Sacheen Littlefeather become the voice of America's marginalized people , how? | Loksatta

सशीन लिटलफेदर अमेरिकेतील उपेक्षितांचा आवाज ठरल्या; त्या कशा?

सशीन लिटलफेदर यांची एक कृती अमेरिकी सांस्कृतिक, सामाजिक तसेच राजकीय क्षेत्राला वळण देणारी ठरली.

सशीन लिटलफेदर अमेरिकेतील उपेक्षितांचा आवाज ठरल्या; त्या कशा?
सशीन लिटलफेदर अमेरिकेतील उपेक्षितांचा आवाज ठरल्या; त्या कशा? ( छायाचित्र सौजन्य – सोशल मीडिया )

चंद्रकांत कांबळे

जागतिक सिनेमाच्या इतिहासामध्ये मैलाचा दगड बनून आपले स्थान अबाधित ठेवणारा फ्रान्सिस कोपोलो दिग्दर्शित ‘द गॉड फादर’ १९७३ साली प्रदर्शित झाला. सिनेमाच्या इतिहासात तो अजरामर झालाच, त्यासोबतच तत्कालीन अमेरिकन सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय वातावरणाला प्रभावित करून नवी दिशा देणारा ठरला. श्वेतवर्णीय लोकांचे संपूर्ण नियंत्रण आणि मक्तेदारी असणारा सिनेक्षेत्रातील सर्वोच्च मानला जाणारा ऑस्कर पुरस्कार १९७३ साली उत्कृष्ट अभिनयासाठी ‘द गॉड फादर’चा मुख्य अभिनेता मार्लन ब्रँडो यांना जाहीर झाला.

तत्कालीन मूलनिवासी वंचित अमेरिकन लोकांना (रेड इंडियन्स) सिनेमा व्यवसाय क्षेत्राकडून मिळालेल्या अन्यायकारक वर्तणुकीचा निषेध म्हणून ऑस्कर ॲकॅडमी अवॉर्ड नाकारत असल्याची भूमिका मार्लन ब्रँडो यांनी घेतली. त्यांच्या वतीने सशीन लिटलफेदर यांनी ती मांडली. कृष्णवर्णीय दिग्दर्शक इव्हान डिक्सन यांचा ‘द स्पूक हू सॉट बाय द डोअर’ (१९७३) हा सिनेमा अचानकच सिनेमागृहांमधून रहस्यमयरीत्या काढून टाकण्यात आला होता. चारच वर्षांपूर्वी मार्टिन किंग जुनियर (१९६८) यांची हत्या करण्यात आली होती. एकंदरीतच या काळात अमेरिकन सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक राजकारण अत्यंत महत्त्वाच्या वळणावर होते. मूलनिवासी वंचित अमेरिकन आणि कृष्णवर्णीय यांच्यावर होणाऱ्या अमानुष अन्याय आणि अत्याचाराचा निषेध म्हणून मार्लन ब्रँडो यांनी हा ऐतिहासिक निर्णय घेतला होता. ब्रँडो यांनी एक पत्र लिहून आपले सविस्तर म्हणणे नमूद केले होते.

मूलनिवासी अमेरिकन लोकांच्या नागरी हक्कांसाठी लढणाऱ्या अभिनेत्री सशीन लिटलफेदर या मार्लन ब्रँडो यांच्या वतीने ऑस्कर पुरस्कार नाकारायला उपस्थित होत्या. पोलीस बळाचा वापर करून अतिशय वाईट पद्धतीने त्यांना तेथून हाकलून दिले गेले. हा ऑस्कर सोहळा पहिल्यांदाच जगभर लाइव्ह प्रक्षेपित होत होता. त्यामुळे त्यांना त्या ठिकाणी मिळालेल्या वागणुकीची जगभर चर्चा झाली. नुकतेच दोन ऑक्टोबर रोजी त्यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी स्तनाच्या कॅन्सरमुळे निधन झाले. त्यानिमित्ताने त्या ऐतिहासिक घटनेची जगभर पुन्हा चर्चा होत आहे. श्वेतवर्णीयांच्या सांस्कृतिक आणि राजकीय वर्चस्ववादी सत्ताशक्तीने लिटलफेदर यांना पुढे अनेक वर्षे छळले. सिनेमाच्या मुख्य प्रवाहात काम न मिळणे इथपासून ते वेळोवेळी अनुल्लेखाने टाळणे, त्यांचे अस्तित्वच नाकारणे या प्रकारांमुळे लिटलफेदर यांना हा लढा लढायला अधिक बळ मिळत राहिले.

उपेक्षितांना आपली वेगळी ओळख, वेगळी संस्कृती मांडता यावी, त्यांचे अचूक चित्रण केले जावे आणि त्यांना योग्य प्रतिनिधित्व मिळावे यासाठी आफ्रिकन, अमेरिकन कृष्णवर्णीय कलाकारांनी ‘ब्लॅक सिनेमा’ या संकल्पनेला मूर्त रूप द्यायला सुरुवात केली. सिनेमागृहांमधून अचानक काढून टाकलेला इव्हान डिक्सनचा सिनेमा याच चळवळीचा भाग होता.

