पहिल्या महायुद्धाचे निखारे धुमसत असताना आणि जखमा ओल्या असताना बेल्जियमसारख्या छोट्या देशाने ऑलिम्पिक भरवण्याबाबत दाखवलेले धाडस कौतुकास्पद होते. ऑलिम्पिक १९१६ बर्लिनमध्ये नियोजित होते. परंतु युरोपातील बहुतेक प्रमुख देश युद्धात ओढले गेल्यामुळे ही स्पर्धा तिच्या अल्पकालीन इतिहासात प्रथमच रद्द करावी लागली. युद्धविदग्ध युरोपच्या भूमीवर ऑलिम्पिक भरवून सामंजस्य आणि सहअस्तित्वाची निकड अधोरेखित होईल, असे पिअर द कुबर्ता यांच्यासह ऑलिम्पिक समितीच्या अनेक सदस्यांना वाटून गेले. बर्लिन १९१६ आणि बेल्जियम १९२० या दोन्ही यजमानपदांचा निर्णय १९१२मध्ये स्टॉकहोमला झाला, पण दोन वेगवेगळ्या सत्रांमध्ये. बर्लिनसमोर आणखी काही शहरांच्या उमेदवारीची स्पर्धा होती. बेल्जियमच्या बाबतीत मात्र त्यांच्या ऑलिम्पिक समितीचे बॅरन एदुआर्द दे लावलेये यांनी केवळ प्राथमिक प्रस्ताव मांडला होता.

त्यावेळी शहराचे नाव निश्चित झाले नव्हते. तेव्हा इतर कोणत्याही देशाने उत्सुकता दाखवलेली नव्हती. बर्लिनमध्ये १९१३ पासून निधी संकलन आणि स्टेडियम उभारणीविषयी हालचाली सुरू झाल्या. पुढील वर्षी म्हणजे १९१४मध्ये कामाला वेग यायचा होता. युरोपमध्ये तोपर्यंत काही सत्तांदरम्यान कुरबुरी सुरू झालेल्या होत्या. तरी त्यांचे रूपांतर महाविस्फोटक महायुद्धात होत आहे हे आकळण्यासाठी १९१५ साल उजाडावे लागले. विसाव्या शतकाच्या सुरुवातीपासूनच महत्त्वाकांक्षी जर्मनी, बलाढ्य ब्रिटन, युद्धसज्ज राहण्याच्या निकडीच्या छायेत सतत वावरणारा फ्रान्स, जपानशी पराभवानंतर पायाभूत सुविधा उभारणीच्या माध्यमातून ताकद वाढवू इच्छिणारा रशिया; या महासत्तांच्या साठमारीत स्वत:चे अस्तित्व टिकवण्याच्या धडपडीत असलेले ऑ्ट्रिरया-हंगेरी, ऑटोमान साम्राज्य आणि इटली, बाल्कन टापूतील इतर युरोपिय देश यांच्यातील सुप्त संघर्ष विविध माध्यमांतून, व्यासपीठांवर व्यक्त होऊ लागला होता. विसाव्या शतकाच्या पहिल्या दशकात हे परस्परसंबंध ताणले जाऊ लागले, ते दुसर्‍या शतकाच्या मध्यावर तात्कालिक घटनेतून तुटलेच. यातून एकापाठोपाठ एक युद्धठिणग्या पडत गेल्या.

जुलै महिन्यात मध्य आणि पूर्व युरोपापुरता उडालेल्या संघर्षाने अल्पावधीत पश्चिम युरोप व्यापला. विशेष म्हणजे जुलै १९१४ नंतर आणि जर्मनीचा युद्धात सक्रिय सहभाग वाढत असतानाही सुरुवातीच्या काळात बर्लिन ऑलिम्पिक फार तर काही महिने पुढे ढकलावे अशीच चर्चा ऑलिम्पिक समिती सदस्यांमध्ये सुरू होती. तरीदेखील १९१६मधील ऑलिम्पिकच्या तयारीत खंड पडला नव्हता. ऑलिम्पिक स्टेडियमची उभारणी झाली होती. पिअर द कुबर्ता यांनी भेटीगाठी सुरू केल्या. पण युद्धात जर्मनीचा सहभाग वाढला तेव्हा म्हणजे ऑगस्ट १९१५ मध्ये बर्लिन ऑलिम्पिक सुरुवातीस ‘स्थगित’ करण्यात आले. ते १९२४ मध्ये भरवण्याचा कुबर्ता यांचा विचार होता, जो अर्थातच पूर्णत्वास जाऊ शकला नाही. अखेर ऑलिम्पिक रद्द करण्यात आले.

