डॉ. रवींद्र उटगीकर

यंदाच्या जागतिक पर्यावरण दिनानिमित्त (५ जून) प्लास्टिकमुक्तीच्या स्वप्नपूर्तीतील आपापला वाटा उचलण्यास सुरुवात करू या..

विसरू नका, तुमच्या अनवाणी पायांच्या स्पर्शाने वसुंधरेलाही शहारून जायचे असते आणि तुमच्या बटांशी खेळण्याची वाऱ्यालाही आस असते..– खलील जिब्रान

nagpur, Man Stabbed , Asking Couple to Move Vehicle, Blocking Road, nagpur crime news, nagpur Man Stabbed, Man Stabbed nagpur, marathi news, nagpur news,
नागपूर : प्रेयसीसमोर अपमान केल्यामुळे चाकू भोसकला….
chaturang article, maintain relationship, good relations, avoid assuming, assuming in relationship, assume, stay away from toxic people, spreading bad thoughts in relationship, husband wife
जिंकावे नि जगावेही : नात्यांमधला नीरक्षीरविवेक!
Video 5 Rupees Lemon Jugad How To Clean Gas Burners at Home
अर्ध्या लिंबाच्या रसात ‘ही’ गोष्ट मिसळून अर्धवट पेटणाऱ्या गॅस बर्नरवर करा उपाय; पैसे, वेळ वाचवणारा जुगाड, Video
young woman saved a caged dog in a burning building shocking video goes viral on social media
जीवाची पर्वा न करता तरुणीने वाचवला पेटत्या इमारतीमध्ये फसलेल्या कुत्र्याचा जीव, VIDEO पाहून येईल अंगावर काटा

कधी कधी आठवतच नाही आपल्याला, समुद्राच्या पाण्याने आपल्या पायांना शेवटचा कधी स्पर्श केला होता ते; बेभान वाऱ्याने विस्कटलेल्या केसांमधून लगेच हात फिरले नव्हते ते.. कधी कधी लक्षातच येत नाही आपल्या, निसर्ग नव्हे, तर आपणच त्याच्यापासून दूर जात राहतो ते; आपल्यात पंचप्राण फुंकणारी हीच ती पंचतत्त्वे आहेत ते..

गावीही नसते आपल्या, ज्याची आपण अपत्ये, त्याला आपणच आपत्तीचे रूप धारण करायला लावतो ते..
कधीकाळी निसर्गाशी पूर्णत: एकरूप होऊन जगणारे आपण, आज त्याच्याशीच फारकत घेऊन जगू पाहतोय. कोणी त्या जगण्याला कृत्रिम म्हणेल, कोणी परिस्थितीनुरूप आकार घेणारे म्हणेल.. इंग्रजीमध्ये या दोन्हीसाठी प्लास्टिक हा प्रतिशब्द वापरला जातो. घडणसुलभ, म्हणजे न तुटता आकार देता येऊ शकणारा, या अर्थाने या शब्दाने जन्म घेतला. आज ज्याला प्लास्टिक म्हटले जाते, त्याची निर्मिती दुसऱ्या महायुद्धानंतर झाल्यावर हा शब्द त्याला चिकटला ते कायमचा. परंतु तेव्हा वरदान वाटलेल्या या पदार्थाचा तेव्हापासून वापरात आलेला कण नि कण कोणत्या ना कोणत्या रूपात आजही आपल्या आसमंतात आहे! निसर्गद्रोही जीवनशैलीसाठी तो आपल्याला साथ देत आहे.

नाशकाले ‘प्लास्टिक’ बुद्धी

गेल्या पाऊण शतकाच्या इतिहासात जगात साधारणत: ८.५ अब्ज टन एवढय़ा प्लास्टिकची निर्मिती झाली आहे. त्यांपैकी फेरप्रक्रिया झालेले ९% आणि पेटवून दिल्याने प्रदूषणकारी वायूंच्या रूपात आपल्याभोवती फेर धरलेले १२% वगळता ७६% प्लास्टिक आजही जगभरातील कचऱ्याचे ढिगारे फुगवत जशाच्या तशा रूपात अस्तित्वात आहे. उरलेले ३% प्लास्टिक सागरांत सामावले आहे. सागरस्तराखालील जलचरजीवन त्या प्रदूषणाने धोक्यात आणले असून दरवर्षी १० लाख जलचरांचा जीव त्याने घेतला जात आहे. २०५० पर्यंत आपल्या सागरांमध्ये जेवढे मासे असतील त्यापेक्षा अधिक प्लास्टिकचे तुकडे असतील, असा इशारा आता अभ्यासकांनी दिला आहे.

