अजित कवटकर
आजच्या राजकारणातील विचारसरणी ‘जिथून नोट मिळणार – तिथे इमान झुकणार…’ याच कार्यपद्धतीवर चालते. एकनिष्ठा, समर्पण, प्रामाणिकपणा अशा तत्वांमधील शाश्वती संपली आहे आणि ते आता एका विशिष्ट ‘माया’संपन्न वातावरणातच जीवित राहू शकतात. त्यांना तसे राहता यावे यासाठीच त्यांना धारण करणारे शरीर, मन मग बहुदा त्या स्तोत्रांकडे धाव घेऊ लागते जिथून, या हपापलेल्या तत्त्वांच्या पोटापाण्याची सोय होईल. म्हणजेच, आजच्या कार्यकर्त्याच्या नीतीतत्वांना भूक लागते आणि रिकामी झालेली खळगी कितीही भरली तरी ती पुन्हा पुन्हा रिकामी होतच राहते. या राक्षसी भुकेला सर्वसामान्यांच्या भाषेत हव्यास, स्वार्थांधपणा, आपमतलबीपणा म्हटले जाते.
असो. ‘मला काय, माझं काय ?’ या विकारांनी वैफल्यग्रस्त झालेल्या एखाद्या निष्ठावान कार्यकर्त्याच्या गरजा त्याच्या वर्तमान पर्यावरणात पूर्ण होत नसतील तर तो एखाद्या सापाप्रमाणे जुनी कातडी फेकून नवीन कातडी परिधान करतो. हे इतके ‘नॉर्मल’ झाले असल्याचे परिणाम म्हणजे आता दर काही वर्षांनी परिस्थितीचा आढावा घेऊन पक्ष-कार्यकर्त्यांमध्ये पक्षांतर करण्याची पडलेली प्रथा.
नेता गेला की तो सोबतच्या कार्यकर्त्यांना आपसूकच स्वत:बरोबर फरफटत नेत असतो. तो आपली सोय बघतो, तसेच कार्यकर्ताही आपली सोय बघून नंतरच त्या नेत्याला लटकून रहायचे की नाही हे ठरवत असतो. एकूण काय, सध्या आपण ‘सोयीचे राजकारण’ अनुभवत आहोत. यात मतदार – जनता यांचा बिलकूल विचार केला जात नाही, त्यांना गृहित धरले जाते. “त्यांना मत देऊ नका”, अशा आजवरच्या प्रचाराच्या विरूद्ध जाऊन आता “त्यांनाच मत द्या”, या स्थित्यंतर प्रक्रियेत हरवत गेलेली लाज, शरम हे विशेष लक्षात घेण्यासारखे आहे. अशा तर्हेचे अनेक अकल्पित, अनपेक्षित, अविश्वसनीय बदल अनुभवास येतात तेव्हा राजकारणातून सतत अंकुरणार्या स्वार्थसंधींनी कार्यकर्त्याची केलेली वाताहात लक्षात येते आणि त्यातूनच राजकारणाची दिवसागणिक अधिकाधिक होत चाललेल्या अधोगतीची कल्पना करता येते.
नि:स्वार्थ, प्रामाणिक, सच्चा कार्यकर्ता भ्रम वाटावा इतकं बदनामीकारक वलय आज ‘राजकीय कार्यकर्ता’ या व्यक्तिमत्वाभोवती तयार झाल्याचे प्रकर्षाने जाणवते. राजकारणात पदार्पण करणारा बहुतेकजण, त्यात येतोच मुळी स्वार्थासाठी. या वृत्तीला अधोरेखित करणारे प्रकार सर्वत्र निरंतर घडत असल्या कारणाने हे क्षेत्र आणि त्यात सक्रिय असणारे शंकाकुशंकांच्या घेऱ्यात नेहमी सापडलेले ऐकावयास मिळणे आता स्वाभाविक झाले आहे. त्यातच, या स्वाभाविकतेला अनुसरणारी आपली ओळख तयार होऊ नये यादृष्टीने जागरूक असणारी किंवा झालीच तरी त्याचे वाईट वाटून घेणारी वा पश्चाताप करणारी आजची पिढी नाही, ही वास्तविकता तेवढीच स्पष्ट आहे. त्यामुळे अशा परिसंस्थेत चांगला राजकीय कार्यकर्ता वा नेता निपजणे फार अवघड !
