मुजम्मिल शाहीन सिराज शेख

सकाळ नेहमीसारखीच संथ पावलांनी उगवली होती. नेपाळ आणि तिबेटच्या सीमेवरील उंचच उंच, गगनचुंबी पर्वतरांगांच्या कुशीत वसलेल्या त्या छोट्याशा खोऱ्यात मानवी पाऊलखुणा अद्याप गाढ निद्रेत होत्या. कोणालाही ती कल्पना शिवलीसुद्धा नव्हती की, ज्या पांढऱ्याशुभ्र, अथांग हिमालयाच्या सौंदर्यावर जग फिदा होते, त्याच वैभवाच्या पोटात मृत्यूचे कोणते काळे आणि विदारक सांडवे दडून बसले आहेत. रसुवागढी आणि तिमुरेच्या त्या सुंदर वाटांवर, कैलास मानसरोवर आणि गोसाईकुंडाच्या पवित्र यात्रेला निघालेले भाविक, आपापल्या संसाराचा लहानसा कोपरा सावरणारे साधेभोळे स्थानिक आणि सीमेवर तैनात असलेले जवान—हे सर्वजण एका अज्ञात भविष्याच्या सावलीत निश्चिंत होते. पण त्या दिवशी नियतीने काळाच्या ललाटावर काही वेगळेच आणि अत्यंत क्रूर सत्य लिहून ठेवले होते.

तिबेटच्या हद्दीतून, लेंधे नदीच्या खोऱ्यातून अचानक एक अशी अमानुष, धडकी भरवणारी गर्जना झाली, जिने संपूर्ण हिमालयाची छाती मुळापासून चिरून टाकली. हजारो वर्षे जुनी, अजस्र बर्फाची शिखरे, पाषाणाचे महाकाय ढिगारे आणि काळेकुट्ट पाषाण एकाच क्षणी खाली कोसळले. अमेरिकन जिऑलॉजिकल सर्व्हेच्या (USGS) नोंदीनुसार, सकाळी साडेआठच्या सुमारास जमिनीच्या पोटात एक मोठा कंपन सिग्नल नोंदवला गेला होता. अनेकांना तो भूकंपाचा झटका वाटला, पण तो केवळ भूकंपाचा धक्का नव्हता; तो हिमालयाच्या एका महाकाय हिमनदीचा (Glacier) आणि संपूर्ण पर्वताचा कडा कोसळण्याचा एक असा महाभयंकर हादरा होता, ज्याने धरणीला हादरवून सोडले. ती केवळ एक नैसर्गिक आपत्ती नव्हती, तर तो पृथ्वीचे एक असे सुन्न करणारे आक्रंदन होते, ज्याने काही सेकंदांतच हसतखेळते संसार, शतकानुशतके उभे असलेले पूल आणि मानवाच्या सर्व गर्वाला काळ्या माती आणि गादात गाडून टाकले.

जगासाठी हे टीव्हीच्या पडद्यावर झळकणारे एखादे डार्क सायन्स फिक्शन किंवा कृत्रिम बुद्धिमत्तेने (एआय) तयार केलेले भयानक सिनेमॅटिक दृश्य वाटत असेल. चिनी वेबसाईटवरून बाहेर आलेले ते पन्नास सेकंदाचे सीसीटीव्ही फुटेज पाहणाऱ्याच्या अंगावर काटा आणणारे होते. एका सेकंदाला जी नदी अतिशय संथ, बारीक पांढऱ्या रेषेसारखी वाहत होती, अवघ्या अर्ध्या तासात ती पाण्याच्या, मलबेच्या आणि चिखलाच्या नऊ मीटर उंच महापुराच्या रूपात लोकांच्या अंगावर काळ बनून धावून आली. त्रिशूली, भोटेकोसी आणि नारायणी नद्यांच्या खोऱ्यात जणू रक्ता-मांसाचे आणि मृत्यूचे तांडव सुरू झाले. ते पाणी नव्हते, तो एक लाव्हासारखा उसळणारा काळाकुट्ट सैलाब होता, ज्याच्या वाटेत जे आले ते पानाफुलांसारखे हवेत उडून गेले.

दोन कड्यांना घट्ट धरून ठेवणारे, दशकांपासून उभे असलेले ते मजबूत सिमेंट-कॉंक्रिटचे पूल असे ताश्याच्या पत्त्यांसारखे पाण्यात वाहून गेले, जणू त्यांच्याकडे वजनाचा लवलेशही नव्हता. चायनीज इमीग्रेशन चेकपॉइंट, जिथे दररोज शेकडो भारतीय आणि परदेशी पर्यटक व्हिसा स्टॅम्प करून मानसरोवर यात्रेसाठी मोठ्या अपेक्षेने पुढे जायचे, तो संपूर्ण परिसर एका फटक्यात त्या मलब्याच्या महासारात विलीन झाला. रसुवा, नुवाकोट, धादिंग आणि चिलमच्या त्या दऱ्यांमध्ये जिथे कालपर्यंत हॉटेल्सची गर्दी होती, चहाच्या टपऱ्यांवर हशा पिकत होता, आज तिथे फक्त आणि फक्त मृत्यूची निद्रिस्त शांतता आणि गाळ भरलेला विनाशाचा विदारक पसारा उरला आहे.

