कर्नल अभय बाळकृष्ण पटवर्धन (निवृत्त) रशियन सैन्य फेब्रुवारी, २०२२ मधे युक्रेनमधे शिरल्यानंतर रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी अमेरिका आणि नाटो राष्ट्रांनी रशियाविरुध्द छुपे युद्ध (प्रॉक्सी वॉर) सुरू केल्याचा कांगावा सुरू केला. युद्ध सुरू होऊन जवळपास सव्वा वर्ष झाल्यानंतरही अपेक्षित यश न मिळाल्यामुळे, रशियाने २५ मार्च, २०२३ रोजी आपली टीएनडब्ल्यू (टॅक्टिकल न्युक्लिअर वेपन्स- टीएनडबल्यु) बेलारूसमधे तैनात करण्याचा निर्णय घेतला. तसा निर्णय रशियन मंत्रिमंडळाच्या बैठकीत पुतीन यांनी जाहीर केला. एका अहवालानुसार, रशियन अण्वस्त्रांची वाटचाल बेलारूसच्या दिशेने सुरू झाली आहे. १९९१ मध्ये झालेल्या सोव्हिएत युनियनच्या विघटनानंतर टीएनडब्ल्यू पहिल्यांदाच देशाबाहेर तैनात केले जात आहेत. बेलारूसमधील मिंक्स येथे गेलेल्या रशियन संरक्षणमंत्री सर्जेई शोयगुनी यांनी या निमित्त या तैनातीचे खापर अमेरिका, नाटो आणि पाश्चात्य देशांवरच फोडले. राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी या तैनातीच्या हुकुमावर स्वाक्षरी केल्यानंतरच बेलारूसमधे रशियन टीएनडब्ल्यू तैनात सुरू झाल्याची ग्वाही बेलारूसचे राष्ट्राध्यक्ष, अलेक्झांडर ल्युकशेंको यांनी दिली. दोन्ही देशांमधील एका ताज्या, विवक्षित करारानुसार, टीएनडब्ल्यू बेलारूसमध्ये स्पेशल देखरेखीखाली ठेवण्यात आली आहेत. रशिया आपले सार्वभौमत्व टिकवण्यासाठी व पाश्चात्य राष्ट्रांच्या आक्रमक, कुटील कारस्थानांपासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी युक्रेन युद्ध लढतो आहे आणि त्यासाठी तो संपूर्ण प्रयत्न करेल असे प्रतिपादन राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी या संदर्भात केले होते. दुसरीकडे "युक्रेनने रणांगणावर रशियन सैन्याचा पराभव करावा अशी आमची तीव्र इच्छा असली तरी रशिया नष्ट व्हावा असे आम्हाला वाटत नाही आणि त्यासाठी आम्ही कुठलेही पाऊल उचलणार नाही. सोव्हिएत युनियनच्या विघटनानंतर नाटो संघटनेची झालेली सामरिक वृद्धी आणि युक्रेन युद्धाचा अर्थाअर्थी काहीही संबंध नाही" अशी ग्वाही अमेरिकी गृहसचिवांनी तसेच नाटो संघटना प्रमुखांनी दिली आहे. ही रशियन टीएनडब्ल्यू बेलारूसमधे केव्हा कार्यरत होतील याचे निश्चित वेळापत्रक रशियाने जाहीर केलेले नाही. बेलारूसची आंतरराष्ट्रीय सीमा पोलंड, लिथुआनिया आणि लाटव्हिया या नाटो सदस्य राष्ट्रांशी संलग्न आहे. त्यामुळे, बेलारूसमधील रशियन टीएनडब्ल्यू तैनातीला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. टीएनडब्ल्यू बेलारूसमधे असली तरी त्यांचे नियंत्रण रशियाकडेच राहील. विवक्षित डावपेचात्मक यश (स्पेसिफिक टॅक्टिकल गेन्स) मिळवण्यासाठी जी अस्त्रे वापरण्यात येतात, त्यांची विदारक क्षमता जीव आणि मालमत्ता यांचे प्रचंड नुकसान करणाऱ्या सामरिक अण्वस्त्रांपेक्षा (स्ट्रटेजिक न्युक्लिअर वेपन्स) खूप कमी असते. सामान्यतः टीएनडबल्यू बॉम्ब बारा फूट लांब आणि ०.