प्रमोद (पी.डी.) देशपांडे
केशवसुत आणि बा. सी. मर्देकर यांच्यानंतर आधुनिक मराठी कवितेला महत्त्वाचे वळण देणारे कवी म्हणजे नारायण सुर्वे. जात, धर्म, पंथ आणि प्रांताच्या सीमा ओलांडून त्यांच्या कवितेच्या गाभ्याशी केवळ ‘माणूस’ उभा आहे. दिगंबर पाध्ये यांच्या मते मानवी मूल्ये, मानवी संवेदना आणि निखळ मानवतावाद हाच या कवितेचा आत्मा आहे. स्पष्ट भूमिका, धारदार नजर आणि सामान्यांविषयीचा तीव्र कळवळा ही तिची वैशिष्ट्ये. सूर्यप्रकाश जसा अंधार दूर करून नव्या पहाटेची आशा देतो, तशी ही कविता संघर्षातून प्रकाशाची वाट दाखवते. म्हणूनच डॉ. रणधीर शिंदे यांनी तिला ‘सूर्योमुखी’ आणि ‘सूर्यकेंद्री’ म्हटले आहे.

अनाथपणातून मिळालेली माय

जन्मदात्या आईने सोडून दिल्यामुळे सुर्वे यांच्या वाट्याला अनाथपण येणार होते. पण एका गिरणी कामगार कुटुंबाने त्यांना दत्तक घेतले. काशीबाई त्यांची आई झाली आणि त्यांना ‘नारायण गंगाराम सुर्वे’ हे नाव मिळाले. वडील इंडिया युनायटेड मिलमध्ये, तर आई कमला मिलमध्ये काम करत होती. अनाथ म्हणून जीवनाची सुरुवात झाल्याची वेदना त्यांना कायम अस्वस्थ करत राहिली, पण पोटच्या मुलासारखे वाढवणाऱ्या काशीबाईबद्दलची कृतज्ञताही तितकीच होती. जन्मदेइतकीच, किंबहुना अधिक महत्त्वाची, माणूस म्हणून घडवणारी माय असते, असे त्यांनी म्हटले आहे.

गिरणगावाची पाठशाळा

गिरणगाव आणि तिथली कामगारवस्ती हीच त्यांची पहिली पाठशाळा ठरली. पुढे मुंबई महापालिकेत चतुर्थ श्रेणी कर्मचारी असतानाचे त्यांचे सहकारी खान यांच्याकडून ते उर्दू शिकले. खेतवाडीतील प्रगत साहित्यसभेचे संस्कारही त्यांच्यावर झाले. अल्प शिक्षण आणि स्वतःच्या जात-धर्माची माहिती नसतानाही त्यांनी ‘माणूस’ हीच एक जात मानली. कष्टकरी, बहुभाषिक, शोषित कामगारांचे लढाऊ जीवन आणि त्यांचे ऐक्य त्यांनी जवळून अनुभवले. त्यांच्यातला कवी याच वातावरणात आकार घेत गेला.

स्वातंत्र्यलढा, कामगार संघटना, संप आणि आठ तासांच्या दिवसाचा लढा यांच्या सान्निध्यात सुर्वे घडले. कामगारवर्गात जात-धर्म नसतो, फक्त वर्ग असतो, ही जाणीव त्यांना तिथेच मिळाली. पुढे ते कम्युनिस्ट चळवळ आणि मार्क्सवादी विचारसरणीकडे वळले. जगाकडे पाहण्याचा हा ‘वैज्ञानिक दृष्टिकोन’ म्हणजे आपला ‘तिसरा डोळा’ आहे, अशी त्यांची धारणा होती. संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि अण्णाभाऊ साठे, अमर शेख, गवाणकर यांच्या शाहिरीचाही त्यांच्यावर खोल प्रभाव पडला.

प्रभावाखाली असले तरीही ते पोथीनिष्ठेत अडकले नाहीत. माणसाच्या आणि कलेच्या स्वातंत्र्यावर बंधने आली, तर त्यांचा पक्ष नेहमी या स्वातंत्र्याचाच राहिला. म्हणूनच डाव्या चळवळीची उणीवही त्यांनी अचूक टिपली. कार्यकर्त्यांच्या सांस्कृतिक पोषणाकडे चळवळीचे दुर्लक्ष झाले आणि संतसाहित्य व आधुनिक साहित्याच्या वारशाशी ती जोडली गेली नाही, ही खंत त्यांनी आपल्या लेखनातून नोंदवली.

स्वतःच्या वाटेचा शोध

केवळ जगणे पुरेसे नाही, काहीतरी बदलण्याची किंवा निर्माण करण्याची अस्वस्थता असते तेच खरे कार्यकर्ते अन् तेच खरे कलाकारही, असे सुर्वे मानत. या अस्वस्थतेतून ते लेखनाकडे वळले. कथालेखन, हिंदी कथांचे अनुवाद आणि वर्तमानपत्रांना पत्रे, अशा मार्गांनी त्यांनी आपली क्षमता आजमावली. औपचारिक शिक्षण नसले तरी जनचळवळीतील अनुभव आणि स्वयंअध्ययन हेच त्यांचे शिक्षण होते. पुस्तकांपेक्षा प्रत्यक्ष जीवन हेच त्यांचे विद्यापीठ.

