स्थळ- तेच ते, नुकतंच आंदोलनस्थळांच्या यादीतून वगळण्यात आलेलं… आठवड्यापूर्वीची गोष्ट असेल. एक चष्मा लावलेला मुलगा पोलिसांशी वाद घालत होता. “नहीं सर, मेरा है ये, मेरे साथ जाएगा. मैं अंदर रख लुंगा, पर आप छिनेंगे नहीं. ये आप नही ले सकते…” गर्दीतली एक मुलगी “सर, फ्लॅग क्यू छिना आपने?” मग गर्दीतून आणखी एक आवाज “ये जो छिना है, किस चिज का है ये?” हा आवाज नक्कीच कोणा जेन-झीचा नव्हता. कारण त्या पिढीचं कोणी हा प्रश्न विचारूच शकत नाही.
सध्या अनेकांना हा प्रश्न पडला आहे? ‘क्या चीज है ये?’. होतं काय त्या झेंड्यात एवढं? काळं झिरझिरीत कापड. त्यावर एक कवटी, दोन हाडं आणि एक गवताची टोपी. ही प्रतिमा ‘नीट’ पेपरफुटीनंतरच्या आंदोलनांतही ठिकठिकाणी दिसली होती आणि आता मुख्य निवडणूक आयुक्तांविरुद्धही तसेच झेंडे फडकवले जात आहेत. ‘असेल काहीतरी या जेन-झीचं…’ म्हणून बहुतेकांनी सोडून दिलं होतं. पण झालं असं की परवा नेहा बोराच्या लाल टी-शर्टवरही तीच खोपडी दिसली. खाली ठसठशीत अक्षरांत लिहिलेलं होतं- ‘वन पीस’. नेहाचे त्या टी-शर्टमधले फोटो व्हायरल झाले आणि पुन्हा एकदा ‘सत्ता उलथवून टाकण्याचा कट’, ‘देशाविरोधी कारस्थान’, ‘परकीय शक्ती’ वगैरे आरोपांना उधाण आलं. याला आधार एवढाच की असेच झेंडे नेपाळमधल्या आंदोलनातही दिसले होते आणि त्यानंतर तिथे सत्तांतर झालं.
पण हा झेंडा केवळ नेपाळ आणि भारतातल्याच आंदोलनांत दिसलेला नाही. याआधी तो अन्यही अनेक देशांतील तरुणांच्या असंतोषाचा ‘आवाज’ ठरला आहे. या झेंड्याला म्हणतात ‘जॉली रॉजर फ्लॅग’ आणि तो आला आहे ‘वन पीस’ या जेन-झीला ‘अति-महाप्रिय’ असलेल्या ॲनिमेमधून. तर असं आहे, की हे जेन-झी विशेषतः मुलगे ॲनिमेच्या विश्वातच जगतात. त्यांची ‘बकेट लिस्ट’ सदैव भरलेलीच असते. त्यांच्या टी-शर्ट्सपासून सोशल- मीडिया स्टेटसपर्यंत साऱ्या गोष्टी ॲनिमेप्रेमाच्या गाथा गात असतात. तर अशा या त्यांच्या विश्वातल्या आजवरच्या सर्वाधिक लोकप्रिय ॲनिमेपैकी एक म्हणजे ‘वन पीस’ आणि जगभरातल्या ‘जेन-झी’ असंतोषाचं प्रतीक ठरलेला हा झेंडा आहे त्या ॲनिमेचा नायक मंकी डी लूफीचा.
आधी ज्यांना ॲनिमेबद्दल फारसं काही माहीत नाही अशांसाठी- याचं मूळ आहे जपानमध्ये. तिथल्या कॉमिक बुक्सना ‘मांगा’ म्हटलं जातं. ॲनिमेच्या आधीपासून जपानी मांगा जगभर प्रचंड वाचला जाणारा साहित्यप्रकार होता आणि आजही आहे. बहुतेक सर्वच ॲनिमे मांगावर बेतलेले असतात. ‘वन पीस’चं विश्व निर्माण केलं आहे लेखक इचिरो ओडा यांनी. या मालिकेतलं पहिलं मांगा प्रसिद्ध झालं १९९७ मध्ये आणि आता तीन दशकं संपत आली तरी अद्याप मालिका संपलेली नाही. थोडक्यात जेन-झी बरोबरंच या कथेचा जन्म झाला आणि त्यांच्याबरोबरच ती वाढत गेली. ॲनिमेचे तब्बल ३६ ‘आर्क्स’ म्हणजेच ‘सिझन्स’ मिळून एक हजार १८० ‘एपिसोड्स’ प्रदर्शित झाले आहेत.
वरवर पाहता ही केवळ एक ‘पायरेट्स’ म्हणजेच समुद्री चाच्यांची कथा. साहस, जिद्द वगैरेची शिकवण देणारी, पण ती जाता जाता अनिर्बंध जुलमी सत्ता, सत्तेचं केंद्रीकरण, तिचं भ्रष्ट होणं, गुलामगिरी, शोषण, पर्यावरणाचा ऱ्हास, अमली पदार्थांच व्यापार अशा आजच्या जगातल्या समस्यांचाही खरा चेहरा दाखवते. खजिन्याच्या शोधत असताना आपल्या साथीदारांबरोबर या समस्यांशी आणि दुष्ट शक्तींशीही आपल्या मर्यादित क्षमता आणि साधनांनिशी झुंजणारा लूफी जेन-झीच्या आदर्शांमध्ये समाविष्ट झाला आणि त्याचा ध्वज त्यांचं प्रेरणास्थान ठरला.
पोलीस कदाचित केवळ काळं निशाण किंवा खोपडीचं चित्र पाहून हे झेंडे जप्त करत असतील, पण समाजमाध्यमी भाषेत सांगायचं तर ‘ॲनिमे पगलु जेन-झी’साठी तो त्यांच्या अस्तित्वावरच घाला आहे. भारतात या खोपडीकडे बहुसंख्यांचं लक्ष आकर्षित झालं ते नेहा बोराच्या टीशर्टमुळे. एकांगी विचार करणाऱ्या आणि प्रत्येक घटनेचा पूर्वग्रहदूषित दृष्टिकोनातून अर्थ लावणाऱ्या अनेक टीव्ही वाहिन्यांना या टी-शर्टमुळे आयतंच कोलीत मिळालं. नेहा बोरा आणि तिच्या विचारांच्या लोकांचा देशातली सत्ता उलथवून लावण्याचा डाव असल्याचे दावे केले जाऊ लागले. मूळ मुद्दा भरकटवण्यासाठी संधीच त्यांना मिळाली.
हा ‘जॉली रॉजर’ सर्वांत आधी दिसला तो २०२३ मध्ये इंडोनेशियात झालेल्या आंदोलनांत. पॅलेस्टाइनमधील वंशसंहाराविरोधात ऑक्टोबर २०२३ मध्ये योग्याकार्ता येथे झालेल्या निदर्शनांत तो फडकवला गेला. पण त्याकडे लक्ष वेधलं गेलं ते गतवर्षी ऑगस्टमध्ये त्याच देशात झालेल्या निदर्शनांमुळे. इंडोनेशियाचा स्वातंत्र्यदिन जवळ आला होता. एकीकडे अन्न आणि शिक्षणावरचा खर्च गगनाला भिडू लागला होता आणि त्याच वेळी खासदारांच्या भत्त्यांमध्ये मात्र वाढ करण्यात आली. त्यामुळे देशभर असंतोषाचं वातावरण होतं. त्यातच राष्ट्राध्यक्षांनी स्वातंत्र्यदिनी ठिकठिकाणी राष्ट्रध्वज फडकवण्यात यावेत, असं आवाहन केलं. या आवाहनानंतर काही तासांत देशातल्या अनेक कपडे विक्रेत्यांकडे जॉली रॉजर ध्वजाची मोठ्या प्रमाणात मागणी नोंदवली जाऊ लागली. स्वातंत्र्यदिनी अनेकांनी आपली घरं, गाड्यांवर राष्ट्रध्वजाऐवजी ‘वन पीस’चा हा झेंडा फडकवला. राष्ट्रवाद वगैरे उत्तमच पण जमिनीवर खदखदणाऱ्या असंतोषाकडे लक्ष कधी देणार आहात, असा प्रश्न या प्रतिकाने केला. तिथेही सत्ताधीशांनी मूळ प्रश्नांकडे लक्ष न देता ‘दुफळी माजवण्याचा प्रयत्न’ वगैरे म्हणत यावर टीका केली आणि विरोधकांनी हिंसेपेक्षा झेंडा फडकवून निषेध करणं कधीही बरं म्हणत तरुणांच्या मागण्यांकडे लक्ष वेधलं.