३ ते १.७ किलो टन शक्तीचा असतो. बेलारूस सोडता रशियाची अंदाजे २००० टीएनडबल्यू अण्वस्त्र इतर कुठल्याही देशांमधे तैनात नाहीत. उलटपक्षी, अंदाजे २०० अमेरिकन टीएनडबल्यू अण्वस्त्रे; जर्मनी, टर्की, इटली, बेल्जियम, नेदरलँड आणि पोलंड या सहा देशांतील विमानतळांवर (एअर बेस) तैनात करण्यात आली आहेत. आपल्या टीएनडबल्यू अण्वस्त्रांबरोबर रशियाने बेलारूसमधे अनेक; पारंपारिक अस्त्रे/ अण्वस्त्र स्फोटक वाहू इस्कंदर एम मिसाईलस् आणि सुखोय- २५ विमाने पाठवली आहेत. त्यानुसार, तेथील सैनिक आणि वैमानिकांना संभाव्य अमेरिकी/ नाटो हल्ल्याला तोंड देण्यासाठी प्रशिक्षणही दिले जात आहे. १९६२ मध्ये पंतप्रधान निकीता क्रुश्चेव्ह यांच्या अधिपत्याखालील रशियाने क्युबात मिसाईल्स तैनात करून जगाला पहिल्या वहिल्या अणु युध्दाच्या खाईत लोटण्याचा चंग बांधला होता. त्यानंतर व्लादिमीर पुतीन हे देखील युक्रेन युद्ध संपवण्यासाठी आज तीच वाट चोखाळताहेत असे अमेरिकन संरक्षणतज्ञांचे मत आहे. "नॉन प्रोलिफरेशन ऑफ न्युक्लिअर वेपन्स् ट्रीटी" अंतर्गत, अण्वस्त्रधारी देश अण्वस्त्र नसणाऱ्या राष्ट्रांना, अण्वस्त्र तसेच अण्वस्त्र विषयक तंत्रज्ञान देऊ शकत (कॅन नॉट ट्रान्स्फर) नाहीत. पण आपल्याच नियंत्रणात असणारी आपली अण्वस्त्रे दुसऱ्या देशात तैनात करण्यावर कोणतेही प्रतिबंध नाहीत. आणि आज रशिया त्याच कलमाचा फायदा उचलतो आहे. युक्रेनमधे रशियन अधिपत्याखाली लढणारा वॅगनर ग्रुप, बखमुत शहर काबीज करून रशियन सेनेला हस्तांतरीत करण्याच्या तयारीत असताना रशियाने टीएनडब्ल्यू बेलारूसमधे तैनात करण्याचा निर्णय घेतला हा केवळ योगायोग निश्चितच नाही. दुसरीकडे, झेलेन्स्की पाश्चिमात्य राष्ट्रांना उद्देशून विविध घोषणा करताहेत. "तुम्ही युक्रेनला क्षेपणास्त्र, विमान, तोफा, दारुगोळा यांचा पुरवठा सुरू ठेवला, आमचे वैमानिक व सैनिकांना योग्य प्रशिक्षण दिले आणि आम्हाला रशियाच्या लष्कराची माहिती (इंटलिजन्स) देत राहिलात तर आम्ही लवकरच रशियाला नक्की पराभूत करू" अशी खात्री अमेरिका व नाटो राष्ट्रांना पटवून देण्यात राष्ट्रपती झेलेन्स्की सफल झाले आहेत. दुसरीकडे, रशियाने आपल्या सामरिक चुका सुधारत, हत्यार व दारुगोळा उत्पादनात वाढ केली आहे. मार्च २०२३ मधे रशियन वायुसेनेने (रशियन एरोस्पेस फोर्सेस: आरयूएएफ), युक्रेनची युद्ध क्षमता नष्ट करण्यासाठी त्यांच्या संसाधनांवर करत असलेले, विमान/ ड्रोन/ क्षेपणास्त्र हल्ले बंद करून, युक्रेनची प्रति हल्ला क्षमता (काउंटर ऑफेंसिव्ह कॅपेबिलिटी) नष्ट करण्यासाठी युद्ध क्षेत्राकडे/ सीमेकडे येणारी युक्रेनी रसद व सैनिकांच्या येण्याजाण्याच्या मार्गावर हल्ले (रुट इंटरडिक्शन अटॅक्स) सुरू केले. अमेरिका, नाटो व पाश्चात्य