राहुल गांधी अमेरिकेच्या दौऱ्यावर गेल्यापासून वाद, आरोप-प्रत्यारोप आणि निषेधाला उधाण आलं आहे. आधी त्यांनी टेक्सासमध्ये म्हटलं की ‘देशात प्रत्येकाला संधी मिळाली पाहिजे मग ती व्यक्ती कोणत्याही जाती धर्माची असो. सध्या भारतात याच मुद्द्यावर संघर्ष सुरू आहे आणि नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्याचा दाखला मिळाला.’ ते असंही म्हणाले की ‘भारतात शिक्षणातून विशिष्ट विचारधारेचा प्रसार केला जात आहे. बहुतेक विद्यापीठांच्या कुलगुरूंची नियुक्ती संघाकडून केली जात आहे.’ वॉशिंग्टन डीसीमध्ये भारतीय वंशाच्या व्यक्तींशी संवाद साधताना राहुल म्हणाले, ‘शिख व्यक्तीने पगडी परिधान करावी की नाही, कडा घालावा की नाही, गुरुद्वारात जावं की नाही, यावरून भारतात संघर्ष होऊ लागले आहेत. हे केवळ एकाच धर्माच्या बाततीत नाही, सर्वच धर्मांबाबत अशीच स्थिती आहे.’ जॉर्जटाऊन विद्यापीठात विद्यार्थ्यांशी संवाद साधताना म्हणाले, ‘भारतात समता प्रस्थापित होईल तेव्हा काँग्रेस आरक्षण रद्द करण्याचा विचार करेल, मात्र सध्या तरी तशी स्थिती नाही.’

भाजपला आपल्या भात्यातून देशद्रोहास्त्र बाहेर काढण्यासाठी एवढं निमित्त पुरेसं होतं. केंद्रीय मंत्री गिरिराज सिंग यांनी लगोलग राहुल यांच्याविरोधात देशद्रोहाचा खटला दाखल केला जावा, अशी मागणी सुरू केली. गृहमंत्री अमित शाह यांनीही एक्सवर लांबलचक पोस्ट करून ‘राहुल गांधी यांना देशविरोधी वक्तव्यं करण्याची सवयच लागली आहे. त्यांचं आरक्षण रद्द करण्याविषयीचं वक्तव्य काँग्रेसचं धोरण स्पष्ट करणारं आहे. भाजप आहे तोवर कोणीही आरक्षण रद्द करू शकणार नाही,’ वगैरे म्हटलं. भाजपचे अन्य नेतेही राहुल गांधींवर ताशेरे ओढू लागले. मग काँग्रेसही आपल्या नेत्याच्या बाजूने किल्ला लढवू लागली.

हे ही वाचा… कसला ‘नागरी समाज’? हे तर राजकीय अवडंबर…

आपल्या देशातल्या समस्या परदेशांत जाऊन मांडू नयेत ही भाजपची अपेक्षा योग्यच. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी तरी ती पूर्ण करतात का? २०१५ साली पंतप्रधानपदी विराजमान होऊन अवघं एक वर्ष झालं असताना मोदी चीनच्या दौऱ्यावर गेले होते. एका वर्षात देश कितीसा बदलू शकतो? पण तिथे जाऊन त्यांनी ‘दुख भरे दिन बिते रे भैय्या,’ हे गाणं गायलं. मग त्यांच्या खास शैलीत म्हणाले, ‘भारतीयांना परदेशात कोणी विचारात नव्हतं. त्यांचं म्हणणं ऐकून घ्यायला, एवढंच काय त्यांच्याकडे बघायलाही कोणी तयार नसे. पण आता भारतीय इतरांच्या नजरेला नजर भिडवून बोलू शकतात. हो की नाही?’

नंतर लगेचच त्यांनी दक्षिण कोरियाला भेट दिली. तिथे म्हणाले ‘काँग्रेसच्या काळात लोकांना वाटे की मागच्या जन्मी काय पाप केलं होतं म्हणून भारतात जन्माला आलो. हा काय देश आहे, हे काय सरकार आहे? असा विचार करून लोक देश सोडून निघून जात पण आता परिस्थिती बदलली आहे. लोक परदेशातून पुन्हा भारतात येऊ लागले आहेत.’

मोदी सर्वप्रथम पंतप्रधान झाले २६ मे २०१४ रोजी आणि वरील दोन्ही दावे केले मे २०१५ मध्ये. अवघ्या एका वर्षात त्यांनी देशात एवढं प्रचंड परिवर्तन केलं की सर्व समस्या दूर झाल्या? पण देश सोडून परदेशात जाणाऱ्या, परदेशी नागरिकत्व स्वीकारणाऱ्या भारतीयांची दरवर्षी सादर केली जाणारी आकडेवारी मोदींच्या दाव्यांच्या अगदी विपरीत स्थिती दर्शवत आली आहे.

