scorecardresearch

‘कमळाबाई’चा राजकीय तमाशा

मित्रपक्षांचा सत्तेसाठी वापर करूनघेणाऱ्या भाजपने कोणाला मित्र करून घ्यावे, याचे ताळतंत्रही कधीच सोडले आहे…

‘कमळाबाई’चा राजकीय तमाशा
‘कमळाबाई’चा राजकीय तमाशा

हर्षल प्रधान

भाजपचे मुख्य प्रवक्ते ‘लोकसत्ता’त आपल्या बालिशपणाचा सगळा कस पणाला लावून हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला ‘शिल्लकसेना’ म्हणण्याचे सुमार प्रयत्न करतात म्हणून त्यांना त्यांच्या भाजपने- बाळासाहेबांच्या भाषेत ‘कमळाबाई’ने आजपर्यंत कसे आणि कुठे राजकीय ठुमके लावले, याचा आरसा दाखवणे भाग पडते आहे.

भाजपचे असत्याचे प्रयोग २०१४ सालापासून प्रकर्षाने देशासमोर येऊ लागले आहेत. २०१९ साली कोणी कोणाला दगा दिला, हे सर्वांच्या समक्ष आहे. २०१९ साली पहाटेचा प्रयोग फसला आणि मग भाजपला ‘शिवसेनेने दगा दिला’ याची उपरती झाली. वास्तविक २०१९ विधानसभेचे निकाल लागल्यावर शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी ‘पद आणि जबाबदारीचे समान वाटप’ या फडणवीस-शहांच्या उपस्थितीत केलेल्या विधानाची आठवण भाजपला करून दिली होती आणि त्याच वेळी, मला वेगळा निर्णय घ्यायचा नाही, मात्र भाजपने आपला दिलेला शब्द पाळावा अशी स्पष्ट भूमिकादेखील मांडली होती. मात्र भाजपकडून त्याला कुठलाच प्रतिसाद आला नाही. याउलट भाजप शिवसेनेला माध्यमातून चर्चेचे पोकळ आवाहन करत होता. फडणवीसांनी शहांच्या उपस्थितीत माध्यमांसमोर जाहीरपणे दिलेल्या शब्दावर खासगीत चर्चा भाजपला हवी होती. कमळाबाई इतक्यावरच थांबली नाही तर दुसरीकडे ती अजित पवारांना डोळे मारत होती. अखेर रातोरात कमळाबाईने राष्ट्रपती राजवट काढून पहाटेच्या मुहूर्तावर मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत अजित पवारांसोबत शपथ घेतली. त्यामुळे कमळाबाईने नैतिकतेचे सल्ले शिवसेनेला देऊ नयेत.

सहा महिन्यांत साक्षात्कार?

‘२०१९ सालचा दगा’ म्हणत कमळाबाई गेली जवळपास तीन वर्षे टाहो फोडते आहे. मात्र त्याआधी २०१४ साली कमळाबाईने शिवसेनेची युती तोडून जो सत्तेचा, स्वार्थाचा माज दाखवला त्याबद्दलही कमळाबाई शिवसेनेलाच दोष कसा देऊ शकते? युती संपुष्टात आणल्याची माहिती तेव्हाचे भाजपचे विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी जाहीर केली. मग ‘शिवसेनेने युती तोडल्या’चा कांगावा भाजप कुठल्या तोंडाने करतो? २०१९ लोकसभा निवडणुकीपर्यंत शिवसेनेच्या जागा मान्य करणाऱ्या कमळाबाईला केंद्रात निर्विवाद बहुमत मिळाल्यावर सहा महिन्यांतच शिवसेनेची ताकद घटल्याचा साक्षात्कार झाला. शिवसेनेला शिल्लकसेना म्हणणारी कमळाबाई मात्र इतर पक्षांतील उपऱ्यांच्या जिवावर ठुमके देते आहे, त्यामुळे देशाच्या राजकारणाबाबत जनतेचा भ्रमनिरास होतो आहे.

