योगेश पवार
ऑस्कर पुरस्कार विजेते संगीतकार ए. आर. रेहमान यांनी एका मुलाखतीत केलेल्या वक्तव्यामुळे मोठा गदारोळ झाला. पण त्यामुळे रेहमान यांनी जे म्हटले त्यातील गर्भित अर्थांकडे मात्र सगळ्यांचे दुर्लक्षच झाले.
‘सर्जनशील नसलेल्या लोकांच्या हातात आता निर्णयप्रक्रिया गेली आहे, यामागे कदाचित धर्मांधता हे कारण असू शकतं. मला थेटपणे सांगितलं जात नाही, पण तशी कुजबुज माझ्या कानावर येते. मला देतो म्हणून सांगितलं गेलेलं काम नंतर इतर संगीतकारांना दिलं गेलं’, असं ऑस्कर पुरस्कार विजेते संगीतकार ए. आर. रेहमान यांनी म्हटलं आणि त्यावरून बराच वाद झाला. वास्तविक यातून रेहमान एवढंच सांगतात की या क्षेत्राच्या परिसंस्थेतच काहीतरी मूलभूत बदललं आहे. ‘सुरक्षित’ आणि ‘धोकादायक’ याच्या अदृश्य सीमा ठरल्या आहेत, आणि त्यातूनच हळूहळू बॉलीवूडचे भगवेकरण सुरू झालं आहे. ही प्रक्रिया कोणाच्या आदेशांनी नाही तर अस्वस्थतेतून जन्मलेल्या स्व-नियमनाने होते आहे.

एक काळ होता जेव्हा हिंदी सिनेमाला आपलं देशप्रेम सिद्ध करावं लागत नव्हतं. त्यात असणारं भारताचं चित्रण बहुविध, इतरांच्या भावभावनांबद्दल जिज्ञासा असणारं आणि इतर संस्कृतींना सामावून घेणारं होतं. तेव्हा मशीद आणि मंदिर एकाच फ्रेममध्ये असू शकत होते, उर्दू शायरी प्रेमगीतांत सहज मिसळत होती, श्रद्धा ही राजकीय नव्हे, तर वैयक्तिक होती, देशप्रेम उथळ नव्हतं. आता ते बॉलीवूड दूर कुठेतरी हरवून गेले आहे.

बॉलीवूडचं भगवेकरण ढोलताशे वाजवत आलेलं नाही, ते आलं आहे बॉक्स ऑफिसच्या आत्मविश्वासातून, माध्यमांच्या प्रशंसेमधून आणि पुनरावृत्तीच्या सोयीस्करतेमधून. कोणत्या प्रकारच्या कथांना निधी मिळतो, कोणते हिरो लोकांना आवडतात, कोणत्या इतिहासाचे पुनर्लेखन केले जाऊ शकते, कोणत्या गुंतागुंतीच्या विषयाभोवती मौन पसरतं, यांतून ते दिसतं.

हा केवळ एखाद्या चित्रपटापुरता मुद्दा नाही, तर तो पॅटर्न आहे. ‘द काश्मीर फाइल्स’चंच उदाहरण घ्या. एका सत्यकथनाचा प्रयत्न या रूपात त्याचं मार्केटिंग केलं गेलं, पण तो चित्रपट कमी आणि राजकीय ‘कार्यक्रम’च अधिक होता. त्याचा दृष्टिकोन आत्मपरीक्षण करणारा नव्हता. त्याने प्रश्न विचारले नाहीत; तर थेट निकालच दिले. त्याच्या यशाने एक गोष्ट दाखवून दिली की जर तक्रार किंवा गाऱ्हाणे राष्ट्रवादाच्या रूपात मांडलं गेलं, तर ते फायदेशीर ठरतं.

त्यानंतर ‘द केरला स्टोरी’ हा चित्रपट आला. या चित्रपटाने केवळ सत्य आणि कल्पनेतील सीमारेषाच धुसर केली नाही, तर त्याने सत्याचा अधिकार सांगत कल्पनेचा शस्त्र म्हणून वापर केला. तो बचाव आणि संरक्षणाच्या भाषेत बोलत होता, पण त्याच वेळी संशय आणि भीती पेरण्याचं काम करत होता. त्याचा संदेश स्पष्ट होता, मुस्लीम समुदाय हा लोकसंख्याशास्त्रीय धोका आहे, असं सहज मांडलं जाऊ शकतं. त्याबद्दल माफी मागायचीही गरज नाही.

