उल्हास पवार ( ज्येष्ठ काँग्रेस नेते, माजी आमदार )
एखादा शब्द चुकून गेला, तर माफी मागण्याचे धाडस त्यांच्यात होते. चूक झाल्यावर ते यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीजवळ बसले होते. त्यांच्या प्रामाणिकपणाला सलाम केला पाहिजे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाचे वृत्त धक्कादायक आणि अत्यंत वेदनादायी आहे. अजितदादांनी राजकारणात आपल्या कृतीतून ठसा उमटवला. त्याहीपेक्षा प्रशासनात एक दबदबा निर्माण केला. प्रशासनावर त्यांची उत्तम पकड होती. सध्या बर्याच नेत्यांमध्ये विषयाच्या आकलनाचा अभाव दिसतो. मात्र, एखादा विषय ताबडतोब समजून घेऊन त्याची पूर्तता करण्याचे कसब अजितदादांकडे होते. ही क्षमता दिवंगत मुख्यमंत्री वसंतदादा पाटील, वसंतराव नाईक, विलासराव देशमुख आणि शरद पवार यांच्याकडे असल्याचे मी पाहिले आहे. ही मंडळी आपल्या अफलातून आकलनशक्तीच्या जोरावर कोणताही विषय मार्गी लावायची. विषय कोणताही असेल, तो क्षणात समजून घेण्याची कला अजितदादांच्या अंगी होती. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली ऐन तारुण्यात काम करण्याची त्यांना संधी मिळाली. त्यातून हे व्यक्तिमत्त्व घडले होते.
अगदी सुरुवातीच्या काळात तरुण वयात ते खासदार झाले. त्यांना राजकीय वारसा असला, तरी आपले वेगळेपण जपणे महत्त्वाचे असते. अजितदादांनी त्यांच्या कर्तृत्वातून हा वारसा आणि वेगळेपणा जपला. बुद्धिमत्ता, स्मरणशक्ती आणि आकलनशक्तीच्या जोरावर जी माणसे आपला ठसा उमटवतात, त्यामध्ये अजितदादांचे नाव घ्यायला लागेल.
अजितदादांचे आणखी एक वेगळेपण म्हणजे वक्तशीरपणा. मंत्रिमंडळाची बैठक असेल, एखाद्याला भेटीची वेळ दिली असेल किंवा त्यांच्या खात्याची बैठक असेल, तर वेळेच्या अगोदर ते पोहोचायचे. अनेक समारंभांमध्ये हे त्यांचे वेगळेपण मी पाहिले आहे. अनेक राजकारणी हे कार्यक्रमाच्या ठिकाणी वेळेवर जात नसल्याचा अनुभव नागरिकांना येतो. मात्र अजितदादा हे कोणत्याही कार्यक्रमाला वेळेवर किंवा वेळेच्या अगोदर जायचे. सध्याच्या काळात ही गोष्ट दुर्मीळ झाल्यासारखी झाली आहे. मात्र अजितदादा हे कायमच वेळेत यायचे. अजितदादांनी शरद पवार यांचे काही गुण आत्मसात केले. त्यापैकी हा एक होता. शरदराव हे सकाळी साडेसात वाजता तयार असतात. रात्री कितीही जागरण झाले तरी ते सकाळी नागरिकांच्या भेटीसाठी तयार असतात. शरदरावांच्या सान्निध्यामध्ये १९७० ते १९७८ पर्यंत मी सावलीसारखा त्यांच्याबरोबर फिरलो आहे. त्यांचा हा गुण मी जवळून पाहिला आहे.
अजितदादांना मी पहिल्यांदा पाहिले तो १९७० चा काळ असेल. तेव्हा ते १० ते ११ वर्षांचे होते. शरद पवारांबरोबर माझा मुक्कामही रामटेकला असायचा. मी आऊट हाऊसमध्ये एक खोलीत राहात होतो. तेव्हापासून मी अजितदादांना पाहत आलो. बारामतीला अनेक वेळा मी शरदरावांबरोबर गेलो, अंबराईच्या जुन्या घरी मी अजितदादांना पाहत आलो. अजितदादांचे वडील, त्यांना घरातील सर्व जण ‘तात्या’ म्हणायचे. अजितदादांच्या वडिलांचे शरदरावांवर अतिशय प्रेम. या कुटुंबात सामंजस्य आहे. त्या दृष्टीने महाराष्ट्रातील हे आदर्श कुटुंब म्हटले पाहिजे. मोठे कुटुंब असतानाही हा सगळा परिवार एकत्र राहतो.