देशाचे राजकारण इतक्या खालच्या स्तरावर नेणारी कमळाबाई आज राज्याराज्यांत आणि केंद्रात सत्तेत आहे, त्यासाठी खरे तर त्यांचे कधीकाळचे मित्र कारणीभूत आहेत. त्यांच्या जिवावर मोठी झालेला भाजप आज कधीकाळी मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेला क्षमा न करण्याची दर्पोक्ती करतो. अमित शहांच्या विधानातून सत्तेचा माज दिसून येतो, परंतु शिवसेनेचे भवितव्य उज्ज्वल आहे, कारण ते कुण्या दिल्लीशहाच्या हातात नसून जनतेच्या मनात आहे. जमीन दाखवा म्हणणाऱ्या शहांना आम्ही अस्मान दाखवू हे उद्धव ठाकरेंचे विधान भविष्याची चाहूल देणारे आहे.

वास्तविक ज्या कमळाबाईच्या शब्दाला किंमत शिल्लक नाही त्या तिच्या धमक्यांना शिवसेना भीक घालत नाही. देशाच्या राजकारणातील इतिहास तपासून बघितला तर कमळाबाईने मायावतीपासून मेहबूबा मुफ्तीपर्यंत अनेक ठिकाणी तोंड काळे केले आहे. हा इतिहास विसरून आज कमळाबाई उजळ माथ्याने फिरत असली तरी इतिहास बदलता येणार नाही. आत्मनिर्भर भारताचा संदेश देणाऱ्या पंतप्रधान मोदींनी देश आत्मनिर्भर केला नाही; मात्र पक्ष म्हणून गेल्या साडेआठ वर्षांत कमळाबाईला भलतेच आत्मनिर्भर केले. देशावर एकछत्री सत्ता मिळवण्याच्या हव्यासापोटी कमळाबाईने नेहमीच पावले पुढे टाकली. मग शिवसेनेसोबत युती टिकवण्यासाठी कमळाबाईने ‘एक पाऊल मागे घेतले’ असे आता म्हणण्याला कुठलाच अर्थ शिल्लक राहात नाही. लोकसभेत भाजप आणि राज्यात शिवसेना हे सूत्र शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांच्या हयातीत निश्चित झाले असताना दर विधानसभा निवडणुकीत जागावाटपात भाजपचे एक पाऊल वाढत गेले. कमळाबाईचे राज्यस्तरीय प्रवक्ते कुठल्या आधारावर युती टिकवण्यासाठी भाजपने एक पाऊल नेहमीच मागे घेतल्याचे दाखले देतात हे अनाकलनीय आहे.

सत्तेसाठी हिंदुत्वाचा वापर

कमळाबाईचे प्रवक्ते म्हणतात की भाजपने मित्रपक्षांचा घात केल्याचे एक तरी उदाहरण दाखवावे. संयुक्त महाराष्ट्र समितीतून केवळ जागावाटपाच्या मुद्द्यावर जनसंघ बाहेर पडला. तेव्हा त्यांना संयुक्त महाराष्ट्राची नव्हे तर स्वतःच्या जागांची अधिक काळजी होती. महाराष्ट्रात शिवसेनेला उघड उघड आव्हान देण्याची आणि घात करण्याची क्षमता भाजपच्या कोणाही नेत्यात नसल्याने कमळाबाईने २००९ सालापासून शिवसेनेच्या पाठीत अनेकदा वार केले. तो एक स्वतंत्र विषय आहे, पुढे कधी तरी त्यावर सविस्तर लिहिले जाईल. १९८९ सालापासून शिवसेना हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजपला बिनशर्त पाठिंबा देत आली. केंद्रातले मंत्रीपद असो अथवा राज्यातले जागावाटपाचे सूत्र. शिवसेनेने नेहमीच एक पाऊल मागे घेतले.

