डॉ. नितीन करीर
राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनाने महाराष्ट्राने एक कुशल, उत्तम प्रशासक, मंत्री गमावला आहे. १९९०च्या दशकात माझ्या प्रशासकीय सेवेला प्रारंभ झाला, त्याच वेळी अजितदादाही राजकारणात सक्रिय झाले होते. मी जिल्हा परिषदेचा मुख्य कार्यकारी अधिकारी होतो तर ते राज्यमंत्री होते. गेल्या ३० वर्षांत अनेकदा त्यांच्याबरोबर काम करण्याची, त्यांच्याकडून काहीतरी चांगले शिकण्याची संधी मिळाली.
स्पष्टवक्तेपणा, कडक स्वभाव अशी दादांची ओळख. ते स्पष्ट आणि अगदी खरे बोलतात, हातचे काही राखून ठेवत नाहीत अशी त्यांची प्रतिमा. मात्र त्यामागची दुसरी बाजू वेगळी आहे. नियमांना बांधील, प्रशासकीय अधिकार्यांवर पराकोटीचा विश्वास, राज्यातील प्रश्नांची उत्तम जाण, सतत लोकांसाठी काम करण्याची तळमळ हे त्यांचे गुण वाखाणण्याजोगे होते.
दादांचा एखाद्या अधिकार्यावर विश्वास बसला की तोे एखाद्या प्रकरणाबाबत जे कायदे वगैरे सांगे, त्यासंदर्भात दादा त्या अधिकार्याच्या पद्धतीने काम करीत. एखाद्या अधिकार्याने एखादे काम नियमात बसत नाही असे सांगितले तर दादा त्याच्यावर विश्वास ठेवून संबंधितांना तसे समाजावून सांगत, याचा गेल्या कित्येक वर्षांच्या प्रशासकीय सेवेत आम्ही अनेक अधिकार्यांनी वेळोवेळी अनुभव घेतला आहे. दादांचे तिसरे गुणवैशिष्ट्य म्हणजे तांत्रिक मुद्दा समजावून घेण्याचा संयम.
कोणत्याही विभागाशी सबंधित कोणतीही गोष्ट असेल, त्यातील बारकावे समजावून घेण्याची त्यांची ताकद अफाट होती. त्यांची आणखी एक खासीयत होती, त्यांनी कोणाला भेटीसाठी वेळ दिली, तर ते त्याला त्या वेळी भेटणारच. भेटीचीही त्यांची एक पद्धत होती. ज्या व्यक्तीला वेळ दिली आहे, त्या वेळेत तिला बोलू द्यायचे, भूमिका मांडू द्यायची, तिचे बोलणे शांतपणे ऐकून घ्यायचे आणि नंतर तिला प्रश्न विचारायचे. म्हणजे त्यांनी अर्धा तास वेळ दिला असेल तर त्यातील २५ मिनिटे तिच्या हक्काची आणि शेवटच्या पाच मिनिटांत ते तिला प्रश्न विचारणार, समजून घेणार आणि लगेच निर्णयही घेणार. इतका संयम फार कमी राजकारण्यांकडे दिसून येतो.
कोणतीही गोष्ट लक्षपूर्वक ऐकून घेणे, समजावून घेणे ही दादांची आणखी एक खासीयत. वित्त विभागाचा सचिव असताना मी अनेक वेळा मी हा अनुभव घेतला. एखाद्या विषयावरचे सादरीकरण अतिशय बोगस आहे, ते कशाला पाहता असे सुचविले तरी दादा ते शांतपणे ऐकून घ्यायचे. त्याला मांडायचे आहे ते मांडू द्या, बोलू द्या. त्यातून काय घ्यायचे हे मी पाहतो असे ते सांगायचे. त्या वेळेत त्यांचे लक्ष केवळ त्या विषयावर असायचे. त्या वेळी ते फोन बघणार नाहीत, कोणाशी बोलणार नाहीत. वेळेची शिस्त पाळण्यात त्यांचा हात कोणीच धरू शकत नसे. पहिली बैठक १० वाजता, दुसरी १०.०५. तिसरी १०.१२ मिनिटांनी होणार असेल आणि तुम्ही दिलेल्या वेळेत पोहोचणार नसाल तर त्यांच्या कार्यालयातील लोक सतत फोन करून बैठकीच्या वेळेची आठवण करून देत.