या पार्श्वभूमीवर, यंदाचा जागतिक पर्यावरण दिन (५ जून २०२३) हा ‘प्लास्टिक प्रदूषणापासून मुक्ती मिळवा’ (बीट प्लास्टिक पोल्युशन) या संकल्पनेवर साजरा केला जात आहे. परंतु ही ओळ वाचत असतानाही दर मिनिटाला एक ट्रक भरेल एवढे प्लास्टिक आपण सागराच्या पोटात ढकलत आहोत. ते कमी म्हणून की काय, त्यापेक्षा २५ पटींनी अधिक प्लास्टिक आपल्या अवतीभोवतीच्या कचराकोंडाळय़ांमध्ये आपण फेकून दिले आहे. काही शास्त्रज्ञांच्या मते, त्यातुलनेत नगण्य, परंतु मानवी जिवाच्या दृष्टीने लक्षणीय असे पाच ग्रॅम प्लास्टिक दर आठवडय़ाला, म्हणजे आपल्या सरासरी आयुर्मानकाळात १८ किलो एवढे मायक्रोप्लास्टिक आपल्या पोटात पोचू लागले आहे. म्हणजे हे संकट आता आपल्या दारातून बरेच आत पोचले आहे!

भारतीयांच्या आयुर्मानात घट

परंतु हे संकट काही प्लास्टिकपुरते मर्यादित नाही आणि आज ते आपल्या पोटापर्यंत पोचले असले तरी आपल्या उद्याच्या पिढय़ांच्या गळय़ापर्यंतही पोचणार आहे. कारण महाकाय वाटणारे प्लास्टिक जगातील ३.४% एवढय़ाच हरितगृह वायूंच्या (ग्रीन हाऊस गॅसेस – जीएचजी) निर्मितीला कारणीभूत ठरत आहे. त्याच्याही वीस पटींनी आपले अवकाश काळवंडण्याला खनिज इंधने कारणीभूत ठरत आहेत. या हरितगृह वायूंमुळे आपल्याला विकोपाच्या हवामान बदलांना सामोरे जावे लागत आहे. भारताच्याच संदर्भात बोलायचे, तर गेल्या वर्षीच्या पहिल्या दहा महिन्यांतील ३०३ पैकी २७१ दिवसांत भारताच्या कोणत्या ना कोणत्या भागाला अतिविकोपाच्या हवामानाचे दुष्परिणाम अनुभवावे लागले आहेत. ‘स्टेट ऑफ इंडियाज एनव्हायरन्मेंट रिपोर्ट २०२३’ या अहवालानुसार, या वायूंच्या परिणामी होणाऱ्या प्रदूषणामुळे प्रत्येक भारतीयाला आयुष्यातील ४ वर्षे आणि ११ महिने एवढा काळ गमवावा लागत आहे!

जागतिक हवामानशास्त्र संस्थेने (डब्ल्यूएमओ) अलीकडेच जारी केलेल्या माहितीनुसार, हे संकट अलीकडे गहिरे होताना दिसत असले, तरी गेल्या ५० वर्षांपासून स्थिती खालावतच चालली आहे. भारतात त्याच्या परिणामी सरासरी दररोज सात मृत्यू होत आहेत. आता तर २०२७ पर्यंतच्या पाच वर्षांत जागतिक तापमानवाढ औद्योगिकीकरणपूर्व स्तरापेक्षा १.५ अंशांच्याही पलीकडे जाण्याचा धोका डब्ल्यूएमओने दिला आहे. म्हणजे ज्या स्थितीपलीकडे जगाने जाऊ नये, यासाठी आता नेटाने प्रयत्न सुरू झाले आहेत, तिच्या उंबरठय़ावर आपण पोचलोही आहोत! त्यामुळे १९६० मध्ये जन्म झालेल्या व्यक्तीपेक्षा २०२० मध्ये जन्म झालेल्याला तीन पटींनी अधिक अतिविकोपाच्या हवामानाला सामोरे जावे लागणार आहे.

