देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
राजकारणात अनेक नेते येतात. काही नेते निवडणुका जिंकतात, काही सरकारे चालवतात; पण काही नेतृत्व अशी असतात, जी देशाच्या विकासाचा विचार करण्याची पद्धतच बदलून टाकतात. नरेंद्र मोदीजींच्या सार्वजनिक जीवनातील २५ वर्षांचा प्रवास हा अशाच परिवर्तनाचा प्रवास आहे. दि. ७ ऑक्टोबर २००१ रोजी गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतलेल्या नरेंद्र मोदीजींच्या सार्वजनिक जीवनाला ७ ऑक्टोबर २०२६ रोजी २५ वर्षे पूर्ण होत आहेत. हा २५ वर्षांचा प्रवास केवळ एका राजकीय नेत्याच्या प्रदीर्घ कारकीर्दीचा आढावा नाही; तर तो भारताच्या विकासाच्या बदलत्या दिशेचा, जनसहभागातून राष्ट्रनिर्मितीचा आणि सामान्य माणसाच्या आकांक्षांना केंद्रस्थानी ठेवणार्या नेतृत्वाचा प्रवास आहे.
गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून प्रशासनाचा अनुभव घेतल्यानंतर २६ मे २०१४ रोजी त्यांनी भारताच्या पंतप्रधानपदाची जबाबदारी स्वीकारली. मे २०२६ मध्ये त्यांच्या पंतप्रधानपदाचा १२ वर्षांचा टप्पा पूर्ण झाला. आजही त्यांच्या नेतृत्त्वात गतिमान विकास होत आहे. गुजरातपासून दिल्लीपर्यंतचा हा प्रवास आज भारताच्या विकासाच्या व्यापक संकल्पनेशी जोडला गेला आहे. या प्रवासाचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे महाराष्ट्र. उद्योग, व्यापार, शेती, शिक्षण, विज्ञान, संस्कृती आणि सामाजिक परिवर्तनाची प्रदीर्घ परंपरा असलेल्या महाराष्ट्राला राष्ट्रीय विकासाच्या केंद्रस्थानी आणण्यात केंद्र सरकारच्या विविध निर्णयांचा आणि पायाभूत प्रकल्पांचा मोठा वाटा आहे. २०१४ ते २०२६ हा कालखंड महाराष्ट्राच्या पायाभूत सुविधांच्या इतिहासातील महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.
गुजरातमधील वडनगरसारख्या छोट्या शहरातून आणि सामान्य कुटुंबातून पुढे आलेल्या नरेंद्र मोदीजींच्या सार्वजनिक जीवनाची सुरुवात समाजसंघटनेच्या कार्यातून झाली. १९७४ च्या गुजरातमधील विद्यार्थी आंदोलनातील सहभाग, आणिबाणीच्या काळातील भूमिगत जनजागृती आणि भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक कार्यातील प्रदीर्घ अनुभव हे या प्रवासातील महत्त्वाचे टप्पे आहेत.
७ ऑक्टोबर २००१ रोजी त्यांनी गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या पहिल्या मोठ्या परीक्षांपैकी एक म्हणजे २००१च्या भूकंपानंतरचे पुनर्वसन आणि पुनर्निर्माण. या काळात प्रशासनाच्या कामकाजात उद्दिष्टे, आकडेवारी, वेळमर्यादा आणि प्रत्यक्ष परिणाम यांना महत्त्व देणारी कार्यशैली विकसित झाली. किती घरे बांधली, किती कुटुंबांचे पुनर्वसन झाले, कोणते काम पूर्ण झाले आणि कुठे अडथळे आहेत, याचा आढावा घेणारी पद्धत पुढे त्यांच्या प्रशासनशैलीची ओळख ठरली. गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून नरेंद्र मोदीजींच्या कार्यकाळात ऊर्जा, पाणी, शेती, उद्योग, शिक्षण आणि प्रशासन या क्षेत्रांमध्ये विविध उपक्रम राबविण्यात आले. ‘व्हायब्रंट गुजरात समिट’च्या माध्यमातून जागतिक गुंतवणूकदारांना गुजरातकडे आकर्षित करण्यात आले. २००१ मध्ये एक लाख कोटीपेक्षा कमी असणारी गुजरातची निर्यात मोदीजीच्या मार्गदर्शनात चार लाख कोटींपर्यंत पोहोचल्याचे उपलब्ध आकडेवारी सांगते.