अकॅडमी अवॉर्डच्या इतिहासामध्ये कृष्णवर्णीय कलाकारांना नगण्य स्थान मिळाले होते. श्वेत कलाकारांच्या तुलनेत अगदी हाताच्या बोटांवर मोजता येतील इतकी नगण्य पारितोषिके मिळाली होती. श्वेतवर्णीयांचे पारंपरिक वर्चस्व संपूर्ण सिनेमा इंडस्ट्रीवर असल्यामुळे साहजिकच होते. मात्र एक श्वेत कलाकार सामाजिक समता, न्यायासाठी आणि उपेक्षितांच्या योग्य प्रतिनिधित्वासाठी मिळालेला ऑस्कर नाकारतो यामुळे श्वेत राजकीय, सांस्कृतिक सत्ताशक्ती भांबावून गेली होती. श्वेतवर्णीयांच्या पारंपरिक मक्तेदारीला या प्रसंगाने चांगलीच ठेच बसली होती.

तत्कालीन मूलनिवासी अमेरिकन लोकांना सिनेमा इंडस्ट्रीकडून मिळालेल्या अन्यायकारक वर्तणुकीचा निषेध म्हणून आपण ऑस्कर अकॅडमी अवॉर्ड नाकारत असल्याची भूमिका मार्लन ब्रँडो यांच्या वतीने सशीन लिटलफेदर यांनी जाहीर केली. ४० सेकंदांच्या या भाषणाने अमेरिकन सांस्कृतिक वर्चस्वाला हादरा दिला गेला. विशेष महत्त्वाचे पुढे ५० वर्षांनंतर ऑस्कर अकॅडमीने मार्लन ब्रँडो यांच्या या भूमिकेचे समर्थन करून सशीन लिटलफेदर यांची जाहीर माफी मागितली गेली. जगातल्या प्रगत देशातील विशिष्ट वर्गाची मक्तेदारी उद्ध्वस्त करायला अनेक शतकांचा कालावधी जावा लागला. दिलगिरी आणि क्षमाभाव व्यक्त करायला दशके जावी लागली. त्यानंतरच्या काळात ‘ब्लॅक सिनेमा’ चळवळीने जोर धरला. कृष्णवर्णीयांचे अचूक चित्रण व्हायला आणि त्यांना योग्य प्रतिनिधित्व मिळायला सुरुवात झाली. याचाच परिणाम म्हणून ‘ट्वेल्व्ह इयर्स अ स्लेव्ह’ या सिनेमाला अनेक ऑस्कर पुरस्कारांनी पुरस्कृत केले. यानंतर ब्लॅक पॅन्थर, मूनलाइट, ग्रीन बुक, आणि जुडेस अँड द ब्लॅक मसीहा ऑस्कर पुरस्काराचे मानकरी ठरले. अलीकडील हॅशटॅग ‘ऑस्कर सो व्हाइट’ आणि ‘ब्लॅक लाइव्ह्ज मॅटर’ या महत्त्वपूर्ण चळवळीमुळे पारंपरिक मक्तेदारीची पकड सैल होत गेली. असे असले तरी हॉलीवूड डायव्हर्सिटी अहवालाने वंचित, वांशिक, अल्पसंख्याक, महिला, भिन्नलिंगी, अमूलनिवासी अमेरिकनांचे योग्य प्रमाणात प्रतिनिधित्व झाले नसल्याचे नोंदवले आहे.

मोशन पिक्चर्स अॅकॅडमीच्या माफीनाम्यानंतर लिटलफेदर म्हणाल्या, “आम्हा मूलनिवासी अमेरिकन लोकांकडे खूप चिकाटी आहे. आम्ही फक्त ५० वर्षे घेतली माफीसाठी. आम्ही हसतखेळत जगणारे लोक आहोत. मी एका स्वाभिमानी मूलनिवासी स्त्रीप्रमाणे सन्मानाने, धैर्याने, आणि नम्रतेने तिथे गेले. मला माहीत होते की मला खरे बोलायचे आहे. काही लोक ते मान्य करतील. आणि काही लोक ते मान्य करणार नाहीत.”

“मी आज आहे, उद्या नसेन, पण माझे शब्द नेहमी लक्षात ठेवा. तुम्ही सत्यासाठी उभे राहाल तेव्हा तुम्ही माझा, आपल्या देशाचा आणि आपल्या लोकांचा आवाज जिवंत ठेवाल.” या आशयाचे ट्वीट करून ऑस्कर अकॅडमीने सशीन लिटलफेदर यांना श्रद्धांजली वाहिली.

chandrakant.kamble@simc.edu

लेखक सिंबायोसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी, पुणे येथे वरिष्ठ संशोधक आहेत.

मराठीतील सर्व विशेष लेख ( Features ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
सायबर विश्वात वावरताना सावध राहायला पर्याय नाही; असे का?

संबंधित बातम्या

सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तिवेतनाला ‘ओझे’ म्हणणे ही नाण्याची एक बाजू…
स्पर्धा परीक्षांमधील यशाचा इतका जल्लोष करणे योग्य नाही…
अपंगांसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करून नेमके काय साधणार?

व्हिडिओ

ताज्या बातम्या
भाजपकडून महाराष्ट्राचे तुकडे करण्याचे कटकारस्थान; नाना पटोले यांची टीका
“ओंकारने आधीच सांगितलं असतं तर…” ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे दिग्दर्शक स्पष्टच बोलले
FIFA WC 2022: दिग्गज मॅराडोनाचा मेस्सीने मोडला विक्रम! ऑस्ट्रेलियावर मात करत अर्जेंटिना पोहचली क्वार्टर फायनलमध्ये
IND vs BAN 1st ODI: नाणेफेक जिंकून बांगलादेशचा प्रथम गोलंदाजीचा निर्णय, पाहा दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
“मी शिवभक्त म्हणूनच सांगतोय…; राज्यपाल हटवण्याची मागणी करणाऱ्या आंदोलकांना सहकारमंत्री अतुल सावेंचं आश्वासन