राजीव बर्वे रविप्रकाश कुलकर्णी १९९०-९२ च्या आसपास दिलीपराज प्रकाशनाकरिता हस्तलिखिते वाचून त्याचे अभिप्राय देऊ लागला. रविने दिलीपराजकरिता हजारांहून अधिक हस्तलिखिते आजवर वाचली असतील. त्यातल्या हस्तलिखित स्वीकृतीचे प्रमाण खूपच कमी. वाचायला पुस्तक पाठविल्यावर कधी त्याच्याकडून तक्रार नाही की वेळेवर परीक्षण न आल्यामुळे आम्हाला तगादा लावावा लागला नाही. साधारण १५०-२०० पानांचे हस्तलिखित पाठविले की १५-२० दिवसांत चार ते पाच फुलस्केप पाने त्यावर लिहून अभिप्राय हजर. अभिप्रायाच्या सुरुवातीलाच प्रकाशकाकरिता ‘पुस्तक स्वीकारा किंवा स्वीकारू नका’, याचे स्पष्ट शब्दांत मार्गदर्शन, दोष दाखवायचे असतील, पूर्णपणे नाकारायचे असेल तरी कुठला आडपडदा नाही की लेखक काय म्हणेल याची काळजी नाही! गेल्या काही वर्षांत दिलीपराजचा आणखी व्याप वाढल्यावर आणखी दोन-तीन मान्यवर परीक्षक, संपादक आमच्या परिवारात आले. त्यांनी पाठविलेल्या परीक्षणाखाली त्यांचे नाव नसते किंवा लिहिलेच तर वर फक्त ‘प्रकाशकांसाठीच गोपनीय’ असे लिहिलेले असते. पण रविप्रकाश असं काहीच करत नाही. एवढेच नव्हे तर, ‘तुम्ही माझे नाव घेऊन लेखकाला सांगा की हस्तलिखित रविप्रकाश कुलकर्णी यांनी नाकारले आह” अशी आम्हाला पठ्ठ्याने सूचना देऊन टाकलीय! आमची एक पद्धत आहे की लेखक कितीही मोठा असला तरी त्याचे हस्तलिखित स्वीकारण्यापूर्वी वाचायला पाठवायचे. त्याप्रमाणे अनेक मोठ्या लेखकांची पुस्तके रविला वाचायला पाठवली. लेखक मोठा असो अगर छोटा याच्यावर काहीच परिणाम होत नाही. निर्णय घेण्यासाठी त्याच्यावर अजिबात नावाचे दडपण येत नाही. मोठ्या लेखकाच्या चुकीचा, न आवडलेल्या, असंबद्ध गोष्टी स्पष्टपणे लिहून त्याच्याकडे दया-माया काही नसते. प्रसिद्ध लेखकाने (पानावर मानधन मिळत असणाऱ्या) उगीचच पानेच्या पाने वाढवली असतील किंवा संहिता रटाळवाणेपणाने पुढे जात असेल तर कापाकापी करायला किंवा लेखकास कापाकापी मान्य नसेल तर सरळ ‘दुसऱ्या प्रकाशकास हे हस्तलिखित देऊन टाका’ असा सल्ला आम्हाला द्यायला रवी कमी करीत नाही. प्रत्येक लिखित अगदी बारकाईने वाचायचे, त्यातल्या खाचा-खोचांची टिपणं काढायची. कादंबरी असेल आणि पुढे-मागे संदर्भ बिघडला असेल तर बरोबर पान नंबर देऊन त्याची नोंद घ्यायची. सर्वात वर सुरुवातीला स्वत:चे मत स्पष्टपणे नमूद करायचे. संहितेत दुरुस्त्या केल्यानंतर त्यांचे पुस्तक होणार असेल तर अतिशय सविस्तरपणे काय काय बदल हवेत, कुठे आणखी व्यवस्थित लिहायला हवे याचे मार्गदर्शन करायचे. काही वर्षांपूर्वी विदर्भातल्या एका मोठ्या साहित्य संस्थांमध्ये सर्वदूर संचार असलेल्या लेखकाचे साहित्य रविप्रकाशने आम्हाला सरळ साभार परत पाठवून द्यायला सांगितलेले मला चांगलं आठवतंय. माझी मोठी अवघड स्थिती झाली होती. मी ती रविला सांगितल्यावर तो म्हणाला, ‘‘मी कुरिअरने तुझ्याकडे हस्तलिखित पाठवलंय, तुला मिळालं का?’’ मी हो कुरिअर मिळालं म्हणल्यावर म्हणाला, ‘‘मग उघडून पाहिलं का?” मी म्हणालो, “‘अरे, तू दूरध्वनीवर सरळ सरळ परत पाठवून दे’ सांगितल्यावर काय म्हणणार. आता तुला त्या स्क्रिप्टच्या कुरिअर पार्सलमध्येच असेल तर तेवढे काढून घेतो आणि परत पॅक करून अभिप्राय पाठवून देतो.” तर म्हणाला, ‘‘तुझी अवघड परिस्थिती होणार हे मला माहीत होते, त्यामुळे मी त्यांना पत्र लिहून बाड पाठवलंय. माझ्या पत्रासकट बाड त्यांना पाठव, म्हणजे तुला किंवा दिलीपराजला वाईटपणा येणार नाही!” तर असा हा धन्य मनुष्य! एकदा एका मोठ्या लेखकाच्या पुस्तकाविषयी आमच्याकडे अभिप्राय पाठवून ते पुस्तक नाकारताना याने लिहिले होते, ‘त्यांना कसेही करून पुस्तक यायला पाहिजे असे वाटते का? प्रत्येक कॅलेंडर इअरमध्ये एक पुस्तक अशी पद्धत बंद करा म्हणावं.’ आमच्या अनेक प्रकाशित पुस्तकांच्या यशात रविप्रकाशचा मोठा वाटा आहे हे नमूद करायलाच हवे. सुप्रसिद्ध लेखक बाबा कदम यांच्या सुविद्य पत्नी माई कदम यांनी आत्मचरित्र लिहून आमच्याकडे पाठविले. ‘याला जीवन ऐसे नाव’ किंवा असं काहीसं या संहितेचे शीर्षक होते. बाबा कदमांसारख्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाच्या पत्नीने आत्मचरित्र लिहिणे ही साधी गोष्ट नव्हती आणि माई काही कसलेल्या लेखिका नव्हेत. मी भीत भीतच आत्मचरित्र रवीकडे पाठवलं. रवीने मला फोन करून सांगितले की आपण माईंकडून परत लिहून घेऊ. त्याने सविस्तर दुरुस्त्या पाठविल्या. आत्मचरित्रातील काही पात्रे ठसठसशीत उभी राहत नव्हती ती त्याने लिहून घेतली. स्क्रिप्टच्या प्रत्येक पानावर मागच्या बाजूला सूचना व दुरुस्त्या त्याने लिहिल्या होत्या आणि शेवटी त्याने माईंसाठी दोन ओळी लिहिल्या होत्या, ‘तुमच्याकडे संयम आहे म्हणून एवढे मोठे बाड तुमच्याकडून लिहून झाले. मी सांगितल्याप्रमाणे नव्याने सर्व लिहावं. वाचनीयता येण्याच्या दृष्टीने गडद घटना आणखी हव्या आहेत. शीर्षकही बदला.’ माईंनी सगळ्या दुरुस्त्या केल्या आणि ‘दोन घडीचा डाव’ हे लेखकपत्नींच्या रांगेत नोंद करावं, असं आत्मचरित्र आकाराला आलं. इसाक मुजावरांच्या ‘आई-माँ-मदर’ आणि ‘फ्लॅशबॅक’ या दोन पुस्तकांच्या संहिता आमच्याकडे आल्या होत्या आणि दुर्दैवाने इसाकभाई निवर्तले. इसाक मुजावरांचे अक्षर भयंकर! डीटीपी ऑपरेटर अनेक ठिकाणी अडखळू लागली. रविने सांगितले, जमेल तसे टाइप करून दोन्ही पुस्तके माझ्याकडे पाठवा. मी बघतो आणि त्यानंतर रविने त्या दोन पुस्तकांवर एवढे कष्ट घेतले आणि अवाढव्य काम केले की पुछो मत। पुस्तके पाहायला अर्थात इसाक मुजावर पृथ्वीतलावर नव्हते. त्या स्वर्गलोकीतल्या मुजावरदादांनी शंभर वेळा रविला दुवे दिले असतील. अशी आणखीही काही लेखकांच्या बाबतीत दुर्दैवी उदाहरणे झाली आहेत, तेव्हा रवि आमच्या मदतीला धावून आलेला आठवतोय. न्या. माधवराव रानडे यांच्या जीवनावरची ‘मन्वंतर’ ही गंगाधर गाडगीळांची शेवटची कादंबरी. खूप मोठी. लेखकाचे फार मोठे नाव. पण रविने अभिप्राय देताना काही सूचना पाठवल्या. नेहमीप्रमाणे त्याच्या नावासकट. आम्ही त्या गंगाधर गाडगीळांकडे पाठविल्या. गाडगीळांनी त्या वाचून ‘मला खेद होतोय…’ वगैरे टिपणी केली, पण दुरुस्तीही करून दिली. दुर्दैवाने पुस्तक प्रकाशित होण्यापूर्वी त्यांचे निधन झाले आणि पुस्तकावर शेवटचा हात मात्र रविप्रकाशने फिरवून दिला. माजी कुलगुरू असलेल्या हैदराबादच्या