोबर रुग्णवाहिकेत होतो. तो क्षण माझ्यासाठी खूप अविस्मरणीय आहे. आपल्या गुरूला त्याच्या अखेरच्या इहलोकाच्या प्रवासाला जायच्या क्षणात साथ करणे यासारखे भाग्य नाही, असे मला वाटते. आणि त्यावेळी आम्ही तिघांनी तो एकत्र अनुभवला याचे समाधान वाटते.
नीना कुळकर्णी, ज्येष्ठ अभिनेत्री
