२५ ऑक्टोबर, २०२५, दुपारी १२.५७ वाजता : मला एक व्हाट्सअप मेसेज येतो- त्यात एका फोटोखाली ‘माझ्या वयामुळे लोक बरेचदा मला उगाचच प्रौढ समजतात’ असा मजकूर असतो. हा मेसेज माझा सहकारी आणि प्रिय मित्र सतीश शाह याच्याकडून आलेला असतो. मी त्याला १४.१४ वाजता उत्तर पाठवते, ‘बरोबरच आहे ते. तसाच तर आहेस तू!’

त्यानंतर दीडेक तासात १५.४९ वाजता जे. डी. मजेठिया यांचा मेसेज आला की ‘सतीशभाई आता या जगात नाहीत.’ मला वाटलं की कोणीतरी माझी अतिशय वाईट चेष्टाच करतंय. परंतु जसजशी ती बातमी माझ्या मनात भिनू लागली तसतशी मला ती अधिकच अविश्वसनीय वाटू लागली. सतीश गेला! ज्या माणसाला आयुष्य अधिक पूर्णत्वानं जगायचं होतं, त्याच्याकडे पाहून हसायचं होतं, त्याने मारलेला प्रत्येक ठोसा झेलायचा होता आणि तरीही संकटातून हसतहसत बाहेर पडायचं होतं, तो सतीश चक्क गेला होता? बातमी ऐकून हादरलेली मित्रमंडळी एकमेकांना वेड्यासारखी मेसेज करू लागली होती- कसा ? कधी? त्याच्याबरोबर कोण होतं? आता तो कुठे आहे? खरोखरच काय बोलावं आणि काय करावं, हेच कुणाला कळेनासं झालं होतं. सतीश गेला. गेला… नंतर मला कळलं की सगळ्यांनाच साधारण त्याच सुमारास त्यानं असे मेसेजेस पाठवले होते आणि हा अर्थातच विनोद होता. सगळ्यांना हसवून तो जेवायला बसला होता, आपण संपूर्ण बरे होणार आहोत आणि लवकरच मित्रांना भेटणार आहोत असा आत्मविश्वास त्याच्या मनात होता, अशा ऐन मोक्याच्या क्षणी त्यानं सर्वांची शेवटची थट्टामस्करी केली आणि चक्क या जगातूनच एक्झिट घेतली.

सतीशला मी १९८० च्या दशकापासून ओळखते आहे. याच काळात फिल्म इन्स्टिट्यूटच्या पदवीधरांनी तयार केलेले चित्रपट येऊ लागले होते. आणि त्यातून चित्रपट म्हणजे काय याविषयीच्या आधीच्या सर्व कल्पनांची पार उलटापालट होऊ लागली होती. या चित्रपटांतील चेहरे खऱ्याखुऱ्या जीवनातल्या चेहऱ्यांसारखे वाटत होते आणि या प्रकारचं अभिनयकौशल्य आम्ही यापूर्वी पाहिलं नव्हतं. या चित्रपटांचा प्रेक्षकवर्गही वाढू लागला होता. जणू बदलाचे वारेच वाहू लागले होते. या सर्व चित्रपटांना आवश्यक अशी सर्व कौशल्यं सतीशकडे होती- तो गात होता, नाचत होता, गरज पडेल तेव्हा नाट्यपूर्ण अभिनय करू शकत होता, त्याला अभिनयातले खाचखळगे पटकन लक्षात येत होते, शरीरावरलं त्याचं नियंत्रण आणि ज्या डौलाने तो वावरायचा ते अगदी खासच होतं. वेगवेगळ्या भाषा, त्यांच्या बोली याबाबतचं त्याचं निरीक्षण आणि आकलन अफाट होतं, त्यामुळे गुजराती माणूस मराठी किंवा हिंदी कसं बोलेल, ते आत्मसात करून तो तसं अगदी सहज बोलू शकायचा. त्या त्या बोलीभाषांमधले बारकावे हेरून तो त्या त्याच पद्धतीने अगदी सहज बोलू शकायचा. एकदा कानावर पडलेलं तो सहसा विसरत नसे. आत्यंतिक संवेदनशीलता ही त्याची आणखी एक बाजू.