हिमालयीन टीव्हीचे पत्रकार दिवाकर पोखरिया, शंकर पंडित आणि फोटो पत्रकार कमाल परसाई यांनी एका हेलिकॉप्टरमधून १०५ किलोमीटरच्या त्या उद्ध्वस्त पट्ट्याची आकाशातून पाहणी केली, तेव्हा डोळ्यातून रक्त आणणारी दृश्ये समोर आली. तिनुरे नावाचे अख्खे गाव जणू नकाशावरूनच पुसले गेले होते. तिथे आता ना घर उरले होते, ना हेलिपॅड, ना कोणतीही मानवी खूण. फक्त तीस-चाळीस फूट उंचीचा तो काळा गाळ आणि त्या गाळात गडप झालेले मानवी जीवन. एका ठिकाणी तर एका तुरुंगामध्ये अडकलेले आठ-नऊशे कैदी दैव बलवत्तर म्हणून कसेतरी वाचले, पण त्यांच्या चोहोबाजूंना केवळ उद्ध्वस्त झालेला इतिहास पसरला होता.

या महाप्रलयाच्या पाठीमागची कागदी आकडेवारी जितकी भयानक आहे, त्याहून कैक पटीने भयंकर आहे त्या आकड्यांमागे विव्हळणाऱ्या माणसांची घुसमट. नेपाळच्या अधिकृत आणि अनधिकृत आंकड्यांनुसार मृतांचा हा आकडा शेकडोच्या पल्याड पोहोचला आहे आणि दीड हजारांहून अधिक लोक अद्याप लापता आहेत. यात शेकडो परदेशी पर्यटक आहेत, ज्यामध्ये भारताच्या विविध भागांतून, विशेषतः तामिळनाडू आणि उत्तर भारतातून गेलेले शेकडो भारतीय भाविक या काळ्या लाटेत कुठे तरी हरवले आहेत. चीनच्या गिरोंग पोर्ट आणि तिबेटच्या भागातही शेकडो नागरिकांचा संपर्क तुटला आहे. नेपाळ पोलिसांचे २८ जवानसुद्धा या पुरात वाहून गेले.

एका व्हायरल व्हिडिओमध्ये एक माणूस उभा आहे, आणि त्याच्या अगदी डोळ्यांसमोर पाण्याचा तो महाकाय पहाड धावत येतोय. त्याच्या बाजूला त्याची मुलगी किंवा कुटुंबातील व्यक्ती कदाचित त्याला ओरडून बोलावतेय, पण तो तिथून हलत नाही. कारण त्याला ठाऊक आहे की या रौद्र रूपाच्या समोर पळून जाण्यासाठी आता जगात कोणतीही सुरक्षित जागा उरलेली नाही. तो माणूस तिथेच सुन्न होऊन आपली नियती मुकपणे स्वीकारून उभा राहतो, आणि काही क्षणातच तो आणि त्याचा संपूर्ण परिवार त्या काळ्या ढिगाऱ्यात सदासाठी गायब होतात. ही केवळ एक दृष्यफीत नाही, ही एका हसत्याखेळत्या आयुष्याची शेवटची आर्त चीख आहे, जी काळाच्या पोटात कायमची दडपली गेली.

दुसऱ्या एका दृश्यात, बचाव पथकाचे हेलिकॉप्टर वरून लोकांना शोधत होते, तेव्हा खाली जिवंत राहिलेल्या लोकांच्या चेहऱ्यावर अश्रूंचे असे महापूर होते, ज्यांना सांत्वन देण्याची ताकद जगातल्या कोणत्याही शब्दांत उरली नव्हती. आपल्या लेकराला, आपल्या जीवनसाथीला चिखलातून बाहेर काढण्यासाठी स्वतःचे हात नखशिखांत मातीत रुतवून बसलेला एक पिता जेव्हा आकाशात पाहतो, तेव्हा त्याची ती नजर माणसाच्या अंतःकरणाला पार चिरून जाते.

