डॉ. शुभदा कुलकर्णी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संत वाङ्मयाचे गाढे अभ्यासक प्र. न. अर्थात प्रल्हाद नरहर जोशी लिखित साहित्याच्या विपुलतेवरून आणि वैविध्यावरून त्यांच्या क्षमतेची, व्यासंगाची तसंच कष्टाचीही कल्पना येते. त्यांची जन्मशताब्दी नुकतीच सुरू झाली आहे, त्यानिमित्ताने त्यांच्या मुलीने साकारलेले त्यांचे शब्दचित्र.

‘सांगे वडिलांची कीर्ती तो येक मूर्ख..’ हे रामदासांचे बोल आहेत, तो मूर्खपणा पत्करून मी माझ्या वडिलांच्या जन्मशताब्दी वर्षांत त्यांच्याविषयी जमेल तितकं लिहितेय. माझे वडील वाणीचं आणि लेखणीचं सामथ्र्य लाभलेली व्यक्ती होते. वयाच्या चाळिशीनंतर केवळ लेखनावर प्रपंच चालविणाऱ्या दुर्मीळ मराठी साहित्यिकांपैकी एक होते. ते ‘प्र. न.’ या नावानंच ओळखले जायचे. आपल्या नावामागं त्यांनी कधीच ‘डॉ.’  ही पदवी लावली नाही. मराठी साहित्यात मधुरा भक्तीवर त्यांचं संशोधन होतं. अवघ्या तिशीत फुलब्राइट शिष्यवृत्ती मिळवून अमेरिकेत शिक्षणासंदर्भात काम करण्यासाठी ते गेले. अशा संपन्न देशात कामाची, नोकरीची संधी आली तरी स्वदेशात परतण्याची त्यांची मानसिकता होती. फेलोशिपच्या उरलेल्या पैशांतून मौजमजा करण्याऐवजी त्यांनी संपूर्ण युरोप पालथा घालून, तिथली कलासंस्कृती आणि साहित्यसंस्कृती जाणून घेतली. त्यावर विपुल लिखाणही केलं.

त्यांनी पैसा, प्रसिद्धी मिळवली; पण त्याचा कधीही हव्यास धरला नाही. परदेशगमनात काढलेल्या फोटोंच्या असंख्य उत्तम स्लाइड्स, स्वत:चा तीन ते चार हजारांचा ग्रंथसंग्रह आणि स्वत:ची साहित्यनिर्मिती.. हेच त्यांचं खरं वैभव. ग्रंथांवर त्यांचं अपार प्रेम. चाळिशीपर्यंत प्राध्यापक, अध्यापक, मुख्याध्यापक ही पदं भूषविली. तिथंही त्यांच्या तासाला वर्गाबाहेर विद्यार्थ्यांची खूप गर्दी असे, इतकं उत्तम वक्तृत्व त्यांना लाभलं होतं. पुण्यात तसंच पुण्याबाहेर, महाराष्ट्राबाहेरही त्यांची अनेक व्याख्यानं होत. शास्त्रज्ञ आणि संत हे वेगळे नसून एकमेकांस पूरक आहेत हा विचार त्यांच्या व्याख्यानांतून, लेखणीतून सतत प्रकट व्हायचा. आज जे सर्व जगात मान्य केलं गेलंय की, अध्यात्म आणि विज्ञान हातात हात घालून जातं, ते या द्रष्टय़ानं केव्हाच जाणून ते प्रतिपादनही केलं.

आपल्यातील गुणांची तशीच अवगुणांची यथार्थ पारख आणि प्रखर आत्मविश्वास हे यांचे व्यक्तिविशेष. ‘मी ज्ञानी नाही, तर मला केवळ अधिक गोष्टी माहिती आहेत,’ असं ते म्हणायचे. खरं तर कोणत्याही क्षेत्रातील ज्ञानाचं परिग्रहण सहजतेनं होत असे. कुमार गंधर्वाच्या ‘अनुपरागविलास’ या पुस्तकाबद्दल अतिशय मार्मिक परीक्षणानंतर वा. ह. देशपांडय़ांनी त्यांना आवर्जून पत्र लिहिलं होतं. गरिबीमुळे त्यांना अशा कला शिकायला सवड नव्हती; पण चित्रकला आणि कोरीवकामात त्यांना उत्तम गती होती. नकाशा पक्का असणं- कोणतीही जागा कोणत्या अक्षांश- रेखांशावर आहे हे अचूकतेनं न पाहता सांगत असत. ते गोष्टी  नाटय़मय करून सांगत.

