‘सगळ्या गर्दीतही आपण कुठेतरी एकटेच असतो. ते एकटेपण नकळत कागदावर उमटत जाते. नाटक करतो, पण ते शब्द दुसर्‍याचे असतात. सद्य: परिस्थितीवर आपण भाष्य करत असतो, परिस्थिती अनुभवत असतो. त्यातून डोक्यात होणार्‍या कल्लोळाचा निचरा होणे आवश्यक असते. साठलेले रिते होते आणि कविता उमटत जाते. आपल्या भवतालानुसार कविता बदलत जाते. रंगमंच हे आम्हा कलाकारांचे राज्य असते. व्यक्त होण्यासाठी आम्ही इथे येतो. प्रेक्षागृहातील अंधारात आम्ही आमचे सुख शोधत असतो. प्रेक्षक दिसत नाहीत, पण त्यांचे असणे हे आमच्या अस्तित्वाचे खरे कारण आहे..’ अशा विवेचनानंतर नानांच्या धीरगंभीर आवाजात शब्द उमटू लागले…

कळेच ना असं का होतं?

खूप त्रास देतात आठवणी

म्हणून ठेवल्या पावसात

म्हटलं जातील वाहून..

गावाला समुद्र किनारी सापडल्या

या आठवणींची विल्हेवाट

लावता नाही येत

वावटळ होऊन सगळं

अस्ताव्यस्त करतात

कायद्याने बंदी घालायली

हवी यांच्यावर

दोन हजारांच्या नोटेसारखी

चलनातून बाद, मग

किंमत शून्य

आठवणींनासुद्धा..

पण होत नाही ना तसं

सगळं गमावून उरलेलं हे संचित…

आठवणी भेडसावतात

काही आठवणींना शिंगं आहेत, काहींना सुळे आहेत

काही खारकुंडीसारख्या चोंबड्या…

आल्या आल्या गेल्या गेल्या

काही बैदुलात लपलेल्या नक्षीसारख्या

ओल्या-सुक्या, आंबट-गोड…

सरसकट ठेवल्या सगळ्या पावसात

आणि उंबर्‍यावर बसून पाहात होतो

वाटलं… सरल्या,

पण पुढल्या वळणावर पुन्हा हजर

विसरायचं म्हणून पुन्हा तेच

कितीवेळा आठवायचं?

रोज एक गोळी जेवल्यावर, असं सांगून

मोठी बाटली दिली आहे डॉक्टर मित्राने,

डोक शांत होण्यासाठी..

ती गोळी घ्यायला लागल्यापासून

फरक पडलाय बर्‍यापैकी

आता आठवणी अलगद येतात…

हलक्या पावलानं

आदळ आपट कमी झाल्येय..

प्रश्न पडतो… माझ्याच आहेत का…

परक्या वाटतात…

मी लांबूनच सावत्र नजरेनं

पाहतो त्यांच्याकडे

डॉक्टर मित्राला सांगितलं तर म्हणाला, छान…

गुण येतोय, परक्याच वाटल्या पाहिजेत.

आपल्यांचा त्रास होतो, परक्यांचा नाही

हळूहळू होशील बरा…

अरे… मी काय आजारी आहे का गाढवा

काय आजार आहे मला?

तुला तू आजारी वाटत नाहीस, हाच आजार आहे तुला

मी या डॉक्टर मित्रावर फुली मारली आहे.

कॉपी करून पास झाला असणार…

आठवणींबरोबर यालासुद्धा ठेवले पाहिजे पावसात…

चिरगुट झालं पाण्यात की-

पाण्यावरनं आठवलं…

गावात मी आणि आई समुद्राकडे पाहात पकटीवर बसलो होतो.

मी पाच-सहा वर्षांचा असेन… दुसरीत…

संध्याकाळ…

घरी जाणार्‍या पक्ष्यांनी आभाळाला लांबलचक शिवण घातली होती.

रसरसलेला सूर्य… घरी निघालेला… समुद्राला टेकणारच होता…

तेवढ्यात आई म्हणाली…

आता बघ चर्र होईल…

सूर्य पाण्याला झिमटला, पण चर्र झालं नाही..

आईने विचारलं, ऐकलंस?

मी नाही म्हणून मान हलवली…

मी ऐकलं… लाटांच्या भांडणात तुझं हुकलं…

उद्या पुन्हा ऐक…

नंतर खूपवेळा त्या चर्रसाठी समुद्राकाठी बसलो…

पण… नाहीच

आईला ऐकू आलेलं मला का नाही ऐकू आलं?

आई गेली तेव्हा चर्र झालं…

मला वाटलं सूर्य बुडला…

मी बाहेर धावलो…

सूर्य माथ्यावर होता.

त्या दिवशीचा चर्र कानात गोठलाय…

त्या आवाजासाठी सूर्य बुडावा लागत नाही…

हल्ली समुद्राचा काठ इथेच राहायला आलाय… माझ्यापाशी

मला हे सगळं विसरायचंय…

फुली खोडून मी डॉक्टर मित्राला फोन केला…

सूर्य रोज का उगवतोय?

थांबवण्यासाठी काही करता येईल का?

म्हणाला… बघतो बोलून

लवकर… मी म्हणालो…

बरं…

फोन ठेवता ठेवता म्हणाला,

सकाळीपण एक गोळी सुरू कर…

आता मी पुन्हा त्याच्यावर

फुली मारली आहे…

कळेच ना असं का होतं?

खूप लोक यायचे इथं माझ्याकडे

बघता बघता निघून जायचे…

मी पाहात राहायचो…

कधीही यायचे- सकाळ, दुपार, रात्री… वेळी अवेळी

आणि निघून जायचे

मी का जागत बसायचो यांच्यासाठी?

कुणीतरी थांबेल…

कुणीच नाही.

जेवढा वेळ असायचे, तेही अनोळखी असल्यासारखे…

एक दिवस चुकून मी आरशात पाहिलं…

आणि हसत स्वत:ला म्हणालो,

अरे, तू स्टेशन आहेस… घर नाही.

इथं कसं कोण थांबेल तुझ्यासाठी?

माझी चूक सुधारली आहे…

आता सगळ्यांच्या जाण्याची मी वाट पाहतो…

काहीशा गूढतेतून सुरू झालेल्या नानांबरोबरील शब्दमैफलीचा शेवट मात्र ‘रुमानी’ झाला.