लोकसत्ता टीम

ऋषी सुनक यांची ब्रिटनच्या पंतप्रधानपदी बिनविरोध निवड झाल्यावर सुरू झालेल्या चर्चांचे प्रतिबिंब ब्रिटनप्रमाणेच अन्य देशांतील वृत्तपत्रांतही उमटले. सुनक हे ब्रिटनचे गेल्या सहा वर्षांतील पाचवे आणि गेल्या अवघ्या दोन महिन्यांतील तिसरे पंतप्रधान ठरणार आहेत. सुनक यांची गडगंज संपत्ती, ब्रिटिशांची वसाहत असलेल्या भारतातील त्यांची पाळेमुळे, त्यांचे हिंदू असणे, त्यांच्या समोरचे आर्थिक संकट आणि ते सोडवण्यासंदर्भातील त्यांचा दृष्टिकोन अशा अनेक मुद्द्यांनी बातम्यांना मुबलक विषय पुरविले आहेत. ब्रिटन, अमेरिका आणि भारतासह जगभरातील अनेक वृत्तपत्रे यावर कशी व्यक्त होत आहेत, हे पाहूया…

आर्थिक संकटात सापडलेल्या ब्रिटनच्या पंतप्रधानपदी ऋषी सुनक यांची निवड झाल्यामुळे त्यांची अर्थविषयक धोरणे आणि त्यांचा सर्वसामान्य ब्रिटिशांच्या जीवनावर होणारा परिणाम याविषयी चर्चा सुरू आहेत. याविषयी सुनक यांनी ‘आपण व्यक्तींना नव्हे तर धोरणांना प्राधान्य देऊ,’ असे म्हटल्याचे ‘द गार्डियन’च्या वृत्तात नमूद आहे. ‘द फायनान्शियल टाइम्स’ने सुनक यांच्या समोरील आर्थिक आव्हानांचा आढावा घेतला आहे. ‘शेअर बाजाराच्या दृष्टीने ट्रस यांचे वादळ शमले असून सुनक यांच्या काळात त्याची किंमत मोजावी लागणार आहे,’ अशा शब्दांत भविष्याकडे लक्ष वेधले आहे.

सुनक यांची अतिशय सधन पार्श्वभूमी नेहमीच चर्चेचा आणि काहीसा संशयाचा विषय ठरत आली आहे. ‘सोन्याचा चमचा घेऊन जन्मलेल्या माणसाला काय कळणार सामान्यांची दु:खं,’ अशा छापाच्या प्रतिक्रिया सर्वत्र व्यक्त झालेल्या दिसतात. ‘न्यू यॉर्क टाइम्स’ने लंडनहून प्रकाशित होणाऱ्या ‘द टाइम्स’च्या हवाल्याने म्हटले आहे की सुनक आणि त्यांची पत्नी अक्षता मूर्ती यांची एकत्रित संपत्ती आठ अब्जांच्या घरात असून ते जगातील २५० सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींच्या यादीत समाविष्ट आहेत. त्यामुळे सर्वसामान्य ब्रिटिशांना भेडसावणाऱ्या आर्थिक संकटाची तीव्रता त्यांना कितपत कळेल, याविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. त्यांना ब्रिटनला आर्थिक ओढगस्तीतून बाहेर काढण्याचे शिवधनुष्य पेलावे लागणार आहे. संभाव्य मंदी टाळण्यासाठी काही कटू निर्णयही घ्यावे लागतील.’

