कौस्तुभ खांडेकर
‘सत्य सर्वांचे आदीघर, सर्व धर्मांचे माहेर.’
– महात्मा ज्योतिबा फुले

पुण्याच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी वटपौर्णिमेनिमित्त महात्मा फुले वाड्यातील वडाच्या झाडाची पूजा केली आणि त्यानंतर अर्थातच वादंग झाला. स्वतःला पुरोगामी म्हणवणाऱ्या मंडळींना हे कृत्य म्हणजे फुले दाम्पत्याच्या विचारांचा अवमान असल्याचे वाटले तर काहींनी हा परंपरा आणि संस्कृतीचा भाग असल्याचे म्हटले. समाजमाध्यमांपासून वृत्तवाहिन्यांपर्यंत या विषयावर चर्चा झाली. परंतु या चर्चेत मूळ प्रश्न मात्र मागे पडला. एखाद्या स्थळाचे महत्त्व आपण कोणत्या निकषावर ठरवतो? आणि तो निकष सर्वांसाठी समान असतो का?

भारतीय संस्कृतीत स्थानमहात्म्य ही अत्यंत प्राचीन संकल्पना आहे. आपल्या पुराणांमध्ये, इतिहासात आणि लोकपरंपरेत अनेक स्थळांना विशेष महत्त्व दिले गेले आहे. काशी म्हणजे केवळ एक शहर नाही, पंढरपूर म्हणजे केवळ एक गाव नाही, देहू-आळंदी ही केवळ भौगोलिक ठिकाणे नाहीत. त्या भूमीवर घडलेल्या घटनांमुळे, तेथे वावरलेल्या संत-महात्म्यांमुळे आणि त्या ठिकाणांशी जोडल्या गेलेल्या सामूहिक स्मृतींमुळे त्या स्थळांची महती आहे. आणि त्याचमुळे लाखो लोक त्या ठिकाणी जात असतात. ती अंधश्रद्धा नसते तर इतिहासाशी, संस्कृतीशी आणि श्रद्धेशी जोडले जाण्याचा, एक संवाद साधण्याचा तो अनुभव असतो.

आणि ही संकल्पना केवळ भारतापुरती मर्यादित नाही. अमेरिकेतील ग्राऊंड झिरो हे फक्त एक ठिकाण नाही; तर ते राष्ट्रीय वेदनेचे प्रतीक आहे. दक्षिण आफ्रिकेतील रॉबेन आयलंड हे केवळ एक बेट नसून नेल्सन मंडेलांच्या संघर्षाची ज्वलंत आठवण आहे. जेरुसलेम हे तीन वेगवेगळ्या धर्मांच्या इतिहासाचा अडीच हजार वर्षांचा इतिहास आणि परंपरा आहे. फ्रान्समधील बॅस्टिलचा किल्ला, रशियातील रेड स्क्वेअर किंवा इंग्लंडमधील वेस्टमिन्स्टर ॲबे, ही सगळीच ठिकाणे त्यांच्या इतिहासामुळे, तिथल्या स्मृतींमुळे लोकांच्या स्मरणात असतात. त्यामुळे स्थानाला महत्त्व देणे ही निव्वळ धार्मिक भावना नसून, ती मानवी संस्कृतीची सहज भावना आहे.

आपल्याकडेही आपण रायगडावर जातो ते दगडांना नमस्कार करण्यासाठी नव्हे; तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याला, त्या शौर्याला अभिवादन करण्यासाठी जातो. राजघाटावर जाणं ही त्या स्थानाची पूजा नसते; ते असतं महात्मा गांधींच्या विचारांना आणि लढ्याला केलेले वंदन! आगाखान पॅलेसचं महत्त्व वास्तूच्या भव्यतेमुळे नसून तेथे घडलेल्या स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासामुळे आहे. म्हणजेच, एखाद्या स्थळाचे पावित्र्य अथवा महात्म्य हे निव्वळ तिथल्या भौतिकी रचनेमुळे, तिथल्या मातीमुळे नसते; तर ते तिथल्या जागेशी जोडलेल्या इतिहास, परंपरा आणि स्मृतींमुळे असते.
याच परिप्रेक्षातून फुले वाड्याकडे आपण बघणे हे अधिक संयुक्तिक ठरेल.

महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी याच वास्तूतून भारतीय समाजाला नवी दिशा दिली. स्त्रीशिक्षण, शूद्र-अतिशूद्रांचे शिक्षण, विधवाशिक्षण, सत्यशोधक समाजाची स्थापना, जातिभेदाविरुद्धचा संघर्ष, शेतकरी आणि वंचित समाजाच्या प्रश्नांवरील चिंतन — या सर्व कार्यांचा इतिहास या वास्तूने अनुभवला आहे. म्हणूनच फुले वाडा हे केवळ बांधकाम नसून ते भारतीय समाजसुधारणेचे ठाम प्रतीक आहे. आणि म्हणूनच त्या स्थानाचा आदर आपण करतो आणि तिथे जाऊन अभिवादन करतो.

पण मग याच वेळी जर आपण फुले वाड्याचे ऐतिहासिक आणि वैचारिक महत्त्व मान्य करत असू, तर इतरांच्या श्रद्धास्थानांच्या बाबतीतही तोच निकष लागू करणार आहोत का?

उदा. गेली अनेक दशके अयोध्येतील रामजन्मभूमीचा प्रश्न देशात चर्चेत होता. रामभक्तांनी ‘राममंदिर त्याच जन्मभूमीवर व्हावे’ अशी भूमिका घेतली तेव्हा अनेक पुरोगामी विचारवंतांनी ‘राम सर्वत्र आहे; मग एका जागेचाच आग्रह कशासाठी?’ असा प्रश्न उपस्थित केला. म्हणजेच स्थानमहात्म्यालाच आव्हान दिले गेले. त्याचवेळी फुले वाड्याच्या संदर्भात मात्र ‘ही महात्मा फुले यांच्या विचारांची भूमी आहे’, ‘या वास्तूचे पावित्र्य राखले पाहिजे’, ‘येथे अमुक गोष्ट होऊ नये’ असे युक्तिवाद पुढे आले. म्हणजेच, येथे स्थानमहात्म्य सहज स्वीकारले गेले आणि जे योग्यच होते.
पण ही वैचारिक विसंगती नाही का?

प्रश्न श्रीरामाचा नाही आणि प्रश्न महात्मा फुल्यांचाही नाही. प्रश्न तत्त्वांचा आहे. विवेक म्हणजे सर्वांसाठी समान मापदंड असणे. तत्त्वे व्यक्ती, पक्ष किंवा राजकीय विचारसरणी पाहून बदलत असतील, तर ती तत्त्वे राहात नाहीत; त्या राजकीय भूमिका बनतात.

आता वटपौर्णिमेचा विचार करूया.
अनेकांनी वटपौर्णिमेला केवळ ‘पतीच्या दीर्घायुष्यासाठी केलेले कर्मकांड’ एवढ्यापुरतेच मर्यादित केले आहे. किंबहुना आजच्या अनेक महिलाही दुर्दैवाने त्याच विचारांच्या पाईक आहेत. परंतु भारतीय संस्कृतीत वड हे दीर्घायुष्य, सातत्य, आश्रय, जीवनशक्ती आणि पर्यावरण यांचे प्रतीक आहे. हजारो पक्षी, प्राणी आणि वनस्पतींना आधार देणारा हा वृक्ष भारतीय जीवनपद्धतीचा अविभाज्य भाग राहिला आहे. आज पर्यावरण संवर्धनासाठी शासन, अनेक स्वयंसेवी संस्था विविध मोहिमा राबवतात; त्याचवेळी आपल्या पूर्वजांनी त्यासाठी श्रद्धेचा मार्ग निवडला. पिंपळ, वड, औदुंबर, तुळस, नदी, पर्वत यांना पावित्र्य देऊन त्यानं संरक्षण दिले केले. त्यामुळे वटपूजनाचा अर्थ केवळ धार्मिक विधी नसून निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची सांस्कृतिक पद्धत असा देखील घ्यायला हवा.