२०१४ साली कमळाबाईला झालेला साक्षात्कार आणि भाजपचा सत्तेचा उन्माद अहंकार प्रकर्षाने दिसू लागला. पार्ल्यामध्ये हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेना निवडणूक लढली तेव्हा डॉ. प्रभूंना पाठिंबा देण्याऐवजी भाजपने शिवसेनेच्या विरोधात उभ्या असलेल्या उमेदवाराला पाठिंबा दिला. इतिहासच उगाळायचा असेल तर मग काल, आज आणि उद्याही शिवसेनेचे हिंदुत्व कमळाबाईपेक्षा अधिक स्वच्छ आणि पवित्र आहे. मुळात भाजपकडे हिंदुत्व नाहीच- आहे तो केवळ सत्तेवर जाण्यासाठी केलेला हिंदुत्वाचा आणि मित्रपक्षांचा वापर. हिंदुत्वाचा विचार भाजपने घेतला तो शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांना जनतेने दिलेल्या उदंड प्रतिसादामुळेच.

आज कमळाबाईची अवस्था काय आहे? सत्ता आहे परंतु वाईट काळात सोबत असलेले आज कुणीही सोबत नाहीत.

केवळ थापा मारून जनतेची दिशाभूल करून भाजप सत्तेच्या नशेत मश्गूल आहे. अगदी नोटाबंदीसारखे अर्थहीन निर्णय लादून पंतप्रधान मोदींनी ‘५० दिवसांत फरक कळेल’ असा केलेला दावा फोल ठरला. कुठलीच भूमिका ठोस आणि ठळकपणे कमळाबाईने आजवर घेतली नाही. बाबरी पाडल्यावर त्याचे खापर शिवसेनेवर फोडले, राम मंदिर बांधकामाला न्यायालयाने परवानगी दिली. मात्र राम मंदिरासाठी दारोदारी भिक्षुकी करण्यासाठी कमळाबाईचा परिवार हिंडत होता. शिवसेनेने एक कोटीची रक्कम मंदिरासाठी दिली. स्वतःचे पंचतारांकित कार्यालय उभे करणारी कमळाबाई प्रभू रामचंद्रांच्या मंदिरासाठी मात्र लोकांकडून देणग्या मागत फिरत होती.

अनेकांच्या पाठीत वार

केंद्रीय यंत्रणांचा, पैशांचा गैरवापर करून फोडलेल्या लोकप्रतिनिधींना कमळाबाई बळजबरीने स्वतःकडे वळवू शकेल, परंतु जनतेचे मन या तथाकथित ‘महाशक्ती’ला वळवता येणार नाही; याची जाणीव असल्यानेच फोडाफोडीचे राजकारण कमळाबाईने केले. कमळाबाईने २०१४ सालापासून आजवर अनेकांच्या पाठीत वार केले. वर साळसूदपणाचा आव आणत ‘मी नाही त्यातली…’ म्हणत नेहमी स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी इतरांचा वापर केला. देशाच्या २०१४ सालापासूनच्या इतिहासात भाजपने मांडलेला राजकीय तमाशा हा ‘कमळाबाईचे ठुमके’ म्हणून नावारूपास येण्यामागची कारणे ही अशी आहेत.

जाता जाता : मेहबूबा मुफ्ती यांच्याशी लागेबांधे करताना कमळाबाई हिंदुत्व कुठे सोडून आली होती? फक्त सत्ता आणि सत्ता- कारभार मात्र बेपत्ता असाच प्रकार कमळाबाईने केला; म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कमळाबाईचे जोखड उतरवण्याचा निर्णय घेतला. आणि तो योग्य होता कारण ते शिवसेनेला संपवायला निघाले होते हे सध्याच्या परिस्थितीतून स्पष्ट होतेच आहे.

लेखक शिवसेनेचे जनसंपर्कप्रमुख आहेत.

मराठीतील सर्व विशेष लेख ( Features ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या