ऑलिम्पिक प्रतीकांचा जन्म

बेल्जियममधील अँटवर्प येथे झालेले ऑलिम्पिक ऐतिहासिक ठरले, कारण याच स्पर्धेत तीन ऑलिम्पिक प्रतीकांचा जन्म झाला. ऑलिम्पिक ध्वज, ऑलिम्पिक शपथ आणि शांततेचे प्रतीक म्हणून पांढरी कबुतरे उडवण्याचा उपचार. यांतली पहिली दोन प्रतीके आजतागायत टिकवली गेली. ऑलिम्पिक ध्वजाचे डिझाइन कुबर्ता यांच्या संकल्पनेतून साकारले गेले. पांढर्‍या पार्श्वभूमीवर पाच वेगवेगळ्या रंगांची परस्पर बद्ध वर्तुळे किंवा रिंग याचा अर्थ नेमका काय याची उजळणी जवळपास प्रत्येक ऑलिम्पिकच्या निमित्ताने जनसंज्ञापनांमध्ये होतच असते. कुबर्ता यांनी युरोप-अमेरिकेपलीकडे जाऊन इतर खंडांचा, विशेषत: आशिया आणि आफ्रिकेचा त्यावेळी विचार केला हे त्या काळी उल्लेखनीय ठरले. या डिझाइनची जुळणी युद्धाच्या आधीपासून सुरू होती. ऑलिम्पिक ध्वजाचे पहिले प्रकटीकरण पॅरिस येथे १९१४ मध्ये, युद्धाला तोंड फुटले त्या वर्षीच व्हावे हा मात्र योगायोग.

‘ऑलिम्पिकच्या एका ध्वजाखाली विविध देशांतील खेळाडूंनी बंधुभावातून एकत्र येऊन, खिलाडूवृत्तीने क्रीडाकौशल्य सादर करावे आणि खेळांच्या माध्यमातून जागतिक शांततेचे संवर्धन करावे’ हा संदेशही त्यावेळी पहिल्यांदा प्रसृत झाला. त्याची प्रतीकात्मकता युद्धोतर दिवसांत आश्वस्त करणारी ठरली. नियमांचे पालन आणि खिलाडू वृत्तीचे आचरण या दोन मूल्यांशी कटिबद्ध राहण्याविषयीची ऑलिम्पिक शपथही त्या स्पर्धेपासून सुरू झाली. शांतता प्रसारावी म्हणून पांढरी कबुतरे वगैरे सोडण्याची परंपरा त्या स्पर्धेपासूनच सुरू झाली. कालांतराने ती (मानव आणि कबुतर अशा दोहोंच्या भल्यासाठी!) थांबवली गेली, तरी ऑलिम्पिक शपथ आणि ऑलिम्पिक ध्वजारोहण या प्रथा आजही सुरू आहेत.

बेल्जियमच्या जनतेसाठी…

बेल्जियम ही पहिल्या महायुद्धामध्ये एक प्रमुख युद्धभूमी होती. जर्मनीने फ्रान्सवर हल्ला करण्यासाठी बेल्जियमचा वापर केला, त्यावेळी केलेल्या अनन्वित अत्याचारांचा उल्लेख इतिहासात ‘रेप ऑफ बेल्जियम’ म्हणून केला जातो. बेल्जियम त्या युद्धात तटस्थ होता. पण त्या देशाचा वापर जर्मनीने त्यांच्या डावपेचासाठी केला आणि विध्वंस घडवला. मनुष्यहानी मोठ्या प्रमाणात झाली. बेल्जियमच्या जनतेला अभिवादन करण्यासाठी १९२० मधील ऑलिम्पिक अँटवर्प येथे भरवण्याचा निर्णय युद्ध संपल्यानंतर म्हणजे १९१९ मध्ये झाला. ऑलिम्पिकसाठी शहर निवडीची प्रक्रिया १९१४ मध्ये सुरू झाली होती. अँटवर्पबरोबर ॲमस्टरडॅम, बुडापेस्ट आणि रोम या शहरांची उमेदवारी ऑलिम्पिक समितीपर्यंत आली. युद्धाची फारशी झळ न पोहोचलेल्या अमेरिकेतील क्लीव्हलँड, अटलांटा आणि फिलाडेल्फिया या शहरांनी, तसेच क्युबातील हवाना शहरानेही इच्छा व्यक्त केली होती. मात्र नंतरच्या काळात फ्रान्सने बेल्जियमच्या पारड्यात वजन टाकले. त्यानंतर अँटवर्पची निवड सर्वानुमते झाली.