अफाट स्मरणशक्ती ही दादांना लाभलेली आणखी एक दैवी देणगी होती. उदाहरणार्थ २० वर्षांपूर्वी एखाद्या कृषी महाविद्यायात गेले असताना तेथे पाहिलेल्या संशोधनाची माहिती ते कृषी विभागाच्या आढावा बैठकीत अधिकार्यांना देत. विशेषत: कृषी आणि पशुसंवर्धन विषयावरील त्यांच्याइतकी माहिती अन्य कोणाकडे असेल असे वाटत नाही. जलसंपदा विभागाचीही त्यांना प्रचंड जाण होती.
अजितदादा कुशल प्रशासकही होते. प्रशासकीयदृष्ट्या कोणताही विषय नीट समजून घेणारे, सबंधितांशी चर्चा करून पटकन निर्णय घेणारे दादा आगळेवेगळे होते. बर्याच वेळा ते सकाळी सकाळी फोन करत. अहो कमिशनर, माझ्यासमोर हे अमुक-तमुक बसलेले आहेत. त्यांचे म्हणणे ऐकून घ्या. तुम्ही स्पीकर फोनवर आहात हे ते आवर्जून सांगणार. समोरच्या व्यक्तीचे बोलणे झाल्यावर आपण आपले मत मांडायचे. ते ऐकून मग दादा समोरच्या व्यक्तीलाही ते समजावून सांगत आणि तेथेच निर्णय घेऊन विषयाचा तुकडा पाडत. त्यानंतर तो विषय बंद अशी दादांची अफाट निर्णयक्षमता होती.
राजकारणापलीकडे दादांचा नाट्य, कला, साहित्य, संस्कृती याकडे त्यांचा कल नाही, त्यांना त्याची आवड नाही असे म्हटले जायचे. पण याची दुसरी बाजू अशी की, दादांचे सर्व लक्ष प्रशासकीय काम आणि राजकारणावर केंद्रित असे. या दोन्ही गोष्टींवरील त्यांचा फोकस तिळमात्रही ढळला नाही. राजकारण, समाजकारणावरील दादांचे लक्ष इतके तीव्र होते की, ते पहाटेपासूनच क्षेत्रीय पाहणीच्या कामाला लागायचे. मग तो करोनाचा काळ असो वा एखाद्या कार्यालयात, सरकारी इमारतीला दिलेली भेट असो. स्वत: जाऊन त्या भागाची पाहणी करणे, त्यातील त्रुटी दाखवून देणे, स्वच्छतेला प्राधान्य देणे, दिवसभराचे काम वेळेत करणे आणि रात्री लवकर काम संपवणे ही त्यांची पद्धत आम्ही प्रशासकीय अधिकार्यांसाठी खूपच लाभदायक होती.
राज्याच्या अर्थव्यवस्थेचा दादांचा गाढा अभ्यास होता. आतापर्यंत ११ वेळा त्यांनी राज्याचा अर्थसंकल्प मांडला होता. यंदाच्या अर्थसंकल्पाची तयारीही त्यांनी सुरू केली होती. अर्थसंकल्पातील आकडे कोठून येतात. त्या आकड्यांच्या मागे काय गणिते आहेत, त्या गणितांच्या मागे कोणते प्रकल्प आहेत आणि त्या प्रकल्पांच्या मागे कोणते लोक आहेत… म्हणजेच कोणाला या प्रकल्पांचा लाभ होणार आणि कोण बाधित होणार हे समजणे सोपे नसते. त्यात खूप बारकावे असतात. शिवाय अर्थसंकल्पात आकड्यांचा खेळही मोठा असतो. मात्र या सर्व बाबींची दादांना उत्तम जाण आणि ज्ञान होते. त्यामुळे व्यय समितीच्या बैठकीत निर्णय लगेच व्हायचे. त्यांना कोणता प्रकल्प किती महत्त्वाचा आहे. त्यासाठी किती निधीची गरज आहे. कोणत्या प्रकल्पाला प्राधान्य देण्याची गरज आहे याची सखोल माहिती असायची.