देशांकडून युक्रेनला सतत होत असलेला हवाई/ उपग्रहीय माहिती स्रोत (इंटलिजंस/ एरियल आयएसआर फ्लो) आणि जमिनीवरील लक्ष्य सुचितेवर (टार्गेटिंग इन्फर्मेशन) मात करण्यासाठी रशियाने वेगळेच युद्ध व हत्यार धोरण आणि विकसित केले. ऑक्टोबर २०२२ ते मार्च/ एप्रिल २०२३ दरम्यान (विंटर/ स्प्रिंग ऑफेन्सिव्ह) युक्रेनची ऊर्जा संसाधने (एनर्जी इन्फ्रास्ट्रक्चर) नष्ट करण्यासाठी व जनतेचे मनोधैर्य खच्ची करण्यासाठी/ धास्ती फैलवण्यासाठी केलेल्या जबरदस्त ड्रोन/ क्षेपणास्त्र/ हवाई हल्ल्यांना अपेक्षित यश न मिळाल्यामुळे रशियाला हे पाऊल उचलावे लागले. आता रशियन वायुसेनेचे क्षेपणास्त्र हल्ले युक्रेनची संसाधने उद्ध्वस्त करण्यासाठी न होता, रशियाच्या ताब्यात असलेला भूभाग परत हस्तगत करण्यासाठीं सुरू असलेल्या, युक्रेनी सेनेची प्रतिहल्ला क्षमता नष्ट करण्यासाठी होत आहेत. या धोरणानुसार, रशियाचा पहिला मारा, खेरसन क्षेत्रातील काखोवका धरणावर केल्या गेला. मंगळवार, ६ जून २३ रोजी जगातील मोठ्या गणल्या जाणाऱ्या या हायड्रो इलेक्ट्रिक धरणाचा व सरोवराचा एक मोठा भाग क्षेपणास्त्रांच्या माऱ्याने उद्ध्वस्त झाला. गुरुवारपर्यंत हजारो इमारती, ठिकाणे आणि वसाहती ज्ञायपर नदीमधील पुराच्या पाण्याखाली आल्या. नदीच्या पूर्वेचा भाग पाण्याखाली आहे आणि तेथून दक्षिणेकडे जाणाऱ्या वाटा, जमिनी व रस्ते चिखलाने भरले आहेत. त्यामुळे, युक्रेनच्या फौजेचा मार्ग दुष्कर झाला आहे. अमेरिकन/ जर्मन रणगाडे व इतर चिलखती वाहने पुढे जाऊ शकत नाही आणि रशियन इन्फंट्रीच्या अँटी टँक वेपन्सचा शिकार बनताहेत. धरणावरील हा मिसाईल स्ट्राईक बहुदा नव्या रशियन युद्ध धोरणाचा ओनामा होता. या नंतर त्याच क्षेत्रातील न्यूक्लियर प्लान्ट आणि इतर लक्ष्ये गाठली जातील. रशियन वायुसेना आता, युक्रेनी सीमेकडे कूच करणारे युक्रेनी सैनिक /रणगाडे / तोफा/ क्षेपणास्त्र वाहन व त्यांचे "फॉरवर्ड स्टेजिंग पॉईंट्स" आणि सीमेजवळील तसेच खूप मागे/ दूर असलेल्या दारुगोळा/ हत्यारांच्या युद्धक्षम ठिकाणांवर (सप्लाय चेन अँड मुव्हमेंट रुटस्) वायु हल्ले करते आहे. एप्रिल, २०२३ च्या सुरुवातीला असे हल्ले तुरळक प्रमाणात होत असत. पण दिवसेंदिवस ते अचूक, सक्षम आणि तीव्रतम होतांना दिसून येत आहेत. रशिया आता अत्याधुनिक व प्रगत हत्यारांचा वापर करते आहे. याआधी वापरलेल्या; दृश्य, कमी मारक क्षमतेच्या कॅलिबर क्षेपणास्त्रांऐवजी रशिया आता, अदृष्य, केएच १०१ तसेच इस्कंदर के क्रुझ क्षेपणास्त्र आणि इस्कंदर व किंझल क्वासी बॅलास्टिक मिसाईल्सचा वापर खूप मोठ्या प्रमाणात करते आहे. २९ मे, २०२३ रोजी; नऊ रशियन टीयू ९५ एम स्ट्रटेजिक बॉम्बर विमानांनी युक्रेनवर, ४० केएच १०१/ ५५५ एअर बॉर्न क्रुझ क्षेपणास्त्र आणि ११ इस्कंदर क्रुझ व बालास्टिक क्षेपणास्त्रांचा अचूक मारा केला. रशियन ड्रोन्स आणि क्षेपणास्त्रांची