महिला राजकारणात फारशा नसायच्या, त्या काळात शरदरावांच्या आई तेव्हाच्या लोकल बोर्डाच्या सदस्या होत्या. वेगवेगळ्या विचारसरणीची माणसे कुटुंबात असली तरी त्यांच्यात प्रेम आणि सामंजस्याची भावना आहे. संत गाडगे महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि सत्यशोधक समाज यांचा वारसा या कुटुंबामध्ये आहे, त्यामुळे धर्मांधता, जातीयता हा विषय त्यांच्या कुटुंबात नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कुटुंबात प्रत्येकाला मत मांडण्याचे स्वातंत्र्य आणि निर्णय घेण्याचा अधिकार आहे. अजितदादा हे थोडे आक्रमक होते. पण त्याचा अर्थ कोणाचा तरी अपमान करणे असा नव्हता. आक्रमकतेचा अर्थ ठरलेली गोष्ट न घाबरता अमलात आणणे. ही धडाडी त्यांच्यामध्ये कायम होती.
अजितदादांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे वक्तृत्व आणि व्यक्तिमत्त्वाची जडणघडण. शरद पवार यांनी जसे स्वत:ला घडवले, त्याप्रमाणे अजित पवार यांनी स्वत:चे व्यक्तिमत्त्व घडवले. एखादे व्यक्तिमत्त्व हे शिबीर घेऊन विकसित करता येत नाही. त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते. ते शरद पवार यांनी केले, तसेच अजित पवार यांनी केले.
अजितदादांना आवाजाची देणगी होती. त्यांचा आवाज पहाडी होता. तेच त्यांचे वेगळेपण होते. अशा आवाजातून बोललेले कधी कधी समोरच्याला उद्धट वाटते. तसा समज अजितदादांबाबत अनेकांचा व्हायचा. ते कोणाचाही अपमान करत नसत. मात्र एखादी गोष्ट होणार नसेल तर ते स्पष्टपणे सांगायचे. तसेच काम होणार असेल तर तेही स्पष्टपणे सांगायचे, हे मी पाहिलेले आहे. त्यांनी एखादे काम करायचे ठरवले तर ते शंभर टक्के करून दाखवायचे. ‘करतो’, ‘बघतो’, हे शब्द त्यांच्या शब्दकोशात नव्हते. तो त्यांचा स्वभावच नव्हता.
त्यांनी राज्य सहकारी बँक अत्यंत यशस्वीपणे चालवली. राज्य सहकारी बँकेच्या माध्यमातून त्यांनी शेतकर्यांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला. भूविकास बँकेच्या माध्यमातूनही मदत केली. राज्य सहकारी बँक, जिल्हा सहकारी बँक आणि विविध सहकारी संस्थांच्या माध्यमातून ते काम करत राहिले. कित्येक वर्षे त्यांनी पुण्याचे नेतृत्व केले. ते करताना काही कठोर निर्णय घ्यावे लागतात. मात्र शेतकर्यांचे दु:ख पाहिल्यानंतर, थोडेसे नियमात बदल करून ते मदत करत राहिले. त्यासाठी त्यांनी कधीही हात मागे घेतला नाही, हे या ठिकाणी सांगितले पाहिजे. अनेक सहकारी साखर कारखाने, सहकारी सूत गिरण्या अशा सहकारातल्या विविध संस्था जिवंत ठेवणे, त्यांना पाठबळ देणे आणि सहकार टिकवण्याचे काम अजितदादांनी केले.
महाराष्ट्राचे वैशिष्ट्य म्हणजे सहकाराचे असलेले जाळे. देशात महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश आणि काही प्रमाणात आंध्र प्रदेश अशी तीन-चार राज्ये वगळता अन्य ठिकाणी सहकार प्रभावी दिसत नाही. महाराष्ट्रात यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, वसंतराव नाईक यांनी सहकार क्षेत्र हे केवळ जपले नाही, तर ते जोपासले आणि हरितक्रांतीच्या दृष्टीने वाटचाल केली. त्यांना योग्य तो न्याय देण्याचे काम आणि योग्य ते संतुलन ठेवण्याचे काम धाडसाने ज्या मोजक्या लोकांनी केले त्यामध्ये अजितदादांचे नाव प्रामुख्याने घ्यावे लागेल.