‘न्यू यॉर्क टाइम्स’च्या या वृत्तात असेही म्हटले आहे की, ‘‘ऑगस्टमध्ये सुनक यांना त्यांच्या संपत्तीविषयी प्रश्न करण्यात आला असता त्यांनी ‘आजच्या सुबत्तेसाठी मी स्वत:ला नशिबवान समजतो, मात्र मी जन्मत:च एवढा श्रीमंत नव्हतो. शिवाय आपल्या देशात व्यक्तीचे मूल्यमापन त्याच्या बँक बॅलन्सवरून नाही, तर त्याच्या चारित्र्यावरून आणि त्याने केलेल्या कामावरून होते,’ अशी प्रतिक्रिया दिली होती. त्यांच्या पत्नीच्या महागड्या पोशाखांवरून आणि त्यांच्या यॉर्कशायर आणि सांता मोनिका येथील घरांवरून नेहमीच चर्चा होत असते. आपण सर्वसामान्यांप्रमाणेच जीवन जगत असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न सुनक वारंवार करत असले, तरीही त्यांचे हे प्रयत्न दरवेळी फसतात आणि समाजमाध्यमांवर त्यातील त्रुटींचा खरपूस समाचार घेतला जातो,’ असे या वृत्तात म्हटले आहे.

असे असले तरीही, सुनक वाढती महागाई, घरांच्या वाढत्या किमती आणि घटते पगार किंवा मजुरी यावर नियंत्रण ठेवण्यात यशस्वी ठरतील, असा विश्वासही या वर्गातील अनेकांना आहे. सुनक निवडून आल्यामुळे एकीकडे करवाढीची भीती निर्माण झाली आहे, तर दुसरीकडे ही व्यक्ती देशाला आर्थिक संकटातून बाहेर काढू शकते, असेही मत व्यक्त होत आहे. ब्रिटनमधील अनेक वृत्तपत्रांनी सुनक यांच्या निवडीचे स्वागत केले आहे. ‘द मेल’ने त्यांचे स्वगत ‘ब्रिटनमध्ये नवी पहाट’ अशा शब्दांत केले आहे. ‘द सन’ या छोट्या- टॅबलॉइड आकाराच्या आणि सनसनाटी बातम्या देणाऱ्या- वृत्तपत्राने, ऋषी सुनक हे मतदान न होताच विजयी झाल्याचे अधोरेखित करत, आता त्यांच्या रूपाने ब्रिटनला आशेचा किरण दिसू लागल्याचे म्हटले आहे.

सुनक यांच्या बिनविरोध निवडीमुळे नकारात्मक प्रतिक्रियाही उमटल्या आहेत. ‘द मिरर’ने म्हटले आहे, ‘आमचे नवे पंतप्रधान, पण तुम्हाला मते कोणी दिली? राजे चार्ल्स दुसरे यांच्यापेक्षाही दुप्पट श्रीमंत असलेले सुनक पंतप्रधान झाले आहेत, मात्र त्यांना आर्थिक नाड्या आवळाव्या लागणार आहेत.’ स्कॉटलंडमधील डेली रेकॉर्ड या वृत्तपत्राने अधिक कठोर टीका करत या घटनेचे वर्णन ‘लोकशाहीचा अंत’ अशा शब्दांत केले आहे. ‘काही आठवड्यांपूर्वीच त्यांच्या स्वत:च्याच पक्षाने त्यांना नाकारले होते. आता ते एकच उमेदवार उरले आहेत. केवळ १०० मतांच्या आधारे सुनक देशाचे पंतप्रधान होणार आहेत.’ द टाइम्सने, ‘पक्षातील भेगा बुजवण्यात अपयश आल्यास पक्ष संपुष्टात येईल. त्यामुळे एकतर एकत्र या नाहीतर नष्ट व्हा,’ या सुनक यांच्या वक्तव्याचे विश्लेषण केले आहे.