संख्या युक्रेनवरील प्रत्येक हल्ल्यानंतर वाढतेच आहे. दर वेळी, नवीनतम, अत्याधुनिक ड्रोन्स वापरली जातात. हे ड्रोन्स/ क्षेपणास्त्र अतिशय कमी उंचीवरून, "वे पॉइंट नेव्हिगेशन"च्या आधारे उड्डाण करत, भिन्न भिन्न दिशांनी आपल्या लक्ष्यावर येत असल्यामुळे युक्रेनी एअर डिफेन्स सिस्टिमला गोंधळात पाडण्यात सफल होतात. हे ड्रोन्स उपग्रहांच्या माध्यमातून नियंत्रित केले जातात. ते अतिशय कमी उंचीवरून, सेन्सर्सच्या मदतीची पाहत मोठया झुंडीने (युझिंग स्वार्म टॅक्टिक्स) आपल्या लक्ष्यावर येतात. ते तुकड्या तुकड्यांनी उड्डाण (फ्लाय इन बॅचेस) करतात, प्रत्येक ड्रोनचा आपला स्वतंत्र मार्ग असतो जो, उपग्रहाद्वारे नियंत्रित होणाऱ्या जीपीएस नेव्हिगेशन सिस्टिम्सद्वारे संचलित करण्यात येतो. ते सरळ, तिरपे, उलटे तसेच वर्तुळाकार उडू शकतात. लक्ष्यावर पोहोचल्यानंतर योग्य वेळी ते अचूक मारा करतात. लव्हिव, कीव्ह, डोनबस्क सारख्या महत्त्वाच्या ठिकाणांवर प्रत्येकी सहा ते सात क्रुझ मिसाईल्स आणि १२ ते १३ ड्रोन्सचा मारा (स्ट्राईक) जवळपास रोजच दिवसातून दोन ते तीन वेळा होत असतो. रशियाने त्यांच्या उत्पादनात अनेक पटींनी वाढ केल्यामुळेच तो युक्रेनवर इतक्या प्रचंड प्रमाणात क्षेपणास्त्र व ड्रोन्सचा मारा करू शकते. मागील काही दिवसांपासून रशिया, युक्रेनच्या हवाई संरक्षण क्षमतेला टप्प्याटप्प्यांने उद्ध्वस्त करण्यात सफल झाला आहे. त्यामुळे आता तो युक्रेनचे रणक्षेत्र तसेच आत दूरपर्यंत ड्रोन व क्षेपणास्त्र मारा करू शकतो. परिणामी रशियाने अ) युक्रेनची अनेक एस ३०० अँटी एअरक्राफ्ट मिसाईल रडार्स, ओएसए एकेएम मिसाईल सिस्टीमस् आणि एयर टार्गेट डिटेक्शन रडार स्टेशन्स नष्ट केली आहेत; ब) सर्वात लक्षणीय मिसाईल हल्ला; राजधानी किव्हमधे तैनात अमेरिकन सर्फेस टू एअर पॅट्रिऑट मिसाईलच्या एक बॅटरीच्या पाच लाँचर्स आणि मल्टिफंक्शनल रडार स्टेशनला उद्ध्वस्त करणारा किंझल हायपरसॉनिक मिसाईल्सचा समन्वयी हल्ला होता. अर्थातच अमेरिकेने; "द किंझल मिसाईल हॅज मेअरली डॅमेज्ड द पॅट्रिऑट" या शब्दांमधे, याचा इन्कार केला; क) रशियन लष्कराने; युक्रेनच्या बहुतांश लष्करी विमानतळांवरील कमांड पोस्ट, रडार स्टेशन्स, अॅम्युनेशन डेपो आणि विमानांना, हवेतून मारा करणाऱ्या, दूर पल्ल्याच्या अत्यंत अचूक हत्यारांचा वापर करून उद्ध्वस्त केले; ड) स्टारोकोस्तीयनटीव्ही विमानतळावरील हल्ल्यात, सेव्हंथ टॅक्टिकल एव्हिएशन ब्रिगेडची नऊ सूखोय २४ एम, चार सुखोय २४ एमआर आणि १२ एरो एल ३९ सी अल्बोस्ट्रोस विमाने तसेच प्रत्येकी एक इंधन व दारुगोळा डेपो रशियन वायुसेनेच्या माऱ्याने नष्ट झाले. हा विमानतळ, नाटो योग्यतेचा असून अमेरिकेने विकसित केला होता. सुखोय २४ एमआर विमान, स्टॉर्मशाडो क्षेपणास्त्र नेत. युद्ध सुरू झाले तेव्हा युक्रेनकडे १० सुखोय २४ एमआर विमाने होती. या ताज्या