हे ही वाचा… सर्वकार्येषु सर्वदा : दीड शतकाच्या दस्तावेजांना आधुनिकीकरणाचा साज

पुढे मोदी जर्मनीमध्ये म्हणाले की ‘काँग्रेसने गेल्या ६० वर्षांत पसरवलेली अस्वच्छता (गंदगी) साफ करण्यासाठी आम्ही आलो आहोत.’ कॅनडामध्ये म्हणाले, ‘भारत आजवर स्कॅम इंडिया म्हणून ओळखला जात होता, आता देश स्किल्ड इंडिया म्हणून ओळखला जातो.’ शशी थरूर, दिग्विजय सिंग, प्रदीप सुरजेवाला, संजय झा यांनी त्यावेळी मोदींना लक्ष्य केलं होतं. मोदींनी त्यांच्याच पक्षाच्या पूर्वासुरींकडून धडे गिरवावेत, असा सल्लाही दिला होता, पण कोणीही त्यांना देशद्रोही ठरवलं नव्हतं. विरोधकांनी निंदा केल्यानंतरही पुढे ओमान दौऱ्यावर असताना मोदींनी काँग्रेसकाळातल्या भ्रष्टाचारावर शरसंधान केलं. ‘मी चुकीच्या प्रशासकीय प्रथा बदलण्याचा कसोशीने प्रयत्न करत आहे,’ असं म्हटलं.

मोदींच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळाला आता एक दशक लोटलं आहे. दरम्यानच्या काळात त्यांनी अनेक परदेश दौरे केले पण आजही त्यांनी काँग्रेसच्या चुका मोजून दाखवणं थांबवलेलं नाही. याच वर्षी कोपनहेगनमध्ये मोदी म्हणाले की आपल्या डिजिटल इंडिया उपक्रमाने भारतात परिवर्तन आणलं. तत्पूर्वी भारत याबाबतीत मागासलेला होता. थोडक्यात मोदींनी आजवर परदेशांत भारताच्या ६० वर्षांच्या इतिहासाची, इथल्या राजकारण आणि अर्थकारणाची, भारतीयांच्या परदेशातल्या प्रतिमेची येथेच्छ निंदा केली आहे. ते वरचेवर परदेशांत जातात आणि जवळपास प्रत्येक दौऱ्यात त्यांच्या राजकीय विरोधकांना तुच्छ लेखतात. काँग्रेसच्या ६० वर्षांत काहीच झालं नाही, मीच सगळं केलं हा राग आळवतात. आता राहुल गांधीही मोदींनी बांधलेल्या महामार्गावर सुसाट जात आहेत.

गांधी नेहरूंनी अमुक केलं तर आम्ही केल्याने काय बिघडलं हा भाजपचा प्रतिवाद स्वीकारार्ह नाही तसंच मोदींनी भारताची नालस्ती केली मग राहुल गांधींनी केली तर काय बिघडलं असं काँग्रेसने म्हणणंही ही चुकीचंच. पण मुद्दा हा आहे की आजच्या काळात एखादं वक्तव्य कुठे केलं गेलं याने खरंच फरक पडतो का?

हे ही वाचा… अमेरिकेत भारतीयांची ‘व्होट बँक’ आहे?

पूर्वी, म्हणजे इंटरनेटच्या आधीच्या युगात भारतात केली गेलेली वक्तव्य आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचण्यास मर्यादा होत्या. पण आता कानाकोपऱ्यात काय घडत आहे हे १०-१५ मिनिटांत जगभर पोहोचतं. एक्सवर पोस्ट केल्या जातात, यूट्यबवर संपूर्ण भाषणं, मुलाखती, चर्चासत्र उपलब्ध असतात. ज्याला राजकारणात शून्य स्वारस्य आहे, जो वृत्तपत्र वाचत नाही, वृत्त वाहिन्या पाहत नाही अशा व्यक्तीलाही व्हॉट्सॲप, शॉर्ट्स आणि रिल्समुळे इच्छा नसेल तरी कोण काय म्हणालं हे ऐकत पाहत रहावं लागतं. कुठे म्हणलं हा मुद्दा जवळपास बाद झाला आहे.

भारतात अर्थव्यवस्थेची, रोजगाराची, सर्वधर्मसमभावाची, स्त्रियांच्या सुरक्षिततेची, शिक्षणाची सध्या काय स्थिती आहे हे जगाला नीट माहीत आहे. त्याविषयी मोदी आणि राहुल गांधींची काय मतं आहेत, दोघे परस्परांचे कसे वाभाडे काढतात हेही एव्हाना सर्वांना तोंडपाठ झालं असेल. साहजिकच नरेंद्र मोदींनी वा राहुल गांधींनी परदेशात जाऊन काही म्हटल्याने फार काही फरक पडेल असं नाही. त्यामुळे आता दोन्ही बाजूंनी हा वाद मिटवून त्यात वाया जाणारी दोन अवाढव्य पक्षांची ऊर्जा खरे प्रश्न सोडवण्यासाठी वापरणं उत्तम.

vijaya.jangle@expressindia.com