हिरव्या सोन्या’ची संधी

एकूणच, या खनिज इंधनांनी आपली अवस्था ‘धरलं तर चावतंय..’ अशी करून टाकली आहे. त्यांना निसर्गस्नेही पर्याय शोधणे गरजेचे झाले आहे. हवा आणि पाण्याच्या प्रदूषणातून आरोग्याला उद्भवणाऱ्या धोक्यांमुळेही ही इंधने हानीकारक ठरत आहेत. श्वसनविकारांपासून हृदयविकारापर्यंत वेगवेगळय़ा आजारांना ती निमंत्रणे देत आहेत. भारतासारख्या खनिज इंधनासाठी बहुश: आयातीवर अवलंबून असणाऱ्या देशाच्या अर्थकारणावरही या इंधनांचा ताण वाढत आहे. विशिष्ट देशांवरील आपले हे अवलंबित्व इंधन सुरक्षाही धोक्यात आणत आहे.

खजिन इंधनांना पर्याय शोधण्याच्या जगभर सुरू असलेल्या प्रयत्नांत भारतही सहभागी आहे. २०३० पर्यंत आपल्या गरजेच्या ५०% ऊर्जानिर्मिती अक्षय स्रोतांपासून करण्याचे उद्दिष्ट आपल्या देशाने ठेवले आहे. त्यासाठी सौर ऊर्जा व पवन ऊर्जा या पर्यायांबरोबरच जैवइंधन आणि ग्रीन हायड्रोजन हे आपल्यासाठीचे नवे आशेचे किरण आहेत. जैवइंधननिर्मिती ही तर या संकटाने आपल्याला देऊ केलेली संधीच ठरणार आहे. शेतांतील जैविक अवशेष आणि टाकाऊ शेतमाल यांपासून जैवइंधनाच्या उत्पादनाचे तंत्रज्ञान आता विकसित झाले आहे. त्याची मुबलकता हे आपल्यासारख्या शेतीप्रधान देशासाठी ‘हिरवे सोने’ ठरण्याची शक्यता आहे. खनिज इंधनाच्या रूपातील ‘काळय़ा सोन्या’ने एके काळी आखाती देशांमध्ये समृद्धीच्या खुणा उमटवण्यास सुरुवात केली होती. जैवइंधनांमुळे ती संधी भारताला मिळण्याची चिन्हे आहेत. शेती ही आपल्या ग्रामीण अर्थकारणाचा कणा असल्याने हे इंधन संक्रमण ग्रामीण रोजगार आणि ग्रामीण अर्थव्यवस्था यांना बळकटी देणारे ठरू शकते, हा मुद्दा विशेष दखल घेण्यायोग्य आहे.

खनिज इंधनांप्रमाणेच प्लास्टिकलाही पर्याय शोधण्याचे प्रयत्न जगभरात सुरू आहेत. अक्षय रसायने व जिन्नस (रिन्युएबल केमिकल्स अँड मटेरिअल्स – आरसीएम) या व्यापक चौकटीतून याकडे पाहिले जात असून, त्याचा भाग म्हणून जैवप्लास्टिकची निर्मिती केली जात आहे. पॉलिलॅक्टिक अॅसिडच्या रूपातील जैवप्लास्टिकनिर्मितीचे तंत्रज्ञान आता आपल्या देशातही विकसित झाले आहे. जैवभार हाच त्याचाही स्रोत राहणार आहे.

जगभरातील मानवजातीची जीवनरेखा भविष्यात आणखी गडद होणार की फिकी, हे हवामान बदल रोखण्यासाठीच्या अशा उपाययोजनांवर विसंबून राहणार आहे. भारत हा जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश, जगातील पाचव्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था आणि जगातील सर्वात मोठी उदयोन्मुख बाजारपेठ आहे. त्यामुळे हवामान बदलरोधक शाश्वत विकासाच्या रथाचे सारथ्य करण्याची क्षमता आपल्या देशामध्ये आहे.

आपला देश २०४७ मध्ये स्वातंत्र्याची शताब्दी साजरी करत असेल तेव्हा एका विकसित देशाचे स्वप्नही पूर्ण झालेले असेल, असा आपला संकल्प आहे. अमृत महोत्सवपश्चात वाटचालीची सुरुवात त्या दिशेने झालीही आहे. आता गरज आहे प्रत्येक भारतीयाने निसर्गस्नेही जीवनशैली अंगीकारण्याची; त्यातून या शाश्वत विकासरेषेवरील एक बिंदू होण्याची. हा शाश्वत बिंदूंचा जनसागरच भारताला बलसागर करेल, ही खूणगाठ बांधू या.

(लेखक प्राज इंडस्ट्रीजचे उपाध्यक्ष असून, ज्येष्ठ व्यवस्थापनतज्ज्ञ आहेत.)