त्यानंतर कलम ३७० आला. त्याला गुंतागुंत किंवा परिणामांमध्ये रस नव्हता. त्याला केवळ स्वत:च्या कृतीचं समर्थन करायचं होतं. त्याने प्रेक्षकांना केवळ काय घडलं हे सांगितलं नाही, तर त्याबद्दल त्यांना काय वाटलं पाहिजे हेदेखील सांगितलं.

ऐतिहासिक चित्रपटांमध्ये, तर हा सूर अधिकच उघडपणे समोर आला आहे. ‘तानाजी’, ‘सम्राट पृथ्वीराज’ आणि ‘आदिपुरुष’ यांनी इतिहासाचा वापर करून घेतला. इतिहास हा त्यात सांस्कृतिक मालकी हक्काचे रणांगण बनला. मुस्लीम शासकांना विकृत व्यक्तिरेखांमध्ये रूपांतरित केलं गेलं. हिंदू राजांना आद्या-राष्ट्रवादी म्हणून सादर केलं गेलं. वर्तमानासाठी भूतकाळाला धारदार आणि लष्करी स्वरूप देण्यात आलं.

आता पूर्वीचे चित्रपट… ‘मुघल-ए-आझम’ने अकबराच्या मुस्लीम या सामुदायिक ओळखीची (आयडेंटिटी) भीती बाळगली नाही किंवा त्याच्या माणुसकीला कमी लेखलं नाही. ‘जोधा अकबर’ने कोणत्याही चिंतेशिवाय विविध धर्मांमधील प्रेम दाखवलं. सत्ता – संघर्ष असतानाही, विचारसरणीसाठी कधीही प्रतिष्ठेचा बळी दिला गेला नाही.

आता बदल केवळ विषयांपुरता नाही. तो नैतिक भूमिकेतही आहे.

पूर्वी, बॉलीवूडला संशयाचा आधार घेता-देता येत होता. बॉम्बे सिनेमाने जातीय हिंसाचार दाखवला, पण त्यातील नायक त्याचे उदात्तीकरण करत नाही. ‘रोजा’ने कोणत्याही सामुदायिक ओळखीला (आयडेंटिटी) खलनायक न ठरवता देशभक्ती सादर केली. ‘रंग दे बसंती’ने राष्ट्रवाद आणि जबाबदारी यातली अस्वस्थता चित्रित केली. ‘स्वदेस’ने देशप्रेमाचे शांत, नैतिक आणि जवळजवळ कौटुंबिक स्वरूप दाखवले.

जागतिक इस्लामोफोबियाच्या पार्श्वभूमीवर, ‘माय नेम इज खान’ या चित्रपटाने ‘‘माझं नाव खान आहे, आणि मी दहशतवादी नाही’’ असं म्हणण्याचं धाडस केलं होतं. आज, असे होऊ शकते?

‘पीके’ आणि ‘ओएमजी’सारख्या चित्रपटांनी श्रद्धेला लक्ष्य न करता धार्मिक अधिकारांवर प्रश्नचिन्ह निर्माण केले होते. ते खोडकर, अवमानकारक होते, पण अत्यंत लोकशाहीवादी होते. त्यांनी प्रेक्षक फक्त प्रतिक्रिया देतील असे न मानता, ते विचार करतील यावर विश्वास ठेवला. त्यांची तुलना आजच्या कथांशी करा. नवीन नायक विचार करत नाही; तो प्रश्न विचारत नाही; तो दावा करतो. तो सायुदायिक ओळखीवर (आयडेंटिटी) वाटाघाटी करत नाही; तो ती लादतो.

यालाच ‘प्रगतिशील भगवीकरण’ असे म्हणतात. म्हणजे सिनेमात हिंदू या सामुदायिक ओळखीचे (आयडेंटिटी) राजकीय संदेशात रूपांतर करणे. यातून श्रद्धा ही वैयक्तिक मार्गदर्शक न राहता एक सांस्कृतिक शस्त्र बनते. म्हणूनच ए.आर. रेहमान यांच्या टिप्पणीने अनेकांच्या भावना दुखावल्या.

एका मुलाखतीत रेहमान म्हणाले:

‘‘वातावरण बदलत आहे. पूर्वी लोक अधिक मोकळे होते. आता ‘मर्यादा ओलांडू नका’ अशी भावना आहे.’’