भ्रष्टाचार केल्याशिवाय राजकारणात मोठं होताच येत नाही हा चुकीचा परंतु सर्वत्र जिवंत – उदाहरण म्हणून प्रस्थापित होत असलेला गलिच्छ आदर्श आता अनिवार्य असल्याप्रमाणे अनुकरणीय ठरत आहे. यामुळेच, आज राजकारणात भ्रष्टाचार व गुन्हेगारीबाबत विकृत सर्जनशीलता दाखवणारे एकापेक्षा एक सापडत आहेत आणि त्यांच्या ‘लय भारी’ करामती ऐकायला मिळत आहेत. राजकारण, समाजकारणाची संपूर्ण ‘ईकोसिस्टिम’च यामुळे बरबाद झाली आहे. ‘जसा नेता, तसा त्याचा कार्यकर्ता’ याला अनुसरूनच पावले टाकली जात आहेत. अंधारात राहून गैरमार्गाने पैसे ओरबाडायचे आणि उजेडात येऊन नीतीतत्त्वांची भाषा करायची, असेच सुरू आहे. अशा नेत्यांच्या या दिखाऊ तत्त्वज्ञानाला जनता तर दूरच पण त्यांचा स्वत:चा कार्यकर्ताही भीक घालत नाही. परंतु नेत्याच्या चुकीच्या गोष्टींना आदर्श मानून त्यांचे अनुकरण मात्र तो आवडीने करतो. त्यामुळे आजच्या राजकारणाची वाताहात ही वरून झिरपत खाली उतरली आहे.
पूर्वी राजकारणाचा मार्ग समाजकारणातून जायचा. उदरनिर्वाहासाठी केल्या जाणाऱ्या प्रामाणिक कष्टातून मिळालेला वेळ समाजकार्यासाठी घालविणे हा समाजाशी बांधलेलं राहण्यासाठीचा एक विरंगुळा, छंद असायचा. समाजकार्य हे नि:स्वार्थ, निर्मळ मनाने, आवडीने केलं जायचं. सामाजिक उन्नती साधण्याचा यातून प्रयत्न असायचा. त्यातून पैसा कमवून स्वत:चा उद्धार करण्याचा हेतू नसायचा. आजचा बहुतांशी कार्यकर्ता मात्र पद मिळविण्यासाठी धडपडतो ते, पक्षसंघटनेच्या शिक्का, चिन्हाच्या आश्रयाखाली मिळेल तेथे ‘उन्नीस – बीस’ करून, रूबाब थाटण्यासाठी. हा असला कार्यकर्ताच पक्षाचे तळापासून सर्वाधिक नुकसान करत असतो; ते इतके की मग विरोधकांना काहीच परिश्रम घेण्याची गरज पडत नाही. त्यांनी फक्त हा असला कार्यकर्ता सदैव टिकून राहावा, एवढीच प्रार्थना करावी. पण समोरचे याहून अधिक दिवटे असतील तर मग कोणी कोणासाठी आणि कुणाकडे प्रार्थना करावी ? निवडणुका आल्या की ‘बंडखोरीचे बुजगावणे’ उभे करून नंतर ते हटविण्यासाठी ‘मोठी सेटलमेंट’ करण्याचे मौसमी धंदे निवडणुकांवेळी तेजीत चालतात. लोकशाहीच्या उत्सवातील हा फायदा उचलण्यासाठी अनेक संधीसाधू गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असतात. निवडणुकीचा असाही धंदा काहींनी करून ठेवला आहे.