त्यांच्या साहित्याच्या विपुलतेवरून आणि खास करून वैविध्यावरून त्यांच्या क्षमतेची, व्यासंगाची तसंच कष्टाचीही कल्पना येते. अत्यंत मुक्तहस्तानं आणि आनंदानं दान करणं हे त्यांचं खास वैशिष्टय़. मग ते ज्ञान असो, वस्तू असो वा पैसा.. संस्थेमध्ये ध्येयनिष्ठेनं काम करणं शक्य नाही, हे उमगल्यावर सन्मानाची नोकरी, पैसा सोडून पूर्णवेळ लेखन व्यवसाय स्वीकारून, तो यशस्वी करून दाखवला.

नवोदित लेखकाला घालाव्या लागणाऱ्या खेपा त्यांना कधीच घालाव्या लागल्या नाहीत. चेकबुक घेऊन, त्यांच्या योजनेला साद देण्यासाठी प्रकाशक दारात हजर असत. पाठय़पुस्तके लिहिली, त्यातही त्यांनी त्यांचं स्वयंभू, जागतिकतेची जाण असणारे विचार मुलांपर्यंत पोहोचवावेत या हेतूने अनेक बदल करून पुस्तके लिहिली. पाठय़पुस्तकांत मार्टिन ल्यूथर किंग त्यांनी आणला. संगीतातील उपजत अंगाप्रमाणे उत्स्फूर्त आणि एकटाकी असे त्यांचे लिखाण असे. कागदावर खाडाखोड नसे- कारण विचारांची सुस्पष्टता आणि ओघ!

‘साहित्य – सुगंध’ नावाची पूरकवाचनाची मालिका काढली तर त्याची पहिलीच आवृत्ती ४०- ४५ हजाराची काढावी लागली. आणीबाणीच्या काळात (१९७५- ७६) मिळालेला सरकारी पुरस्कार त्यांनी कटाक्षानं नाकारला होता. त्यांच्या या निर्णयाचे कौतुक करणारे शेकडो फोन्स आणि पत्रं आली. केवळ लेखनावर प्रपंच करणाऱ्या साहित्यिकाला हे सोपं नव्हतं! आपल्याला पटेल तसं आयुष्य जगण्याची क्षमता आणि भाग्य असणारी ती व्यक्ती होती.

सातारा जिल्ह्यातील एका नावही परिचित नसलेल्या लहान खेडय़ातून (खर्शी) आलेल्या या व्यक्तीची झेप थक्क करून टाकणारी आहे.

निवडक साहित्य

६ राजवाडे : विचारदर्शन, ६ वॉल्ट डिस्ने – यावर त्यांना वॉल्ट डिस्ने यांचं पत्रं आलं होतं. ६ शास्त्र व कला, ६ भाषाशास्त्र, ६ मुन्शी प्रेमचंद

६ शरच्चंद्र चटजी, ६ विज्ञान : उदय व विकास २२. विज्ञान कथा भाग १, २, ३ (हिंदीतही), ६ शास्त्रज्ञांचा चरित्रकोश, ६ यंत्रदेवाचे उपासक- कादंबरी, ६ चोखा डोंगा परी

संत वाङ्मय

६ सार्थ तुकाराम गाथा – खंड १, २, ३, ६ ज्ञानेश्वर अभंग गाथा – सटीप, ६  नाथ संप्रदाय

६ दत्तकोश, ६ सकल संतगाथा, ६ ज्ञानेश्वरांच्या विरहिण्या, ६ संत आले घरा, ६ भारतीय संत – भाग १ ते १०, ६ ज्ञानेश्वरांचे जीवनदर्श, ६ संत काय म्हणतात?