ब्रिटनमधील हुजूर पक्ष हा पारंपरिकदृष्ट्या कर्मठ विचारांचा पक्ष म्हणून ओळखला जातो. या पक्षाच्या ध्येयधोरणांत आजही वर्णभेद, मुस्लिमांचा द्वेष, एलजीबीटीक्यू वर्गाविषयी नकारात्मक दृष्टिकोन, स्थलांतराला विरोध अशा वृत्ती डोकावत असल्याची टीका आजवर अनेकदा झाली आहे. मात्र गेल्या काही वर्षांत ही प्रतिमा बदलू लागली आहे. त्याविषयी ‘द न्यू यॉर्क टाइम्स’मध्ये मार्क लँडलर यांनी केलेल्या विश्लेषणात म्हटले आहे, ‘गेल्या काही वर्षांत महिला आणि गौरेतरांबाबतच्या पक्षाच्या धोरणांत सकारात्मक बदल झालेले दिसतात. लिस ट्रस यांच्या कॅबिनेटमध्येही दोन कृष्णवर्णीय पुरुष आणि एका कृष्णवर्णीय महिलेला महत्त्वाचे स्थान देण्यात आले होते. विरोधी पक्ष असलेल्या मजूर पक्षाने मात्र आजवर एकाही महिलेची नेतेपदी निवड केलेली नाही. २०१९मधल्या सार्वत्रिक निवडणुकांत हुजूर पक्षाच्या एकूण निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींत महिलांचे प्रमाण एक चतुर्थांश होते. पक्षाच्या एकूण उमेदवारांपैकी सहा टक्के उमेदवार अल्पसंख्याक वर्गातील होते.’

असे असले तरीही हा समभाव केवळ एका उच्चभ्रू वर्गापुरताच मर्यादित राहिल्याचीही टीका होतेच. ‘सुनक हे भारतीय वंशाचे असले, तरीही ते ऑक्सफर्ड आणि स्टॅनफर्ड विद्यापीठात प्रवेश घेण्यापूर्वी विंचेस्टर या लब्धप्रतिष्ठितांच्या महाविद्यालयात शिकले होते.’ असा दाखला दिला जातो. मात्र हा दावा डेव्हिड कॅमेरॉन यांनी खोडून काढला आहे, ‘२०१५ साली माझ्या मंत्रिमंडळात समाविष्ट असलेले साजिद जाविद हे एका पाकिस्तानातून स्थलांतर केलेल्या बस चालकाचा मुलगा होते. जुना आणि कर्मठ हुजूर पक्ष आता अशा भिन्न पार्श्वभूमीच्या व्यक्तींनाही पुढे आणण्यात यशस्वी होत आहे,’ असे कॅमेरॉन यांनी स्पष्ट केले आहे.

ब्रिटन आणि वेल्समध्ये मिळून भारतीय वंशाचे १५ लाख लोक राहतात. इथे आलेल्या भारतीयांनी प्रदीर्घ काळ वंशभेदाचा सामना केला आहे, समतेसाठी संघर्ष केला आहे. त्यामुळे या समूहासाठी सुनक यांचा विजय ही फार महत्त्वपूर्ण घटना आहे. त्यांचे हिंदू असणेही चर्चेचा विषय ठरत आहे. त्यांच्या धर्मपालनाविषयी न्यू यॉर्क टाइम्सच्या वृत्तात म्हटले आहे की, ‘सुनक यांना त्यांच्या भारतीय असण्याचा अभिमान आहे. ते आजही हिंदू धर्माचे पालन करतात. संसद सदस्यपदाची शपथ घेतानाही त्यांनी ती गीतेवर हात ठेवून घेतली. दिवाळीत ते स्वत:च्या घराबाहेर दिवे लावून रोषणाई करतात. मात्र आपले राजकारण त्यांनी या मुद्द्याभोवती गुंफले नाही. त्यांचा अर्थ क्षेत्रातील अनुभवच नेहमी त्यांच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी राहिला आहे. ब्रिटिश माध्यमांनीही कधीही या मुद्द्यांवर भर दिला नाही.’