जलसंधारण हा त्यांच्या आवडीचा विषय. राज्यातील नद्या, त्या कुठून कुठे आणिा किती महिने वाहतात याची सर्व माहिती अजितदादांना होती. मला नदीकाठी घर बांधायचे होते. दादांची वेळ घेऊन त्यांना कल्पना सांगितली. त्या वेळी दादांनी सर्व नद्यांची, त्यांच्या पाणीसाठ्याची महिती सांगितली. पुढील तीन वर्षांत नद्यांची काय परिस्थिती असेल, माझे बजेट आणि गरजा याचा विचार करून कुठे घर बांधावे याची त्यांनी माहिती दिली. जलसंधारणाबाबतचे त्यांचे ज्ञान अफलातूनच होते. नुसती माहिती असून उपयोग नाही तर त्याचे विश्लेषण करून या माहितीचा योग्य पद्धतीने वापर करण्याचे असाधारण कौशल्य त्यांच्याकडे होते.
स्पष्टवक्तेपणाच्या, फटकळ बोलण्याच्या सवयीमुळे त्यांच्या या असाधारण बाबी लोकांसमोर आल्या नसतील. मात्र प्रशासकीय अधिकार्यांबाबत विचार केल्यास दादा म्हणजे राज्यातील उत्कृष्ट प्रशासक मंत्री असे अधिकारी सांगतील. कोणताही विषय समजून घेण्याचा संयम, समजून घेतलेली गोष्ट कायम ध्यानात ठेवणे, कठोर निर्णयक्षमता, एकदा निर्णय घेतला की त्याला बांधील राहणे, अधिकार्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे हे दादांचे गुण प्रशासकीय अधिकार्यांना नेहमीच प्रोत्साहन देणारे वाटायचे.
कितीही चिडचिड झाली, त्रास झाला तरी लोकांना भेटण्याचे, त्यांच्या अडचणी ऐकून घेण्याचे दादांनी कधी थांबवले नाही. कृपया कोणी चपला काढू नयेत ही त्यांच्या बंगल्याच्या दर्शनी लावलेली पाटी खूप काही सांगून जाते. येणारा माणूस कोणत्या पक्षाचा, जातीचा आहे, गरीब आहे की श्रीमंत आहे असा विचार न करता येईल त्याचा प्रश्न कसा सुटेल याकडे दादांचा कटाक्ष असे. त्यांच्या स्वीय साहाय्यकांनाही कायम सतर्क रहावे लागत असे. कारण येणार्या प्रत्येकाचे काम मार्गी लावणे याकडे दादांचा कटाक्ष असे.
गेल्या काही दिवसांत दादांची तीव्र विनोदबुद्धी हा त्यांचा आणखी एक गुण लोकांसमोर आला. सार्वजनिक ठिकाणी, व्यासपीठावर त्यांना कोणी तरी ओरडून सांगावे, ‘आय लव्ह यू’ आणि व्यासपीठावरूनच ‘हेच घरी जाऊन तुझ्या बायकोला का सांगत नाहीस’ असे त्यांनी म्हणावे. दादांचा हा हजरजबाबीपणा, समयसूचकता, लोकांना हसविण्याची वृत्ती हा नवा पैलू अलीकडच्या काळात फार उभारून आला होता. कर्मकांडापासून दूर राहण्याची, अंधश्रद्धेला थारा न देण्याची दादांची वृत्ती अन्य राजकारण्यांसाठी वस्तुपाठ होती.
प्रशासकीय अधिकारी आणि राजकारणी यांच्यातील संबंध कसे असावेत याचा दादा वस्तुपाठ होते. काही अधिकार्यांबरोबरच्या मैत्रीसबंधांचा अपवाद वगळता अजितदादांचे प्रशासनाबरोबरचे संबंध व्यावसायिक होते. सर्व अधिकार्यांशी ते समान न्यायाने, आपुलकीने वागत. एखाद्या मंत्र्याने सांगितलेल्या दहा कामांपेकी नऊ केली आणि एक केले नाही तर तो नाराज झाल्याची अनेक उदाहरणे देता येतील. अजितदादा मात्र याला अपवाद होते. त्यांनी सांगितलेल्या कामांपैकी काही कामांना अधिकारी नाही म्हणाले तरी ते नाराज होत नसत. त्यांचे हे स्वभावगुण राज्याच्या सध्याच्या परिस्थितीत खूपच दिशादर्शक आणि दिलासादायक होते. आज महाराष्ट्र ज्या परिस्थितीत आहे त्यातून मार्ग काढण्यासाठी या गुणांचा उपयोग झाला असता. मात्र नियतीलाच ते मान्य नसावे.
शब्दांकन- संजय बापट
(माजी मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य)