त्या स्पर्धेसाठी आलेल्या देशांच्या उपस्थितीत फरक पडलेला दिसला. पॅरिस शांतता परिषदेने (१९१९) युद्धखोर ठरवलेले जर्मनी, ऑ्ट्रिरया, हंगेरी, बल्गेरिया, ऑटोमान साम्राज्य यांच्या सहभागावर बंदी आणली गेली, त्यामुळे ते उपस्थित नव्हते. युद्ध आणि १९१८ मधील क्रांती यांमुळे अस्थिर, अस्वस्थ बनलेल्या रशियानेही पथक पाठवले नाही. अँटवर्पच्या आयोजकांना स्पर्धा भरवण्यासाठी अक्षरश: वर्षभराचा अवधी मिळाला होता. त्यांच्याजवळ फार पैसा नव्हता. खरे तर बेल्जियम हा युरोपात सर्वप्रथम उद्योगप्रधान बनलेला देश. पण वर्षानुवर्षे हा देश युरोपची रणभूमीच ठरत आला. पहिल्या महायुद्धानंतर फेरउभारणीचे आव्हान होते. तरीदेखील बेल्जियमने ऑलिम्पिक भरवून दाखवले. प्रेक्षकांचा प्रतिसाद मात्र फारसा लाभला नाही. कारण तिकिटेच बहुतांना परवडणारी नव्हते. तिकिटांचे दर चढे ठेवले गेले, कारण ऑलिम्पिक आयोजनाचा खर्च भागवण्यासाठी तोच एक मार्ग होता. अखेरच्या टप्प्यात विद्यार्थ्यांसाठी फुकट प्रवेश ठेवण्यात आला, तरी फार उपयोग झाला नाही. ऑलिम्पिकसाठी मोजकीच संकुले उभारली गेली. बाकी स्पर्धा उपलब्ध क्रीडांगणे आणि संकुलांमध्येच घेतल्या गेल्या. ऑलिम्पिकमध्ये २९ देशांतील दोन हजार ६२६ खेळाडू सहभागी झाले. अमेरिकेने सुवर्णपदके आणि एकूण पदकांमध्येही आघाडी घेतली.

पण या तपशिलापेक्षाही युद्धानंतर इतक्या नजीकच्या काळात युरोपला ऑलिम्पिक भरवावेसे वाटले, आणि त्यातून जगासमोर गेलेला प्रतीकात्मक संदेश महत्त्वाचा ठरला. युरोप आणि जगासाठी अत्यंत विध्वंसक ठरलेल्या विसाव्या शतकातील त्या पूर्वार्धाचा इतिहास युद्धे, वसाहतींचे बंड, स्वातंत्र्य चळवळी, साम्राज्यांचे पतन, अणुबॉम्बचा उदय अशा अनेक वैशिष्ट्यांसकट मांडता येईल. पण बॉम्बगोळे नि तोफगोळे सर्वत्र सांडत असतानाही युद्धानंतर, युद्धांदरम्यान ऑलिम्पिक स्पर्धा भरवण्यासाठी, त्यांत भाग घेण्यासाठी माणसे एकत्र येत होती नि स्पर्धा आपापल्या परीने यशस्वी पार पाडण्यासाठी झटत होती. पिअर द कुबर्तांच्या ऑलिम्पिक चळवळीची पहिली अग्निपरीक्षा तिला कमकुवत करण्याऐवजी बळकट करणारी ठरली. ऑलिम्पिकचा श्वेत ध्वज उंच फडकतच राहिला!