उमेदवारीच्या काळात मढेकर, कुसुमाग्रज, मुक्तिबोध आणि विंदा करंदीकर त्यांना जवळचे वाटले, पण त्यांचे जग वेगळे असल्याने समाधान झाले नाही. उर्दू-हिंदी कविता त्यांनी अधिक वाचल्या. फैज, मजाज, सरदार जाफरी यांच्या कवितेतील तरल सामजिक संवेदना त्यांना भावली, पण तिथेही ते फारसे रमले नाहीत. त्यांना कवितेत हवा होता स्वतःच्या मेहनतीच्या घामाचा वास. म्हणून कोणाचाही प्रभाव न घेता त्यांनी निष्ठेने स्वतःची वाट शोधली.

कवितेचा प्रवास

१५ ऑक्टोबर १९२६ ते १६ ऑगस्ट २०१० असे ८४ वर्षांचे आयुष्य लाभलेल्या सुर्वे यांनी १९५६ पासून, वयाच्या तिशीत, कविता लिहिण्यास सुरुवात केली. स्त्रियांच्या दुःखाचा वेध घेणारे ‘डोंगरी शेत’ हे त्यांचे पहिले गीत घराघरांत पोहोचले. त्यासाठी त्यांना मिळाले अवघे पंधरा रुपये मानधन. पुढे ‘गिरणीची लावणी’, ‘महाराष्ट्राच्या नावानं’ अशी पंधरा-वीस गीते त्यांनी लिहिली.

तेव्हाच्या मराठी कवितेत एका बाजूला मुक्त शैलीची नवकविता होती, तर दुसरीकडे हळुवार सौंदर्यवादी कविता. सुर्त्यांनी दोन्हींपेक्षा वेगळा रस्ता काढला. तो ‘ऐसा गा मी ब्रह्म’ (१९६२) मधून दिसला आणि ‘माझे विद्यापीठ’ (१९६६) मधून ठळक झाला. ७२ ओळींची ‘माझे विद्यापीठ’ लिहिताना वर्षभर दमछाक झाली आणि नंतर सहा महिने त्यांना काहीच लिहिता आले नाही. या कवितेचा शेवटचा बंध त्यांना आधी सुचला, प्रारंभ नंतर. केशव मेश्राम यांच्यामार्फत ती राम पटवर्धनांपर्यंत पोहोचली आणि ‘सत्यकथा’त त्यांच्या कविता नियमित प्रसिद्ध होऊ लागल्या. सुरुवातीच्या काळात त्यांना शिरीष पै व कुसुमाग्रज यांचेही प्रोत्साहन लाभले.

आधुनिक मराठी कविता प्रामुख्याने मध्यमवर्गाची भाषा बोलत होती. सुर्वे यांनी आपल्या वर्गाची भाषा आणि अनुभव मांडला. वैयक्तिकतेत कुढत न बसता ‘जाहीरनामा’ (१९७५) मध्ये ते आपल्या काळाला आणि त्याच्या दुःखाला हाक देतात.‘नव्या माणसाचे आगमन’ (१९९५) हा त्यांचा चौथा आणि अखेरचा संग्रह, तर ‘सर्व सुर्वे’ (२०११) मध्ये त्यांच्या सर्व १४५ कविता ग्रथित झाल्या आहेत. संख्यात्मक दृष्टीने कविता कमी असल्या, तरी त्यात शिगोशिग भरलेल्या गुणवत्तेने त्यांना अभूतपूर्व लौकिक मिळाला. १९९५ मध्ये परभणी येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून ते घसघशीत मतांनी निवडून आले.

कवितेविषयीची भूमिका

कामगार, शिगवाला, भडक्यात होरपळणारी स्त्री अशी सामान्य माणसे त्यांच्या कवितेचे नायक आहेत. जातीयता, धार्मिक भेदाभेद, अंधश्रद्धा आणि शोषणाची चौकट फोडण्याची गरज त्यांनी मांडली. ‘भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बरबाद झाली’ किंवा ‘कधी विचार असे येतात, जसे थकून यावेत तिसऱ्या पाळीचे कामगार घरात’ अशा स्वानुभवातील प्रतिमा त्यांच्या काव्यात आल्या आहेत.

लयतत्त्वाचा त्यांनी फारसा विचार केला नाही. लिहीत गेल्यावर लय येते, असे ते म्हणत. कविता ही चटकन द्यायची प्रतिक्रिया नव्हे, ती कवीची प्रकृती असावी लागते. निर्मितीची प्रक्रिया गर्भधारणेसारखी कष्टसाध्य पण आनंददायी आहे. कला म्हणजे जीवनाच्या भट्टीतून तयार झालेले सत्य, आणि केवळ घोषणा किंवा लादलेले मत कवितेला पोकळ करते. स्वतःच ते आपले पहिले समीक्षक आणि संपादक होते. लिहिलेले वारंवार वाचणे आणि असमाधान वाटल्यास फाडून पुन्हा लिहिणे, या शिस्तीतून त्यांचे लेखन बावनकशी झाले.

सुर्वे यांची कविता स्व-बचावासाठी नाही, ती स्वयंभू आहे. नव्या कालखंडाला सामोरे जाताना ‘मान उंच करून चालण्याइतके धैर्य’ वास्तवाने आणि कवितेने दिले आहे, असे ते म्हणत. शताब्दीच्या उंबरठ्यावर ही ‘सूर्यलोकाची सनद’ आजही तितकीच तेजस्वी आणि मार्गदर्शक आहे.

प्रमोद (पी.डी.) देशपांडे

(लेखक, बहुभाषी अनुवादक आणि ‘भाषाबंध फाउंडेशन’ या सांस्कृतिक संस्थेचे अध्यक्ष)

 peedeedeshpande@gmail.com