प्रा. राजेश म. सगळगिळे
अलीकडेच रशियामधील प्लेगचे संशयित प्रकरण सायबेरियाच्या इर्कुत्स्क प्रदेशात आढळून आले आहे. बाधित २८ वर्षीय महिला इर्कुत्स्क येथील ‘अँटी-प्लेग इन्स्टिट्यूट’ या प्रयोगशाळेमध्ये संशोधक म्हणून काम करत होती. तिला गंभीर न्यूमोनियाच्या लक्षणांमुळे इर्कुत्स्कजवळील शेलेखोव्ह शहरातील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, जेथे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या घटनेकडे जगाचे लक्ष वेधले गेले आहे. डब्लूएचओ सारख्या मोठ्या संघटनेचेही लक्ष यावर आहे. तसे पाहिले तर ‘न्यूमोनिक प्लेग’ हा प्लेगचा सर्वात घातक आणि दुर्मिळ प्रकार आहे. हा फुफ्फुसांचा एक गंभीर संसर्ग आहे, तो अत्यंत संसर्गजन्य आहे. लक्षणे दिसू लागल्यापासून २४ तासांच्या आत उपचार न केल्यास हा आजार जवळजवळ १००% प्राणघातक (जीवघेणा) ठरतो.

रोगकारक घटक आणि इटिओलॉजी (कारणे):

रोगकारक जीवाणू- यर्सिनिया पेस्टिस (Yersinia pestis) हा आहे. हा एक ग्रॅम-निगेटिव्ह, नॉन-मोटाईल (स्थिर), नॉन-स्पोर-फॉर्मिंग (बीजाणू तयार न करणारा) कोकोबॅसिलस (गोल लंबाकृती) प्रकारचा जीवाणू आहे. सूक्ष्मदर्शकाद्वारे स्टेनिंग/कलरिंग (Wayson, Giemsa किंवा Wright स्टेंन्स वापरून) केल्यावर हे जिवाणू क्लासिक “सेफ्टी पिन” (बायपोलर) सारखे दिसतात.

प्रसार/संसर्गाची पद्धत

ब्युबोनिक प्लेग हा पिसवांच्या चावण्यावर अवलंबून असतो तर, न्यूमोनिक प्लेग एका व्यक्तीकडून थेट दुसऱ्या व्यक्तीकडे पसरू शकतो. संक्रमित व्यक्ती किंवा प्राण्याच्या (सामान्यतः मांजरीच्या) शिंकण्या-खोकल्यातून उडणाऱ्या संसर्गजन्य थेंबांच्या (aerosolized droplets) श्वासामार्फत संपर्कात आल्याने हा आजार होतो. त्यास प्राथमिक न्यूमोनिक प्लेग असे संबोधले जाते. उपचार न केलेल्या प्राथमिक ब्युबोनिक किंवा सेप्टिसेमिक प्लेगच्या संसर्गामुळे रक्तप्रवाहातून (हेमॅटोजेनस) फुफ्फुसांपर्यंत प्रसार होतो व त्याचे रूपांतर दुय्यम न्यूमोनिक प्लेगमध्ये होते.

चिन्हे आणि लक्षणे:

याचा उष्मायन काळ (Incubation period) अत्यंत कमी असतो, सामान्यतः १ ते ३ दिवसांचा असतो. अचानक तीव्र ताप, प्रचंड डोकेदुखी, थंडी वाजणे आणि खूप अशक्तपणा अशा लक्षणांनी सुरूवात होते.

वेगाने वाढणारा न्यूमोनिया ज्यामध्ये धाप लागणे (डिस्पनिया), छातीत दुखणे आणि तीव्र खोकला येतो आणि पुढे श्वसन प्रक्रिया निकामी होते. खोकल्यातून पाण्यासारखी, फेसाळ किंवा रक्तमिश्रित थुंकी (हेमोप्टिसिस) पडणे.

गंभीर आजार आणि गुंतागुंत:

वेळेवर उपचार न केल्यास, रुग्णाची प्रकृती वेगाने खालावते. तीव्र श्वसन संकट सिंड्रोम (ARDS – Acute Respiratory Distress Syndrome), सेप्टिक शॉक: सिस्टिमिक दाहक प्रतिसादामुळे (Systemic inflammatory response), अशी जीवघेणी लक्षणे दिसतात व रक्तदाब धोकादायक पातळीपर्यंत खाली येतो. काही वेळा मल्टि-ऑर्गन फेल्युअर (अनेक अवयव निकामी होणे) दिसून येते.