फुले वाड्यातील वडाच्या झाडाचे महत्त्व तर याहून अधिक आहे. तो वृक्ष त्या महान दाम्पत्याच्या कार्याचा मूक साक्षीदार आहे. त्या परिसरात सावित्रीबाईंची संघर्षगाथा, ज्योतिरावांचे धैर्य, सत्यशोधक चळवळीची सुरुवात आणि समाजपरिवर्तनाच्या विचारांची मुहूर्तमेढ रोवली गेली. अशा ठिकाणी वटपूजन होते तेंव्हा त्याकडे केवळ कर्मकांड म्हणून न बघता इतिहासाशी जोडले जाण्याचे ते साधन बनते.

किंबहुना, वटपौर्णिमेच्या परंपरेला अधिक अर्थपूर्ण बनवण्याची संधी यात आहे. वडाभोवती जोडीने एकत्र फेरे मारत जर ‘आमच्या सहजीवनात सावित्रीबाईंसारखी जिद्द, ज्योतिरावांसारखा विवेक, परस्पर सन्मान, समानतेची भावना आणि समाजासाठी काही करण्याची प्रेरणा नांदो,’ अशी प्रार्थना केली तर त्यात महात्मा फुले यांच्या विचारांचा अपमान आहे की गौरव हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा.

महात्मा फुले यांनी समाजाला सत्यशोधनाची आणि समतेची दिशा दिली. त्यांच्या नावाचा राजकीय वापर न करता, त्यांनी मांडलेल्या विवेकनिष्ठ विचारांच्या मार्गावर सर्वांनी मार्गक्रमण केल्याने त्यांच्या विचारांचा नक्कीच सन्मान ठरेल.

आपण कृतीचा अर्थ तिच्या आशयावरून न ठरवता कृती करणाऱ्या व्यक्तीवरून ठरवतो ही आज आपल्यापुढे असलेली सगळ्यात मोठी समस्या आहे. जर ती व्यक्ती आपल्या विचारांची असेल तर तीच कृती स्पृहणीय तर विरोधकांनी केली की “प्रतिक्रियावाद” ठरते. या सोयीच्या निकषांमुळे समाजात विसंवाद वाढून नुकसानच होते.

फुले वाड्यात वटपूजनाच्या निमित्ताने, भारतीय परंपरेतील वृक्षपूजनाला महात्मा फुले यांच्या समतेच्या विचारांची जोड देता येईल का? प्रत्येक दाम्पत्याने परस्पर आदर, समानता, शिक्षण, विवेक आणि समाजसेवा यांची प्रतिज्ञा करण्याचा हा दिवस ठरू शकतो का? परंपरेला आधुनिक मूल्यांची जोड देण्याचा हा एक सुंदर प्रयोग होऊ शकतो का?

कधी नव्हे ती आपल्याला आज समन्वयाची गरज आहे, सर्वांसाठी समान निकषांची गरज आहे. अश्या वेळी स्थानाचा आदर म्हणजे निव्वळ त्या वास्तूची पूजा न म्हणता, त्या भूमीवर घडलेल्या इतिहासाचा आणि तेथून समाजाला मिळालेल्या प्रेरणेचा सन्मान परंपरेची कास धरून आपण करू शकत नाही का? कारण व्यक्तीनुसार तत्वे बदलली, तर त्यांना विचार म्हणत नाहीत; त्यांना फक्त सोय म्हणतात.

आदरणीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात ‘Cultivation of mind should be the ultimate aim of human existence!’
अर्थात – मनाची मशागत म्हणजेच बौद्धिक आणि सामाजिक जाणिवांचा विकास हेच मानवी जीवनाचे अंतिम उद्दिष्ट असावे.