रघुनंदन भागवत
सध्या अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यात संघर्ष पेटला आहे. अफगाणिस्तानचे तालीबानी परराष्ट्र मंत्री भारतात येऊन भारताशी मैत्रीचा राग आळवत असतानाच भारतीय भूमीवरून पाकिस्तानला दम देत आहेत. त्यातच पाकिस्तानमध्ये अंतर्गत यादवी माजली आहे. पाकव्याप्त काश्मीर मध्ये पाकिस्तानी सरकारविरुद्ध तेथील जनता रस्त्यावर उतरली आहे व ती ‘आझादी’ची मागणी करत आहे. बलुचिस्तान लिबरेशन आर्मी स्वतंत्र बलूच राष्ट्रासाठी लढत असतानाच पाकिस्तानी लष्कराचे लचके तोडत आहे.
पाकिस्तानची अशी हालत झालेली पाहून भारतात एक प्रकारे जल्लोशाचे वातावरण तयार होत आहे/ झाले आहे.भारतातील अंतरराष्ट्रीय घडामोडीचे अनेक व्यावसायिक अभ्यासक, राजकीय विश्लेषक आता पाकिस्तानचे विभाजन होणार आणि भारतात दिवाळीबरोबरच पाकिस्तानच्या विघटनाचे फटाके उडवायला मिळतील अशा प्रकारची हवा निर्माण करण्यात गर्क आहेत.भारत आता केव्हाही पाकव्याप्त काश्मीर परत घेईल आणि बलुचिस्तानच्या स्वातंत्र्य लढ्याला थेट मदत करून स्वतंत्र बलूच राष्ट्र निर्मितीत सहयोग देईल वगैरे स्वप्न दाखवत आहेत आणि सर्व सामान्य जनता या स्वप्नरंजनात हरखून गेलेली दिसते. पण वास्तव काय आहे याकडे डोळेझाक करून चालणार नाही.
काय आहे हे वास्तव?
पाकिस्तानात सध्या जी अंतर्गत यादवी माजली आहे त्याला निरनिराळी कारणे आहेत आणि ती प्रत्येक प्रदेशात भिन्न भिन्न आहेत.
टीएलपी नावाच्या कट्टर धार्मिक संघटनेने लाहोर ते इस्लामबाद असा लॉन्ग मार्च काढला आहे. हा लॉन्ग मार्च पॅलेस्टीन आणि इस्राईल यांच्यात अमेरिकेच्या पुढाकाराने जो शांतता करार होत आहे त्याला विरोध करण्यासाठी आहे. या संघटनेचे असे म्हणणे आहे की असीम मुनीर व शहाबाज शरीफ यांनी अमेरिकेच्या दबावाखाली येऊन पॅलेस्टीनच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या हमास या दहशतवादी गटाचा विश्वासघात केला आहे. या मोर्चातील निदर्शक व पाकिस्तानी लष्कर यांच्यात लाहोरच्या रस्त्यांवर तुंबळ लढाई जुंपली आहे.
पाकव्याप्त काश्मीरमध्ये गगनाला भिडलेली महागाई, सरकारी अनास्था, विकासाकडे दुर्लक्ष या मुद्यावरून जनतेत असंतोष माजला आहे. सिंध प्रांतात स्वतंत्र ‘सिंधू राष्ट्रा’साठी चळवळ चालू आहे. भारतातून फाळणीच्या वेळी स्थलांतरित झालेल्या लोकांना मोहाजीर असे संबोधले जाते. हे मोहाजीर प्रामुख्याने सिंध प्रांतात वसले आहेत आणि त्यांना पाकिस्तानात दुय्यम दर्जाची वागणूक मिळते म्हणून ते नाराज आहेत.
खैबर पखतुनवा प्रांतात पठाणांना अफगाणिस्तानमध्ये सामील व्हायचे आहे. विशेष म्हणजे या प्रांतात इम्रान खानच्या पक्षाचे सरकार आहे जो असीम मुनीर व शहाबाज शरीफ यांच्या विरोधात आहे. (इम्रान खान पठाण आहे) त्यामुळे स्थानिक सरकारची बंडखोरांना फूस आहे. तेथील मुख्यमंत्र्यांनी मागणी केली आहे की त्यांच्या प्रांतात पाकिस्तानी लष्कराने कुठलीही कारवाई करू नये.
बलुचिस्तानला स्वातंत्र्य हवे आहे कारण त्यांच्या म्हणण्यानुसार बलुचिस्तानवर पाकिस्तानने बळजबरीने कब्जा केला आहे. आता आपण गृहित धरू की विश्लेषकांच्या आकलनानुसार पाकिस्तानचे खरोखरच विघटन होईल. असे झाले तर त्याचा भारताला काय फायदा/तोटा होईल याचा साधक बाधक विचार करणे आवश्यक ठरते.
सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात घेणे आवश्यक आहे की असीम मुनीर व शहाबाज शरीफ यांची सत्ता जरी वर उल्लेख केलेल्या विविध कारणांमुळे गेली तरी त्याजागी येणारे सरकार हे भारत विरोधीच असणार आहे. इम्रान खान हा सध्या तुरुंगात आहे आणि त्याला जनतेत बराच पाठिंबा आहे. इम्रान खानची जर सुटका झाली व तो परत सत्तेवर आला तर तो भारतविरोधी धोरणे अधिक जोमात राबवेल. काश्मीरमधील दहशतवाद तसाच सुरू राहील. (पुलवामा हल्ला इम्रानच्याच सत्ता काळात झाला होता हे विसरता कामा नये). तसाही क्रिकेटच्या मैदानावर सुद्धा इम्रानचा भारतद्वेष बरेच वेळा लपून राहिला नव्हता.
इम्रानचे पुनरागमन झाले तर पाकिस्तान-अफगाणिस्तान संबंधाना निराळे वळण लागू शकते. इम्रान पठाण असल्याने अफगाणिस्तान त्याच्याशी जुळवून घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या स्थितीत अफगाणिस्तान आता भारतापुढे केलेला मैत्रीचा हात भविष्यात आखडता घेऊ शकेल आणि घूमजावही करू शकेल.
पाक व्याप्त काश्मीर समजा स्वतंत्र राष्ट्र झाले तर पाकिस्तानचे काही जाणार नाही कारण तसेही ते काश्मिरी जनतेला आपले मानत नाहीतच. त्याचा इंटरेस्ट भारताच्या काश्मीरमध्ये अधिक आहे. पण असे झाले तर भारताच्या काश्मीरमध्येही आझादीची चळवळ पुन्हा जोर धरू शकेल. दोन्ही काश्मीर मिळून स्वतंत्र राष्ट्र निर्माण करण्याची मागणी केली जाऊ शकते. अशा स्थितीत काश्मीरला स्वतंत्र राज्याचा दर्जा न देता केंद्रशासित प्रदेश ठेवण्यात भारत सरकारने दूरदर्शीपणा दाखवला असे म्हणावे लागेल. बऱ्याच जणांना घाई झाली आहे की भारताने पी. ओ. के. ताब्यात घ्यावा. पण तसे केले तरी काश्मीरमध्ये स्वतंत्र काश्मीरची चळवळ उभी राहाण्याची भीती आहेच. हे सर्व घोके ओळखूनच भारत सरकार कुठलीही घाई करण्याच्या मनः स्थितीत नाही.
भारताने समजा आता पाकिस्तानमध्ये हस्तक्षेप केला तर आपापसात लढणारे पाकिस्तानातील विविध गट भारताविरुद्ध जिहादच्या नावाखाली एक होतील हे निश्चित.
बलुचीस्तानला जर स्वातंत्र्य मिळाले तर भारताचा थेट फायदा होणार नाही कारण बलुचीस्तानची सीमा भारताला लागून नाही. फक्त पाकिस्तानच्या सीमेवर भारतासाठी एक मित्र राष्ट्र तयार होईल एवढेच. पुन्हा भविष्यात बलुचिस्तानची बुद्धी बांगलादेश प्रमाणे फिरणार नाही याची काय हमी आहे?
सिंध प्रांताबाबतही असेच म्हणता येईल. सगळ्यात महत्वाचे म्हणजे पाकिस्तानात कितीही अराजक माजले असले तरी चीन व अमेरिकेला पाकिस्तानची नितांत गरज आहे ती भारतावर दबाव ठेवण्यासाठी. दोन्ही देशांना भारत बलाढ्य राष्ट्र झालेला बघवत नाही. तसेच दोन्ही देशांचे आर्थिक व सामरिक हितसंबंध पाकिस्तानात गुंतले असल्याने ते सहजासहजी पाकिस्तानवर पाणी सोडणार नाहीत.काहीही करून हे दोन्ही देश पाकिस्तानातील एकमेकांच्या जीवावर उठलेल्या गटात तडजोड घडवून आणण्याचा प्रयत्न करतील.
अफगाणिस्तान व पाकिस्तान ही दोन्ही इस्लामी राष्ट्रे आहेतच पण त्याहूनही महत्वाचे म्हणजे दोन्ही देश ‘सुन्नी’ पंथाचे आहेत. सौदी अरेबियासारखा जगातील एक सामर्थ्यवान सुन्नी देश या दोन्ही देशांत समेट घडवून आणण्याचे प्रयत्न नक्कीच करेल. वरील सर्व विवेचन लक्षात घेता पाकिस्तानात अराजक सदृश परिस्थिती निर्माण झाली म्हणून भारताने हुरळून जायचे कारण नाही आणि दिवाळीत नेहमीप्रमाणेच फटाक्यांची आतशबाजी करावी ती ऑपरेशन सिंदूरचे यश साजरे करण्यासाठी. पाकिस्तानचे विघटन होईल / झाले म्हणून नव्हे.
raghunandan.bhagwat@gmail.com
