– अपूर्वा सिरसीकर देऊळगांवकर
गल्लीतून येणाऱ्या ढोल-ताशांचा आवाज, दारातली फुलांची आरास, उदबत्तीचा दरवळ आणि स्वयंपाकघरातून येणारा मोदकांचा गोड सुगंध… बाप्पांच्या आगमनानं घराचं वातावरणच बदलून गेलं होतं. काही क्षणांपूर्वीची लगबग आता आरतीच्या स्वरांत विरली होती. फुलांनी सजलेल्या मखरात बाप्पा विराजमान झाले होते आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळंच समाधान खुललं होतं. आरती संपली. घरातली लगबग थोडी शांत झाली. अथर्व मात्र बाप्पांसमोरच बसून राहिला. बराच वेळ त्या मूर्तीकडे पाहिल्यानंतर त्यानं आईला विचारलं— “आई, बाप्पांच पाण्यात विसर्जन का करतो गं आपण?”.

प्रश्न छोटासा होता; पण त्यात गणेशोत्सवाचा एक गहन अर्थ दडला होता. कारण ज्याला आपण इतक्या प्रेमाने देवत्व देऊन घरी आणतो, तो बाप्पा सुरुवातीला मात्र असतो पृथ्वीच्या कुशीतली साधी माती. त्या मातीला कलाकाराचा स्पर्श मिळतो, आकार मिळतो आणि आपल्या श्रद्धेनं त्यात गणरायाचं रूप साकारतं. काही दिवस तो आपल्या घराचा लाडका सदस्य बनतो… आणि मग विसर्जनाच्या वेळी पुन्हा निसर्गाच्या कुशीत परततो. मातीपासून देवत्वाकडे आणि देवत्वापासून पुन्हा निसर्गाकडे हा केवळ मूर्तीचा प्रवास नाही; हा श्रद्धा, परंपरा आणि निसर्ग यांना जोडणारा एक सुंदर दुवा आहे.

‘पार्थिव’ म्हणजे पृथ्वीतलावरील मातीचा वापर करून बनलेली गणेशाची मूर्ती. पण माती म्हणजे केवळ धुळीचे कण नाहीत. ती एक जिवंत परिसंस्था आहे. तिच्यात खनिजांचे कण, पाणी, हवा, सेंद्रिय पदार्थ आणि असंख्य सूक्ष्मजीव असतात. जीवाणू, बुरशी, शैवाळ यांसारखे सूक्ष्मजीव सेंद्रिय पदार्थांच्या विघटनात, पोषकद्रव्यांच्या चक्रात आणि वनस्पतींच्या वाढीसाठी आवश्यक असलेल्या अनेक जैवरासायनिक प्रक्रियांमध्ये सहभागी असतात. आपल्या पायाखाली दिसणारी माती वरून साधी वाटते; पण तिच्या कुशीत असंख्य जीवांची अखंड लगबग सुरू असते आणि याच मातीतून गणपतीची मूर्ती घडवली जाते, यात एक सुंदर प्रतीक दडलेलं आहे. ते म्हणजे जीवनाला आधार देणाऱ्या मातीतून देवाचं रूप घडतं आणि तेच रूप पुन्हा मातीत विलीन होतं.

विज्ञानाच्या आधीचं निसर्गज्ञान

आज आपल्याकडे सूक्ष्मदर्शक आहेत, प्रयोगशाळा आहेत. मातीतील सूक्ष्मजीव, सेंद्रिय पदार्थांचं विघटन, पोषकद्रव्यांचं चक्र , जैव रासायनिक प्रक्रिया यांचा शास्त्रीय अभ्यास आपण सहजपणे करू शकतो. पण पूर्वीच्या माणसाकडे ही आधुनिक साधनं नव्हती, तेव्हाही त्याच्याकडे होतं निसर्गाचं बारकाईनं निरीक्षण करण्याची कला.