हल्ल्याच्या परिणामी, युक्रेनकडे आता फक्त सहा स्टॉर्मशाडो लाँच प्लॅटफॉर्मस् उरले आहेत. याच काळात रशियाने युक्रेनचे सेंट्रल डिसिजन पॉईंटही नष्ट केले आहेत. यात; ४० केएच १०१/ ५५५ एअर टू एअर क्रुझ मिसाईल नेणाऱ्या नऊ टीयू ९५ स्ट्राटेजिक बॉम्बर्स आणि ११ इस्कंदर एम क्षेपणास्त्रांचा वापर करण्यात आला. युक्रेनने रशियावर केलेल्या दहशतवादी हल्यांमध्ये; मार्च महिन्यातील क्रेमलीनवर झालेला ड्रोन हल्ला व ऑईल डेपोवरील हल्ला, लिऑपर्ड रणगाड्यांचा वापर करून एप्रिलमधे आहेत रशियन मिलिटरी बेसवर झालेला हल्ला आणि नुकताच ३० मे, २०२३ रोजी मास्कोवर झालेला ड्रोन हल्ला; हे प्रमुख होते. या सर्वांसाठी अमेरिका व नाटो राष्ट्रांनी युक्रेनला गोपनीय माहिती व संसाधने दिली होती असा रशियाचा आरोप होता. ३० मे, २०२३ रोजी मास्कोवर झालेला युक्रेनी ड्रोन हल्ला, युक्रेनच्या डिसिजन मेकिंग सेंटरवर झालेल्या हल्ल्याचा सूड उगवण्यासाठी केला गेला होता. यात आठ ड्रोन्सचा वापर झाला पण एकही लक्ष्यावर पोचू शकला नाही. सर्व ड्रोन्स पन्ट्सीर एस मिसाईलच्या भक्ष स्थानी पडले. युक्रेन रशियाच्या आत दूरपर्यंत जाऊन, तिथल्या लोकांच्या सहाय्याने, स्थानिक हत्यारांचा वापर करून छुपे लढा (प्रॉक्सी वॉर) देत आहे. या सगळ्यात रशियाचेही बरेच नुकसान होत आहे. समाजमाध्ममे, यू ट्यूब, रेडियो आणि प्रसारमाध्यमांमधील बातम्या तसेच तेथे असलेल्या धूसर युद्धजन्य परिस्थितीच्या (फॉग ऑफ वॉर) आधारे, रशिया आणि युक्रेनच्या लष्करी (स्ट्रटेजिक/ टॅक्टिकल) मोहिमांचा अचूक आढावा घेणे वाटते तितके सोपे नाही. त्यातच रशियाचे बदललेले लष्करी धोरण यशस्वी मानले तर, युक्रेनने रशियावर प्रतिहल्ला (काऊंटर ऑफेंसिव्ह) करण्याची शक्ती गमावली आहे हे स्पष्ट होते. पण युक्रेनवर बदललेल्या रशियन लष्करी धोरणाचा लक्षणीय सामरिक परिणाम न झाल्यामुळे जवळच्या भविष्यात युक्रेनचा प्रतिहल्ला सुरू झाला तर अमेरिका व नाटो राष्ट्रांच्या मदतीनी युक्रेन हे युद्ध कितीही काळ चालवू शकतो आणि अशा परिस्थितीत रशिया, युक्रेनला वठणीवर आणण्यासाठी म्हणा किंवा पराभूत करण्यासाठी म्हणा अण्वस्त्रांचा वापर करण्याचा विचार करू शकतो. रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनाही याची कल्पना असलीच पाहिजे म्हणून तर त्यांनी रशियन टॅक्टिकल न्युक्लिअर वेपन्स बेलारुसमधे पाठवली आहेत. तेथून रशिया; युक्रेन लष्कर आणि त्याला मदत करणाऱ्या, रशियाशी संलग्न असणाऱ्या नाटो राष्ट्रांमधून येणारी सशस्त्र कुमक त्या युक्रेनमधे पोहोचण्याआधीच नष्ट करेल. त्याच्या विरोधात अमेरिका व नाटो राष्ट्रांनी सामरिक विरोध केला तर "जगाला तिसऱ्या आण्विक महायुद्धाला सामोरे जावे लागेल" ही गर्भित धमकी पुतीन यांनी बेलारूस टीएनडबल्यु तैनातीद्वारे दिली आहे. युद्ध पुढे कसे वळण घेते हे पाहणे औत्सुक्याचे असेल. abmup54@gmail.com