वैशाली विवेकानंद फडणीस

ऐच्छिक बेरोजगारी ही संकल्पना कदाचित बऱ्याच जणांना माहीत नसेलही. पण, ढोबळमानाने बेरोजगारीची जी वर्गवारी होते त्यामध्ये शहरी, ग्रामीण, हंगामी, प्रच्छन्न, चक्रीय, घर्षणात्मक बेरोजगारी असे जे सगळे प्रकार आहेत. त्यामध्ये ऐच्छिक बेरोजगारी हा एक महत्त्वाचा भाग आहे. ऐच्छिक बेरोजगारी म्हणजे एखाद्या व्यक्तीची एखादे ठरावीक काम करण्याची पात्रता तर असते, पण ती व्यक्ती रोजगार किंवा काम उपलब्ध असूनही काम करण्यास इच्छुक नसते, म्हणजेच आपणहून स्वीकारलेली बेरोजगारी. ऐकून जास्त नवल वाटायला नको. कारण हा लेख वाचत जाताना अशी बरीच उदाहरणे आपल्या आजूबाजूलाच असल्याचे लक्षात येईल.

Akshaya Tritiya 2024 Gajkesari Rajyog Ma Lakshmi
अक्षय्य तृतीयेला राजयोगांचा मेळा; ‘या’ राशींच्या कुंडलीत लक्ष्मी सोन्याच्या पावलांनी येऊन देणार करोडपती व्हायची संधी
How to prevent heart attacks
Heart Attack : हृदयविकाराचा धोका कसा टाळायचा? वयाच्या विसाव्या वर्षापासून लावा ‘या’ सवयी, तज्ज्ञ सांगतात…
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…
risk of H5N1 bird flu outbreak Case Was Seen in Hens At Nagpur
कोविडहुन १०० पट जास्त भीषण विषाणू उड्या मारतोय! नागपुरातही आढळलं प्रकरण, तज्ज्ञांचं मत काय?

सीएमआयई (सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी) या संस्थेने प्रकाशित केलेल्या अहवालानुसार मार्च २०२३ मध्ये असणारा बेरोजगारीचा दर वाढून एप्रिल २०२३ मध्ये साधारण ८.११ टक्के इतका झाला. डिसेंबर २०२२ मध्ये हाच दर ८.३० टक्के इतका उच्चांकी होता. हे सर्वेक्षणाचे आकडे पाहता सामाजिक, राजकीय, भौगोलिक, पर्यावरणविषयक सर्व परिमाणे पाहून शाश्वत रोजगार, नोकरी/ व्यवसाय निर्माण करणे अत्यावश्यक असून त्यावर वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये काम सुरू आहे. सर्व समाजघटक व त्यातील तज्ज्ञ मंडळी कदाचित काही प्रमाणात यावर ठोस उपाययोजना करूही शकतील, पण ऐच्छिक बेरोजगारीचे सध्याचे तपशील समोर येणेही तितकेच महत्त्वाचे आहे.

ऐच्छिक बेरोजगारीची कारणेही व्यक्तिपरत्वे वेगवेगळी आहेत. त्यामध्ये प्रमुख कारण म्हणजे वाडवडिलांनी कमवून ठेवलेली मालमत्ता! साधारणपणे एक वर्ग पूर्वजांच्या कमाईवर गुजराण करण्यात धन्यता मानताना दिसत आहे. अगदी जहागीरदारी जीवनपद्धती अवलंबून कुठलेही काम रोजगारासाठी न करणारी एक जमात समाजामध्ये पाहायला मिळते. ज्यामध्ये शासकीय प्रकल्पांमध्ये/ साठी जमिनी विकून फॉर्च्युनरमध्ये फिरणारी गुंठेबहाद्दर मंडळीही येतात! याशिवाय काही ठिकाणी नोकरीची गरज असताना आणि संधीही उपलब्ध असताना आळस, निष्क्रियता आणि नोकरी, व्यवसाय, शेती यामध्ये कष्ट करून मेहनत घेणे कमी प्रतिष्ठेचे समजूनही हे ऐच्छिक बेरोजगारीचे प्रमाण वाढीस लागले आहे असे समजते!

शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात एक चित्र सर्रास पाहायला मिळते. ते म्हणजे साधारण १८ ते २५ वर्षे हा वयोगट पबजी, ऑनलाइन रमी, यूट्यूब, इन्स्टाग्राम रील्स आणि एवढे सगळे झाल्यावर गावातील एखाद्या सुमार दर्जाच्या राजकारणी पुढाऱ्याच्या मागे दिवसभर मोटारसायकल फिरवत राहतो. रंगवलेल्या केसांचे तुरे, मोटारसायकलमध्ये स्वखर्चाने पेट्रोल टाकण्याची ऐपत नसतानाही, दिवसेंदिवस ‘पॉशमध्ये’ गावभर भटकणे आणि त्याच सुमार दादा/ भाऊ/ नाना यांच्या वाढदिवसाला केक घेऊन जाऊन दोन-चार सेल्फी ‘मारून’ स्वत:चा सामाजिक ‘स्टेटस’ मिरवणारा एक वर्ग! कितीही विदारक वाटले तरी आज हे चित्र गावागावांत पाहायला मिळतेच!

