अनीश दाते
रवींद्र पिंगे आपल्या साहित्याचा वारसा मागे ठेवून २००८ मध्ये गेले. ५० वर्षे सातत्याने ते लिहीत होते. ‘सर्वोत्तम रवींद्र पिंगे ’, ३०० भारतीयांची व्यक्तिचित्रे, २०० पाश्चात्त्य साहित्यिकांचे परिचय, शंभरेक रंजक प्रवासवर्णने, हजारो पुस्तक परीक्षणे, ६० मानपत्रे, पाच-सहाशे ललितलेख, ५० कथा आणि तेवढ्याच संख्येनं केलेले स्वैर अनुवाद ही पिंगे यांची आजवरची लेखन संपत्ती आहे.

२००७ साली १३ मार्च या दिवशी पिंगेंच्या ८१ व्या वर्षी अत्यंत निवडक ललित लेखांच्या संग्रहाचे ‘सर्वोत्तम पिंगे’ हे पुस्तक प्रकाशित झाले. २००९ साली पिंगेंच्या काही अप्रकाशित लेखांचे संकलन करून ‘ रवींद्रायन ‘ आणि ‘ पश्चिमेची धनदौलत ‘ ही दोन पुस्तके प्रकाशित झाली. ३७ ललित लेखांच्या संग्रहाचं पुस्तक म्हणजे ‘ रवींद्रायन ‘. तर पाश्चिमात्य साहित्य जगातील नामवंत साहित्यिकांच्या साहित्याचा परिचय करून देणाऱ्या अभ्यासपूर्ण लेखांचे संग्रहित पुस्तक म्हणजे ‘ पश्चिमेची धनदौलत.’

मनात साचलेल्या आठवणींपर पिंगेंनी लिहिलेले अनेक छोटे ललित लेख ‘ रवींद्रायन ‘ मध्ये आहेत. विषयाचा धागा पकडून पिंगे असे काही सुरेख वस्त्र विणतात की पुन्हा पुन्हा वाचत राहावंसं वाटतं. पिंगेंना आयुष्याच्या विविध वळणांवर अनेक माणसं भेटली. बस स्टॉपवर जलसा बंगल्याचा पत्ता विचारणारा लखनौचा अनोळखी गरीब म्हातारा खेडूत असो की साहेबी मागणी पुरी करायला भाग पडणारी ओळखीची प्राथमिक शिक्षिका असो, यातली काही त्यांच्या मनात घर करून गेली. क्रिकेटर दि. ब. देवधर आणि शिक्षणाधिकारी चंद्रा कर्नाटकी या परिचित मंडळींच्या शतायुषी सोहळ्याला हजर राहण्याचं भाग्य पिंगेंना लाभलं. माटुंग्याला दर गुरुवारी सकाळी बिशीबेळे भाताचा आस्वाद घेण्यासाठी पिंगे जात. तिथे एका गुरुवारी परिसरातील एका इमारतीमध्ये सजवलेला मंडप दिसला. सहज कुतुहूल म्हणून पिंगे तिथे डोकावले मात्र, अनाहुत पाहुणे असूनही त्यांचं जोरदार आगतस्वागत झालं. के. ए. शिवराम नामक एका केरळी गृहस्थाचा दाक्षिणात्य पद्धतीप्रमाणे होणारा शतायुषी कार्यक्रम जवळून पाहायला मिळाल्यावर वाटलेलं कोण अप्रूप पिंगेंनी छान लिहून ठेवलं आहे. पु. ल. देशपांडे, इंदिरा संत, मधुसूदन कालेलकर, मधू अभ्यंकर, चित्रकार विलास परुळेकर या ओळखीच्या परिचितांविषयी पिंगे अनेक आठवणी उलगडून सांगतात.

एकेकाळी मंत्रालयात स्वच्छ आणि सरळ कामकाजाचा अनुभव घेणारे पिंगे आजचे भ्रष्टाचारी जग पाहून जितके व्यथित होतात तितकेच जगाबरोबर बदलत राहण्याविषयी जागरूक राहून तसे स्पष्ट लिहितात. असे लिहायला लागणारे धारिष्ट्य पिंगेंजवळ होते कारण हाताची दाही बोटे स्वच्छ ठेवून त्यांनी आधी मंत्रालय आणि आकाशवाणीवर अंमलदार म्हणून प्रामाणिकपणे काम केलं. आजचा अजब – गजब कारभार पाहून एकेकाळी मंत्रालयातला कारभार अव्वल इंग्रजीत चालत होता असं वाचल्यावर आश्चर्यच वाटतं. पिंगेंनी ललित लेखांत एवढे लक्षणीय बदल नोंदवले आहेत की वाचताना काही ठिकाणी धक्के बसतात आणि डोळ्यांच्या कडा नकळत ओलावतात.

