अरुण खोरेगांधीजी आणि विनोबा यांनी दाखवून दिलेल्या पदपथावरून अखंड वाटचाल करत राहिलेल्या शोभनाताई रानडे यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या कार्याचा आढावा. शोभनाताई रानडे यांनी आपल्या ९९ वर्षांच्या दीर्घ आयुष्यक्रमात गांधीजींची प्रेरणा व विनोबांचा विचार जागता ठेवत बालके, महिला आणि वंचित, उपेक्षित समाजातील वर्ग यांच्यासाठी मोठे काम उभे केले. पुण्यातील ज्या आगाखान पॅलेसमध्ये गांधीजी पावणेदोन वर्षे ब्रिटिशांच्या तुरुंगवासात होते, त्याच ठिकाणी स्वातंत्र्यानंतर शोभनाताईंनी आपले काम सुरू केले. आगाखान पॅलेसच्या जागेतच गांधी नॅशनल मेमोरियल सोसायटीची स्थापना करण्यात आली. त्याच्या विश्वस्त सचिव म्हणून शोभनाताई काम पाहत होत्या. इथे नोंदवण्यासारखी गोष्ट म्हणजे, ज्या प्रिन्स आगाखान यांचा हा राजवाडा होता, त्यांनी तो गांधीजींच्या जन्मशताब्दीच्या वर्षी म्हणजे १९६९ साली भारत सरकारला देणगीदाखल दिला. तिथेच काही वर्षांनी गांधीजी आणि कस्तुरबा यांच्या स्मरणार्थ विधायक उपक्रमांची सुरुवात झाली. गांधीजींनी स्वातंत्र्यानंतर विधायक आणि रचनात्मक कामाकडे लक्ष केंद्रित केले पाहिजे, असे आवाहन केले होते. विनोबा भावे, ठाकूरदास बंग, दादा धर्माधिकारी, डॉ. झाकीर हुसेन, तुकडोजी महाराज, डॉ. कुमारप्पा या सर्वांनीच गांधीजींच्या या आवाहनाला प्रतिसाद दिला. त्याचाच एक भाग म्हणून विनोबांनी भूदान चळवळ सुरू केली, तेव्हा शोभनाताई त्यात सहभागी झाल्या. हेही वाचा >>> प्रस्थापितांना झुगारून एकत्र आल्यास रिपब्लिकन पक्षही नवी भरारी घेईल! आसाम, नागालँड या भागात त्या विनोबांबरोबर काम करत होत्या. विनोबा त्यांना म्हणाले, ‘महाराष्ट्रातील जंगले आणि इथली जंगले यात तुला काय फरक दिसतो?’ तेव्हा त्या म्हणाल्या, ‘महाराष्ट्रातल्या झाडांचे बुंधे उघडे असतात, पण इथे मात्र ते वेलींनी पूर्ण लगडलेले असतात.’ विनोबा म्हणाले, ‘बरोबर आहे. या वेलींप्रमाणे तुला इथल्या समाजात मिसळून सामाजिक काम करायचे आहे.’ मग शोभनाताईंचा पुढचा प्रवास सुरू झाला. आसामात काम करत असतानाच तिथल्या काँग्रेसच्या नेत्यांनी शोभनाताईंना विधानसभेवर येण्याची विनंती केली. विनोबांचा सल्ला घेऊन मग त्यांनी काँग्रेसला आपला नकार कळवला होता. गांधीजी हा या सर्वांमधला नेहमीच मोलाचा दुवा होता. शोभनाताईंच्या माहेरचे सगळे लोक गांधीवादी होते. वारकरी पंथातले आदरणीय असलेले सोनोपंत ऊर्फ मामासाहेब दांडेकर हे त्यांचे काका. त्यामुळे गांधीजींचे गारुड या सर्वांच्या जीवनक्रमाभोवती होतेच! निराधार आणि अनाथ बालकांच्या पुनर्वसनाचे काम आणि विनोबांच्या मार्गदर्शनाप्रमाणे महिला सक्षमीकरणाचे काम या दोन्ही सामाजिक क्षेत्रात शोभनाताई रानडे यांनी आपल्या संघटन कौशल्याने आणि समर्पित वृत्तीने मोठे काम उभे केले. आसामात जाऊनही त्यांनी तिथे बालसदनची सुरुवात केली. त्यामुळे अनेक निराधार अनाथ मुलांना आधार मिळाला. बालकांचे शिक्षण आणि त्यांचा विकास हा त्यांच्या सामाजिक कार्याचा एक मूलाधार होता. एका मुलाखतीत त्यांनी सांगितले होते की, मादाम मॉन्टेसरीचा सहवास त्यांना पुण्यात लाभला होता. बालकांच्या पूर्व प्राथमिक शिक्षणाच्या बाबतीत एक प्रशिक्षणाचा वर्ग पुण्यातील एसपी कॉलेजच्या लेडी रमाबाई हॉलमध्ये आयोजित करण्यात आला होता. जवळपास ३२० प्रशिक्षणार्थी त्यात सहभागी झाले होते. शोभनाताईंनी या सर्व प्रशिक्षणवर्गाचे समन्वयन केले होते. मादाम मॉन्टेसरी यांना आणणे, त्यांची व्यवस्था पाहणे या सगळ्या गोष्टी त्या अतिशय आनंदाने करत होत्या. बालकांच्या पूर्व प्राथमिक शिक्षणाचे महत्त्व लक्षात घेऊन या नंतरच्या काळात शोभनाताईंनी या क्षेत्रातही काम उभे केले. पुण्यातील बॉम्बे सॅपर्समध्ये त्यांनी पहिली मॉन्टेसरी बालवाडी सुरू केली. त्यानंतर मग पुण्यात विविध संस्था संघटनाच्या माध्यमातून शहराच्या विविध भागांत बालवाड्या उभ्या राहू लागल्या. त्या वेळी सर्रास या बालवाड्यांना मॉन्टेसरी वर्ग असेच म्हटले जायचे. आता याचेच रूपांतर अंगणवाडीमध्ये झाल्याचे आपण पाहत आहोत. आसाम, नागालँडमध्ये नंतरच्या काळात बाल सदनाची सुरुवात याच भूमिकेतून झाली होती. आसामातून परतल्यानंतर शोभनाताईंनी महाराष्ट्राला अभिनव वाटेल असा बालग्रामचा वेगळा प्रयोग बाबासाहेब जाधव यांच्या सहकार्याने राबवला. ऑस्ट्रेलियातील डॉक्टर हार्मोन मेनार यांनी याचा आराखडा तयार केला होता. त्याच्या आधारे पुण्यातील येरवडा भागात बालग्राम एसओएसची सुरुवात झाली. या प्रयोगाचे वेगळेपण म्हणजे निराधार, अनाथ मुलांना छोट्या छोट्या गटात ठेवून त्यांचे संगोपन बालग्राममधील माता करणार. या बालकांना संगोपनाबरोबरच हा भावनेचा ओलावाही त्यातून मिळेल, असा त्यांचा विश्वास होता. या प्रयोगाचे फार मोठे स्वागत झाले. पुणे, पनवेल या भागात बालग्राम स्थापन करण्यात आले. पुण्यात एका वेळी २०० मुले या बालग्राममध्ये वास्तव्याला होती. मुलींची संख्याही मोठी होती. या संस्थांमधून जवळपास १६०० मुला-मुलींचे संगोपन झाले आणि यातील बरीच मुले पुढे स्वावलंबनाने आपल्या जीवनात उभी राहिली. आगाखान पॅलेसमधील कामाला सुरुवात करताना विनोबांनी शोभनाताईंना सांगितले होते की, महिला सक्षमीकरणाचे काम तुला या भागात करायचे आहे. कस्तुरबा स्मारक ट्रस्टच्या माध्यमातून आणि खादी ग्रामोद्याोग मंडळाच्या सहकार्याने नंतर हे काम खूप विस्तारले. आगाखान पॅलेसच्या आवारात १९७९ साली राष्ट्रीय महिला प्रशिक्षण संस्थेची स्थापना शोभनाताईंनी केली. महिलांसाठी विविध स्वरूपाची प्रशिक्षण कौशल्य देणारे अभ्यासक्रम येथे राबवण्यात आले. त्याचा लाभ अनेक महिलांना झाला. या महिलांनी केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन आणि त्याची विक्री येथे होत असते. महिला सक्षमीकरणाचा विचार राबवत असताना, शोभनाताईंनी विविध कल्पना समोर