मात्र त्या काळातील दिग्दर्शकांना त्याची केवळ ‘विनोदी’ बाजूच दिसली. कदाचित, सतीशसुद्धा स्वत:कडे आपण मुख्यत्वे विनोदवीरच आहोत, या नजरेनं पाहू लागला असावा. त्यानं पडद्यावर आणि पडद्यामागेही तो भ्रम तसाच ठेवला (किंवा मग कदाचित तोच खरा त्याचा पिंड असेल.) खरं सांगायचं तर, मलाही बरेचदा आश्चर्य वाटायचं की तो कधीतरी या विनोदवृत्तीतून बाहेर येतो की नाही? पण मग त्याच्यावर टीव्हीवरल्या यशाची लाटच कोसळली. त्या लाटेवरून तो आणखी एका प्रवासाला निघाला. या प्रवासानं त्याला सुरक्षित अस्तित्व दिलं, चाहत्यांचं प्रचंड प्रेम दिलं, कामातलं समाधान दिलं आणि चांगले मित्रही दिले. त्यानंतर मग कामातला तोचतोचपणा आणि अधिक पुढल्या पायरीवर जाण्याची संधी कधीच न शोधणं ही त्या यशासाठी मोजलेली खूपच कमी किंमत आहे असंही त्याला कदाचित वाटलं असेल.

फ्लॅशबॅक… ‘फिल्मी चक्कर’ या सीरियलच्या शीर्षकगीताचं चित्रीकरण चाललं होतं. मी त्या काळात विनोदी अभिनयात नवशिकी होते- ‘इधर उधर’ या सीरियलचे केवळ १३ एपिसोड एवढाच विनोदी अभिनयामधला अनुभव माझ्या गाठीशी जमा होता, तर सतीश हा त्या खेळात पारगंत असलेला गडी होता. त्याची विनोदबुद्धी अतिशय तीक्ष्ण आणि सफाईदार होती. कॉमेडी हा प्रकार त्याचा हातखंडा होता म्हणाना. ‘ये जो है जिंदगी’ या मालिकेच्या ६७ भागांत त्याने एकट्याने ५० वेगवेगळ्या व्यक्तिरेखा सादर केल्या होत्या. आपल्याला बरंच काही शिकावं लागणार आहे हे माझ्या पटकन लक्षात आलं आणि ते शिकवायला माझा मित्र ‘सॅट्स’ हा सोडून आणखी दुसरं कोण मिळालं असतं? (आम्ही एकमेकांना कित्येक वर्षांपासून ‘सॅट्स’ आणि ‘रॅट्स’ याच नावाने हाक मारत आलो आहोत.). तो प्रचंड दिलदार अभिनेता होता, त्यानं मला तर मदत केलीच पण त्याचबरोबर जे लहान मुलगे आमच्या मुलांची भूमिका करत होते त्यांना आणि छोट्याछोट्या भूमिकांतील इतर बऱ्याच नटांनाही मदत केली. खरं सांगायचं तर जे सीन उत्तम वठले त्या सर्वांच्या मागे तोच होता. आमच्या वाट्याला आलेला दिग्दर्शक बऱ्यापैकी मूर्ख होता. त्यामुळे आमच्याकडे स्क्रिप्ट यायची त्यात बरेच गोंधळ असायचे. त्यात ती स्क्रिप्ट ऐन चित्रीकरणाच्या दिवशीच यायची. शिवाय विनोदी मालिका असूनही त्यातले संवादही अजिबात मजेदार नसायचे. मला आठवतं की सतीश, विजय काश्यप, सुलभा आर्य आणि मी असे आम्ही चौघे जण स्टुडिओबाहेर लेखकाबरोबर बसून त्या दिवशी करायचे सीन आणखी चांगले कसे करता येतील याची चर्चा करायचो. आहे त्या प्रसांगांमधून विनोदनिर्मिती कशी करायची यात सतीश एकदम माहीर होता. त्याच्या अनुभवातून त्याने हे कौशल्य मिळवलं होतं. एखादा हास्यास्पद सीनही प्रेक्षकांना तसा न वाटता विनोदी वाटणं, हे सतीशमुळेच होऊ शकत असे. असंही असू शकतं, हे प्रेक्षकांना केवळ आणि केवळ सतीशमुळेच वाटत असे. इतर अभिनेत्यांना त्यांचं ‘टायमिंग’ साधता यावं, याचं भान सतीशने कधीच सोडलं नाही. मुख्य म्हणजे हे करताना आपलंच महत्त्व वाढेल, असं त्याने कधीच केलं नाही. त्यामुळेच ही मालिका यशस्वी झाली.

