ओऱ्हान पामुक यांची नवी कादंबरी एका काल्पनिक देशात घडते.. आणि वास्तव जगाला उघडं पाडते!

विबुधप्रिया दास

A case has been registered against the scribes in the city police station for embezzlement of examination fees by the scribes of Miraj High School
लेखनिकाने केला अपहार, ३५८ विद्यार्थी मात्र निकालापासून वंचित
Jayant Patil on Ajit pawar letter
‘सत्तेमध्ये असल्याशिवाय विकास होत नाही’, अजित पवारांचं म्हणणं खरं; जयंत पाटील पुढे म्हणाले…
selfie parent letter cm eknath shinde
सेल्फीस नकार देत पालकाने मुख्यमंत्र्यांना केला थेट सवाल; काय आहे प्रकरण? जाणून घ्या
Raj Thackeray on marathi bhasha din
“लोकांच्या बदलत्या आवडीनिवडी लक्षात घेऊन…”, मराठी भाषा गौरव दिनानिमित्त राज ठाकरेंची खास पोस्ट!

साहित्यक्षेत्रातलं ‘नोबेल पारितोषिक’ २००६ मध्ये मिळवणारे ओऱ्हान पामुक हे मराठीत अनुवादांतूनही माहीत आहेत ( ‘माय नेम इज रेड’चा अनुवाद गणेश विसपुते यांनी, तर ‘स्नो’चा विशाल तायडे यांनी केला आहे). पामुक यांची नवी कादंबरी ७०० पानी! या ‘नाइट्स ऑफ प्लेग’चं लेखन २०१७ मध्ये सुरू झालं, पण जणू ती कोविड-काळावरच लिहिली असावी अशी वर्णनं तिच्यात आहेत. कोविडकाळात जगभरच्या प्रशासनांनी कसे बिनडोक उपाय योजले, सत्ताधारी कसे नि:स्स्ंग वागले आणि आतबाहेर सर्वत्र कसा अविश्वास भरून राहिला होता, हे सारं या कादंबरीत आहेच, पण पामुक यांचा मुख्य विषय तो नाही. तुर्कस्तानसारख्या एखाद्या देशाच्या इतिहासाकडे परस्थपणे पाहणारी ही कादंबरी आहे. त्यामुळे सध्या, खुद्द तुर्कस्तानात ‘पामुक यांनी ‘अतातुर्क’ (म्हणजे तुर्कस्तानचे राष्ट्रपिता) केमाल पाशा यांची खिल्ली उडवली आहे, अवमान केला आहे’ अशी याचिका उच्च न्यायालयापुढे आहे. इंग्रजी अनुवाद सप्टेंबरातच प्रकाशित झाल्यामुळे पाश्चात्त्य देशांतही आता ‘पामुक यांनी खरोखरच अवमान केलाय? कुणाचा?’ ही चर्चा सुरू होते आहे

कादंबरी ‘तुर्कस्तानसारख्या एखाद्या देशा’बद्दल असल्यानं ती भूमध्यसागरातल्या छोटेखानी मिंघेरिया बेटावर घडते. काळ १९०१चा. तुर्की सुलतानाचं ओटोमन साम्राज्य बरकरार असतानाचा. पण तीन भागांमधल्या या कादंबरीच्या दुसऱ्या भागात मिंघेरिया हा तुर्कस्तानपासून निराळा, स्वतंत्र देश होतो. तिसरा भाग हा प्लेगपासूनही मुक्त झालेल्या, स्वतंत्र- पण मजहर इफेन्डी याची हुकूमशाही अनुभवणाऱ्या मिंघेरियाची कहाणी सांगतो. पहिला भाग मात्र अर्थातच, प्लेगची (आणि त्या मिषानं कोविडचीही) गोष्ट सांगणारा आहे.