२०१४ मध्ये पंतप्रधानपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर नरेंद्र मोदीजींनी भारताच्या विकासाची दिशा व्यापक राष्ट्रीय उद्दिष्टांशी जोडली. विकसित भारत २०४७ हे केवळ आर्थिक विकासाचे लक्ष्य नाही; तर आत्मनिर्भरता, पायाभूत सुविधा, तंत्रज्ञान, सामाजिक समावेशकता, महिला सक्षमीकरण आणि सांस्कृतिक वारसा यांचा समन्वय साधणारे राष्ट्रनिर्मितीचे ध्येय आहे. या दृष्टिकोनातून अनेक राष्ट्रीय उपक्रमांना चालना मिळाली.
२५ कोटी नागरिकांना दारिद्य्र रेषेबाहेर काढणे असो, देशभरातील गरीब आणि महिलांना ‘जनधन’मधून बँकिंग सेवेत आणणे असो, ‘मुद्रा’, ‘स्टार्टअप’मधून तरुणांसाठी अफाट संधी उपलब्ध करणे असो, यूपीआयची जगाला अनोखी भेट देणे असो त्यांच्या कार्यकाळात कितीतरी क्षेत्रांत प्रगती झाली. सर्वांसाठी घरे, शौचालये, प्रत्येक घरात नळ, अशा मुलभूत क्षेत्रातही त्यांना काम करावे लागले. स्वातंत्र्यानंतरच्या ६५ वर्षांत जे झाले नाही, ते काम त्यांनी केले. नंतरच्या काळात देशाची आत्मनिर्भरतेकडे वाटचाल ही माझ्या मते, अतिशय महत्त्वाची बाब आहे. संरक्षण क्षेत्रातही भारत निर्यातदार देश झाला. शेजारी देशांनी जेव्हा कुरापती केल्या, तेव्हा घरात घुसून धडा शिकवणारा देश ही प्रतिमा त्यांनी निर्माण केली. राममंदिर निर्मिती असो, काश्मिरातून अनुच्छेद ३७० रद्द करणे असो, तीन तलाकसारखी कुप्रथा असो, असे कितीतरी विषय त्यांनी तडीस नेल्याचे आपण पाहिले.
सिंचन असो, पायाभूत सुविधा असोत, शेती आणि शेतकरी असोत, महाराष्ट्र हे सर्वाधिक लाभ मिळालेले राज्य ठरले. लाखो कोटींचे पायाभूत सुविधांचे प्रकल्प, इंदूमिल स्मारक, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे लंडनमधील स्मारक, छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, वाढवण बंदर, नवी मुंबई विमानतळ, महाराष्ट्राच्या सामाजिक, आर्थिक प्रगतीच्या प्रत्येक टप्प्यावर मोदीजींचे अतिशय भक्कम मार्गदर्शन महाराष्ट्राला लाभले. पुढचा टप्पा विकसित भारताचा आहे आणि त्यात महाराष्ट्र अग्रणी आहे. देशाच्या पाच लाख कोटी डॉलर अर्थव्यवस्थेच्या वाटचालीत महाराष्ट्राने आपला एक लाख कोटी डॉलरचा वाटा उचलण्याचा संकल्प केला, तो मोदीजींच्या भक्कम आशीर्वादाच्या बळावरच.
मोदीजी २०१४ मध्ये पंतप्रधान झाले आणि त्याचवर्षी महाराष्ट्राचे नेतृत्त्व करण्याची संधी मला मिळाली. त्यामुळे माझ्या या आजवरच्या वाटचालीत प्रत्येक क्षणाला मोदीजींचे मार्गदर्शन मला मिळाले. त्यांनीही आपल्या देशपातळीवरील नेतृत्त्वाची सुरुवात महाराष्ट्रातून शिवरायांना वंदन करून केली आणि कायम महाराष्ट्राच्या पाठीशी भक्कम उभे राहिले, आजही ठामपणे उभे आहेत. आजही जेव्हा काही समस्या असतात, तेव्हा मी त्यांना भेटतो, तासभराच्या भेटीत ते शांततेने ऐकून घेतात आणि त्यावर तोडगा सुद्धा सुचवतात. त्यांची भेट ही कायमच दिलासा देणारी, नवी ऊर्जा देणारी आणि नवी उमेद, प्रोत्साहन देणारी असते. हा माझाच नाही, प्रत्येक सामान्य कार्यकर्त्याचा अनुभव आहे. देशाला एक उत्तुंग, विशाल, राष्ट्रहित समर्पित नेतृत्त्व लाभले, हे आपल्या सर्वांचे भाग्य आहे. सांविधानिक पदावरील त्यांच्या या रौप्यमहोत्सवी वाटचालीनिमित्त मी त्यांचे मनापासून अभिनंदन करतो. त्यांनी असेच नेतृत्त्व प्रदान करावे आणि वेळोवेळी मार्गदर्शन करीत रहावे. त्यांच्या नेतृत्त्वात विकसित भारताचा प्रवास अधिक भक्कम व्हावा आणि यासाठी त्यांनी उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभावे, अशी प्रार्थना करतो.