एका प्रसिद्ध लेखकाचं हस्तलिखित नाकारताना त्याने त्याच्या छोट्या ठेवणीतल्या हस्ताक्षरातली सहा ‘ए फोर’ साइजची पाने विस्तृत अभिप्राय लिहून खर्ची घातली होती. मी याचे कारण विचारल्यावर म्हणाला, ‘तू हस्तलिखित परत पाठविल्यावर’ ते का परत पाठविले म्हणून त्यांनी विचारले तर माझा अभिप्राय दे त्यांना पाठवून! सुदैवाने त्यांनी विचारले नाही व मी तो पाठविला नाही. नाही तर याचा अभिप्राय वाचून आठवडाभर महाशयांना झोप लागली नसती. अर्थात, चांगल्या साहित्याचे तोंड भरून कौतुक करून आम्हाला ते हस्तलिखित स्वीकारायला लावलेलीही असंख्य उदाहरणे आहेत. अशा वेळेला त्याने दोन-चार ओळींत स्वीकृती कळविली असे होत नाही तर तो त्या संहितेची वैशिष्ट्ये, पात्ररचना, जमेच्या बाजू, मनाला भिडलेले पृष्ठांचे पान क्रमांक आणि संहिता आवडूनसुद्धा अभिप्रायाच्या शेवटी आणखी चांगले पुस्तक होण्यासाठी दोन-तीन सूचना, असे सगळे करतोच. स्वत:च्या कामासाठी अतिशय प्रामाणिक राहणे आणि अभिप्राय देण्यासाठी कोणताही जवळचा मार्ग न शोधणे, हे त्याचे वैशिष्ट्य मला आवडत आले आहे. ‘अनेक लेखकांना केवळ रविप्रकाशमुळे मोठाली बक्षिसे मिळाली आहेत,’ असे विधान मी केले तर त्यात यत्किंचितही अतिशयोक्ती असणार नाही. रेखा बैजल, प्र. सु. हिरुरकर, सुहास बारटक्के, गिरिजा कीर अशा अनेक लेखकांच्या पुस्तकांची उदाहरणे येथे सांगता येतील. १५ लाख रुपयांचा सरस्वती सन्मान ज्या शरणकुमार लिंबाळेच्या ‘सनातन’ला मिळाला, ती कादंबरी परत परत वाचून रविनेच मौलिक सूचना केल्या होत्या आणि शेवटी एक वाक्य मला तो म्हणाला, तुझा चष्मा काढून ठेव, डोळे मीट आणि ही कादंबरी वाच. छान बक्षिसे मिळवेल ही कादंबरी! शरणकुमार लिंबाळेंना सरस्वती सन्मान मिळाल्यावर त्यांच्याविषयी आलेल्या लेखांचे, त्यांच्या मुलाखतीचे पुस्तक करायचे ठरले. डॉ. विजयकुमार खंदारे यांनी ती जबाबदारी घेतली. बाड आमच्याकडे आले, पण ते सगळे विस्कळीत. संपादनाच्या पुस्तकाचे संपादन करणे आवश्यक झाले होते. रविला पाठविले. त्याने काम केले तरी मनासारखे होईना. मग रवि पुण्यालाच ठाण मांडून बसला आणि ‘समन्वय’ नावाचा वेगळाच छान ग्रंथ आकाराला आला. डॉ. रमेश धोंगडे यांचे ‘विंदांची कविता शैली वैज्ञानिक विश्लेषण’ नावाचे पुस्तक रविकडे वाचायला पाठविले असता, नेहमीप्रमाणे त्याने लेखकाच्या विद्वत्तेचा ताण न घेता स्वत:ची मते व्यक्त करून काही गोष्टींचा अंतर्भाव पुस्तकात करायला लावलेला मला चांगला आठवतोय. त्याचा अभिप्राय लिहिताना त्याने ‘वि. दा. करंदीकर’ यांचे नाव ‘वि. दा. करंदीकर’ हे नसून ‘गोविंद विनायक करंदीकर’ असे आहे, असे जेव्हा लिहिले तेव्हा मीसुद्धा चकित झालो. अनेकांना हे माहीत नाही. खरं तर साहित्याच्या प्रांतातल्या अनेक गोष्टी अनेकांना ज्या माहीत नसतात, त्या बरोबर रविला माहीत असतात. संहितेत वाङ्मयचौर्य कुठे केले आहे, हा बरोबर ओळखतो! एका ठिकाणी दिलेला लेख परत नवीन पुस्तकात एखाद्या मोठ्या लेखकाने घेतला असेल तर हा अलगद बाजूला करतो. तो लेखकदेखील चकित होतो आणि ‘मग नजरचुकीने झाले’चा आधार घेतो! परखड आणि ओजस्वी वक्ते म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या