राजकीय कार्यकर्त्याची गुणवत्ता एवढी दूषित होऊन रसातळाला जाण्याचे कारण काय ? अस्वीकार्य गुणवत्तेची घराणेशाही हे पहिले कारण. दुसरे हे की आज राजकारणाकडे ‘पैसे कमविण्याचे करियर क्षेत्र’ म्हणून बघितले जाते. राजकारणात भ्रष्टाचार नॉर्मल झाला आहे आणि लोकांनीही थोडी कुरकुर करत तो स्वीकारल्याचा समज आता सर्वत्र स्थिरावला आहे. राजकीय पक्ष – संघटनांशी संबंधित असल्यास, ‘पापां’ना आपसूकच एक सुरक्षा कवच लाभते, हा विचार अनेक विकारांना जन्म देत आहे. कुणीही ‘गाॅड फादर’ नसलेला एखादा सर्वसामान्य माणूस हा राजकीय व्यवस्थेच्या शिखर पदावर पोहोचण्याचं उदाहरण अतिशय दुर्मिळच.
सर्वसामान्य राजकीय कार्यकर्त्याला आज एका विशिष्ट स्तरापलीकडे जाण्याची, घुसण्याची वा त्यापलीकडची स्वप्नं बघण्याची मुभा नाही – परवानगी नाही. घराणेशाहीने राजकारणाला इतके ग्रासले – व्यापले आहे की नेत्याच्याच परिवारातील कुणीतरी त्याची जागी घेण्याचा आता जणू नियमच पडला आहे. तो राजकीय उत्तराधिकारी कसाही असला तरी त्यास पक्षकार्यकर्त्यांनी, जनतेने स्वीकारावे यासाठी बळजबरी केली जाते. पदं त्यांनाच, निवडणुका तेच लढणार, नेतृत्व करायला त्यांनाच मिळणार. मग कार्यकर्त्याला काय मिळणार ? सतरंज्या ? वडापाव ? राहिलेले पुष्पगुच्छ ? टीशर्ट आणि टोप्या ? यातून हताश झालेला कार्यकर्ता अगोदर पक्ष – नेत्याच्या नावावर चिरीमिरी कमवायला सुरूवात करतो आणि नंतर हिम्मत वाढवत पुढे छोटे आणि नंतर मोठे घोटाळे करण्याची मजल मारतो.
आता त्याला प्रत्येक व्यवहारांत कमिशन दिसते. रस्त्यांवरील – वस्त्यांमधील मोकळ्या जागा दिसू लागतात. कन्स्ट्रक्शन, पुनर्विकासाची आवड निर्माण होते. तो आता स्वत:ला त्याच्या लहानशा स्तरावरचा मोठा नेता, समाजसेवक समजू लागतो. पुढे तो स्वत:ला त्याच्या नेत्यापेक्षाही मोठा समजू लागतो. तो नेता माझ्यामुळेच मोठा झाला, असे आता त्याचे ठाम मत तयार होते. असे असेल तर आपण का मागे राहायचे ? आपला हक्क मिळविण्यासाठी आपली ताकद दाखवणे हाच न्याय या विचाराने प्रेरित होऊन मग तो आपल्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्याच्या उद्देशने पक्षांतर / बंडखोरी / वोटकटवा पाँलिटिक्स/ विरोधकांकडून सुपारी उचलणे / अपक्ष उमेदवार या भूमिकेतून निवडणुकीत उतरतो. याचा अर्थ असा नव्हे की असे करणारे सर्वच चुकीचे असतात. यातील काहींवर खऱ्या अर्थाने अन्याय झालेला असतो. पण बहुतेक जण वैयक्तिक स्वार्थाने गंजलेले असतात आणि मग त्यांच्याच इमानदारीचा निवडणुकीच्या बाजारात लिलाव होतो.
ajit.kavatkar@gmail.com