अजित पवार यांनी राज्य सरकारमध्ये विविध खाती सांभाळली; पण अर्थ खाते त्यांनी अधिक सक्षमपणे सांभाळले. कुणी कितीही टीका- टिप्पणी केली, तरी ते निर्णयावर ठाम असायचे. अर्थसंकल्पामध्ये ज्या तरतुदी आहेत, त्या चाकोरीतच त्यांनी काम केले. निर्णय घेण्याची अत्यंत कठोर क्षमताही अजित दादांमध्ये होती. कोणतेही खाते असले, तरी विषय समजून घेऊन निर्णय घ्यायचे, हे त्यांचे विशेष होते.
बोलण्याची कला त्यांनी आत्मसात केली होती. अलीकडे त्यांची भाषणे ऐकताना ते अधिकाधिक प्रगल्भ झालेले दिसून यायचे. शैलीदार वक्तृत्व, मार्मिक टिप्पणी करत विनोदाची झालर देऊन श्रोत्यांना आपलेेसे करायचे. निवडणुकीची सभा असली, तर त्या ठिकाणी कसे बोलायचे, गंभीर प्रश्न असल्यास कशी भूमिका मांडायची. प्रशासनाशी कसा संवाद साधायचा हे त्यांनी अतिशय उत्तम प्रकारे जपले. अनेक नेत्यांमध्ये अभावाने ही गोष्ट आढळते. एखाद्या नेतृत्वाबद्दल आदर व्यक्त करणे किंवा मूल्यमापन करताना आपले मत व्यक्त करणे, यामध्ये त्यांनी कधीच माघार घेतली नाही.
तुमचे आवडते मुख्यमंत्री कोण, असा प्रश्न विचारताच ते क्षणात म्हणायचे, विलासराव देशमुख! त्यांनी हे अनेकदा सांगितले. ते खासगीत कधी कधी म्हणायचे, मुख्यमंत्र्यांना सहकार समजला पाहिजे, मुख्यमंत्र्यांना शेती समजली पाहिजे, मुख्यमंत्र्यांना उद्योग समजला पाहिजे, मुख्यमंत्र्यांना शैक्षणिक वातावरण कसे आहे, ते समजले पाहिजे, प्रत्येक गोष्टीची थोडी तरी माहिती हवी. विलासरावांकडे गेल्यावर ते एका क्षणात समजून जातात. विलासरावांबद्दल त्यांना खरोखरच खूप आदर होता. अलीकडच्या काळात, एका नेत्याने निवडणुकीच्या दरम्यान विलासरावांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले, तेव्हा लातूरमध्ये जाऊन तिथे आपला उमेदार असतानाही ते विलासरावांबद्दल स्पष्ट बोलले. लोकशाहीमध्ये हे फार महत्त्वाचे आहे.
कधी कधी एखादा शब्द चुकून गेला, तर माफी मागण्याचे तेवढेच धाडस त्यांच्यामध्ये होते. चूक झाल्यावर ते यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीजवळ बसले होते. त्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल खरंच सलामच केला पाहिजे. ते रोखठोक बोलायचे. त्यांच्याकडे बोथटपणा नव्हता. योग्य व्यक्तींबद्दल त्यांच्या मनात अत्यंत आदर होता.
दबदबा असलेले नेते खूप झाले. मला नेहमी वाटायचे की, अजित दादा हे भविष्यात दिल्लीत वलय निर्माण करतील. नितीश कुमार, लालू प्रसाद यादव, मुलायम सिंह यादव, अखिलेश यादव यांच्याप्रमाणे दिल्लीत अजित पवार नावाचे वलय निर्माण होऊ लागले होते.
पुण्यात माजी नगरसेवक अप्पा रेणुसे यांच्या संस्थेच्या वतीने दरवर्षी गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम आयोजित केला जातो. त्यात अजित दादांच्या हस्ते माझा सत्कार करण्यात येणार होता. मात्र, कामाच्या व्यापामुळे दोन वेळा हा कार्यक्रम त्यांना पुढे ढकलावा लागला. आता मात्र, तो सत्कार राहूनच गेला… शब्दांकन- सुजित तांबडे

