अथर्व पाठक
सध्या सुरू असलेल्या‘आर्टेमिस-२’ मोहिमेची प्राथमिक माहिती प्रत्येक मानवाला हवीच; पण भावी काळातल्या ‘आर्टेमिस-३’ बद्दल उत्सुकताही हवी… कारण या मोहिमा चंद्रावर केवळ पाऊल न ठेवता चंद्रावरून मंगळाकडे झेपावण्यासाठी तळ उभारणे, चंद्रावर कायमची वस्ती शक्य करणे आदी मानवी आकांक्षांना प्रत्यक्षात आणू शकतात!
मानवी इतिहासात २० जुलै १९६९ हा दिवस सुवर्णाक्षरांनी लिहिला गेला आहे. याच दिवशी नील आर्मस्ट्राँगने चंद्राच्या धुळीवर आपले पहिले पाऊल ठेवले आणि जगभरातील कोट्यवधी डोळ्यांनी एकच स्वप्न पाहिले-अंतराळात मानवी वस्तीचे. मात्र, १९७२ च्या ‘अपोलो १७’ मोहिमेनंतर चंद्रावरील मानवी मोहिमांना जणू पूर्णविराम मिळाला. गेल्या पाच दशकांपासून आपण चंद्राकडे फक्त पृथ्वीचा उपग्रह म्हणून पाहात होतो. पण आता परिस्थिती बदलली आहे. अमेरिकेची ‘नासा’ (नॅशनल एरोनॉटिक्स ॲण्ड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन) ही अंतराळ संस्था अत्यंत महत्त्वाकांक्षी ‘आर्टेमिस’ मोहिमेद्वारे पुन्हा एकदा चंद्रावर मानवी पाऊलखुणा उमटवण्यासाठी सज्ज झाली आहे. यावेळी आपण तिथे फक्त ‘भेट देऊन परत येणार’ नाही, तर तिथे कायमस्वरूपी वास्तव्य करण्याचा पाया रचणार आहोत.
‘अपोलो’च्या पुढे!
ग्रीक पौराणिक कथांनुसार ‘आर्टेमिस’ ही चंद्राची देवी आणि ‘अपोलो’ची जुळी बहीण मानली जाते. नासाने या मोहिमेला दिलेले नावच खूप काही सांगून जाते. ‘अपोलो’ मोहिमेचा उद्देश हा शीतयुद्धाच्या काळात आपली ताकद सिद्ध करणे आणि चंद्रावर पोहोचणे हा होता. परंतु ‘आर्टेमिस’ ही मोहीम पूर्णपणे वैज्ञानिक प्रगती आणि भविष्यातील अंतराळ प्रवासावर आधारित आहे. या मोहिमेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर (साऊथ पोल) मानवाला उतरवण्याचे नियोजन. आजवरच्या बहुतेक मोहिमा चंद्राच्या विषुववृत्तीय भागावर झाल्या आहेत, मात्र दक्षिण ध्रुव हा भाग आजही गूढ आणि आव्हानात्मक आहे.
मोहिमेचे उद्दिष्ट: चंद्र ते मंगळ
नासाचे शास्त्रज्ञ सांगतात की, चंद्रावर पुन्हा जाण्याचे कारण केवळ पर्यटन किंवा इतिहास पुन्हा जगणे हे नाही. चंद्राला आपण मंगळ ग्रहावर जाण्यासाठीचा एक महत्त्वाचा पडाव किंवा तळ- ‘लॉन्च पॅड’ किंवा ‘बेस कॅम्प’ – बनवणार आहोत. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील खोल आणि अंधार्या विवरांमध्ये अब्जावधी वर्षांपासून बर्फाच्या स्वरूपात पाणी गोळा झालेले आहे. मानवाला त्याचा वापर करता आला, तर त्यापासून पिण्याचे पाणी, श्वास घेण्यासाठी ऑक्सिजन आणि रॉकेटसाठी हायड्रोजन इंधन तयार करता येईल. थोडक्यात, पृथ्वीवरून इंधन नेण्याऐवजी आपण चंद्रावरच ‘फ्युएल स्टेशन’ उभारू शकू. याच इंधनाच्या जोरावर मानव, मंगळ ग्रहाच्या मोहिमेचे स्वप्न पूर्ण करू शकेल.
कोणतीही मोहीम ही त्यातील मानवी जिद्दीमुळे मोठी होते. ‘आर्टेमिस-२’ ही या मालिकेतील पहिली मानवी मोहीम असेल, ज्यामध्ये चार अंतराळवीर चंद्राच्या कक्षेची प्रदक्षिणा करून परततील. या चार व्यक्ती केवळ अंतराळवीर नसून ते बदलत्या जगाचे आणि सर्वसमावेशकतेचे प्रतीक आहेत:
रीड वाइझमन (कमांडर): अमेरिकन नौदलातील प्रदीर्घ अनुभव असलेले वाइझमन या मोहिमेचे नेतृत्व करतील. शांत डोक्याने कठीण निर्णय घेण्याची त्यांची क्षमता या मोहिमेसाठी महत्त्वाची आहे.
व्हिक्टर ग्लोव्हर (पायलट): अंतराळात दीर्घकाळ राहणारे पहिले आफ्रिकन-अमेरिकन व्यक्ती म्हणून त्यांचा लौकिक आहे. ‘आर्टेमिस’मुळे चंद्राच्या इतक्या जवळ जाणारे पहिले कृष्णवर्णीय ठरणार आहेत.