माती ओलसर झाल्यावर तिच्यात होणारे बदल, सेंद्रिय पदार्थ मिसळल्यानंतर जमिनीची बदलणारी गुणवत्ता, शेणखताचा पिकांवर होणारा परिणाम, सूक्ष्मजीव आणि मातीचा पोत, पावसाळ्यानंतर जमिनीतील बदल—या सगळ्या गोष्टी अनुभवाच्य ज्ञानानी पिढ्यान्पिढ्या अवगत होत गेल्या. गोमयाचा वापरही शेती आणि मातीच्या संदर्भात अनेक पारंपरिक पद्धतींमध्ये होत आला आहे. योग्य प्रकारे तयार केलेल्या शेणखतात सेंद्रिय पदार्थ आणि विविध सूक्ष्मजीव असतात, जे मातीतील जैविक प्रक्रियांना मोलाचा हातभार लावू शकतात हे माणसाला समजलं, याचा अर्थ पूर्वजांना आधुनिक अर्थाने ‘सूक्ष्मजीवशास्त्र’ संपूर्णपणे माहीत होतं, असा होत नाही. पण त्यांची निसर्गातले बदल, अनुभव, वातावरणातल्या चढउतारानं बदलणारा मातीचा पोत ओळखण्याची त्यांची क्षमता निश्चितच उल्लेखनीय होती.

विसर्जनातून नवी सुरुवात…

गणपती बाप्पाच्या स्थापनेच्या वेळी साध्या मातीला आकार मिळतो. डोळे, कान, सोंड, मुकुट… यांतून देवत्व साकार होतं. काही दिवस त्या रूपाची भक्तीभावाने पूजा होते. घर आनंद, उत्साह आणि आपलेपणानं भरून जातं. आणि मग विसर्जनाचा दिवस येतो. मूर्ती पाण्याच्या संपर्कात येते. माती भिजते, मऊ होते आणि नैसर्गिक परिस्थितीत हळूहळू पुन्हा निसर्गाच्या चक्रात सामील होते. ही प्रक्रिया आपल्याला निसर्गाचा एक साधा पण गहन नियम सांगते .

निसर्गात काहीही कायम एका रूपात राहात नाही; किंबहुना राहू शकत नाही. मातीपासून रूप, रूपातून पुन्हा माती आणि त्या मातीतून पुन्हा जीवन. म्हणून पार्थिव गणेशाचं विसर्जन म्हणजे केवळ निरोप नाही; तो निसर्गाने निसर्गाकडे परतण्याचा प्रवास आहे.

इथेच आधुनिक काळानं आपल्यासमोर एक महत्त्वाचा प्रश्न उभा केला आहे. आजची युवा पिढी पर्यावरणीय हिताचा विचार करून शाडू मातीच्या बाप्पाच्या मूर्ती कडे वळली असली तरी, मूर्ती मातीची असली तरी तिच्यावर वापरलेले कृत्रिम रंग, प्लास्टिक, थर्माकोल किंवा इतर अविघटनशील सजावटीचे घटक पर्यावरणावर परिणाम करू शकतात. म्हणून पर्यावरणपूरक गणेशोत्सव म्हणजे केवळ मातीची मूर्ती आणणं नव्हे. मूर्ती कोणत्या पदार्थाची आहे, रंग कोणते आहेत, सजावट कशाची आहे, निर्माल्याचं व्यवस्थापन कसं होतं आणि विसर्जन कशा पद्धतीनं केलं जातं या प्रत्येक टप्प्याचा विचार करणं अत्यावश्यक आहे.

श्रद्धा जपताना निसर्गाची किंमत मोजावी लागू नये, एवढीच किमान अपेक्षा.

आपण श्रीगणेशाला ‘विघ्नहर्ता’ म्हणतो… आपल्या आयुष्यातील अडथळे दूर करणारा. मग त्याची पूजा करताना प्रत्येकानं स्वतःलाही एक छोटासा प्रश्न विचारायला हवा की, आपल्या अविचारी कृतींमुळे निसर्गासाठी नवी विघ्नं तर निर्माण होत नाहीत ना? ज्याला आपण ‘विघ्नहर्ता’ म्हणतो, त्याचाच उत्सव साजरा करण्याच्या आपल्या उत्साहामुळे नदी, तलाव, माती आणि जलजीवनासाठी संकट निर्माण होऊ नये, हीदेखील आपलीच जबाबदारी आहे.

ही जबाबदारी श्रद्धेच्या आड येणारी नाही; उलट श्रद्धेला कृतीची जोड देणारी आहे. उत्सवात आनंद हवा, भक्ती हवी, परंपरा हवी पण त्या आनंदाची किंमत निसर्गानं चुकवू नये.

विसर्जनाबरोबर केवळ मूर्ती नाही, तर निसर्ग जपण्याची जाणीवही आपल्या मनात रुजली तर? कदाचित हाच बाप्पांचा खरा आशीर्वाद असेल.

apurva.sirsikar@gmail.com