‘‘जेव्हा तुम्ही भीतीच्या छायेत निर्मिती करता, तेव्हा त्याचा सर्जनशीलतेवर परिणाम होतो. ती मर्यादित होते.’’

या काही सामान्य टिप्पण्या नाहीत. हे शब्द हिंदी सिनेमाच्या सर्वात उदार, सर्वसमावेशक, निर्भय काळात वावरलेल्या कलाकाराचे आहेत. रेहमान यांचे संगीत कधीही धार्मिक संकेतांबद्दल नव्हते. ते आध्यात्मिक संवादाबद्दल होते. त्यांच्या कलेने नेहमीच यावर जोर दिला की सामुदायिक ओळख (आयडेंटिटी) द्वेषपूर्ण न होता बहुआयामी असू शकते. म्हणून रेहमान जे बोलतात, त्यामागे राजकारण नाही, तर त्यांना जाणवलेला वातावरणबदल आहे.

कलाकार स्वत:च संपादन करू लागतात. निर्माते ‘सुरक्षित मार्ग’ निवडू लागतात. लेखक सूक्ष्मता टाळतात. मुस्लीम अदृश्य होतात, किंवा ते ऐतिहासिक खलनायक किंवा समकालीन संशयित होतात. गीतांमधून उर्दू गायब होते. आंतरधर्मीय प्रणय दिसेनासा होतो. संदिग्धता एक ओझे बनते.

आणि चित्रपट हळूहळू आरसा बनणे थांबवतो आणि भोंगा बनू लागतो.

हे एका मोठ्या सांस्कृतिक पुनर्रचनेचे प्रतिबिंब आहे, जिथे मतभेदांना देशद्रोह मानले जाते आणि प्रश्न विचारण्याला विश्वासघात ठरवले जाते. चित्रपटसृष्टी हे वातावरण निर्माण करत नाही; ती ते शोषून घेत आहे आणि अधिक तीव्र करत आहे.

आणि खरा धोका तिथेच आहे.

‘हैदर’सारख्या चित्रपटांनी शेक्सपियरच्या शोकांतिकेद्वारे काश्मीरचा शोध घेतला, तेव्हा त्यावर देशद्रोही असल्याचा आरोप झाला. ‘फिराक’ने गुजरात दंगलींच्या परिणामांचे परीक्षण केले, तेव्हा त्याला दुर्लक्षित केले गेले. जेव्हा ‘माय नेम इज खान’ने इस्लामोफोबियाला आव्हान दिले, तेव्हा त्याला ट्रोल केले गेले. हे चित्रपट फारसे बरे नव्हते म्हणून नाहीसे झाले नाहीत. ते नाहीसे झाले कारण त्यांच्या सभोवतालची परिसंस्था कठोर झाली.

एकेकाळी बॉलीवूड सर्वोत्तम होते कारण ते भारतातील सामाजिक, धार्मिक राजकीय गुंतागुंतीला घाबरत नव्हतेे. तेव्हा त्याने अनेक धर्म, भाषा, इतिहास आणि भावनांना कोणत्याही उतरंडीशिवाय एकत्र नांदवले होते. तेव्हा देशभक्तीला आरड्याओरड्याची आणि विश्वासाला वर्चस्व गाजवण्याची गरज नव्हती.

नवीन बॉलीवूड अशा चित्रपटांना प्राधान्य देते जे प्रेक्षकांच्या आधीच असलेल्या विश्वासावर शिक्कामोर्तब करतात. ते हळुवारपणे अस्वस्थ करणारे प्रश्न विचारणाऱ्या नाही तर, भडक अभिव्यक्ती असलेल्या कथांना प्राधान्य देते.

अशा प्रकारे, ‘प्रचार’ हा शब्द न वापरता, कला हळूहळू प्रचारात रूपांतरित केली जाते. तर, भगवीकरण हे रंगांची निवड किंवा पौराणिक संदर्भांबद्दल नाही. ते सिनेमाच्या भावनिक आणि बौद्धिक कक्षा मर्यादित करण्याबद्दल आहे. जो सिनेमा एकेकाळी कवी, बंडखोर, प्रणयी, संशयवादी आणि स्वप्नाळू लोकांना स्थान देत होता, त्याला आता निष्ठा सिद्ध करण्यास सांगितले जात आहे.

ही मोठी हानी आहे.

yogeshp1969@gmail.com