गणेशोत्सवाला सर्वांत पहिल्यांदा सार्वजनिक रूप ज्या शहरात मिळाले, त्या पुणे शहराचा प्रवास आज सार्वजनिक उत्सवातील लोकसहभागाच्या आदर्शापासून उत्सवातील सार्वजनिक उपद्रवापर्यंत झालेला दिसतो. हे स्खलन काही आत्ताच अचानक झाले असे नाही. गेली काही वर्षे उत्सवात लागणार्‍या वेगवेगळ्या उन्मादी कणसूरांनी पुणेकर त्रस्त आहेतच. पराकोटीला पोचलेले ध्वनिप्रदूषण हा त्यातील सर्वांत कर्कश मुद्दा. ध्वनिवर्धकांवरील या अमर्याद उच्च रवाला पुणेकर वैतागलेच होते. यंदा त्या वैतागाला प्रातिनिधिक स्वर मिळाला तो विद्यानंद बापट यांचा.

गणेशोत्सवासंदर्भातील पुणे महापालिकेच्या बैठकीत बापट यांनी डीजे, ढोल-ताशांमुळे होणार्‍या ध्वनिप्रदूषणाविरोधात आवाज उठवला. तसे करताच त्यांना बैठकीतून हुसकावून लावण्यात आले. त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. त्यात समाज माध्यमी पडसाद होते, तसे प्रत्यक्ष पाठिंब्याचे प्रतिसादही होते. ध्वनिकल्लोळाला एकमुखी विरोध हे त्यातील समान सूत्र. बापट यांचे मुद्दे या पलीकडेही आहेत. पण, त्यावर चर्चा करण्यापूर्वी आधी ध्वनिमर्यादेच्या उल्लंघनाने त्रस्त झालेल्या शहरी जगण्याबद्दल.

गेली २५ वर्षे पुण्यातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाने गणेश विसर्जन मिरवणुकीच्या वेळी केलेला आवाजाचा अभ्यास हेच सांगतो, की करोनाकाळाचा अपवाद वगळता कधीही ध्वनिपातळी मर्यादेत राहिलेली नाही. त्यात इतर दिवशी आणखी वेगवेगळ्या आवाजांची भर पडतेच आहे. पुण्यात सध्या गल्लोगल्लीत इमारती, बंगल्यांचा पुनर्विकास सुरू आहे. पुढच्या चार वर्षांत साडेसहा कोटी चौरस फुटांचे इमले बांधले जातील, असा अंदाज आहे. या बांधकामांसाठी माल वाहून नेणारी अवजड वाहने, त्यांचे हॉर्न आणि प्रत्यक्ष बांधकामस्थळी पाया खोदण्यापासून सुरू होणारी यंत्रांची धडधड आजूबाजूच्या रहिवाशांना शांततेचा विसर पाडणारी आहे. हे अहोरात्र सुरू आहे. रोजच्या वाहतूक कोंडीत वाजणारे हॉर्न, गाड्यांच्या इंजिनांची कलकल यामुळे डोके उठतेच. त्यात प्रत्येक छोटा-मोठा सण, गल्ली-बोळांतील, गावठाणांतील कुठकुठले उत्सव, नववर्ष, जयंती, पुण्यतिथी अशी निमित्ते काढून मोठमोठे ध्वनिवर्धक वर्षभर दणाणत असतात. यार, दोस्ताच्या वाढदिवसाचे निमित्त काढून अचानक रात्री बारा वाजता शहराच्या कोणत्याही भागात वाजू शकणारे फटाके हे भरीला. अपरात्री दुचाक्यांवरून किंचाळल्यासारखे आवाज काढत जाणार्‍यांची संख्याही कमी नाही. या स्थितीने शांतता दुष्प्राप्य झाली आहे, हे सांगणे नलगे.