माझ्यासाठी ती जणू विनोदाची शाळाच होती. तिथं मी अगदी योग्य वेळी संवाद कसे बोलायचे, वेळेवर ‘पंचेस’ कसे घ्यायचे, आपल्या वागण्यातील अदब आणि भावना तशीच ठेवूनही बावळटपणा कसा साकारायचा हे शिकले. मी माझ्या अभिनयातून सत्य शोधत होते तर तो परिणामकारकता शोधत होता. लवकरच माझ्या लक्षात आलं की या दोन्ही गोष्टी आवश्यक आहेत (आणि एखाद्या सिटकॉममध्येही म्हणजे परिस्थितीवर आधारित विनोदी मालिकांमध्येही ते शक्य आहे.) मग ती प्रक्रिया तिथे जी सुरू झाली ती ‘साराभाई व्हर्सेस साराभाई’ या मालिकेत फळाला आली.

आतिश कापडिया आणि जे. डी. मजेठिया यांनी मला या मालिकेविषयी सांगितलं तेव्हा फक्त एक रूपरेषावजा सारांश सांगितला होता. तो इतका गमतीशीर (काहीसा आचरटपणाचाही होता, म्हणूनच आगळावेगळाही) होता की मी ताबडतोब होकार देऊन टाकला. आता पुढला प्रश्न होता- इंद्रवदनचं काम कोण करणार? खरं तर हा प्रश्नच अनावश्यक होता- त्यासाठी फार डोकं खाजवायची गरजच नव्हती. – सतीश शाह! ‘साराभाई व्हर्सेस साराभाई’ ही मालिका म्हणजे बऱ्याच ऊर्जांचा जादूई संगमच होता – प्रत्येक जण आपापली ताकद घेऊन येत होता आणि त्या सर्वांचे प्रतिध्वनी जणू एकसुरात तिथं उमटत होते. आतिशला पटकथेविषयी संपूर्ण आत्मविश्वास होता, तर प्रत्येक व्यक्तिरेखा कशी व्यक्त झाली पाहिजे याबद्दल देवेनची समजूत गहन होती. आम्ही पाच अभिनेते (शिवाय, त्या मालिकेत आलटून पालटून येणारे देवेन आणि आतिश हे दोघे- ‘दुष्यंत’ आणि ‘कच्चा केला’… ती मजा कोण विसरेल? ) असे आम्ही सर्व जण आमच्या भूमिकांत अतिशय सफाई आणि मस्ती यांच्यासह जणू शिरलोच होतो. आमचे निर्माते जे. डी. मजेठिया यांचा आम्हाला भरभक्कम पाठिंबा होताच शिवाय या प्रकल्पावर त्यांचा संपूर्ण विश्वासही होता. त्यामुळे ‘संपूर्ण विश्वास आणि एकमेकांच्या कौशल्याचं कौतुक’ अशा त्या वातावरणात काम करणं किती अद्भुुत होतं असं वाटतं आता. खरोखरच, तो आमच्यासाठी अभूतपूर्व अनुभव होता आणि मला वाटतं की प्रेक्षकांतील बऱ्याच जणांसाठी तो तसाच असावा. त्यामुळेच या मालिकेत सतीश ‘हॅगार द हॉरिबल’ या त्याच्या आवडत्या कॉमिक स्ट्रिपसारखा आणि एरवी तो जसा होता अगदी तसाच आनंदाने वावरू शकला.

सतीशच्या घरी एक पाळीव अजगर होता. घरी येणारे पाहुणे बेसावध असताना तो अगदी अलगदपणे तो अजगर त्यांच्याजवळ आणून ठेवत असे. हाच प्रयोग त्यानं एकदा नासीरवर केला आणि नासीरला तर सापांची फार भीती वाटते. त्याला सापांचा फोबियाच आहे म्हणा ना! पण सतीशनं अगदी शांतपणे त्या अजगराला त्याच्याभोवती गुंडाळलं. आणि हा सगळा प्रकार सतीशची आई अर्धवट भीती, अर्धवट गंमत अशा नजरेने पाहत राहिली. आपणच या अवलियाला जन्म दिला का, हा मजेशीर प्रश्नही तिच्या डोळ्यात आम्हाला दिसत होता. सतीशला उच्च दर्जाचा, बुद्धिमान विनोद जितका आवडायचा तितकीच अगदी साधी, खोडकर विनोदी कृत्यंही मजेशीर वाटायची. त्या सगळ्यात काहीतरी कौशल्य आणि गंमत असली पाहिजे एवढीच त्याची अपेक्षा असायची. सतीश कधीच गंभीर नसतो असं सगळ्यांनाच वाटायचं, कारण त्याला प्रत्येक प्रसंगातच काहीतरी तिरकस, मजेशीर छटा दिसायची. नियतीने कितीही वार केले तरीही या माणसाला कुणीही कधीच खिन्न किंवा नाउमेद झालेलं पाहिलं नाही. पण मग कुणीच त्याच्याकडे बघत नसताना तो कसा असेल, असं मला बरेचदा वाटत असे. पण तरीही हा माणूस म्हणजे आमच्या ‘साराभाई कुटुंबा’चा कणा होता यात काहीच संशय नाही.