काहींच्या मते सुनक यांचा विजय ही अतिशय आश्वासक घटना आहे. ‘आजवर ब्रिटनमधील आशियाई लोक आपले सण-उत्सव मोकळेपणाने साजरे करताना कचरत असत. उत्सवांबाबत उत्साह दाखविल्यास आपण अद्याप पुरेसे ब्रिटिश झालेलो नाही, असा अर्थ काढला जाईल, याची भीती त्यांना वाटत असे. मात्र आपल्या संस्कृतीचा नेहमीच खुलेपणाने उल्लेख करणारे सुनक देशातील सर्वोच्च पदी विराजमान झाल्यामुळे आता ही भीती काही प्रमाणात तरी दूर होईल,’ अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. मात्र त्याच वेळी ‘असे असले तरीही, ब्रिटनमधून वर्णभेद पूर्ण नष्ट झाला आहे, असा निष्कर्ष काढता येणार नाही. सुनक यांचा लिस ट्रस यांच्याकडून पराभव झाला त्यामागेही काही प्रमाणात वर्णभेदच होता,’ असे मतही व्यक्त होत असल्याचे तेथील विविध वृत्तांतून दिसते.

पण युरोपात भारतीय वंशाची व्यक्ती पंतप्रधान होणे ही खरोखरच दुर्मीळ घटना आहे का? ‘वॉशिंग्टन पोस्ट’साठी लिहिलेल्या लेखात अमेरिकास्थित विश्लेषक ईशान थरूर म्हणतात, ‘युरोपातील एखाद्या देशात भारतीय व्यक्ती पंतप्रधान होणे ही काही नवी गोष्ट नाही. पोर्तुगालमध्ये गोवन वंशाच्या दोन व्यक्तींनी सर्वोच्च पद भूषविले आहे. आताचे अध्यक्ष अँटोनियो कोस्टा हेदेखील भारतीय वंशाचेच आहेत. २०१७ ते २०२० या कालावधीत आयर्लंडचे पंतप्रधान असलेले लिओ वराडकर यांचे वडील मुंबईकर होते. मात्र भारतावर राज्य करणाऱ्या ब्रिटनच्या सर्वोच्च स्थानी भारतीय व्यक्ती विराजमान होणे हे खास आहे. विन्स्टन चर्चिल यांनी एकदा भारतीयांचे वर्णन ‘रानटी धर्म पाळणारे रानटी लोक’ असे केले होते. आता त्याच धर्माचे पालन करणारी व्यक्ती गीता हाती घेऊन ब्रिटनच्या पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहे.’

या वृत्तात म्हटले आहे की, ‘ऋषी सुनक यांचे जीवन स्थलांतरितांच्या यशोगाथांमध्ये शोभावे असेच आहे. आपल्या भूतकाळाविषयी सुनक सांगतात… माझ्या आजी-आजोबांनी हाती काहीच नसताना स्थलांतर केलं. आज मी देशाच्या सर्वोच्चस्थानी पोहोचणे त्यांच्यासाठी अतिशय अभिमानास्पद आहे. शिक्षणाच्या वाटेवरूनच आम्ही इथवर पोहोचलो.’ सुनक यांच्या आजोबांनी त्यांचे वर्णन ‘आमचा बराक ओबामा क्षण’ अशा शब्दांत केले आहे.

थोडक्यात, ब्रिटनमध्ये कितीही राजकीय आणि आर्थिक उलथापालथ सुरू असली आणि एकेकाळी ज्यांच्या साम्राज्यावरचा सूर्य कधीच मावळत नसे अशा या देशाच्या भविष्याविषयी अनेक प्रश्न उपस्थित होत असले, तरीही सध्या तरी सुनक यांच्या निवडीने सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. सुनक यांची ध्येयधोरणे देशाला आर्थिक शिस्त लावतील आणि समान्यांचे जीवन सुसह्य करतील, असा आशावाद, जगभरातील वृत्तपत्रांतून व्यक्त होत आहे. अर्थात त्याला अपवादही आहेतच…

(या मजकुराचे संकलन विजया जांगळे यांनी केले आहे.)