याखेरीज त्यांनी मासिकांतून असंख्य लेख लिहिले. त्यांची एकंदर २५० च्या वर पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. त्यामुळे सगळी यादी द्यायची म्हटलं तर एक पूर्ण लेखच होईल. त्यांच्या पुस्तकांची शीर्षकंही मोठी वेधक असत हे त्यांच्या ग्रंथांवरून कळतंच. आमच्यावर संस्कार झाले ते उत्तम कामाचे, कष्टाचे आणि शिस्तीचेही. प्रुफं न्यायला प्रकाशनाचा माणूस यायचा त्याआधी काही तास प्रुफं तयार असायची. त्याला ताटकळत ठेवणं त्यांना मंजूर नव्हतं. ज्ञानेश्वरीपासून विल डय़ुरांट, डार्विन अशा विषयांवरच्या पुस्तकांतच आम्ही वाढलो.

‘इलस्ट्रेटेड वीकली’, ‘धर्मयुग’, ‘सत्यकथा’, ‘ललित’, ‘नॅशनल जिओग्राफिक’ असे अंक अवतीभोवती कायम असायचे. दिवाळी अंकही भरपूर यायचे. संगीत, नाटक, चित्रपट यांविषयीही फार प्रेम त्यांना! फार छानछौकीत नाही वाढलो, पण कोणत्याही नाटकाला, गाण्याच्या कार्यक्रमाला जायला त्यांची कधीही ना नसे. त्यांच्यामुळे शांता शेळके, गदिमा, द. न. गोखले, दत्तो वामन पोतदार, श्री. ना. आणि राजेंद्र बनहट्टी अशांसारख्या अनेकांपासून ग. वा. बेहेरेंसारखे निर्भीड पत्रकार ते आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या तत्त्वज्ञानाच्या अभ्यासक, संशोधक एलिनॉर झेलिअटसारख्यांचा सहवास आम्हाला लाभला.

विशेष म्हणजे याच प्रेमानं ते त्यांच्या खर्शीच्या अर्धशिक्षित बालमित्रांनाही भेटायचे.  त्यांच्या प्रकल्पांची एक नोंदवही आहे, त्यात त्यांच्या दूरदृष्टीची कल्पना येते. आज जो कुमार कोश निघाला आहे त्याची कल्पना त्यांनी १९६५ मध्येच केली होती. असे अनेक प्रकल्प आहेत. अर्थात या सगळय़ा कर्तबगारीत माझ्या उच्चशिक्षित, मायाळू, मोठय़ा मनाच्या आईचा आणि प्रेमळ आत्याचा मोठाच सहभाग होता. ५ जून २००४ साली त्यांचं निधन झालं.  माझे परात्पर गुरू आणि आवडते गायक – विचारवंत कुमार गंधर्व यांची जन्मशताब्दी याच वर्षांत यावी हा मी निव्वळ योगायोग मानत नाही. एकाच गोष्टीचा खेद वाटतो की, प्र. नं. नी आपला प्रभात रोडवरचा राहता फ्लॅट आणि साडेतीन हजार पुस्तकं ही भारतीय विद्याभवन संस्थेला बक्षीसपत्रानं भेट दिली. बक्षीसपत्रात अशी अट होती की, त्यांच्या राहत्या फ्लॅटमधली त्यांची लिहायची खोली तशीच ठेवायची आणि अन्य जागेत ‘प्र. न. जोशी अध्यासन केंद्र’ सुरू करायचं. ते हयात होते तोवर ते होतं. त्यानंतर काही वर्षांत तिथं समुपदेशन केंद्र वगैरे सुरू झालं. आता तर बाहेरचा अध्यासनाचा फलकही नाही, असो.

मराठीतील सर्व विशेष लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prof of saint literature prahlad narhar joshi ysh
First published on: 28-05-2023 at 00:03 IST