तुर्कस्तानी सुलतानाचं साम्राज्य इतकं मोठं की, कुठे ना कुठे काही ना काही रोगराई सुरूच असायची. एक जहाजच त्यासाठी ठिकठिकाणी फिरत असतं. सन १९०१ पर्यंत तुर्कस्तान युरोपच्या घनिष्ठ संपर्कात आल्यामुळे हकीम नव्हे, आता ‘डॉक्टर’ या जहाजावर असतात. पैकी एक पोलंडमध्ये जन्मलेला डॉ. बोन्कोवस्की पाशा. दुसरा मूळचा ग्रीक, डॉ. इलियास. तिसरा घरचाच-  सुलतानाचा चुलतजावई नूरी बे. या नावातला ‘बे’ म्हणजे ‘भाई’ किंवा ‘राव’ सारखं संबोधन, हे ओऱ्हान पामुक यांच्या वाचकांना माहीतच असेल. सुलतानानं स्वत:चा भाऊ, वहिनी आणि त्या जोडप्याच्या तिन्ही मुली यांना नजरकैदेत ठेवलेलं असतं; त्यापैकी धाकटी पाकीजे ही नूरी बे याची पत्नी. जहाजातून तीही पतीसह मिंघेरियात आली आहे. तिची नातवंडे-पतवंडे याच मिंघेरियात वाढणार आहेत..  या कादंबरीचं (विशेषत.’ तिसऱ्या भागाचं) निवेदन करणाऱ्या मीना मिंघेर हिची, पाकीजे ही पणजी. याच पाकीजेच्या संरक्षणासाठी सुलतानानं धाडलेला  मेजर कामिल हाच पुढे ध्यानीमनी नसताना मिंघेरियाचा मुक्तिदाता ठरतो! पाकीजेचं या कादंबरीतलं महत्त्व हे असं आहे.  कादंबरीच्या पहिल्या शंभर पानांमधल्या घटना वेगवान आहेत.. बोन्कोवस्कीची हत्या, डॉ. इलियास यालाही विषारी बिस्कीट खाऊ घालून त्याचा काटा काढणं. हे प्रकार कोणी केले याचा शोध घेण्यासाठी मुळात, मजहर इफेन्डी या गुप्तचराची नेमणूक केली जाते.. पण हा गुप्तचरच पुढे हुकूमशहा होतो.

कोविडचीच आठवण करून देणारा या कादंबरीतला प्रसंग म्हणजे, सरकारी नोकरांनी लोकांच्या अंगावर जंतुनाशकाचा मारा करण्याचा आदेश देणं आणि त्याची अंमलबजावणी! शिवाय, प्लेगसारखा जीवघेणा संसर्गजन्य आजार (मराठीत याला ‘काळपुळी’ असं नाव आहे, म्हणजे काखेत पुळी आली की काळच आला रुग्णाचा, असा हा आजार ) फैलावत असूनही लोक ऐकत नाहीत. ‘विलगीकरणा’चे नियम सर्रास मोडले जातात. पण कादंबरी खरोखरच या प्लेगचं वर्णन करण्यापुरती नाही. पामुक यांना त्यांच्या कल्पनेतल्या ‘मिंघेरिया’चा शतकभराचा राजकीय इतिहास मांडायचाय, त्यासाठी (मुळात रेखाटनं करण्याची आवड असलेल्या) पामुक यांनी या कादंबरीच्या सुरुवातीला बेटाचा, मुख्य शहराचा आणि महत्त्वाच्या इमारतींचा नकाशाही रेखाटला आहे. या रेखाटनात प्राण फुंकले जातात ते पामुक यांच्या शब्दांनी. पहिल्या भागाअंती, वाचकाच्या मनात हे बेट जिवंत झालेलं असतं. पण ‘काळपुळी’चा संहार इतका की, इथली लोकसंख्या फारच कमी झालेली असते. सुलतानानं या बेटावर प्रशासक म्हणून नेमलेला सामी पाशा, या संहाराला रोखू न शकल्यामुळे नालायक ठरवला जाऊन त्याची बदली अलेप्पो इथं (सध्याच्या सीरियाची राजधानी) होते, पण तो तरी काय करणार होता? या बेटावरले मुस्लीम आणि ख्रिस्ती (ग्रीसचे) सतत एकमेकांना पाण्यात पाहणारे, मुस्लिमांतही एक गट शेख हमदुल्ला याचा, तो इतर मुस्लिमांशीही भांडणारा. सरकारलाही आडवाच जाणारा. पहिल्या भागाच्या अखेरीस शेख मरतो. पण समी पाशा थेट सुलतानाचा आदेश धुडकावून, मिंघेरियातच राहातो आणि मेजर कामिलच्या ‘स्वातंत्र्य-क्रांती’चा पाईकसुद्धा होतो. मेजर आता मिंघेरियाची भाषा, संस्कृती यांच्या जतनाची हमी देतो, पण प्रगती करायचीच, असंही म्हणत असतो!

