देशातील अनेक स्वयंसेवी संस्थांचे आधारवड असलेल्या रमेशभाई गुलाबचंद कचोलिया यांचे नुकतेच निधन झाले. सामाजिक कामाचा मोठा पट व्यापणार्या या कर्त्या माणसाच्या कर्तृत्वाचा आढावा…
भारतात वंचित सामाजिक गटांचा विकास तसेच यासारख्या विविध प्रश्नांवर काम करणार्या सक्रिय स्वयंसेवी संस्थांची आणि सेक्शन ८ कंपन्यांची (ना नफा तत्त्वावर चालणार्या सामाजिक कंपन्या ) संख्या नीती आयोगाच्या मते सहा लाखांवर गेली आहे. अशा संस्थांचे सर्वार्थाने सक्षमीकरण करणारे, त्यांना शाश्वतता – व्यापकता-सेवेची समावेशक दृष्टी देत समविचारी लोकांशी जोडणारे काही अदृश्य शिल्पकार असतात. असाच एक असामान्य मातृहृदयी संस्थापालक म्हणजे रमेशभाई गुलाबचंद कचोलिया.
अस्तित्वाचा संघर्ष करणार्या देशभरातील सुमारे दोन हजार संस्थांना सक्षम करण्यात आयुष्यातील ५० वर्षं आणि सर्वस्व त्यांनी दिले. ८८ वर्षांच्या रमेश भाईंचे नुकतेच १० जुलै रोजी निधन झाले.
इंटरनेट आणि समाजमाध्यमांची आयुधे उपलब्ध होण्याआधीच्या काळात रमेशभाईंनी भारताच्या कानाकोपर्यातील प्रामाणिकपणे चालणार्या समाजकार्याचा शोध सुरू केला. वृत्तपत्रे, संस्थांची माहितीपत्रके, पुस्तके ,मित्र आणि प्रवास यांच्या माध्यमातून ते दुर्गम भागांतील धडपड्या कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचत. संस्थेचे काम प्रत्यक्ष पाहणे, लाभार्थ्यांकडून थेट प्रतिसाद घेणे, संस्थापकाची आणि त्याच्या संघाची सचोटी तपासणे, त्यानंतर प्रथम स्वत:चा मोठा आर्थिक सहयोग देणे, संस्थेच्या दुर्बल बाजूंचा अभ्यासपूर्वक शोध घेऊन त्यावर संस्थेसोबत काम करणे, ती निकोप झाल्यावर तिच्या गरजांवर अन्य दात्यांसोबत काम सुरू करणे, अशी त्यांची कार्यपद्धती होती. विविध स्रोतांतून संस्थांना आर्थिक मदत मिळण्यासाठी ते संस्थाकार्याचे उत्तम शब्दांकन इंग्रजीत करून देत. संस्थेच्या कार्यकर्त्यांसह दात्यांना भेटून कार्याचे सादरीकरण कसे करावे याचे प्रत्यक्ष प्रशिक्षण देत. संस्थेबद्दल अनभिज्ञ असणार्या दात्यांना हवी असणारी कामाच्या पारदर्शकतेची, बांधिलकीची आणि विश्वासार्हतेची हमी ते स्वत: देत. याच आधारे संस्थांना दात्यांचा सहयोग मिळे. पुढील दशकाचा वाटचालीचा आराखडा ते संस्थांना तयार करायला लावत. त्यासाठी चिकाटीने मार्गदर्शन करत. संस्था चालविणार्यांना समाजकार्याचे औपचारिक शिक्षण आणि प्रशिक्षण घेण्यासाठी त्यांनी जगभर पाठविले.
बंगालमधील हावडा येथील टिकियापाडा म्हणजे मुंबईच्या धारावीचे प्रतिरूप. येथे शबाना आणि मामून अख्तर या दाम्पत्याने आपल्या पत्र्याच्या खोपटीत सुरू केलेल्या समरिटन हेल्प मिशन या बालशिक्षण प्रयोगाची कहाणी त्यांना समजली. आर्थिक कोंडीमुळे हा प्रकल्प थबकला होता. ते टिकीयापाडा येथे गेले. वार्षिक ४०० रुपये आय-व्यय असणारी ही संस्था आता चार सुसज्ज शाळांमधून सुमारे १६ हजार विद्यार्थ्यांना उच्च माध्यमिक स्तरापर्यंत मोफत दर्जेदार शिक्षण देते. त्यांचा वार्षिक जमा-खर्च १६ कोटी रुपये आहे. आरोग्य, रोजगार आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनाच्या माध्यमातून ती हावडा परिसरातील परिवर्तनाचे केंद्र बनली आहे.