गाईड या हिंदी चित्रपटाला ऑस्कर नामांकन मिळाल्याचे सर्वज्ञात आहे. पर्ल बक या अमेरिकन लेखिकेला गाईडची पटकथा आणि संवाद लेखनाचे काम देण्यात आले होते. ताजसारख्या पंचतारांकित हॉटेलमध्ये तिला खास इतमामामात ठेवण्यात आले होते. पण गाईड कादंबरीचे मूळ लेखक आर. के. नारायण यांना एक फुटका छदाम मिळाल्याचे नसल्याचे नमूद करताना लेखकांना मिळणाऱ्या वागणुकीवर प्रकाश टाकला आहे. साहित्यिकांना मिळणाऱ्या पुरस्कारांबाबत परखड लिहिले आहे. स्वतः पिंगे कधीही अशा पुरस्कारांमागे धावले नाहीत. कारण मुळात तो त्यांचा स्वभाव नव्हता. काही मानाचे प्रतिष्ठित साहित्यिक पुरस्कार त्यांना मिळाले खरे, मात्र रसिक वाचकांच्या अनुकूल अभिप्रायांची वाढती पावती हा खरा पुरस्कार असे ते कायम मानत आले. म्हणून यशापयशाचा बाऊ न करता शेवटपर्यंत अत्यंत निकोप मनाने पिंगे लिहिते राहिले.

यशाच्या राशी रचणाऱ्या जिद्दी आणि उद्यमी लेखकांबाबत लिहताना पिंगे साहित्याच्या पठारावरून हिंडवून आणतात. आनंदाचा झोका घेताना चंद्राच्या साथीला असणाऱ्या आनंदी शुक्रताऱ्याचा उल्लेख करतात. भारतरत्न पंडित रविशंकर जगभरात पोचले, पण सरस वादनाने त्यांच्यावर मात करणाऱ्या पत्नी अन्नपूर्णादेवींच्या पैलूंबाबत लिहिताना कलावंतांमधील उच्च नीचता आणि पराकोटीचे भेदभाव नजरेला आणतात. पित्याच्या आज्ञेनुसार अन्नपूर्णादेवींनी मैफिलींपासून पूर्णपणे फारकत घेऊन पती रविशंकरना पुढे जाण्याची मोकळीक दिली असली तरी पुढे पतीच्या तोडीस तोड असणारी वादक शिष्य परंपरा घडवली हे विशेष. प्रसिद्धीचे सारे पाश तोडून जगाची पर्वा न करता अन्नपुर्णादेवी आनंदी शुक्रताऱ्याप्रमाणे जगल्या.