आता या वर्गाकडे साधारणपणे हाताला काहीच काम नाही असेही नाही. शेती, घरकाम किंवा इतरही आसपासची छोटीछोटी कामे करून स्वखर्च भागविण्याइतपत उत्पन्न ते नक्कीच कमावू शकतात. तरीही एकंदरच नोकरी, कष्ट करणे, मेहनत घेणे हे कमी दर्जाचे मानले जात आहे आणि त्यातून आळस, निष्क्रियता आणि आयत्या पिठावर केवळ रेघोट्या मारण्याची वृत्ती वाढीस लागत आहे. मानेवर दगड ठेवून दहा-बारा तास काम करण्याची सवय असणाऱ्या मागच्या पिढीने आपल्या कुटुंबासाठी दिवस-रात्र मेहनत करून, जोडलेली पै-पै या साऱ्याचा कुठलाच पायपोस या वर्गाला नसेल तर एकंदरीतच सगळे अवघड आहे.

मुळात रोजगार, नोकरी, व्यवसाय हे फक्त उत्पन्नाचे माध्यम नव्हे तर आयुष्याला शिस्त लावण्याची सुरुवात आहे! आणि ‘आरंभ है प्रचंड’प्रमाणे या छोट्या छोट्या गोष्टींची सवय लावून घेणे, अगदी सकाळी लवकर उठण्यापासून ते स्वत:च्या सर्व गोष्टी स्वत: करणे, या सर्व गोष्टींचा कुठलीही व्यक्ती यशस्वी होण्यामध्ये खूप मोठा सहभाग असतो. कारण कुणीही एका रात्रीत टाटा किंवा अंबानी होऊ शकत नाही. प्रचंड चिकाटी, सातत्य, दुर्दम्य ध्येयवाद आणि अविरत मेहनत अपरिहार्यच!

या साऱ्या गोष्टी एकत्र आणून आणि कुठलेही काम करण्याची लाज न बाळगता घराबाहेर पडाल तर येणारा प्रत्येक दिवस आपलाच असेल, याची जाणीव या वर्गाला होणे गरजेचे आहे! हातीपायी धडधाकट, कुठलेही शारीरिक काम पेलवण्याची क्षमता असे असतानाही भारतात श्रमप्रतिष्ठेला मिळणारा दर्जा हा दुय्यम प्रतीचा असल्याचे दिसते. आणि कदाचित हेच कारण असेल की चीनमध्ये एवढी प्रचंड लोकसंख्या असूनही तेथील रोजगार आणि दरडोई उत्पन्नाचा दर्जा भारतापेक्षा चांगला आहे. आवश्यक कौशल्ये, काम करण्याची तयारी आणि रोजगाराची उपलब्धता या त्रिसूत्रींवर मजबूत काम करत चीनने ॲपलसारख्या बलाढ्य कंपन्या आपल्या देशाकडे खेचून आणण्यात व टिकवण्यात यश संपादन केले आहे! म्हणूनच अनेक महत्त्वाच्या कंपन्या अशा देशांमध्ये पाय रोवणे पसंत करतात!

आणखी महत्त्वाची भूमिका बजावतात, ती वृत्तमाध्यमे! या तात्पुरत्या युवा नेत्यांना गॉगल लावून राजकीय बॅनर्स/ फ्लेक्सवर कोपऱ्यात का होईना झळकण्यास प्रोत्साहन आजची समाजमाध्यमे आणि वृत्तमाध्यमे यांतून मिळत आहे. कारण लोकशाहीचा चौथा खांब समजल्या जाणाऱ्या वृत्तवाहिन्यांवर दिवस-रात्र, २४ तास फक्त आणि फक्त राजकारणी, नेते आणि पुढारी यांच्या सवंग मूर्ख आणि बाष्कळपणाचा रतीब सुरू असतो. राजकारण आणि सत्ताकारण यापलीकडे जाऊनसुद्धा दैनंदिन जीवनात काही तरी सकारात्मक, विधायक काम करणारे लोक आहेत आणि त्यांना समाजासमोर आणावे, जेणेकरून हा समाज त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन राजकारणी व सेलिब्रिटी नट-नट्या यांव्यतिरिक्तही समाजात ‘हिरो’ आहेत, हे समजून घेण्यास उत्सुक होईल. जर बारकाईने पाहिले तर एखादा ग्रामपंचायत सदस्य अथवा नगरसेवक यांची दखल जेवढी माध्यमे घेतात व समाज घेतो, तेवढी लोकसेवा/ राज्यसेवा परीक्षा देणाऱ्या/ यशस्वी होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संघर्षाची घेतली जाते का?

यामध्ये समाज म्हणून आता एकच ठरवायचे आहे की आपण पाठबळ कशाला द्यायचे? तात्पुरत्या प्रतिष्ठेला की शाश्वात मूल्यांना! कारण विषय एवढाच आहे की आयुष्याला कष्टाची सवय लागण्याच्या वयात वाडवडिलांच्या पैशांवर चैन करायची जर सवय लागली तर ती आयुष्यभराची निष्क्रियता देऊन अक्षरश: ती पिढी बरबाद करून जाते! हे सर्व कळूनही हातातील हिरे सोडून गारगोट्या गोळा करत जायचे असेल तर तो शेवटी ज्याचा त्याचा प्रश्न!

 (लेखिका ‘इंदिरामाई फडणीस सामाजिक प्रतिष्ठान, पुणे’च्या संस्थापक/ संचालक आहेत.)