केवळ जेन-झीच नव्हे तर तिथल्या ट्रकचालकांनीही आपलं म्हणणं मांडताना हा झेंडा वापरल्याचं दिसलं होतं. रस्त्यांवर खड्डे पडतात म्हणून ट्रकचालकांनी अमुक एवढंच वजन वाहून न्यावं असा नियम इंडोनेशियाच्या सरकारने केला होता. क्षमतेपेक्षा कमी वजन वाहून नेल्यामुळे आमचं आर्थिक नुकसान होतं, असा दावा करत ट्रकचालकांनी सरकारच्या निषेधार्थ ट्रकच्या मागील भागावर ‘जॉली रॉजर फ्लॅग’ लावले होते. नेपाळमध्ये सत्तांतर झालं म्हणून तिथले झेंडे लक्षात राहिले, पण प्रत्यक्षात जॉली रॉजरचा सर्वाधिक वापर केला गेला तो इंडिनेशियातच. तिथे हे सारं घडलं ऑगस्ट २०२५मध्ये.
आणि सप्टेंबर २०२५ मध्ये नेपाळ सरकारने समाजमाध्यमांवर बंदी लादली. ही उंटाच्या पाठीवरची शेवटची काडी ठरली. नेत्यांचा भ्रष्टाचार, त्यांच्या मुलांचं उधळी जीवनशैली आणि गरिबीत पिचलेले बेरोजगार सर्वसामान्य तरुण या विरोधाभासाविषयीच्या असंतोषाचा भडका उडाला. तिथल्या तरुणांनीही आपल्या आंदोलनात जॉली रॉजर हाती घेतला होता. या आंदोलनाने तत्कालीन मुख्यमंत्री के. पी. शर्मा ओलींची सत्ता उलथवून टाकली.
पाठोपाठ ऑक्टोबर २०२५ मध्ये मादागास्करमध्ये नागरिकांनी पाणी आणि विजेच्या तुटवड्याविरोधात बंड पुकारलं. लष्कराला पाचारण करण्यात आलं, मात्र लष्कर सामान्य तरुणांच्या बाजूने उभं राहिलं. राष्ट्राध्यक्ष अँड्री राजोएलिना यांच्यावर महाभियोग चालविण्यात आला आणि त्यांना पायउतार व्हावं लागलं.
अमेरिकेतलं ‘नो किंग्ज’ आंदोलन असो वा ‘आइस’च्या अत्याचारांविरोधातला असंतोष तिथेही वारंवार हे झेंडे दिसले. याव्यतिरिक्त फ्रान्स, ब्रिटन, पेरू, सर्बिया, फिलिपिन्स, मोरोक्को, मेक्सिको थोडक्यात जगातल्या अनेक देशांत तरुणांच्या असंतोषाचं प्रतीक म्हणून हा झेंडा फडकवला गेला.
हे सारे देश वेगळे, त्यांची आर्थिक-राजकीय-सामाजिक गणितं वेगळी, पण तरीही या पिढीसमोरच्या समस्या जगभर साधारण सारख्याच आहेत. अनिश्चितता सर्वांनाच ग्रासून आहे. प्रस्थापितांविरोधात खदखदणारा रोष आहे आणि तो व्यक्त करण्यासाठी त्यांनी त्यांच्या पॉप्युलर कल्चरमधलं एक प्रतीक स्वीकारलं. आधीच्या पिढ्यांनी कधी वळलेली मुठ दाखवली कधी तीन बोटांचा सॅल्युट केला, कधी अश्रुधूर रोखणारी छत्री उघडून ‘अम्ब्रेला मुव्हमेंट’ केली तर कधी हिजाब जाळून पुरुषसत्तेचा निषेध केला. अभिव्यक्ती बदलली खदखद तीच आहे.
vijaya.jangle@expressindia.com