जगभरातील लेखक मंडळी का, कसे आणि कधी लिहितात याबाबत पिंगेंनी मोकळेपणे सांगितले आहे. लेखन हा पंथ आहे. सहज सुचलं म्हणून लिहिलं अशी चंचलता तिथे उपयोगाची नसते. लेखनात निष्ठा तर हवीच आणि जिवंतपणा हवा. सगळे लेखक झपाटल्यासारखे लिहू शकत नाहीत. त्यासाठी स्वयंशिस्त अंगी असावी लागते. पोटापाण्यासाठी लिहिणारे बोरू, टंकयंत्र आणि आता संगणक बहाद्दर अधिक असणे तसे साहजिक आहे, तरी सगळे काही कौटुंबिक, प्रसन्न, नर्मविनोदी लिहू शकत नाहीत. रोजच्या रोज लेखनाची खर्डेघाशी करणारे फार थोडे असतात. त्यासाठी अंगी जन्मजात स्वयंशिस्त असावी लागते. विषय मांडण्याची स्वतंत्र धाटणी आणि मोहिनी टाकणारी शब्दकळा या दोन ताकदवान पंखांच्या जोरावर कोणत्याही लेखकाला भरारीसाठी सारं आकाश मोकळं असल्याचं पिंगेंनी म्हटलंय यात किती तथ्य आहे पाहा. जगभरातील आणि भारतीय साहित्यिकांची ठळक उदाहरणे पिंगेंनी त्यासाठी दिली आहेत. जेफ्री आर्चर हा थोर पाश्चिमात्य कादंबरीकार. एकेकाळी व्यापारात साफ बुडाल्यावर साडेचार लक्ष डॉलर्सचे बोकांडी बसलेले कर्ज फेडण्याचा त्याने विडा उचलला. ‘नॉट अ पेनी मोअर, नॉट अ पेनी लेस’ ही कादंबरी लिहून जेफ्रीने कर्जाची पै न पै फेडली. पुढे ही कादंबरी जगभरात तब्बल १७ भाषांमध्ये प्रकाशित झाली. अर्नेस्ट हेमिंग्वेने म्हटल्याप्रमाणे सुदैवाचं सहावं बोट लेखकांच्या लिहित्या हाताला फुटावं लागतं तरच लेखन लोकोत्तर होतं, अन्यथा नाहीच. ‘आठवणींचं झुळझुळ पाणी’ या लेखाच्या शेवटी पिंगे म्हणतात – लंडनवर बॉम्बफेकीचा वर्षाव चालू असताना तळघरात शांतपणे लिहीत बसलेल्या चर्चिलची नुसती आठवण झाली तरी माझं मन प्रसन्नतेनं भरून येतं. चर्चिलसारखा फक्त चर्चिलच.

असे सगळे ललित लेख वाचल्यावर आपलंही मन भरून येतं. लेखनासाठी आवश्यक असणारं हे सारं पिंगेंनी कुठून पैदा केलं असेल याबद्दलचा कौतुकमिश्रित आदर दुणावल्यावाचून राहत नाही. भटकंती आणि निसर्गवाचनाची आवड असल्याने आसाम – अरुणाचल प्रदेश, तुंगभद्रेकाठचं हंपी, राजस्थानमधील भरतपूर, बाबा आमटेंचं आनंदवन, लंडनजवळचे विम्बल्डन याविषयी पिंगेंनी भरभरून लिहिलं आहे. भारतात गंगेपासून कावेरीपर्यंत साऱ्या मुख्य नद्यांमध्ये पोहून येणारे पिंगे हे एकमेव पट्टीचे भारतीय जलतरणपटू – लेखक असावेत. एवढेच नव्हे तर धनुष्यकोडीला हिंदी महासागरामध्ये पोहून येणारा एकमेवाद्वितीय असा मराठी लेखक बहुधा केवळ मीच असावा असे ते थट्टेने म्हणतात. कोणी सांगावे पिंगे बॅकबे परिसरातील आकाशवाणीऐवजी हाकेवरील एअर इंडियामध्ये जनसंपर्क अधिकारी असते तर जगातील प्रमुख नद्या आणि महासागर नक्कीच पोहून आले असते. जोडीला जगभरात मिळणाऱ्या परमेश्वराच्या प्रथमावताराचे त्यांनी अतिशय प्रेमानं भजन, पूजन, सेवन करत त्यावर मनमुराद लेखन केलं असतं असे मानायला मोठा वाव आहे. कितीही झाले आणि जगभरात देहाने कुठेही गेले तरी ते मनाने विजयदुर्ग खाडीकिनारी वसलेल्या मुटाट बंदरनजीकच्या उपळे गावात कायम राहिले. विजयदुर्गची खाडी, मुटाट बंदर , उपळे गाव आणि परिवारातील पूर्वजांविषयी पिंगेंनी श्रद्धेनं लिहिलं आहे. उपळे गावी अधूनमधून एक पाय असला की दुसरा पाय कायम ठेवलेल्या पोटापाण्याच्या मायमुंबईविषयी पिंगेंनी अतिशय आत्मीयतेनं व्यक्त होतात.

आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यात मागे वळून पाहताना पिंगेंनी आपल्या लेखनप्रवासाविषयी लिहिलं आहे. लेखनप्रवासादरम्यानच्या आयुष्यातील स्थित्यंतरे रंगवली आहेत. लेखनप्रवास सुरू असताना स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर देशातील परिस्थितीचे वर्णन वासापुरता मोहोर आणि बाकी सारा पाचोळा असं चपखल केलं आहे. लेखनप्रवासामध्ये पिंगेंना शाबासकीची उत्तेजनं देणाऱ्या प्रतिभावंत मंडळींचे उल्लेख आहेत. चित्रकार दीनानाथ दलाल हे तर रत्नपारखी. दलाल पिंगेंना मेजर रायटर म्हणून संबोधत. कवी मंगेश पाडगांवकर पिंगेंना मित्रत्वाने चांगल्या प्रकाशनांमध्ये सतत लिहिण्याविषयी आपुलकीनं बजावत. लंडनमध्ये वास्तव्य असताना तेथील नागरी जीवनात मुख्यत्वे परिचारिकांना आणि त्याखालोखाल शिक्षक – लेखकांना मिळणारा सर्वोच्च आदराचा मान मिळताना पाहून पिंगे जितके दिपून गेले तितकेच आपल्या देशातील या वर्गांना मिळणारी भयंकर उपेक्षेची वागणूक आठवून बेचैन झाले. सवंग लबाड राजकारणी, उथळ सिनेनट – नट्या आणि क्रिकेटर्सना नको इतके डोक्यावर घेणाऱ्या आपल्या समाजाच्या संवेदनशीलतेबाबत पिंगेंनी व्यक्त केलेले मत योग्य वाटते. लेखनप्रवासादरम्यान अनुभवलेल्या विरंगुळ्याच्या गोष्टी तर अनेक आहेत.

प्रतिभावंतांच्या घरांचे दर्शन घेतल्यानंतर त्याविषयी पिंगेंनी आदरानं लिहिलं आहे. कलावंत आणि कवी – लेखकांच्या सहवासात रमणारे पिंगे नेहेमी कृतज्ञ राहिले. देहाने पार्ल्यात वस्ती करणारे पिंगे मनाने उपळे गावच्या घराबाबत म्हणतात की – माझा एक डोळा माझ्या घराकडे, बागेकडे असतो नि दुसरा डोळा खाडीतल्या चंदेरी मासळीकडे ! अस्मादिक सुद्धा जन्माने पार्लेकर आणि गावाने रत्नांग्रीकर.पार्ल्यातील महिला संघाजवळून नेहमीच कारणपरत्वे येजा होत असते. पूर्वी महिला संघाजवळ आलं की समोरील जय हनुमान सोसायटीत वास्तव्याला असणाऱ्या पिंगेंचं कधीतरी क्वचित का होईना पण धावतं दर्शन व्हायचं. आवडते लेखक म्हणून पिंगेंना त्यांच्या हयातीत कधीतरी भेटून यायला पाहिजे होतं याची रुखरुख वाटते. शिवाय आता पार्ल्यात साहित्यिकांमध्ये तसं राहिलंय तरी कोण ? पु. ल. देशपांडे, रमेश मंत्री, माधव गडकरी, विजय तेंडुलकर आणि रवींद्र पिंगे ही सगळी साहित्यिक मंडळी तशी एकमेकांजवळ अगदी ठराविक अंतराने वास्तव्याला होती. त्यामुळे तेव्हा ही जवळीक जाणवायची. अजमल रोडवर खासगी कोचिंग क्लासमध्ये शिकायला जाताना कधीतरी पु लं चे दर्शन व्हायचे. त्याशिवाय टिळक मंदिरातील कार्यक्रमांत पु लं चे दर्शन आणि त्याहूनही त्यांचे ते चौफेर भाषण अनुभवत होतो. हनुमान रस्त्यावर विचारांच्या तंद्रीत झपाझप चालत जाणारे विजय तेंडुलकर दिसत. त्याचप्रमाणे दिवसभराची लेखंदाजी करून झाल्यावर संध्याकाळी पाय मोकळे करायला निवांतपणे बाहेर पडणारे काळे कोटधारी रमेश मंत्री पाहायला मिळत. माधव गडकरी तर तेव्हा दैनिक लोकसत्ताचे संपादक होते. त्यांचे प्रार्थना समाज रस्त्याच्या नाक्यावर केव्हातरी दर्शन होई. आता यांच्यापैकी कोणीही हयात नसल्याची रुखरुख जाणवते. पार्ल्याचं साहित्यिक वैभव पूर्वीसारखं राहिलेलं नाही.

dateaneesh@gmail.com