एका माजी संमेलनाध्यक्षांच्या संहितेची रविने सोदाहरण आणि वस्तुनिष्ठ पुरावे देऊन इतकी चिरफाड करून ती आम्हाला परत पाठवायला लावले. यानंतर त्यांनी पुढची संहिता तयार झाल्यावर ‘तुमच्या टीममधल्या रविप्रकाश कुलकर्णींना वाचायला देणार नसाल तर पुस्तक देतो,’ असे सांगून आमच्याकडे हस्तलिखित दिले होते. ही काय सुंदर पावती होती! मी त्यांना ‘बरं’ म्हणून ते स्क्रिप्ट रविलाच पाठवले. सुदैवाने या वेळेला होकारात्मक अभिप्राय आल्यावर माझा जीव भांड्यात पडला. रविच्या अशा असंख्य आठवणी ३०-३५ वर्षांच्या त्याच्याबरोबरच्या प्रवासातल्या आहेत. आमच्याच नव्हे तर साहित्यविश्वातल्या सर्वच महत्त्वाच्या समारंभांना हा पदरमोड करून हजर असतो, कोणतेही साहित्य संमेलन तर चुकवत नाहीच. माध्यमातल्या, वर्तमानपत्रातल्या, साहित्य क्षेत्रातल्या सगळ्या बातम्या याच्या मेंदूच्या पोतडीत हा साठवत असतो आणि मग बरोबर कुठे, केव्हा, कशी बातमी या पोतडीतून बाहेर काढायची, हे त्याला चांगले माहीत असते! त्याच्या अफाट स्मरणशक्तीचे तर मला नेहमीच कौतुक वाटत आले आहे. आमच्याच प्रकाशनाच्या इतिहासातल्या काही गोष्टी हा बोलता-बोलता मला निदर्शनाला आणून देतो आणि ‘अरे, आपण कसे विसरलो’ म्हणून खजील व्हायची वेळ माझ्यावर येते! साहित्य क्षेत्रातलं काय काय पण अत्यंत महत्त्वाचं आठवत असतं याला कोण, केव्हा भाषणात काय म्हणाले? त्या वक्त्याला कदाचित काही वर्षांनी विचारल्यावर सांगता येणार नाही, पण रवि सांगतो! वाङ्मयावर, पुस्तकांवर या सगळ्या सारस्वतावर मनापासून प्रेम असल्याशिवाय हे शक्य नाही. त्याच्याकडे वाचनासाठीची बैठक, निग्रह तर ओतप्रोत. निकृष्ट वाचनाची शिक्षा सहन करून त्यावर लिहिणं अवघड आहे सगळं हे. संपादनासाठी, अभिप्रायासाठी आणि आवड म्हणूनही रोजच्या रोज अफाट वाचनाचा रियाज करताना हा थकत नाही तर दिवसागणिक अधिक प्रगल्भ होत जातो आहे, असे आता माझ्या लक्षात येऊ लागले आहे. डोंबिवलीतून दर महिन्या-दीड महिन्यांनी पुण्याला आल्यावर आमची एक बैठक होते, पण त्यात ‘तसे’ काही नसते, असते ती केवळ त्याची आवडती ‘लस्सी’! एखाद्या ध्येयाने काम करणारा माणूस जशा आपल्या गरजा कमीत कमी ठेवतो तशा रविने ठेवल्या असाव्यात, असे मला वाटते. कारण वर्षानुवर्षे बघत आलोय, अगदी साधा असतो हा. कोणतीही अवाजवी मागणी कधीही नाही. स्वत:चे दडपण वाटेल, असे दर्शन तर अजिबात नाही. मोह करायचाच असेल तर तो फक्त पुस्तकांचाच! कोणाशी भांडण नाही की तंटा. हो! पण तुटून पडायचे असेल तर निकृष्ट साहित्यावर आणि साहित्यातील लबाडीवर किवा चुकांवर - हे ब्रीद. पुस्तक लिहून पूर्ण झाल्यावर, पुस्तक छापून बाहेर येण्यापूर्वी तावून-सुलाखून पैलू पाडणारा, दर्जाविषयी विलक्षण जागरूक असणारा, रविप्रकाशच्या रूपाने कोणी चौकीदार या क्षेत्रात आहे, याचा आज आम्हाला अभिमान आहे. या साध्या-सरळ-सज्जन माणसाची एक्काहत्तरी साजरी होतेय. रविने आणखी अनेक वर्षे साहित्यातील निकृष्टता दूर करून स्वच्छ प्रतिभेचा प्रकाश आम्हाला द्यावा, हीच मनोमन इच्छा ! लेखक दिलीपराज प्रकाशन या संस्थेचे संचालक आहेत. rajeevbarve19@gmail.com