मध्य प्रदेशातून कोलकाता येथे शिक्षणासाठी आलेला विनायक लोहानी हा आय.आय.टी. आणि आय.आय.एम. मध्ये अव्वल ठरला. विनायकने त्याची उच्च वेतनाची नोकरी सोडून परिवार केंद्र ही संस्था वंचित मुलांच्या शिक्षणासाठी सुरू केली. रमेशभाईंच्या परिसस्पर्शामुळे ही संस्था तीन हजार मुलांचा निवासी शैक्षणिक प्रकल्प पश्चिम बंगालमध्ये चालवते. छत्तीसगड, मध्य प्रदेश, प. बंगाल आणि झारखंडमधील आदिवासी आणि ग्रामीण भागातील सहा लाखांवर मुलांच्या शिक्षणासाठी ‘सेवा कुटीर’ हा प्रकल्प राबवते. वर्ष २००० मध्ये भविष्य अधांतरी असलेल्या या प्रकल्पाची वार्षिक उलाढाल केव्हाच १०० कोटींवर गेली आहे. विनायकला केंद्र शासनाकडून मिळालेला पद्मश्री पुरस्कार त्याने रमेश कचोलिया यांना समर्पित केला आहे.
विज्ञान शिक्षक राजीव वर्तक यांच्या प्रयोगाधारित शिक्षणाच्या स्वप्नाला संस्थात्मक स्वरूप मिळवून देण्यासाठी त्यांनी अध्ययन संस्थेला प्रोत्साहन दिले. गेल्या २५ वर्षांत या संस्थेने सहा हजार शिक्षकांना प्रशिक्षण देऊन १८ लाख विद्यार्थ्यांपर्यंत गुणवत्तापूर्ण शिक्षण पोहोचवले. तंत्रज्ञानाचा वापर करून सरकारी शाळेतील शिक्षणदर्जा उंचावण्याचे जीवनध्येय संजय दालमिया या आयआयटीच्या माजी विद्याथ्र्याने निवडले. त्याच्या ओपन लिंक फाऊंडेशनचा वर्ष २०१६ मधील आवाका मर्यादित आणि वार्षिक खर्च २५ हजार होता. रमेशभाई यांच्या सहभागाने या संस्थेचे विनोबा हे ॲप महाराष्ट्र, छत्तीसगढ आणि मध्य प्रदेशात तीन लाख शिक्षक आणि ३५ लाख विद्यार्थ्यांच्या वापरात आले. २५० तंत्रस्नेहींची टीम, १८ कोटींचा वार्षिक खर्च असा या संस्थेचा प्रवास एका दशकात झाला.
वर्ष १९९८ मध्ये रमेशभाई अहिल्यानगरमधील स्नेहालय संस्थेत आले होते. जिल्ह्यातील १३ वेश्यावस्त्या आणि झोपडपट्ट्यांत फिरून त्यांनी प्रश्नाची दाहकता समजून घेतली. त्यावेळी स्नेहालयचे चार प्रकल्प होते आणि आर्थिक संसाधने अत्यल्प होती. रमेशभाईंचा वरदहस्त लाभल्याने स्नेहालयचे आठ जिल्ह्यांत एकूण २७ बहुविध सेवा प्रकल्प उभे राहिले. १८ हजार लाभार्थ्यांपर्यंत रोज सेवा पोहोचू लागल्या.
जवळपास दोन हजार संस्थांच्या विकासात रमेशभाईंनी नि:स्वार्थ योगदान अनामिक राहून दिले. सर्व संस्था रमेशभाईंना आपले विश्वस्त किंवा अध्यक्ष होण्याचा आग्रह करत. पण ते कोणत्याच संस्थेचे सदस्यदेखील झाले नाहीत. जे प्रकल्प त्यांनी उभारून दिले, त्यांच्या उद्घाटन फलकावर स्वत:चे नाव नसावे तसेच संस्थेत आल्यावर सत्कार- सन्मानपत्र इ. अजिबात नकोत, याबद्दल ते आजन्म कठोर आग्रही होते. अर्थात संस्थांकडून देणगीदारांना उत्तम आभारपत्र आणि वृत्तांकन मिळावे, यासाठी ते दक्ष असत.
२० मे १९३८ रोजी विदर्भातील अकोला येथे कष्टकरी कुटुंबात रमेशभाई जन्मले. कष्ट आणि नोकर्या करीत त्यांनी मुंबईत कायद्याची पदवी घेतली. बिर्ला उद्योगसमूहात वरिष्ठ पदावर रुजू झाले. त्यांनी एक दशक सौदी अरब देशात आणि कार्पोरेट क्षेत्रात काम केले. त्यांच्या आयुष्याला निर्णायक वळण मिळाले ते १९८१ मध्ये आनंदवनाशी जडलेल्या नात्यानंतर. महामानव बाबा आणि साधनाताई आमटे यांच्या कामाने ते भारावले. त्यांनी महारोगी सेवा समितीच्या आनंदवनाबाहेरच्या सर्व कामात स्वत:ला झोकून दिले. साधनाताई आणि बाबांनी त्यांना विकास आणि प्रकाश यांच्याप्रमाणेच आपला तिसरा मुलगा मानले. त्यांच्या सहवासात समाजकार्याच्या त्यांच्या जाणिवा सखोल आणि व्यापक झाल्या. बाबांनी त्यांना सांगितले की, आपला देश आणि समाज प्रचंड मोठा आणि विविधतेने बनलेला आहे. त्याच्या विकासासाठी हजारो स्वयंपूर्ण आणि विविध विषयांत सेवाकाम करणार्या संस्थांची देशाला गरज आहे. याच विचारातून ‘केअरिंग फ्रेंड्स’ या अनोख्या उपक्रमाचा जन्म झाला. २००३ पासून त्यांनी संवेदनशील दाते, उद्योगपती, व्यावसायिक आणि सामाजिक कार्यकर्ते यांना एका मुक्त व्यासपीठावर आणण्यास सुरुवात केली. हे व्यासपीठ नोंदणीकृत संस्था नव्हते. त्याचे बँक खाते, पदाधिकारी असे काहीच नाही. प्रत्येक देणगी थेट संबंधित संस्थेकडे जात असे. दरवर्षी सुमारे १५० संस्थांना रमेशभाई आणि ‘केअरिंग फ्रेंड्स’ आर्थिक सहयोग देत आले. आर्थिक क्षेत्रात मोठी भरारी घेतलेला रमेशभाई यांचा मुलगा आशीष हा संस्थांसाठीचा सर्वात मोठा दाता बनला. या दानयज्ञाने आनंदी होणारी त्यांची पत्नी लता, सुष्मितासारखी सून असा त्यांच्या कामाला अनुरूप परिवार रमेशभाईंना योगायोगाने मिळाला नव्हता. त्यांनी कुटुंबात रुजवलेल्या संस्कारांचे ते फलित होते.