म्हणूनच, बापट यांनी डीजेमुक्त, ध्वनिप्रदूषणमुक्त उत्सवाच्या केलेल्या मागणीला चटकन पाठिंबा मिळाला. या प्रश्नावर डॉ. कल्याणी मांडके यांच्यासारख्या कान-नाक-घसा तज्ज्ञ गेली काही वर्षे सातत्याने आवाज उठवत आहेत. ध्वनिप्रदूषण नियंत्रित करण्यात विविध यंत्रणांना सातत्याने येत असलेल्या अपयशाबद्दल प्रश्न उपस्थित करून त्यांनी राष्ट्रीय हरित लवादात याचिकाही दाखल केली होती. दीर्घ काळ कर्कशता पदरी पडल्यास सर्व वयोगटांतील व्यक्तींच्या आरोग्यावर परिणाम होतो – एक प्रकारे ध्वनिप्रदूषण हे ‘बिनआवाजी मारेकरी’ आहे – हेही त्या आणि इतर कान-नाक-घसातज्ज्ञ ‘ओरडून’ सांगत आहेत. त्यांना अर्थातच अनुल्लेखाने ‘मारले’ आहे.

बापटांचे वैशिष्ट्य हे, की ते थेट उत्सवाच्या बैठकीत जाऊन धडकले आणि नंतर अत्यंत तर्कशुद्ध पद्धतीने वेगवेगळी उदाहरणे देत, ता्त्विवक चर्चा करत या प्रश्नाला भिडत राहिले. ध्वनिप्रदूषणासारखा प्रश्न व्यक्तिकेंद्री करू नका, असे आता ते कितीही सांगत असले, तरी या प्रश्नावर लढायला – याचा त्रास नकोसा झालेल्या सर्वांना – नायक मिळाला आहे, ही वस्तुस्थिती. बापट यांचा आक्षेप फक्त डीजेपुरता नाही, तर सार्वजनिक ठिकाणी होणार्‍या शांतताभंगाबद्दल आहे आणि त्यासाठी ते उत्सवावर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. पण त्यावर, ‘गणपतीला विरोध करतो’, ‘दिमागी नक्षल आहे’, ‘भावना दुखावतो’, या मतप्रदर्शनापलीकडे बिनतोड तार्किक प्रत्युत्तर अजूनपर्यंत मिळालेले नाही.

त्यामुळेच प्रश्न उरतो, तो या चर्चेच्या केंद्रस्थानी न येणार्‍या सार्वजनिक भानाचा. त्याचा सुवर्णमध्य हा लोकांना त्रास होणार नाही, अशा प्रकारे सार्वजनिक उत्सव साजरा करता येतो, याचा आदर्श पुण्याने घालून देणे, हा असू शकतो. आणि तशी पुण्याला परंपराही आहे. उत्सवांच्या निमित्ताने कला-क्रीडा प्रकारांच्या सार्वत्रिक अभिव्यक्तीला याच शहराने वाव दिला. देखाव्यांच्या निमित्ताने कारागिरीला पैलू पडले. उत्सवाने रुजलेल्या, रुजविलेल्या सामाजिक जाणिवेने याच शहरात कार्यकर्ते घडले. आणि, ही परंपरा खंडित झालेली नाही, ती फक्त या ध्वनिप्रदूषणाने झाकोळली गेली आहे. बहुसंख्य पुणेकरांना ती हवीही आहे. म्हणूनच, तिला उजागर करून कुप्रथा बंद करण्यासाठीचे पाऊल सुधारणांचा कायमच प्रारंभ करणार्‍या याच शहराला उचलावे लागेल. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात, तसा पारंपरिक पद्धतीने उत्सव साजरा करायचा असेल, तर त्यात पारंपरिक या नावाखाली असंख्य ढोल-ताशे बडविणे येत नाही, याचेही भान मंडळांनी ठेवायला हवे. या ढोल -ताशांची संख्या मर्यादितच हवी. बेभान वागण्याची सूट म्हणजे परंपरा राखणे नसते. समाजमनात सामीलकीची भावना वर्धिष्णू करून विधायकतेची कास धरणे हेच उत्सवांचे उद्दिष्ट असते. ते सुफळ व्हावे.
siddharth.kelkar@expressindia.com