पण या सगळ्या क्रूर वास्तवामागे एक असा अस्वस्थ करणारा प्रश्न उरला आहे, ज्याचा जाब या देशाला, या संपूर्ण जगाला द्यावाच लागेल. हा केवळ निसर्गाचा प्रकोप होता का? किंवा आपण स्वतः आपल्या हाताने या विनाशाचा काळा विध्वंस रचला होता का? गेल्या काही दशकांत हिमालयाच्या कुशीत विकास आणि पर्यटनाच्या नावाखाली जी बेसुमार लूट चालवली गेली आहे, त्याचेच हे भीषण फलित आहे. रसुवागढीचा तो १११ मेगावॅटचा जलविद्युत प्रकल्प असो, किंवा इतर १३ हून अधिक हायड्रो पॉवर प्रकल्पांची साखळी असो, मानवाने आपल्या विजेच्या आणि पैशाच्या भुकेसाठी या क्षणभंगूर पर्वतरांगांच्या मुळावर डायनामाइट लावले. डोंगर कोरले, नद्यांचे नैसर्गिक मार्ग रोखून धरले आणि हे पूर्णपणे विसरले की नदी कितीही वर्षे शांत असली, तरी ती कधी ना कधी तिचे जुने घर परत मागण्यासाठी नक्की परत येते.

हवामान बदलामुळे हिमालयाचे तापमान झपाट्याने वाढत आहे. हिमनद्या वितळत आहेत आणि तुटत आहेत. यात कार्बन उत्सर्जनात नेपाळसारख्या देशांचा वाटा अगदी नगण्य आहे, पण या जागतिक जाळपोळीची आणि निसर्गाच्या बदलाची सर्वात मोठी किंमत या पर्वतीय भागातील गरिबांना, निष्पाप लोकांना आपल्या प्राणांचे बलिदान देऊन चुकवावी लागत आहे. राजकीय नेते आणि संस्था अर्ली वॉर्निंग सिस्टिमचे कितीही दावे करोत, पण जेव्हा अर्ध्या तासात पाण्याचा स्तर नऊ मीटरने वर उचलला जातो, तेव्हा जगातले कोणतेही तंत्रज्ञान माणसाला वाचवू शकत नाही. कारण आपण धोक्याच्या इशारे देणारी यंत्रणा उभी केली, पण त्या नद्यांच्या मार्गावर सिमेंटच्या वस्त्या बसवण्याची लोभी सवय कधीच सोडली नाही.

भारत आणि नेपाळचे संबंध केवळ कागदावरच्या करारांचे नाहीत; ते हिमालयाच्या याच सामायिक वेदनेने जोडलेले आहेत. २०१५ च्या भूकंपाच्या वेळेस मदतीच्या नावाखाली जी राजकीय शेखी मिरवली गेली होती, ती घोर चूक या वेळी होता कामा नये. नेपाळचा हा उद्वेग केवळ एका शेजारी देशाचे दुःख नाही; ती भारताचीही सामायिक वेदना आहे, कारण हेच पाणी पुढे जाऊन बिहार, उत्तर प्रदेश आणि बंगालच्या नद्यांना प्रलयकारी रूप देते. आज गरज आहे ती कोणत्याही दिखाव्याशिवाय, निस्सीम माणुसकीने आणि ओल्या डोळ्यांनी नेपाळच्या या संकटात त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची.

हा लेख संपवताना मनाच्या कुठेतरी एका अथांग कोपऱ्यात एक अत्यंत खोल आणि वेदनादायी प्रश्न उरतो. आज आपण जी भव्य इमारतींची शहरे उभी करत आहोत, जी विकासाची स्वप्ने रंगवत आहोत, ती काय कामाची जिथे एका रात्रीत माणसाचे संपूर्ण अस्तित्व मातीचा एक कण बनून उडून जाते? रसुवाच्या त्या चिखलात ज्या आईने आपल्या चिमुरड्याचे हात सोडले असतील, ज्या मुलाने आपल्या वडिलांचे शेवटचे शब्द ऐकले असतील, त्यांच्या त्या उघड्या डोळ्यांमधली ती आतुरता आणि भीती आपल्याला कधी शांत झोपू देईल का?

निसर्ग आपल्याला पुन्हा पुन्हा चेतावणी देतो की माझ्याशी स्पर्धा करू नका. पण मानवाचा हा स्वार्थी आणि मग्रूर अहंकार कधी संपणार? जेव्हा पुढच्या वेळी आपण हिमालयाच्या कड्यांवर फिरायला जाऊ किंवा एखाद्या नवीन धरणाच्या उद्घाटनाचा उत्सव साजरा करू तेव्हा या नेपाळच्या प्रलयातील त्या हजारो मूक आत्म्यांचे चेहरे डोळ्यांसमोर आणले पाहिजेत. कारण शेवटी, मातीतून आलेला माणूस जेव्हा मातीतच विलीन होतो, तेव्हा फक्त मागे उरतात फक्त काही न पुसता येणारे अश्रू आणि एका भयानक विनाशाची मूक साक्ष देणारी ही कागदाची पाने.

writesmstosms@gmail.com