गेल्या २५ वर्षांत केअरिंग फ्रेंड्सच्या माध्यमातून आणि विविध स्रोतांतून त्यांनी विविध संस्थांना १५०० कोटी रुपयांहून अधिक मदत थेट पोहोचवली.
रमेशभाईंचे वैयक्तिक जीवन त्यांच्या साधे होते. अंधेरीतील छोट्याशा तीन खोल्यांच्या घरात त्यांनी आयुष्याचा मोठा भाग व्यतीत केला. दिवसातील केवळ एक तास व्यवसाय आणि उर्वरित वेळ समाजकार्यासाठी राखून ठेवणे, हे त्यांचे जीवनसूत्र होते. साधा बटणाचा मोबाइल, वस्तू पूर्ण झिजेपर्यंत वापरणे, अनावश्यक खर्च टाळणे आणि पर्यावरणपूरक जीवनशैली ही त्यांच्या जगण्याची वैशिष्ट्ये होती.
त्यांचे लहान घर सतत कार्यकर्त्यांनी गजबजलेले असे. ते दुर्गम भागातून मुंबईत येणार्या कार्यकर्त्यांसाठी राहण्याची व्यवस्था करत, दात्यांच्या भेटींचे नियोजन करत. स्वत:चे वाहनही उपलब्ध करून देत. स्वत: मात्र रिक्षाने प्रवास करत.
रमेशभाईंनी केवळ संस्थांना निधी मिळवून दिला नाही, तर संस्थांना संस्था संचालनाचे तत्त्वज्ञान आवर्जून दिले. विविध जाती-धर्मातील लोकांचा-विशेषत: महिला आणि लाभार्थी यांचा सहभाग, पारदर्शकता, राजकारणापासून कटाक्षाने अंतर राहणे, सक्षम उत्तराधिकारी आपल्या हयातीत तयार करणे आणि त्यांच्या हाती कामाचे सर्वाधिकार सोपविणे, समाजाशी विश्वासाचे नाते आणि संपूर्ण पारदर्शकता जपणे, संस्थेच्या आत लोकशाही पद्धतीने कारभार करणे, या मूल्यांचा त्यांनी सातत्याने आग्रह धरला. संस्थांची संस्थाने झाली तर ती समाजसेवा कामात योगदान देण्यापासून दूर जाईल, हे ते बजावून सांगत.
ओळख आणि विश्वासार्हता नसलेल्या नव्या संस्थांसाठी पहिले एक लाख रुपये उभे करणे सर्वांत कठीण असते. त्यामुळे त्यांनी स्वत:च्या निधीतून एक योजना सुरू केली. नवोदित पात्र संस्था निवडून त्याना बीज मदत देण्याची. ही सर्व जबाबदारी त्यांनी स्नेहालय संस्थेला दिली. स्नेहालयच्या शिफारसीनुसार ३५० नवोदित संस्थांना त्यांनी सहा कोटी ७९ लाख रुपयांची बीजमदत दिली. त्याचबरोबर अशा नवोदित संस्थांसाठी स्नेहालयला सेवा संवर्धन कार्यशाळा सुरू करायला लावल्या. या संस्थांना स्वत:चे ध्येय उद्दिष्ट निश्चित आणि शब्दांकित करणे, अहवाल लेखन, माहितीपत्रक, तंत्रज्ञान वापर, देणगीदारांशी संवाद यांचे प्रशिक्षणही उपलब्ध करून दिले. त्यांच्या जाण्याने भारतातील स्वयंसेवी क्षेत्राने केवळ एक दानशूर व्यक्ती गमावली नाही, तर संस्थांना जोडणारा, त्यांच्यावर निस्सीम विश्वास ठेवणारा आणि समाजपरिवर्तनासाठी आयुष्य वेचणारा एक आधारवड गमावला आहे.
‘स्नेहालय’चे कार्यकर्ते