तुर्कस्तानच्या अस्मितावाद आणि आधुनिकता यांची सांगड घालण्यासाठी केमाल पाशा यांनीही एकाधिकारशाहीचाच मार्ग वापरला होता. तो खपून गेला, कारण जनतेला बदल हवाच होता. पुढे मात्र तुर्कस्तानला आधुनिक राजकीय प्रणाली टिकवून ठेवता आली नाही. त्या देशात लष्करी उठाव झाले, रशियाचा वरचष्मा राहिला.. हा खरा इतिहास काहीसा अमूर्तपणे इथे कादंबरीत, मिंघेरियाचा इतिहास म्हणून येतो. मेजर कामिल याची एकाधिकारशाही, प्लेग आटोक्यात आला नसूनही त्यांचे अस्मितावादाचे नवनवे प्रयोग, यांत दुसरा भाग संपतो. मग तिसऱ्या भागात नवा नेता. हाच तो मजहर इफेन्डी. काहीच वर्षांपूर्वी साधा गुप्तचर होता. आता पुढली ३० र्वष- म्हणजे तो मरेपर्यंत- मिंघेरियाची सत्ता त्याच्याच हातात एकवटणार आहे.

कादंबरी नीट वाचणाऱ्यांना आणि जागतिक घडामोडींत रस असणाऱ्यांना कामिल आणि केमाल पाशा यांच्यामध्ये साम्य दिसेलही, पण या कामिलमध्ये आजच्या तुर्की देशाचे सर्वेसर्वा रेसेप तयिप एर्दोआन यांच्याही छटा आहेत. त्या मेजर कामिलमध्ये नाहीतच- कारण एकाधिकारशाही केमाल पाशाची कुठे आणि हल्लीची कुठे- हा युक्तिवाद जरी खरा मानला तरी, मजहर इफेन्डी याच्यात एर्दोआन आणि थेट रशियाचे पुतिन यांच्याही छटा दिसतील की नाही?

तुर्कस्तानी ‘राष्ट्रभक्तां’ना फक्त केमाल पाशाचा अवमान दिसतोय, म्हणजे एर्दोआन यांच्याबद्दलची नापसंती या कादंबरीत असल्याचं त्यांना कळतच नाही,  हेच एकापरीनं बरंय.. पामुक यांना २००५ पासूनच या ना त्या प्रकारे अडकवण्याचे प्रयत्न सुरू आहेत, त्यांचा त्रास जरा तरी कमी! पण हो, जरी या साऱ्या राजकीय पार्श्वभूमीला नजरेआड करून कादंबरी वाचलीत, तरीही ती वाचनीयच ठरेल. ‘प्लेग’ हे इंग्रजीत क्रियापद म्हणूनही वापरलं जातं. ‘ग्रासून टाकणे’ असा त्याचा अर्थ. तर या कादंबरीत, ‘अस्मिता टिकवून प्रगती करू’ अशी आकांक्षा बाळगणाऱ्या आणि त्या आकांक्षेपायीच एकाधिकारशाहीनं ग्रासलेल्या एका ‘मिंघेरिया’ देशाचं वर्णन आहे..

.. हा देश काल्पनिक आहे बरं का, काल्पनिक! नशीबच की नाही आपलं?