ठेवून काम केले. घरकाम करणाऱ्या महिला, सामाजिक कार्यकर्त्या आणि आदिवासींच्या पाड्यात काम करणाऱ्या महिलांसाठी विविध प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात आले. प्रौढ महिला साक्षरतेकडेही त्यांनी लक्ष दिले. या सामाजिक प्रशिक्षणाच्या वर्गात देशाच्या सर्व भागातील मुली, महिला सहभागी होऊ शकतील, ही आखणी त्यांनी केली होती. त्यामुळे एकदा त्यासाठी मणिपूरजवळच्या गावातून ५६ मुली पुण्यात आल्या होत्या. सामाजिक काम करताना जे किमान कौशल्य लागतात त्यावर त्यांनी भर दिला. आरोग्य प्रशिक्षण कार्यक्रमात बालकांचे आरोग्य, संगोपन, कुपोषित महिलांच्या प्रसूतिपूर्व आणि प्रसूतीनंतरच्या काळातील आरोग्याची काळजी या सगळ्या पैलूंकडे या अभ्यासक्रमात आणि प्रशिक्षणात लक्ष दिले जात होते. आपल्या सगळ्या कार्यात गांधी विचार आणि त्यांची मूल्ये हे केंद्रस्थानी आहेत, याबद्दल शोभनाताई नेहमीच बोलत असत. या कार्यासाठी त्यांना जमनालाल बजाज पुरस्कार मिळाला. केंद्र सरकारने पद्माभूषणचा सन्मान दिला. जिथे गांधीजी, कस्तुरबा, महादेवभाई राहिले, त्या वास्तूशी म्हणजे आगाखान पॅलेसशी असलेले त्यांचे भावबंध खूप खोलवरचे होते. कस्तुरबा आणि महादेवभाई देसाई यांच्या अंत्यविधीनंतर त्यांची समाधी वृंदावने, पॅलेसच्या मागील बाजूला बांधली आहेत. त्याच्याजवळच गांधींच्या अस्थिकलशाचे वृंदावन आहे. महादेवभाई यांच्या निधनाला ५० वर्षे पूर्ण झाल्यावर आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी डॉ. सुशीला नायर, महादेवभाईंचे चिरंजीव नारायणभाई देसाई हे आले होते. अगदी अलीकडेच सुशीला नायर यांची पुन्हा एकदा आठवण झाली. नायर यांच्या ‘कारावास की कहानी’ या हिंदी पुस्तकाचा मराठी अनुवाद शोभनाताईंनी करून, त्याचे पुस्तक प्रकाशित केले. प्रकृती बरी नसतानाही ९२ वर्षांच्या शोभनाताई या कार्यक्रमासाठी व्हीलचेअरवरून सभागृहात आल्या, तेव्हा सर्वांनी टाळ्यांचा कडकडाट केला! त्या खूप आनंदी होत्या आणि तो आनंद त्यांच्या चेहऱ्यावर लखलखीतपणे दिसत होता. आगाखान पॅलेसमधील आपल्या कार्यालयात जाण्याची त्यांची इच्छा असायची, पण प्रकृतीमुळे ते शक्य होत नसायचे. या सगळ्या पॅलेसच्या आवारात आज शोभनाताई नसल्या तरी त्यांच्या आठवणी खूप आहेत. गांधीजी, कस्तुरबा, महादेवभाई जिथे राहत होते, त्याच्यालगतच अगोदर त्यांचे कार्यालय होते. नंतर केंद्र सरकारच्या खात्यांनी या वास्तूचा ताबा घेतल्यावर त्यांचे कार्यालय मागील बाजूस गेले. खूप ऊर्जा आणि अपरिमित उत्साह हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे रसायन होते आणि प्रसन्न चेहऱ्याने सारे काम त्या करीत होत्या. आता आगाखान पॅलेसमध्ये जात असताना शोभनाताईंची खुर्ची रिकामी असेल. शेजारी काचेच्या कपाटात असलेला गांधीजींचा छोटा अर्धपुतळा शोभनाताईंची आठवण करून देत राहील. लेखक ज्येष्ठ पत्रकारआहेत arunkhore1954@gmail.com