आम्ही खरोखरच एक कुटुंबच झालो होतो. त्याचा अंतिम प्रवास सुरू होण्याआधी आम्ही सगळे एकत्र जमलो तेव्हा हे खूपच जाणवलं. आम्ही त्याला तेव्हा प्रथमच पूर्णपणे शांत अवस्थेत पाहिलं असेल. ज्याच्या उत्साहाचा धबधबा कुणीच कधी थांबवू शकलं नव्हतं तो आज गप्प झाला होता. त्याचा चेहरा पूर्णपणे स्तब्ध झाला होता. (तो शांत दिसत होता का? नक्की नाही सांगता येणार मला.) आणि मग अगदी सहजप्रेरणेने आम्ही त्याची बायको आणि गेल्या ४५ वर्षांच्या सुखदु:खांत त्याला साथ देणारी त्याची सहचरी मधु हिच्याकडे वळलो. काय घडलंय हे अजून तिला नीट कळल्याचं जाणवत नव्हतं. ‘‘हे खरंच असं काही घडतंय का?’’ तिनं मला विचारलं. ती अजूनही धक्क्यात आहे हे तिचे डोळेच सांगत होते, तिचे हात अद्याप ताठरलेले होते. त्याला तिथून नेल्यावर आम्ही तिच्याभोवती गोळा झालो आणि घडल्या प्रकाराचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करू लागलो. त्याला तिच्यासाठी जगायचं होतं. तिच्या त्रासाच्या काळात तिची साथ द्यायची होती. ‘माझ्यासाठी हे तिनं कित्येक वर्षं केलं आहे, आता मी तिच्यासाठी करायची वेळ आली आहे,’ असं तो म्हणाला होता. ते दोघंही इतके अनुरूप होते, की सतीश जेव्हा जेव्हा सगळ्यांसमोर गायचा, ( हो, तो फार उत्तम गायक होता आणि तो नेहमी काहीतरी गात किंवा गुणगुणत असायचा); तेव्हा प्रत्येक वेळेला तीदेखील त्याला साथ देण्यासाठी त्याच्या बाजूला उभी असायची. सुरेलपणा, आनंद- डौल आणि सौंदर्य यांची ही प्रतिमाच आहे, असं तिच्याकडे बघून वाटायचं. आता तिच्यासाठी, तिच्यासोबत कोण गाईल?

सतीशला अखेरचा निरोप देण्यासाठी आम्ही सगळे ‘साराभाई’ या जमलो होतो. आम्ही हा प्रसंग कधीच विसरू शकणार नाही. आम्ही त्याची सगळी आवडती गाणी गायली. चांगली गोष्ट म्हणजे आमच्यापैकी कुणीही अशा प्रसंगी करतात, तशी भाषणं केली नाहीत. मधुही आमच्यात सामील झाली. सुरुवातीला ती अगदी हलक्या सुरात गुणगुणत होती. या सगळ्या गाण्यांशी जुळलेला ‘माणूस’ इथे हजर कसा नाही याचं तिला बहुधा आश्चर्य वाटत असावं. पण त्यानंतर मात्र सतीशच्या जगण्याचा उत्सव साजरा करण्यासाठी आणि त्याला त्याच्या अनंताच्या प्रवासासाठी निरोप देण्यासाठी जमलेल्या प्रियजनांच्या आपुलकीच्या झऱ्यात तिनं स्वत:ला लोटून दिलं. आधी गुणगुणणाऱ्या मधुचा आवाज हळूहळू चढत गेला… जणू ती तिच्या सतीशसाठीच गात होती.

अचानक पावसाची मोठी सर आली. आपल्या खोडकर वागण्यातून आजूबाजूच्यांची टोपी उडवणारा भारतीय विनोदविश्वाचा हिरो येत आहे, आता आपली काही खैर नाही, या भीतीनं बहुधा स्वर्गातून अश्रू ढाळले जात होते!

अनुवाद – सविता दामले