मृत्यू: पहिली श्वसन लक्षणे दिसू लागल्यापासून बऱ्याचदा १८ ते २४ तासांत वेगाने मृत्यू ओढवतो.

निदान: प्रयोगशाळेत खात्री होण्यापूर्वीच तातडीने आयसोलेशन (विलगीकरण) आणि अनुभवजन्य (एम्पिरिकल) उपचार सुरू करणे आवश्यक आहे.

डायरेक्ट स्मीअर: थुंकी, रक्त किंवा लिम्फ नोड ऍस्पिरेट्सचे ग्रॅम, जिम्सा (Giemsa) किंवा वेसन (Wayson) स्टेनिंग (बायपोलर “सेफ्टी पिन” बॅसिली शोधण्यासाठी) केले जाते.

कल्चर्स (Cultures): थुंकी, रक्त किंवा ब्रॉन्कियल वॉशिंग् ची कल्चर्स केले जातात अर्थात जीवाणूंना वाढविले जाते व अभ्यास केला जातो.

जलद चाचण्या (Rapid Tests): डिपस्टिक चाचण्यांद्वारे अँटीजेन शोधणे (F1 कॅप्सूल अँटीजेन) हा मुख्य उद्देश असतो. ज्यात मॉलिक्युलर (Molecular) चाचण्या, निश्चित आणि जलद निदानासाठी पॉलिमरेझ चेन रिअॅक्शन (PCR) केल्या जातात.

उपचार:

वेळ अत्यंत महत्त्वाची असते. लक्षणे सुरू झाल्यापासून २४ तासांच्या आत अँटीबायोटिक थेरपी सुरू केली पाहिजे. प्रथम श्रेणीतील प्रतिजैविके (First-Line Antibiotics): इंट्राव्हेनस स्ट्रेप्टोमायसिन (Streptomycin) किंवा जेंटामाइसिन (Gentamicin).

पर्याय: डॉक्सीसायक्लिन, सिप्रोफ्लॉक्सासिन, लेव्होफ्लॉक्सासिन किंवा क्लोराम्फेनिकॉल (विशेषतः मेंदुज्वर/मेनिन्जायटिस असल्यास).

सहाय्यक काळजी: ऑक्सिजन पुरवठा, इंट्राव्हेनस फ्लुइड्स (IV) आणि ARDS विकसित झाल्यास मेकॅनिकल व्हेंटिलेशन.

प्रतिबंध आणि काळजी (प्रोफिलॅक्सिस): पोस्ट-एक्सपोजर प्रोफिलॅक्सिस (PEP): न्यूमोनिक प्लेगच्या रुग्णाच्या जवळच्या संपर्कात आलेल्या (२ मीटरच्या आत) परंतु लक्षणे नसलेल्या व्यक्तींनी ७ दिवसांसाठी तोंडावाटे डॉक्सीसायक्लिन किंवा सिप्रोफ्लॉक्सासिन घेणे आवश्यक आहे.

संसर्ग नियंत्रण: प्रभावी अँटीबायोटिक थेरपी सुरू केल्यानंतर किमान ४८ तासांपर्यंत रुग्णाचे कठोर आयसोलेशन आणि रेस्पिरेटरी ड्रॉपलेट (थेंब) पासून सावधगिरी बाळगणे अत्यंत महत्त्वपूर्ण असते. अशाप्रकारे सतर्क राहून योग्य काळजी घेतल्यास आपण स्वरक्षण करू शकतो. सूक्ष्मजीवशास्त्रातील एक शास्त्रज्ञ फोस्टरने असे म्हटले आहे की, ‘नेव्हर अंडरएस्टीमेट द पाॅवर ऑफ मायक्रोब्स’; हे सर्वांनी लक्षात ठेऊया.

सहाय्यक प्राध्यापक व संशोधक,
सुक्ष्मजीवशास्त्र विभाग,
मूळजी जेठा महाविद्यालय, जळगाव.
तथा,समन्वयक, मायक्रोबायोलॉजीस्ट सोसायटी, इंडिया, कबचौ उमवि विभाग
rajsagalgile.mjc@kces.in