ख्रिस्टीना कोच (मिशन स्पेशालिस्ट): महिला शक्तीचे प्रतीक असलेल्या ख्रिस्टीना यांनी अंतराळात ३२८ दिवस राहण्याचा विक्रम केला आहे. चंद्रावर पाऊल ठेवणारी ‘पहिली महिला’ होण्याचा मान या मोहिमेमुळे त्यांना मिळणार असून क्रिस्टिना जगातील करोडो मुलींसाठी प्रेरणादायी ठरेल.
जेरेमी हॅन्सन (मिशन स्पेशालिस्ट): कॅनडाचे प्रतिनिधित्व करणारे हॅन्सन हे या मोहिमेची जागतिकता अधोरेखित करतात. अंतराळ संशोधन हे आता एका देशापुरते मर्यादित राहिलेले नाही, हेच यातून स्पष्ट होते.
‘एसएलएस’ रॉकेट आणि ओरायन यान
या अवाढव्य मोहिमेसाठी नासाने ‘स्पेस लॉन्च सिस्टिम’ (एसएलएस) हे जगातील सर्वात शक्तिशाली रॉकेट विकसित केले. हे रॉकेट ३२ मजली इमारतीपेक्षाही उंच आहे. हे रॉकेट झेपावते, तेव्हा त्यातून निर्माण होणारी ऊर्जा ही अभूतपूर्व असते. या रॉकेटच्या टोकावर ‘ओरायन’ (ड१्रःल्ल) नावाचे अंतराळयान बसवलेले असते. हे यान म्हणजे ‘आर्टेमिस’ मोहिमेतल्या अंतराळवीरांचे घर आणि प्रयोगशाळा. चंद्राच्या वातावरणात प्रवेश करताना निर्माण होणारी प्रचंड उष्णता सहन करण्याची क्षमता या यानामध्ये आहे.
या मोहिमेचा पुढचा टप्पा म्हणजे चंद्राच्या कक्षेत ‘लूनर गेटवे’ नावाचे स्पेस स्टेशन उभारणे. हे गेटवे म्हणजे पृथ्वीपासून हजारो मैल दूर असलेले एक छोटे घरच असेल. अंतराळवीर प्रथम या गेटवेमध्ये थांबतील आणि तिथून लहान यानाद्वारे (एचएलएस – ‘ह्यूमन लॅण्डिंग सिस्टिम’द्वारे) चंद्राच्या पृष्ठभागावर उतरतील.
भारताच्या ‘चंद्रयान’ला बळ!
भारतासाठी ही मोहीम विशेष महत्त्वाची आहे. भारताने ‘आर्टेमिस करारा’वर (अ१३ीे्र२ अूूः१ि२) स्वाक्षरी केली आहे. याचा अर्थ असा की, भविष्यातील चंद्र मोहिमांमध्ये भारतीय अंतराळ संस्था ‘इस्रो’ (इंडियन स्पेस रीसर्च ऑर्गनायझेशन) आणि ‘नासा’ खांद्याला खांदा लावून काम करतील. भारताचा ‘चंद्रयान’ कार्यक्रम आणि नासाची ‘आर्टेमिस’ मोहीम एकमेकांना पूरक ठरणार आहेत. कदाचित लवकरच आपण एखाद्या भारतीय अंतराळवीराला नासाच्या सहकार्याने चंद्रावर जाताना पाहू शकू.
अर्थातच चंद्राचा प्रवास सोपा नाही. तिथे वातावरण नाही, जीवघेणे रेडिएशन (किरणोत्सर्ग) आहे आणि तापमानातील प्रचंड चढ-उतार आहेत. तरीही मानव तिथे जाण्यासाठी उत्सुक आहे. हे केवळ विज्ञानासाठी नाही, तर मानवी स्वभावात असलेल्या ‘शोध’ घेण्याच्या वृत्तीमुळे आहे. हे अंतराळवीर चंद्राच्या पृष्ठभागावरून निळीभोर पृथ्वी पाहतील, तेव्हा त्यांना जाणवेल की आपली पृथ्वी किती सुंदर आणि नाजूक आहे. ही भावना मानवजातीला अधिक एकसंध बनवण्यासाठी मदत करेल.
नव्या युगाची सुरुवात
आर्टेमिस मोहीम ही केवळ एक तांत्रिक चाचणी नाही, तर ती मानवाच्या स्वप्नांची भरारी आहे. आपण चंद्रावर वस्ती करणार आहोत, तिथे शेती करण्याचे प्रयोग करणार आहोत आणि तिथल्या संसाधनांचा वापर करून विश्वाचे रहस्य उलगडणार आहोत. आगामी काही वर्षांत जेव्हा ‘आर्टेमिस-३’ द्वारे मानव पुन्हा चंद्राच्या मातीला स्पर्श करेल, तेव्हा तो क्षण पृथ्वीवरील प्रत्येक मानवाचा विजय असेल.
आता चंद्राकडे पाहताना आपल्याला तिथे फक्त डाग दिसणार नाहीत, तर तिथे भविष्यातील मानवी संस्कृतीचे दिवे लुकलुकताना दिसतील. चंद्र आता लांब नाही, तो आपल्या वैश्विक प्रवासाचे पहिले पाऊल आहे!
‘आयुका’ व ‘पुणे नॉलेज क्लस्टर’शी संबंधित संगणकतज्ज्ञ
pathakatharva@gmail. com
